स्वप्नांच्या दुनियेची वास्तवता

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 11 मे 2018

आरोग्याचा मूलमंत्र

झोप म्हणजे आपल्या शरीराच्या विश्रांतीचा एक अतूट भाग असतो. आपल्याला नित्य येणाऱ्या या झोपेची व्याख्या करायची झाली, तर आपल्या शरीराची आणि मनाची दर रात्री परत परत होणारी एक अशी स्थिती असते, की जी काही ठराविक तास चालू राहते. ज्यामध्ये मज्जासंस्था निष्क्रिय राहते, डोळे मिटलेले असतात, शरीरातील सर्व स्नायू सैल पडतात आणि देहभान निलंबित असते.

आपण झोपल्यावर आपल्याला स्वप्ने पडतात. स्वप्ने म्हणजे निद्रिस्त अवस्थेत आपल्याला दिसणाऱ्या सैरभैर प्रतिमा किंवा चित्रमालिका असतात. ती कधी मनोरंजक असतात, कधी मजेशीर, कधी अद्भुत रम्य, कधी प्रणय प्रधान, कधी अस्वस्थ करणारी, भीतीदायक, तर कधी कधी कमालीची विलक्षण आणि विचित्र असतात. स्वप्ने कधीच इच्छावर्ती नसतात. आपल्याला रोज लागणाऱ्या निद्रेच्या पाच अवस्था शास्त्रज्ञांनी विषद केल्या आहेत.

पहिला टप्पा : झोप लागताना या सुरवातीच्या टप्प्यातील झोप अगदी तरल स्वरूपातली किंवा हलकी असते. एकूण झोपेच्या काळातील ५ टक्के काळ या झोपेने व्यापलेला असतो. यात डोळे मिटलेले असतात, पण नेत्रगोल सौम्य गतीने हालचाल करत असतात आणि शरीरातील सर्व स्नायू हळूहळू सैलावत जातात.

दुसरा टप्पा : आपल्या एकूण झोपेच्या ४५ ते ५५ टक्के काळ व्यापणारा हा भाग असतो. यात नेत्रगोलांच्या हालचाली थांबतात. मेंदूतून प्रसारित होणाऱ्या विद्युत-चुंबकीय लहरींची गती मंदावते. मात्र अधूनमधून एखादी लहर वेगाने मुक्त होते. तिला ’स्लीप स्पिन्डल’ म्हणतात.

तिसरा टप्पा : झोपेच्या ४ ते ६ टक्के व्यापणाऱ्या काळात मेंदूतून डेल्टा लहरी प्रसृत होतात. या विद्युत-चुंबकीय लहरी अतिशय धीम्या गतीच्या असतात. तरीही या टप्प्यात अधूनमधून काही वेगवान लहरीमेंदू प्रसारित करत राहतो. गाढ निद्रेची ही सुरवात असते.

चौथा टप्पा : ही प्रगाढ निद्रा असते. झोपेतला १२ ते १५ टक्के काळ यात व्यतीत होतो. या काळात मेंदूतून फक्त धीम्या गतीच्या डेल्टा लहरी निर्माण होत राहतात. नेत्रगोलांच्या हालचाली पूर्णपणे थांबलेल्या असतात. शरीरातील सर्व गात्रे पूर्णपणे शिथिल होऊन जातात. झोपेच्या या टप्प्यात असलेल्या व्यक्तीला उठवणे कठीण असते.

पाचवा टप्पा : झोपेत स्वप्न पडणारा हा टप्पा असतो. यामध्ये नेत्रगोलांच्या हालचाली वेगाने सुरू होतात. त्यामुळे याला ’रॅपिड आय मूव्हमेंट’ किंवा आर.इ.एम.स्लीप म्हणतात. डोळ्यांच्या अनियमित अशा वेगवान पण वरवरच्या हालचाली होतात आणि मध्येच कोणत्याही दिशेने झटके बसल्यागत डोळे फिरू लागतात. यात हातापायांमध्ये बिलकूल त्राण नसते, मात्र छातीचे ठोके वाढतात आणि रक्तदाब थोडा वाढतो. झोपेचा २० ते २५ टक्के काळ व्यापणाऱ्या या अवस्थेतून एखाद्याला जाग येते आणि तो असंबद्ध अनुभवांचे म्हणजे स्वप्नांचे वर्णन करू लागतो. 

एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचे विश्‍लेषण करताना स्वप्नांचे विश्‍लेषण महत्त्वाचे ठरते. स्वप्ने निर्माण होण्यामागे ’टेम्पोरल लोब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेंदूच्या पुढील भागाचे महत्त्वाचे योगदान असते. यामध्ये वर्तमानातील अनुभव, भूतकाळातील घटना आणि भविष्यातील तयारी यांचे अनोखे मिश्रण असते. या मिश्रणातून तयार होणारी चित्रमालिका आभासी जागृतावस्थेत दृष्य बनून पाहिली जाते. कमालीच्या उचंबळून येणाऱ्या परस्परविरोधी आणि अतिशय गुंतागुंतीच्या मानवी भावना, स्वप्नामध्ये चित्रित होतात. त्या व्यक्तीत आत दडलेला ’मी’ किंवा ’अहं’ त्या बेमालूमपणे एकत्रित करतो. ही सरमिसळ करण्याचे कार्य जागेपणी कार्यरत असलेल्या कल्पनाशक्तीकडून कदापिही होऊ शकत नाही. आपल्या मानसिकतेचा समतोल साधण्यासाठी अशी अनाहूतपणे येणारी स्वप्ने उपयुक्त ठरतात.

जगभरात विविध पद्धतीने झालेल्या शास्त्रीय संशोधनाचे आणि सर्वेक्षणांचे एकत्रीकरण करून स्वप्नांसंबंधी काही मूलभूत गोष्टी सिद्ध झाल्या आहेत.

वैद्यकीय संशोधनातील पाहणीमध्ये स्वप्नांसंबंधी काही महत्त्वाच्या विस्मयजनक गोष्टी आढळतात. 

 • सर्वसामान्यपणे प्रत्येकाला दररात्री तीन ते सहा स्वप्ने पडतात.
 • अनेक जणांना स्वप्ने पडतात, पण ती आठवत नाहीत. 
 • ज्यांना आठवतात त्यांना सकाळी उठल्यावर त्यातला ९५ टक्के भाग विसरला जातो.
 • स्वप्नांमुळे खूप जुन्या आठवणींशी निगडित दीर्घकालीन स्मृती जागृत होते आणि विकसित राहते. पूर्वायुष्यात घडलेल्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न केल्या तरी त्या सूप्तपणे स्मृतीत राहतात आणि स्वप्नांमधून त्यांना जाग्या होतात.
 • स्त्रियांना जास्त करून मुले, कुटुंबातील व्यक्ती आणि घरातील घटना आणि वस्तू यांच्याशी संबंधित स्वप्ने पडतात. 
 • घडलेल्या घटना स्मृतीत जाऊन त्याचे स्वप्न होण्यास कमीत कमी एक आठवडा लागतो.
 • काही वेळेस आठ-आठ दिवसांपूर्वी पडलेले स्वप्न अचानक आठवते, याला ’ड्रीम लॅग इफेक्‍ट’ म्हणतात. 
 • स्वप्नात दिसणाऱ्या व्यक्तींपैकी  ४८ टक्के व्यक्ती या ओळखीतल्या असतात. ३५ टक्के व्यक्ती व्यवसायाशी निगडीत असतात, म्हणजे पोलीस, पुजारी, वकील, डॉक्‍टर वगैरे. मात्र १६ टक्के व्यक्ती या अनोळखी असतात आणि त्यांचा मागमूस लागत नाही.
 • अंध व्यक्तींना डोळस व्यक्तींपेक्षा जास्त स्वप्ने पडतात. त्यांच्या स्वप्नात रंगांपेक्षा चव, वास, स्पर्श आणि ध्वनी संवेदनांचा जास्त अंतर्भाव असतो. 
 • मज्जारज्जूच्या जन्मजात विकारामुळे जन्मापासून हात-पाय पंगू असलेल्या व्यक्ती स्वप्नामध्ये मुक्त हालचाली करतात.   
 • मद्यपानाच्या अमलाखाली येणाऱ्या झोपेची पातळी आणि दर्जा जसा कमी असतो, तसाच स्वप्नांचासुद्धा. 
 • डीमेंशिया आणि अल्झायमर्स या आजारात मेंदूच्या कार्यात बदल झाल्यामुळे स्वप्ने खूप कमी पडतात.

दुःस्वप्ने
भीतीदायक स्वप्ने किंवा नाईटमेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नांची मानसिक दहशत अनेकांना असते. अशी स्वप्ने वरच्यावर पडू लागली तर त्यामुळे दैनंदिन आयुष्यात चिंता आणि आणि भीती निर्माण होते. 
कारणे : आयुष्यात असलेला कमालीचा ताणतणाव, येणाऱ्या परीक्षेची, घडलेल्या एखाद्या घटनेची किंवा व्यक्तीची भीती, पूर्वायुष्यात घडलेल्या दुःखद घटनेची किंवा वेदनामय अपघाताची, शरीरावर झालेल्या अत्याचाराची स्मृती, मन अस्वस्थ करणारे प्रसंग, मानसिक समस्या, दीर्घकाळ चालणारे आजार आणि काही ठराविक औषधांचा वापर ही अशी कारणे दुःस्वप्न पडायला आणि आयुष्य दोलायमान करायला कारणीभूत ठरतात. 

स्पष्ट स्वप्ने
काही ठराविक वेळेस स्पष्ट आणि सुबोध अशी स्वप्ने पडतात. यांना ’ल्युसिड ड्रीम्स’ म्हणतात. झोपेत स्वप्न मालिका चालू असताना या व्यक्तींना जाणीव होते, की त्यांना स्वप्न पडतेय. त्यातील काही गोष्टी ते नियंत्रित करू शकतात. हे नियंत्रण प्रत्येकाच्या बाबतीत कमी अधिक असते. संशोधकांना चक्रावून टाकणाऱ्या या प्रकारात अगदी क्वचित काही व्यक्ती या स्वप्नांमध्ये पुढे काय घडावे यावर थोडे नियंत्रण ठेवू शकतात.  

रंगीत स्वप्ने
काही जणांना मस्तपैकी सप्तरंगी स्वप्ने पडतात तर काही जणांना कृष्णधवल. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात ६० वर्षे वयाच्या आणि ३० वर्षे वयाच्या अशा दोन गटांच्या व्यक्तींचे अनेक वर्षे सर्वेक्षण केले गेले. यात ६० वर्षाच्या ८० टक्के लोकांना काळी-पांढरी स्वप्ने पडत होती आणि २० टक्‍क्‍यांना रंगीत. त्या उलट ३० वर्षे गटात ८० टक्के व्यक्तींनी रंगीत आणि उर्वरित २० टक्के युवकांनी रंगविहीन स्वप्ने पडतात असे नमूद केले. यावरून वृद्ध व्यक्तींना कृष्ण-धवल आणि तरुणांना रंगबिरंगी स्वप्ने पडतात असा निष्कर्ष काढला गेला. परंतु १९९३ ते २०१३ या काळात ६० वर्षे वयाच्या व्यक्तींचे रंगीत स्वप्ने दिसण्याचे प्रमाण २० वरून ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. संशोधकांनी याचा संबंध टेलीव्हिजनशी लावला आहे. कारण याकाळात कृष्णधवल प्रक्षेपण  कमी होऊन सप्तरंगी दूरदर्शन मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होऊ लागले. 

किशोरवयातील स्वप्नावस्था : किशोरावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना मुलांना रात्री स्त्रीविषयक स्वप्न पडते. मुलगा दचकून उठतो. बहुतेकदा स्वप्नातील स्त्री नात्यातील पोक्त महिला किंवा शाळेतील शिक्षिका अथवा तत्सम आदरणीय स्त्री असते.

स्वप्नांचे विषय
संशोधकांच्या सर्वेक्षणात आढळले, की मनात प्रयत्नपूर्वक दडपून टाकलेल्या गोष्टी किंवा घटना स्वप्नांचा विषय बनतात. आयुष्यात घडलेल्या चांगली-वाईट गोष्टी हे स्वप्नांचे विषय असतात. त्यामुळे परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास झाल्याचे स्वप्न पडते. प्रेमी युगुलांना एकमेकाच्या सहवासाची स्वप्ने पडतात. एखादी कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला त्याच्या कादंबरीतील घटनांची तर कठीण प्रमेयांचे संशोधन करणाऱ्या किंवा संगणक प्रणाली विकसित करणाऱ्या व्यावसायिकांना त्याच विषयाची स्वप्ने पडतात. थोडक्‍यात मेंदूला आणि मनाला सातत्याने पिडणाऱ्या गोष्टी स्वप्नात मूर्त स्वरूपात साकार होतात.  नशील्या पदार्थांचे व्यसन असलेल्या व्यक्तींना ड्रग्जची स्वप्ने पडतात तर व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना स्वप्नात आपण व्यसन नाकारतोय असे दिसते. जवळच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या संबंधी स्वप्ने पडतात. मात्र ही स्वप्ने अनेकदा आनंददायक आणि चांगल्या घटनांशी संबंधित असतात. कोणाचा तरी पाठलाग, पाण्याचे स्वप्न, वाहनांचे स्वप्न, व्यक्तींचे स्वप्न, शाळा किंवा शाळेचा वर्ग, पॅरालाइज ( पक्षाघात), मरणाचे स्वप्न, उडण्याचे स्वप्न, खाली पडणे, नग्नता, लहान मुले, अन्न, घराचं स्वप्न, सेक्‍स हे स्वप्नांचे सर्वात जास्त आढळणारे विषय असतात.

काही सूचना

 • कितीही भयंकर स्वप्न पडले तरी घाबरून जाऊ नका. कित्येकदा ही स्वप्ने वर्तमानकाळाशी संबंधित असतात.
 • स्वप्ने लिहून काढावीत. मुख्य आशय काय आहे हे विचारपूर्वक ठरवा.
 • स्वप्नांतील हालचाली आणि भावना यात मुख्य काय आहेत हे लक्षात घ्या.
 • वर्तमानकाळातील भावनिक घटना काय घडल्या याची नोंद घ्या. अनेक वेळेला आपण स्वःतलाच फसवत असतो. स्वप्नांचा वापर ही फसवणूक थांबवण्यासाठी करा.
 • लैंगिक आकर्षण ही स्वाभाविक घटना आहे. त्याबद्दल दोषी वाटण्याने हे आकर्षण कमी होत नसते. ’स्वप्ने’ ही या भावनेचा निचरा करण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे ’अशी स्वप्ने पडतातच कशी?’ अशी आत्मटीका करू नका.
 • काही लोकांना सतत स्वप्ने पडत असतील, एखाद्या फिल्मच्या ट्रेलरसारखी स्वप्नमालिका दिसत असेल, स्वप्नांमुळे  जाग येत असेल, अथवा झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल तर अशा परिस्थितीत निद्रेच्या विकारांपकी एखादा विकार असण्याची दाट शक्‍यता असते. आधुनिक तंत्रज्ञानाने हे विकार ओळखता येतात. आपल्याला निरामय आरोग्यासाठी उत्तम झोप लागते. मात्र या झोपेत पडणारी स्वप्ने हा आरोग्याशी निगडीतच भाग असतो.

संबंधित बातम्या