किशोरवयातील आरोग्य समस्या

डॉ. अविनाश भोंडवे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

आरोग्याचा मूलमंत्र

सर्वसाधारणपणे मुलींमध्ये १० ते १६ आणि मुलांमध्ये १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या काळाला किशोरावस्था मानली जाते. या कालखंडाला पौगंडावस्था किंवा वयात येण्याचा कालावधीसुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये १३ ते १९ या आकड्यांमध्ये (थर्टिन, फोर्टीन, फिफ्टीन....नाईनटीन) टीन हा शब्द असल्याने या मुलांना ’टीनएजर’ म्हणून संबोधले जाते. सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक स्थिती, मिळणारे पोषण, सभोवतालचे वातावरण अशा गोष्टींनी हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.  

किशोरावस्थेतील बदल
किशोरावस्थेत पाऊल टाकताच मेंदूमधून काही संप्रेरके स्त्रवू लागतात. त्यांच्या प्रभावाने मुलांच्या बाबतीत टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स निर्माण होतात. या हार्मोन्सद्वारे अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिणाम या मुलामुलीत घडवून आणतात. 

शारीरिक बदल : याकाळात मुला-मुलींची उंची पटापट वाढते. मुलांची हाडे मुलींपेक्षा जास्त भक्कम होतात आणि स्नायूंचा मांसल भाग सशक्त होतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. मुलींमध्ये मात्र कंबरे भोवतालाचे चरबीचे प्रमाण थोडे जास्त वाढते. मुलांच्या गळ्याचे हाड ज्याला ॲडम्स ॲपल म्हणतात ते मोठे होऊन स्पष्ट दिसू लागते आणि त्याचबरोबर त्यांचा आवाज फुटतो. त्यांच्या शरीरातही लक्षणीय बदल होऊ लागतात.
मानसिक बदल : किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्यांच्या मनात औत्सुक्‍य, भीती, कुचंबणा अशा अनेक भावना निर्माण होतात. याचा परिणाम त्यांच्यामध्ये कित्येक मानसिक स्थित्यंतरे होतात.

 स्वतंत्र विचार : मिशांबरोबर मुलांना स्वतःची मते फुटतात, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आजवर आईवडील, शिक्षक यांच्या विचारांनी वागणाऱ्या मुलांना, आपल्यालाही काही कळते असे वाटू लागते. मोठ्यांनी सांगितलेले खरे असतेच असे नाही, हे त्यांना समजते आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळते, अशा भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच बाबतीत आईवडील-ज्येष्ठ किंवा शिक्षकांपेक्षा मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याकडे कल वाढतो. 
 मित्रांचा दबाव : या वयातल्या मुलामुलीत आपल्या वयाच्या किंवा थोड्या मोठ्या वयाच्या मित्रमैत्रीणींच्या दबावामुळे अनेक गोष्टी घडतात. यात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांची व्यसने, सट्टा-जुगार खेळणे, शाळा कॉलेज बुडवणे, अभ्यास बुडवून इतर छंदफंद करणे या गोष्टी घडतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. मात्र काही मुलांना जर योग्य मित्र मिळाले तर त्यांच्या आयुष्यात उन्नतिकारक बदलदेखील घडतात. 

 लैंगिक आकर्षण : किशोरावस्थेतील मुलांना शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमुळे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. मात्र या आकर्षणाला प्रेम समजून त्यात वाहवत जाणे, लैंगिकदृष्ट्या अनैतिक गोष्टी करणे अशा गोष्टी घडतात. यामुळे शैक्षणिकदृष्ट्या लक्ष विचलित होणे, प्रेमभंग वगैरेमुळे नैराश्‍य येणे, अनैतिक कृत्यांनी शारीरिक आजार होणे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात आज पहायला मिळतात.  
 आक्रमक वृत्ती : किशोरवयीन मुले अधिक साहसी, बेधडक तसेच निर्भय असतात. संकटांना आणि गहन प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. त्याचबरोबर धोक्‍याचे मोजमाप करून, तो पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास पूर्ण झालेला नसतो. 

महत्त्वाच्या इतर समस्या
जगातल्या लोकसंख्येच्या १७ टक्के म्हणजे सुमारे १२ अब्ज व्यक्ती १२ ते १९ या वयोगटातल्या किशोर-किशोरी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यसमस्या म्हणजे जागतिक स्तरावर आरोग्यविषयक प्रातिनिधिक प्रश्न ठरतात. 

 अल्पवयीन मातृत्व : भारतातील मुलींच्या लग्नाचे वय जरी १८ वर्षे पूर्ण असले, तरी एकूण प्रसूतीच्या ११ टक्के प्रसूती किशोर वयातील मुलींच्या होतात. आजमितीला १५ ते १९ वयोगटातील वयाच्या मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू हा एक मोठाच प्रश्न आहे. यात केवळ विवाहितच नव्हे तर कुमारी मातांची संख्यादेखील लक्षणीय आहे. शारीरिक अशक्तपणा आणि ॲनेमिया ही या प्रश्नाची महत्त्वाची कारणे आहेत, तशीच ग्रामीण आणि दुर्गम भागात असलेली उत्तम प्रसूतिगृहांची वानवा, संततिनियमनाच्या साधनांचा वापर न करणे, प्रसूती दरम्यान योग्य आहार आणि औषधे न मिळणे हीसुद्धा आहेत. 

 लैंगिक आजार : स्त्री-पुरुषांच्या मुक्त जीवनशैलीमुळे आज लैंगिक संबंधातून निर्माण होणाऱ्या एड्‌स, हिपॅटायटीस बी, एचपीव्ही, जनायटल हर्पिस अशा आजारांची संख्या वाढते आहे. या आजारांनी पीडित रुग्णात ३० टक्के रुग्ण किशोरवयीन वयोगटातील असतात. यामधील एड्‌सच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरी एकुणात एड्‌सग्रस्त व्यक्तींमध्ये आजही या वयोगटातील किशोरांची संख्या इतर वयोगटांच्या तुलनेत जास्त आहे.

 मानसिक आजार : आजच्या स्पर्धात्मक जगात पालकांच्या आणि समाजाच्या या किशोरांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने येणारे नैराश्‍य कमालीचे वाढते आहे. शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा आणि कलाविषयक गोष्टीत अपेक्षित प्रावीण्य किंवा यश या अपेक्षा समाविष्ट आहेत. एका पाहणीनुसार २६ टक्के किशोर या बाबतीत उद्भवणाऱ्या ताणतणावाच्या विकारांनी पीडित आहेत. 

 व्यसनाधीनता : चटकन प्रभावित होणारे मन, काही तरी वेगळे आणि साहसी करावे वाटणारे विचार, मित्रांची संगत आणि व्यसनांच्या साधनांची सहज उपलब्धता यामुळे तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू, अफू, चरस, भंग, गांजा, एलएसडी आणि अन्य मादक पदार्थ याबाबत किशोर वयातील मुलांचा आणि मुलींचाही सहभाग वाढत चालला आहे. यांच्या समवेत हस्तगत करायला सोपे आणि स्वस्त असले नशीले पदार्थ मुले वापरू लागली आहेत. त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, खोकल्याची कोडीनमिश्रित औषधे, अंग दुखीच्या मलमांची सॅण्डविचेस, इंक रिमूव्हर किंवा व्हाईटनर, टाईपराईटिंग मशिनमध्ये वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची शाई यांचा वापर मुले करायला लागली आहेत.याचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात तितकेच समान आणि भीषण आहे.

दारूमुळे होणारे यकृताचे आजार, नशील्या पदार्थांनी होणारे मानसिक आजार आणि नशा करून होणारे हिंसाचार, अत्याचार,  अवैध कृत्ये, वाहनांचे अपघात यांच्यातला किशोरवयीन मुला मुलींचा टक्का वर्षानुवर्षे वधारत चालला आहे.
आजच्या इंटरनेट युगात, मोबाईल, संगणक यांच्या व्यसनांसोबत सोशल मीडिया आणि निरनिराळी ॲप्स यांचे व्यसन हा एक डोकेदुखीचा विषय झाला आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वीपर्यंत या गटात टेलिव्हिजन आणि चित्रपट यांचे व्यसन मोठ्या प्रमाणात होते, आजच्या पिढीत त्यात मोबाईल आणि संगणकाची भर पडली आहे. या नव्या व्यसनातून सायबर क्राईम तसेच सायबर सुरक्षा आणि चाइल्ड अब्युज या नव्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

आहारविषयक समस्या
 चौरस आहार न घेणे : आजच्या बहुसंख्य किशोरवयीन मुलामुलीत आहाराच्या आवडी निवडी अधिक असतात. त्यामुळे कर्बोदके, चरबीयुक्त पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांनी समतोल असा आहार घेतला जात नाही.

 नाश्‍ता न करणे : ८० टक्‍क्‍याहून जास्त किशोरवयीन मुले न्याहारी करीत नाहीत. सकाळी चहाबरोबर बिस्किटे घेणे हीच कित्येकांची नाष्ट्याबाबत समजूत आहे. शाळांच्या वेळा आणि मुलांना शाळांसमवेत क्‍लासेस लावण्याच्या पालकांच्या अट्टहासामुळे अनेकदा या मुलांना नाश्‍त्याला वेळच मिळत नाही अशी तक्रार असते. नियमित नाश्‍ता करणाऱ्या मुलांना शाळेतील अभ्यासाचे आकलन जास्त चांगले होते तसेच अतिरिक्त वजनवाढ होत नाही, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. 
 दूध न पिणे : ६३ टक्के मुलेमुली नियमित दूध घेत नाहीत. दुधात असलेले अन्नघटक न मिळाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत राहते, हाडे व दात कमकुवत राहतात. परिणामतः शरीरात जोम, उत्साह आणि स्टॅमिना कमी राहतो.

 फळे व भाज्या नाकारणे : जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर्स यांची भरमार असलेली फळे व भाज्या मुले खात नाहीत. यामुळे अ, ब, क, ड अशा जीवनसत्त्वांचा अभाव असलेले आजार होतात. 

 बाजारू पदार्थ आवडणे : भूक लागल्यावर घरगुती पौष्टिक पदार्थांऐवजी डबाबंद, प्रक्रियायुक्त आणि हॉटेल किंवा रस्त्यावरील पदार्थ खाण्याकडे कल जास्त असतो. यामध्ये पिझ्झा, बर्गर, नूडल्स, चिप्स, वेफर्स, चीज सॅण्डविच, वडापाव, भजी, मिसळ, चिवडा, पावभाजी, कोला पेये, एनर्जी पेये, परदेशी पद्धतीची कॉफी, तयार सरबते घेणे मुलांना आवडते. या पदार्थात साखर, चरबी आणि मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. यापासून शरीराच्या दैंनदिन गरजेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात कॅलरीज मिळतात. साहजिकच या वयोगटातील मुलांतील स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे.

योजना
 पौगंडावस्थेतील  मुलामुलींसाठी भारत सरकार योजना राबवते आहे. यासाठी ’आर्श’ (ॲडलोसन्ट्‌स रिप्रॉडक्‍टिव्ह ॲण्ड सेक्‍शुअल हेल्थ) हे धोरण आखले आहे. अनेक सरकारी आणि खाजगी दवाखान्यात व इस्पितळात विशेष क्‍लिनिक्‍स उघडली गेली आहेत. या अंतर्गत भारत सरकारतर्फे खालील योजना राबवल्या जातात. 

किशोर शक्ती योजना- केंद्र शासनाने राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम हाती घेतला आहे. यात महाराष्ट्रासह सर्व राज्यात अनेक उपक्रम राबवले जातात. किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रजनन व लैगिंक आरोग्यामध्ये सुधारणा करणे, बालमृत्यू, मातामृत्यू आणि एकूणच प्रजननदर कमी करणे, प्रसूतीकाळात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीस प्रतिबंध करून त्या काळात योग्य व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथे अडोलेसंट हेल्थ क्‍लिनिकची स्थापना करणे, किशोरवयीन आरोग्य दिवसाचे आयोजन करणे, किशोरवयीनांकरिता हेल्पलाईनची स्थापना करणे ( १८००२३३२६८८ ),आरोग्य शिक्षण उपक्रम अंमलबजावणी करणे ही उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. 

 बालिका समृद्धी योजना
 सर्व शिक्षा अभियान 
 सबला- किशोर युवतींचे सक्षमीकरण करणारी योजना 
 स्कूल हेल्थ स्कीम- यामध्ये शालेय मुलामुलींची वार्षिक शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी केली जाऊन त्यात दोष आढळणाऱ्या मुलांचा उपचार करावा अशी योजना आहे.   

 लोह आणि फोलिक असिड साप्ताहिक तत्त्वावर देणे
 मासिक पाळी आणि आरोग्य योजना - या योजनेद्वारे २०१५ मध्ये भारतातील १५ राज्यांमधील ग्रामीण भागात मोडणाऱ्या १५२ जिल्ह्यातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणे आणि मासिकपाळीतील निगा ठेवण्याबाबत प्रबोधन असा उपक्रम राबवला जातो आहे.

  भारतातील २५ टक्के लोकसंख्या ही किशोरवयीन तरुणांची आहे. १२ ते १९ वयोगटातील ही मुले देशाचा सामाजिक व आर्थिक विकास घडवू शकतात. या युवाशक्तीला ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि जिद्द आहे. पण त्यांच्यापुढे अनेक गहन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शाळा महाविद्यालयात मिळत नाहीत. अशासाठी त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणे, त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक प्रश्नांची उकल वेळेत अचूकपणे करणे यातच संपूर्ण देशाचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून आहे.

संबंधित बातम्या