गॅझेट्‌स आरोग्यासाठी ’स्मार्ट’?

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 17 मे 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

रोज येणारी नवनवीन गॅझेट्‌स, नवी माध्यमे, असंख्य प्रकारचे सोशल मीडिया, नवनवी ॲप्स यांनी आजचे जीवन ओसंडून वाहते आहे. आपल्या रोजच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट एवढ्या अशक्‍य वेगाने बदलू लागली आहे, की त्या गतीशी जुळवून घेणे सर्वसामान्य कुवतीच्या माणसांना खूप जड जाऊ लागले आहे. या तंत्रज्ञानाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे अनेक परिणाम हळूहळू सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागले आहेत. 
आधुनिक तंत्रज्ञानाने अनेकांच्या आयुष्यातले अनेक प्रश्न सोडवले आहेत. अनेक समस्यांवर उपाय शोधले आहेत आणि कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली आहे. आज केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील अब्जावधी लोक स्मार्टफोन आणि संगणकावर इतके अवलंबून आहेत, की त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही ते करू शकत नाहीत. 

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने अमेरिकन नागरिकांचे गेल्या वर्षी एक सर्वेक्षण केले. ’स्ट्रेस इन अमेरिका सर्व्हे ’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या शास्त्रीय पाहणीत काही विस्मयकारक मुद्दे ध्यानात आले आहेत.

  • ९९ टक्के लोकांकडे दैनंदिन वापरासाठी कुठले ना कुठले तरी इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट आहे  
  • ८६ टक्के लोकांकडे संगणक, ७४ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आणि ५५ टक्के लोकांकडे टॅब्लेट आहेत.
  • २००५ मध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण ७ टक्के होते ते २०१७ मध्ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.
  • याच काळात १८ ते २९ वयाच्या मुलांमुलींमध्ये सोशल मीडिया वापरणारे १२ टक्‍क्‍यांपासून ९५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.
  • आजमितीला जगभरातील २ अब्ज व्यक्ती फेसबुक आणि इन्स्टाग्राम नियमितपणे वापरतात.
  • असोसिएटेड प्रेसच्या ’एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्च’ यांनी केलेल्या संशोधनानुसार १३ ते १७ वयोगटातील तरुण तरुणींचे आवडते सोशल मीडिया स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम हे आहेत.
  • या पाहणीमध्ये ७६ टक्के तरुणवर्ग इन्स्टाग्राम वापरतो, ७५ टक्के स्नॅपचॅट, ६६ टक्के फेसबुक, ४७ टक्के ट्‌विटर आणि ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी युवक टंबलर, ट्‌विच किंवा लिन्क्‍डिन वापरतात. 
  • ९१ टक्के तरुण कुठल्याही साईटवरील मेसेजिंग वापरतात, ४० टक्के तरुण व्हॉट्‌सॲप वापरतात.
  • सोशल मीडिया आणि मेसेजिंगचा वापर हा ७० टक्के तरुणांच्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनला आहे. आपल्या मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटी अगदी कमी मात्र सोशल मीडियावरून संपर्क आणि मेसेज जास्त अशी परिस्थिती आढळली. 

सतत ऑनलाइन : जगातील ४३ टक्के सुशिक्षित तरुण सातत्याने त्यांचे इमेल, टेक्‍स्ट आणि इतर मेसेजेस चेक करणे आणि त्याला उत्तर देणे यासाठी २४ तास ऑनलाइन असतात. आलेल्या संदेशाला उत्तर देण्यासाठी ते झपाटल्यासारखे, तहानभूक विसरून स्मार्टफोनला चिकटलेले असतात. अमेरिकेतल्या संशोधन पाहणीत ६५ टक्के व्यक्ती सतत इमेल तपासत असतात.  ५२ टक्के आलेले  मेसेज तपासतात, तर ४४ टक्के सतत सोशल मिडियाची साइट पुनःपुन्हा बघत असतात. २८ टक्के लोक त्यांचे कामाचे इमेल सातत्याने बघत राहतात. या पाहणीत सतत ऑनलाइन राहणाऱ्या स्मार्टफोनच्या गुलामांमध्ये १८ टक्के व्यक्ती या सवयीमुळे दैनंदिन जीवनात कमालीचा ताणतणाव अनुभवतात. सोशल मीडियासाठी स्मार्टफोन सतत वापरण्याची सवय असलेल्या ४२ टक्के व्यक्ती त्यांच्या या सवयीमुळे सतत तणावाखाली असतात. याच उपयोगासाठी स्मार्टफोन दिवसभरात अधूनमधून वापरणाऱ्या २७ टक्के लोकांनाही या सोशल मिडियामुळे तणावाचा प्रसाद मिळतोच. सतत ऑनलाइन चेकिंग करणाऱ्यांपैकी ३३ टक्के व्यक्ती त्यांच्या कुटुंबाशी घरात असतानादेखील समरस होत नाहीत. मित्रमंडळींच्या सहवासातसुद्धा ते स्मार्टफोनच्या धुंदीत हरवलेले आढळतात.

डिजिटल संपर्क आणि आरोग्य : संपर्क माध्यमांमध्ये सतत अडकून राहणाऱ्या या लोकांना तणावमुक्त राहण्यासाठी दिवसातून काही तास आपली संपर्क साधने म्हणजे फोन, संगणक वगैरे बंद ठेवणे हा उपाय असतो. ज्यांना या फोन्स, मेसेजेस आणि इमेल्सचा सतत त्रास होतो त्यांनी आठवड्यातला किमान एक दिवस या साधनांच्या वायर्स गुंडाळून ठेवाव्यात असे सुचवले जाते. हा उपाय एकूण एक लोक तत्वतः मान्य करतात, पण फक्त २८ टक्के व्यक्तीच तो प्रत्यक्षात पाळतात. सोशल मीडियावरील संभाषण, पोस्ट्‌स आणि त्यावरील प्रतिक्रिया यामुळे ४८ टक्के लोकांचे मानसिक स्वास्थ्य डळमळीत होते. या लोकात एकाकीपणा, चिंता आणि नैराश्‍य ही त्रासदायक लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे सगळे पाहिल्यावर कधी कधी संभ्रम निर्माण होतो, की सोशल मीडियामुळे लोक निराश होतात? की फक्त निराश व्यक्तीच सोशल मीडिया वापरतात? 

सोशल मीडियावरील सुख-दुःख वैषम्य : जोहान बोल्लेन या इंडियाना विद्यापीठातील संशोधकाने केलेल्या पाहणीत आपल्या पोस्ट्‌सना कमी लाईक्‍स मिळाले तर लोकांना कमालीचा खेद होतो. ज्या व्यक्तींपेक्षा त्यांच्या मित्रांना अधिक लाईक्‍स मिळतात त्यांच्या मनात मित्राबद्दल असूया निर्माण होते आणि कमालीच्या दुःखद भावना त्यांच्या मनात दाटून येतात. एरवी सुखी आणि आनंदी असलेल्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त लाईक्‍स असलेला मित्र आपल्यापेक्षा अधिक आनंदी आहे, याचे वैषम्य वाटून त्यांच्या मनात खेद निर्माण होतो. 

एकाकीपणा : मनुष्य हा खरा समाजप्रिय प्राणी आहे. परंतु आजच्या जीवनशैलीत त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो समाजापासून विलग होतो. त्याच्या जीवनातील ही पोकळी तंत्रज्ञानाने दूर होण्याऐवजी वाढली आहे. दिवसातला जितका जास्त वेळ सोशल मीडिया आणि इतर संपर्क माध्यमांवर व्यतीत केला जातो, तितक्‍याच जास्त प्रमाणात त्या व्यक्तीला एकाकीपणा जास्त भासतो. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ती व्यक्ती समाजापासून दूर जाते, हे डॉ. ब्रायन प्रायमॅक या पिट्‌सबर्ग विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकाने १९ ते ३२ वयाच्या एक लाख तरुणांचे तीन वर्षे सर्वेक्षण करून सिद्ध केले आहे.

नैराश्‍य आणि आनंद : सोशल मीडियावर जे युवक सतत असतात, दिवसातल्या १ तासापेक्षा जास्त वेळ त्यासाठी देतात. त्यांना नैराश्‍यग्रस्त होण्याची शक्‍यता जास्त असते. सोशल मीडिया १ तासापेक्षा कमी वापरणाऱ्यांच्या तुलनेत वैफल्याचा सामना २.७ पटीने जास्त वेळा करावा लागतो. ’सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर ॲण्ड सोशल नेटवर्किंग’ या नियतकालिकाने केलेल्या संशोधनात  फेसबुक आणि तत्सम सोशल मीडियामुळे युवकातील नकारात्मक भावना जास्त वेळेस जागृत होतात, असे मान्य केले आहे. मात्र यासाठी सोशल मिडियाला आयुष्यातून हद्दपार करण्याची गरज नाही असेही नमूद केले आहे. सॅनडिएगो, कॅलिफोर्निया येथील ’इंटरॅक्‍टिव्ह मीडिया इन्स्टिट्यूट’च्या डॉ. ब्रेंडा वायडरहोल्ड यांच्या मते सोशल मीडियाच विचारपूर्वक आणि योग्य वेळ वापर केला तर, मित्रांशी प्रत्यक्ष भेटून जेवढा आनंद मिळतो तितकाच आनंद आणि तितकेच चैतन्य सोशल मीडियावरून मिळू शकते. 

पालक आणि मुले : २००५ वर्षापर्यंत मुलांनी टेलिव्हिजन पाहण्यात किती वेळ घालवायचा यावर चर्चा रंगायच्या. १०वी, १२ वीला ज्यांची मुले असायची अशा कित्येक पालकांनी घरातला टीव्ही हद्दपार केला होता आणि केबल नेटवर्क बंद केले होते. पण स्मार्टफोनच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्याला अनुषंगून असलेल्या विविध सोशल मीडिया आणि नवनव्या ॲप्लीकेशन्समुळे पालकांसाठी या बाबतीत मुलांवर निर्बंध घालणे जिकिरीचे होऊन बसले आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की मोबाईलचे आणि सोशल मिडियाचे वेड गरिबांपासून अतिसधन वर्गापर्यंत तितकेच फोफावले आहे. एवढेच नव्हे तर पालक आणि पाल्य  हे दोन्हीही त्यात तितक्‍याच प्रमाणात त्यात गुंतलेले आणि गुंगून गेलेले आहेत. 

टेलिव्हिजन पाहणे, स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ घालवणे, संगणकावर कामाव्यतिरिक्त उगाचच टाइमपास करणे यामुळे बरेच अनुचित परिणाम दिसून येतात. 

२ वर्षाखालील मुलांना हातात धरून पाहण्याची टॅब्लेट किंवा स्मार्टफोनसारखी उपकरणे दिली तर ती उशिरा बोलायला लागतात.

स्मार्टफोन झोपण्यापूर्वी वापरत राहणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या वयोगटातील मुलांना झोप कमी लागते. अधून मधून सतत जाग येत राहते आणि गाढ झोपेचा आनंद मिळत नाही. याचे आरोग्यावर नक्कीच दुष्परिणाम होतात.

९ ते २९ या वयोगटातल्या युवावर्गाला चिंता आणि नैराश्‍याने ग्रासण्याचे प्रमाण या प्रसार माध्यमांच्या सततच्या संपर्काने वाढते. 

व्हिडिओ गेम्स : संगणक आणि फोनवरील हिंसक खेळांच्या नादी लागून मुलांमधली आक्रमकता आणि हिंसाचार वाढतो असे आजकाल वरचेवर सांगितले जाते. मात्र यावर जाणीवपूर्वक संशोधन करून हे आक्षेप संशोधकांनी खोडून काढले आहेत. संशोधकांच्या मते, समाजातील वाढत्या हिंसाचाराची कारणे वेगळी आहेत. सोशल मीडीयाच्या अवाजवी प्रभावामुळे समाजातील खऱ्या समस्या नजरेआड होतात. दारिद्य्र, उपासमार, शिक्षणाची आबाळ, युवकांमधली बेकारी या खऱ्या समस्या आहेत. वाढत्या हिंसाचाराची बीजे वास्तवात या समस्यांमध्ये आहेत. अमेरिकेतल्या बाल्टिमोरमधील ’जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या मान्यवर संस्थेने केलेल्या संशोधनपूर्ण प्रबंधात हे दाखवून देण्यात आले आहे, की दररोज ४ तास व्हिडिओ गेम्स खेळल्यावर काही थोड्या जणांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे चिंता, नैराश्‍य वाढते मात्र हिंसक वृत्ती वाढण्याची उदाहरणे दिसली नाहीत. मात्र याकाळात या मुलांनी  एकत्रित बसून एखादा खेळ खेळला, इतरांशी बोलणे सुरूच ठेवले, गप्पागोष्टी चालू ठेवल्या; तर वर्तमानाशी ते जोडलेले राहतात आणि या गेम्सचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही, उलट ती जास्त प्रफुल्लित होतात.   
उपाय

तमाम संशोधकांचे आणि मानसशास्त्रज्ञांचे स्मार्ट गॅझेट्‌सच्या परिणामांबाबत जसे एकमत आहे, तसेच त्यावरील उपायांबाबतही एकमत आहे. आजच्या घटकेला मुलांना या माध्यमांपासून पूर्ण वंचित करणे अयोग्य आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेल्या या वरदानांचा वापर जितका संयमपूर्ण आणि मर्यादित असेल, तितके त्याचे फायदे अधिक होतील आणि तोटे कमी.

’काट्याने काटा काढावा’ असे म्हणतात तशीच एक वैशिट्यपूर्ण गोष्ट या संपर्क माध्यमांवर उपाय म्हणून सामोरी आली आहे. संगणक आणि स्मार्टफोनवर आलेली नवीन ’हेल्थ ॲप्स’ हा यावरील उपाय ठरू शकेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. ही आरोग्यविषयक संसाधने व्यायाम, तणाव, चिंता, नैराश्‍य, झोप याविषयी क्षणोक्षणी मार्गदर्शन करू शकतात. सोशल मीडीयाऐवजी जर ही साधने वापरली, तर स्मार्टफोन वापरूनही त्याचे परिणाम टाळता येऊ शकतील. जगातल्या तंत्रज्ञानविषयक भावी काळाचा विचार केला तर इंटरनेटचे जाळे अधिकाधिक व्यापक होत जाणार आहे, त्याचा वेग दिवसेंदिवस गतिमान होत जाणार हे नक्कीच. २-जी, ३-जी, ४-जी आणि आता ५-जी अशी त्याची उन्नती त्याच्या प्रत्येक जनरेशननुसार ’दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट’ प्रमाणात होणार हेसुद्धा नक्की. याशिवाय आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यवहार आणि एकूणच जीवनातील प्रत्येक कानाकोपरा या संपर्क माध्यमांनी व्यापला जाणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. थोडक्‍यात सांगायचे झाले तर माणसाच्या सुखांसाठी, त्याच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण झाले. माणसातील भौगोलिक अंतरांचा दुरावा दूर करण्यासाठी संपर्क माध्यमे निर्माण झाली. त्याच्या योग्य अशा वापराने या सुखसोई प्राप्त होताच आहेत. पण त्याचे व्यसन बनून जेंव्हा आयुष्य व्यापून जाते, तेंव्हा अमृतवल्लीची विषवल्ली बनते.

संबंधित बातम्या