जॉर्ज नावाचे वादळ

सौजन्य ः सकाळ पेपर्स
गुरुवार, 31 जानेवारी 2019

लढवय्या कामगार नेता, लोहियावादाचा खंदा पुरस्कर्ता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक आणि संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे मुहूर्तमेढकर्ते अशी अनेक बिरुदे मिरविणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांची कारकिर्दही तितकीच रोमांचक ठरली...

जॉन जोसेफ फर्नांडिस आणि अलिस मार्था फर्नांडिस यांच्या पोटी ३ जून १९३० रोजी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. मंगळूरमधील कॅथॉलिक कुटुंबातील जॉर्ज हे सहावे अपत्य. त्यांच्या आई किंग जॉर्ज पाचवे यांच्या चाहत्या, जॉर्ज यांचा जन्मही ३ जूनचा असल्याने नाव त्यांचे ठेवण्यात आले. त्यांचे वडील पिअरलेस फायनान्सचे दक्षिण भारतातील काम पाहायचे. जॉर्ज यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण मंगळूरच्या सेंट अलायसीस महाविद्यालयात झाले. अत्यंत धार्मिक अशा फर्नांडिस (पिंटो) कुटुंबातील जॉर्जला धार्मिक शिक्षणासाठी बंगळूरच्या सेंट पीटर्स सेमिनरीत धाडण्यात आले. दोन वर्षांच्या प्रशिक्षणात, उक्ती आणि कृतीत फरक आहे, अशी जाणीव झाल्याने त्यांनी चर्चचे शिक्षण सोडून दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी मंगळूरमधील वाहतूक आणि हॉटेल कामगार यांचे संघटन सुरू केले. 

फर्नांडिस यांनी १९४९ मध्ये नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. त्यांना वृत्तपत्रात मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली. ज्येष्ठ कामगार नेते प्लासीड डिमोले, समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले. पन्नासच्या दशकात ते मुंबईच्या कामगार विश्‍वातील प्रभावी नेते झाले. फर्नांडिस यांनी १९६७ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांना एकदम प्रकाशझोतात आणणारा ठरला. काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले, दोन दशके राजकारण गाजवणारे सदाशिव कानोजी ऊर्फ स. का. पाटील यांच्या विरोधात त्यांनी दक्षिण मुंबईतून संयुक्त सोशालिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी ४८.५ टक्के मते मिळवत पाटील यांचा दारूण पराभव केला. त्या वेळी ‘जॉर्ज द जायंट किलर’, अशी घोषणाच झाली. या निवडणुकीने स. का. पाटील यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली. 

रेल्वेमनचा संप
फर्नांडिस यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रभावीपणाचा अाविष्कार म्हणून १९७४ मधील रेल्वेमनच्या संपाकडे पाहिले जाते. त्यांनी फेब्रुवारी १९७४ मध्ये नॅशनल कोऑर्डिनेटिंग कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल (एनसीसीआरएस) स्थापन केली. त्याच्या झेंड्याखाली कामगारांच्या संघटना, विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. त्याला मुंबई बेस्ट बस आणि टॅक्‍सी चालकांनी, मद्रासच्या कोच कारखान्यातील दहा हजारांवर कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, गोदीतील संपकरी कामगार अशा सर्वांचा पाठिंबा लाभला होता. सरकारने कामगार नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. अखेरीस २७ मे १९७४ रोजी एकतर्फी संप मागे घेण्यात आला. या संपाने तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी बेचैन झाल्या. त्यांनी जून १९७५ मध्ये आणीबाणीची घोषणा केली. फर्नांडिस यांना अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचे त्या अवतारातील छायाचित्र हे आणीबाणीच्या काळातील दहशतीचे 
प्रतीक बनले.

तीन लाखांचे मताधिक्‍य
आणीबाणीच्या काळातील त्यांच्यावरील बडोदा डायनामाईट खटला खूप गाजला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. आणीबाणी मागे घेतल्यावर सार्वत्रिक निवडणूक होऊन जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले. त्या वेळी बडोदा डायनामाईट खटल्यात तुरुंगात असलेल्या फर्नांडिस यांनी बिहारातील मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. मतदारसंघातही न जाता त्यांना तीन लाखांचे मताधिक्‍य लाभले. देसाई मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री झाले. ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी ‘आयबीएम’ आणि ‘कोका कोला’ यांच्याशी कायद्याची लढाई लढली, या कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला. 

समता पक्षाची स्थापना 
फर्नांडिस यांनी १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (आधीचा जनसंघ) आघाडी केली, १९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्रातील १३ दिवसांच्या सरकारात सामील झाले. २४ पक्षांची मोट असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) १९९९ ते २००४ या काळात केंद्रात कारभार केला. फर्नांडिस आघाडीचे समन्वयक झाले. २००३ मध्ये फर्नांडिस यांच्या पुढाकाराने संयुक्त जनता दलाची स्थापना झाली. संरक्षणमंत्री म्हणून फर्नांडिस यांनी एनडीएच्या काळात दोनदा काम पाहिले. १९९९ मध्ये ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. काहीशे सैनिकांच्या बलिदानानंतर आपण पाकिस्तानच्या कारवाया संपवण्यात यशस्वी झालो.

वादग्रस्त जॉर्ज फर्नांडिस
एलटीटीईचे समर्थनकर्ते असल्याचा, सीआयएकडून निधीसाठी प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. कारगिल युद्धावेळी हुतात्मा सैनिकांच्या शववाहिकांच्या खरेदीत फर्नांडिस यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाला. मात्र, सीबीआयने त्यांना क्‍लीन चिट दिली होती.    

संबंधित बातम्या