नववधूचा मेकअप

समृद्धी धायगुडे 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी : विवाह विशेष
 

 
लग्नसमारंभ किंवा घरगुती कार्यक्रम समारंभासाठी पेहरावासोबतच मेकअपलाही पुष्कळ महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः लग्नासोहळे रिसेप्शन यांसारख्या कार्यक्रमात प्रत्येकजण स्वतःची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण करून घेत असतो. अर्थातच यामध्ये सर्वांचे लक्ष नववधूंकडे जास्त असते. तिचा पेहराव, मेकअप, हेअरस्टाइल याकडे सर्वांचेच लक्ष असते. नववधुंनी आपल्या मेकअप करताना फक्त एक दिवसाचा विचार करून चालत नाही तर त्यासाठी आधीपासून बरीच पूर्वतयारी करावी लागते. नववधूने मेकअपसोबत त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक असते. आरोग्यदायी त्वचा असेल तर मेकअप केल्यावर आणि लग्नानंतरही दीर्घकाळ आपण सुंदर दिसू शकतो. ही तयारी कशी करावी, काय काळजी घ्यावी याविषयी...

चेहऱ्याचा मेकअप 

 • ब्रायडल मेकअप करताना लाइट पिंक ब्लशर वापरावे, कारण तो तुम्हाला नैसर्गिक लुक मिळवून देतो. हा ब्लशर तुमचे गाल हायलाईट करतो. गोऱ्या किंवा थोड्या सावळ्या मुलींना हा मेकअप उठून दिसेल. 
 • त्वचेला अधिक चमक आणि फ्रेश लुक देण्यासाठी मॅट कॉम्पॅक्‍ट वापरू शकता आणि मेकअप सील करू शकता.  
 • लग्नादरम्यान थोडा थकवा येतो. या सर्व धावपळीत त्वचादेखील रुक्ष दिसू लागते. अशावेळी चेहऱ्यावर फेस मिस्ट स्प्रे करावा. हा स्प्रे जास्त अगदी कमी प्रमाणात वापरावा कारण थोडा जास्त झाला तर मेकअप मेल्ट होण्याची शक्‍यता असते.
 • लाइट ब्रॉन्जरमुळे तुमच्या चेहऱ्याला चमक मिळते आणि चेहरा सुरेख दिसतो. 
 • गालावर ॲपल लाइट कलर वापरल्याने तुमच्या चीक बोन्सला परफेक्‍ट शेप देऊ शकता. हे तुम्ही डार्क शेडसोबत वापरू शकता.   
 • चेहरा आणि गळ्याला लूज शिमर पावडरची लाइट शेड लावावी. चिकबोन्स हायलाईट करण्यासाठी डार्क ब्रॉन्ज़रचा वापर करावा.

ब्रायडल आय मेकअप 

 • मेटॅलीक स्मोकी आइजसाठी ब्राँझ आयशॅडो परफेक्‍ट पर्याय आहे. यासोबत तुम्ही हायलाईटरही वापरू शकता. 
 • ज्वेलटोन आयलायनर आणि आयशॅडोने डोळ्यांना एक वेगळा लुक देऊ शकतो. यामध्ये ब्ल्यू, पर्पल, ग्रीन यासारख्या शेड खास उठून दिसतात.  
 • जर तुम्हाला फॉल्स आयलॅशेज आवडत नसतील वोल्युमआयजींग तर मस्कारा वापरू शकता.   
 • बोल्ड लूकसाठी जेल आयलायनर वापरू शकता. 
 • ओठांची काळजी 
 • मॉइश्‍चराइजिंग लीप बाम हा लिपस्टिकसाठी परफेक्‍ट बेस आहे. यामुळे ओठ मऊ राहतात. 
 • संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी कोरल लीप कलर वापरू शकता. तसेच यासोबत विंग्ज आयलायनर लुक ट्राय करू शकता.
 • लाल रंगाच्या लिपस्टिक कायमच हॉट ट्रेंडमध्ये आहे. इव्हिनिंग लूकसाठी रेड मॅट लिपस्टिक वापरू शकता. 
 • तुम्हाला जर ग्लॉस, शाइन लिप्स आवडत असतील पिंक लीप कलरवर ग्लॉस ट्राय करू शकता.  

त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य मिळविण्यासाठी 
     त्वचेची काळजी घेण्यासाठी ’क’जीवनसत्त्व सिरम वापरावे. हे त्वचेसाठी उपयुक्त असते यातील अँटी ऑक्‍सिडन्ट त्वचेला नेहमी तरुण ठेवतात आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो. ’क’ जीवनसत्त्वाचे सिरम त्वचेला रिंकल फ्री आणि मऊ ठेवते.
     त्वचा चांगल्या प्रकारे मॉइश्‍चराइज करण्यासाठी थिक, क्रिमी आणि बॉडी बटर्सचा वापर करावा. बॉडी बटर्स त्वचेचे पोषण करतात. त्यात आवश्‍यक जीवनसत्त्व असतात. यामध्ये कोकोनट, ऑइल, बटर आणि बीवैक्‍स हे प्रकार येतात. हे प्रकार त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात आणि खोलवर पोषण करतात. हे चेहऱ्याला कधीही लावू नये, कारण चेहऱ्याची त्वचा पातळ असते. बॉडी बटर्समुळे चेहऱ्यावर एलर्जीचे पिंपल्स उठतात.
     टिंटेड मॉइश्‍चरायजर अतिशय फायदेशीर असते. ते त्वचेला नैसर्गिक उजळपणा देतात. हे लावल्यावर फाउंडेशन लावायची गरज पडत नाही. हे इंस्टंट मॉइश्‍चराइजिंग करते. डाग लपवून इव्हन टोन देते. हे खरेदी करताना लक्षात ठेवावे, की हे थोडे लाइट आणि नॉन ग्रीसी असेल, यात सॅन प्रोटेक्‍शन घटक असून ते आपल्या त्वचेशी मिळते जुळते असेल असे बघून खरेदी करावी. यामधील शिया बटर त्वचेत ओलावा कायम ठेवून त्यातील ’अ’ जीवनसत्वामुळे तरुण ठेवते.      
     चेहऱ्याची आणि शरीराच्या त्वचेनंतर लक्ष जाते ते पायांकडे. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. यासाठी तुम्ही फ्रूट स्क्रब करून टाचांची डेड स्कीन काढून मुलायम करते. याशिवाय स्क्रबिंगमुळे रक्तप्रवाह चांगला सुधारतो.   

उन्हाळ्यात नववधूंनी त्वचेची काळजी कशी घ्यावी 
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्याच वाढतात. तुम्ही जरा याच सिजनमध्ये लग्नाची तारीख निश्‍चित करत असाल तर तुमची
त्वचा उजळण्यासाठी काही सोपे उपाय करून बघावे. लग्नाच्या आधीपासून ते लग्नानंतर सर्व घडामोडी छायाचित्राच्या रूपाने आपण साठवतो. यासाठी 
प्रत्येक पेहराव, दागिना, ॲक्‍सेसरीज निवडताना मुली काळजी घेतात. पण या सगळ्यामध्ये आपण त्वचेची काळजी घ्यायला विसरतो.  

 • त्वचा निरोगी असणे हे आत्मविश्वास वाढवतो. त्वचा उजळण्यासाठी बॉडी कन्ट्युरिंग, स्कीन लाइटनिंग, स्कीन रिज्युवेनेशन, स्कार्स रिमूव्हिंग, फेस लिपिंटग, लेझर चिकित्सा, डर्मल फिलर्स, यासारखे उपचार आपण डॉक्‍टरांच्या मदतीने घेऊ शकतो.
 • या उपचारांमुळे खूप फायदा होतो, तसेच यामुळे पुरळ, केस गळती, ब्लॅकहेड्‌स, पिगमेंटेशन, रिंकल्स, डाग पडणे हे प्रकार थांबतात. फेशियलमुळे चेहऱ्याचा गेलेला उजळपणा परत मिळविता येतो.
 • तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे त्यावर हे उपचार कसे करायचे हे निश्‍चित करावे. तुमच्या त्वचेला सर्वार्थाने उजळवणारी ट्रीटमेंट निवडावी. लग्नासारख्या प्रसंगी नववधू म्हणून त्वचेला उजळपणा येणे खूप महत्त्वाचे आहे.     
 • डॉक्‍टरांकडे उपचार सुरू करणार असाल तर लग्नापूर्वी सहा महिने तयारी सुरू करावी. बहुतेक मुली हल्ली मसाज, बॉडी पॉलिशिंग, सर्जिकल नोज, हायड्रफेशियल यासारख्या सेलिब्रेटी ट्रीटमेंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट करण्यासाठी येतात.
 • त्वचेवर काळे डाग असतील तर त्वचा तज्ज्ञांकडे जाऊन त्वरित लेझर उपचार घ्यावेत किंवा फोटो फेशियल, क्रीम्ससारखी उत्पादने त्वचेला चमक आणतात.     
 • तुमच्या चेहऱ्यावर खूप केस असतील तर तुम्ही लेझर हेअर रिमूव्हर उपचार घेऊ शकता. मात्र हे उपचार लग्नापूर्वी सहा महिने सुरू करावे लागतात.
 • रोज त्वचेला स्वच्छ करण्यासाठी मॉइश्‍चराइजर लावावे. घराबाहेर पडल्यावर प्रत्येक ठिकाणी प्रदूषण आहे. अशा परिस्थितीत प्रिब्रायडल पॅकेज स्वीकारणे अनिवार्य झाले आहे.  

’प्री-ब्राइडल’चा नवा ट्रेंड 
ही प्रक्रिया प्रामुख्याने लग्नापूर्वी केली जाते. त्वचेची नीट देखभाल करण्यासाठी सध्या बाजारात ’प्री ब्रायडल पॅकेज’ उपलब्ध आहेत. ’प्री-ब्राइडल’ची विविध पॅकेजेस आयुर्वेदिक किंवा नामांकित ब्रॅण्डच्या पार्लरमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. येथील सर्व ट्रीटमेंटसाठी आपल्या बजेटनुसार आहेत का? स्वच्छता, सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या तपासाव्यात.
 लग्नापूर्वी पूर्ण एक दिवस व्यतीत करावा लागू शकतो. लग्नापूर्वी दोन-चार दिवस मेनिक्‍युअर, पेडीक्‍युअर, फेशियल, वॅक्‍सिंग, थ्रेडींग, स्पा, बॉडी पॉलिश, मसाज असलेली पॅकेजेस निवडू शकतो. यानंतर शक्‍य असेल तर प्रिब्रायडल बाथचीदेखील निवड आपण करू शकतो. यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर सुगंधी द्रव्यांचा समावेश केलेला असतो. ही निवडताना शक्‍यतो विश्वासू आणि अधिकृत ठिकाणी जावे.    

याशिवाय लग्नापूर्वी दोन-चार महिन्यापासून प्री-ब्रायडल प्रक्रिया सुरू करू शकता. मात्र या सर्व प्रक्रिया तुम्हाला दर महिन्याला कराव्या लागतील. या प्रक्रियांमध्ये विशेषतः मेनिक्‍युअर,पेडीक्‍युअर,फेशियल (त्वचेच्या पोतानुसार), वॅक्‍सिंग, केसांची काळजी इत्यादींचा समावेश होतो. या सर्व क्रिया जर तुमच्या बजेट बाहेरच्या असतील लग्नापूर्वीच एक दिवसाचे पॅकेज स्वीकारू शकता. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या