मेंदूमधले डावे उजवे

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 15 जून 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

मानवी मेंदू म्हणजे एक चमत्कार आहे. पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या प्राण्याचा सर्वात विकसित अवयव. ५० किलो वजनाच्या प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन साधारणपणे ११०० ते १३०० ग्रॅम असते. यात पुरुषांच्या मेंदूचे वजन १२६० ग्रॅम, तर महिलांच्या मेंदूचे वजन ११३० ग्रॅम असते. मानवी मेंदू मज्जापेशी, ग्लायल पेशी आणि रक्तवाहिन्यांनी बनलेल्या असतात. या मेंदूत २०,००० कोटी (२० बिलियन) मज्जापेशी असतात आणि त्यांच्यात सुमारे १२५ लाख करोड (१२५ ट्रिलिअन) संपर्कस्थाने असतात. आपण करतो त्या हालचाली, आपल्याला जाणवणाऱ्या संवेदना आणि आपले विचार या सर्वांचे नियंत्रण मेंदू करत असतो. मेंदूच्या बौद्धिक कार्यासाठी शरीरातली उर्जा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मेंदूचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त २ टक्के जरी असले, तरी शरीरातील २० टक्के उर्जा आपल्या रोजच्या बौद्धिक कार्यांसाठी दररोज खर्च होत असते. डावा आणि उजवा असे मेंदूचे दोन समान भाग असतात. मेंदूचा डावा भाग हा उजव्या शरीराचं नियंत्रण करतो आणि उजवा मेंदू हा डाव्या शरीराचं नियंत्रण करतो. मेंदूतले हे डावे-उजवे भाग वरवर पाहता दिसायला हुबेहूब एकसारखेच असतात, त्यांचे कार्यही एकमेकाच्या सहकार्याने होत असते. मात्र आलेली माहिती संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याची दोघांची पद्धत वेगळी असते. मानवी मेंदू हा बदलत्या बाह्य परिस्थितीशी, नवनव्या  अनुभवांशी सतत जुळवून घेत असतो. मेंदूच्या या वैशिष्ट्याने आपण नित्य येणाऱ्या विविध अनुभवातून ’शहाणे’ होत राहतो.

डावा आणि उजवा समज गैरसमज
ज्या व्यक्तींमध्ये मेंदूच्या डावी बाजू जास्त प्रबळ असते, ते आपली कामे उजव्या हाताने करतात आणि ज्यांचा उजवा मेंदू जास्त कार्यक्षम असतो ती माणसे डावखुरी असतात, हे खरे आहे. त्यामुळे एका दृष्टीने डावा मेंदूवाले आणि उजवा मेंदूवाले असे दोन गट माणसांमध्ये पडतात. रॉजर स्पेरी या अमेरिकन शास्त्रज्ञाने १९६८ मध्ये ’स्प्लिट ब्रेन’ ही संकल्पना मांडली. १९८१ मध्ये त्याबद्दल त्यांना या वैद्यकीय संशोधनासाठी नोबेल पुरस्कारदेखील मिळाला. त्यांनी माणसाचा डावा-उजवा मेंदू वेगवेगळे कार्य करतात हे मत मांडले. यानुसार- ज्यांचा डावा मेंदू जास्त प्रबळ असतो अशा व्यक्ती तर्कनिष्ठ, जीवनातल्या घडामोडींचे विश्‍लेषण उत्तम तऱ्हेने करण्यात वाकबगार असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची सखोल आणि मुद्देसूद माहिती हवी असते, गणितात आणि संख्यात्मक कामात त्यांना गती असते, त्यांचे विचार स्पष्ट असतात आणि ते योग्य शब्दात व्यक्त करू शकतात. ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्षम असतो, ते लोक सृजनशील आणि नवनिर्मितीमध्ये रस घेतात. त्यांचे विचार मुक्त असतात. एखादी गोष्ट मोठ्या आणि व्यापक स्वरुपात कशी होईल ,याबद्दल त्यांची कल्पनाशक्ती क्रियाशील असते. मानवी व्यवहारांबाबत त्यांना एक प्रकारचे अंतर्ज्ञान असते. आपले विचार शब्दांपेक्षा चित्रमय आणि कलात्मक स्वरुपात ते व्यक्त करतात. परंतु ’पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ या नियतकालिकात १४ ऑगस्ट २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनानुसार डाव्या आणि उजव्या मेंदूची ही वेगळी वैशिष्ट्ये सांगणाऱ्या या पारंपारिक विचारात फारसे तथ्य नाही, असे सिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात व्यक्तींच्या मेंदूचे थ्री-डी एमआरआय काढून संशोधन  करण्यात आले. त्यात कोणाच्याही डाव्या आणि उजव्या मेंदूत एक भाग प्रबळ असतो असे दिसून आले नाही. उलट वेगवेगळी कार्ये करताना मेंदूचे ते ते कार्य करणारे विशिष्ट भाग जास्त उद्दीपित झालेले असता, असे दिसून आले.  या संशोधनात मेंदूच्या दोन्ही भागात काही विशिष्ट कार्य करणारी स्वतंत्र केंद्रे आढळली. उदा. भाषाविषयक आकलनाचे केंद्र डाव्या मेंदूत, तर भावना आणि शब्दांशिवाय होणाऱ्या संवादाचे कार्य मेंदूच्या उजव्या भागात आढळले. 

दोन्ही बाजूतील वास्तविक फरक
डाव्या आणि उजव्या मेंदूबद्दलच्या आज सर्वत्र प्रचलित असलेल्या कल्पना, खरे तर शास्त्रीय नसून भ्रामक आहेत. स्पेरी यांनी संशोधनात मांडलेल्या सिद्धांतांपेक्षा त्या वेगळ्या आहेत. एका अर्थाने त्या कविकल्पना ठरतात. कारण दैनंदिन व्यवहारात माणसांच्या डावखुरे आणि ’उजवखुरे’ असे हात वापरण्यात दोन प्रभाग दिसून आले, तरी प्रत्यक्षात ते ’डाव्या मेंदूवाले’ आणि उजव्या मेंदूवाले’ असे गट नसतात. उलट मेंदूच्या दोन्ही बाजूत त्याची महत्त्वाची काही कार्ये करणारी केंद्रे विभागलेली असतात आणि ती सर्व व्यक्तींमध्ये आणि तितक्‍याच क्षमतेने कार्यरत असतात. याबाबतीत स्त्रिया आणि पुरुष असा भेद मेंदूच्या कार्यात नसतो. दोहोंच्या मेंदूच्या कार्यात तितकेच साधर्म्य आढळते.
भावना : हे केंद्र उजव्या मेंदूत असते. स्वतःच्या भावना व्यक्त करणे आणि इतरांच्या भावना जाणून घेणे हे या केंद्राचे कार्य असते.
भाषा आणि संवाद : यासंबंधीची ब्रोकाज एरिया आणि वर्निकेज एरिआ ही दोन केंद्रे डाव्या बाजूत असतात. बोलताना विशेष शब्द वापरणे आणि इतरांशी विशिष्ट भाषेत संवाद करणे ही या केंद्रांची कार्ये.
खुणांची भाषा : दृश्‍य हालचालींवर आधारित अशी खुणांची भाषा समजणे हे कार्य डाव्या मेंदूचे असते. मूक-बधिर व्यक्तींमध्ये संवाद होताना, खुणांची भाषा सुरू झाल्यास या केंद्रात भाषा बोलताना होतात त्याप्रमाणे संदेशवहन होत असल्याचे आढळून आले आहे.
हात वापरणे : डावखुरेपणा आणि त्याउलट उजवा हात वापरणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूतील रचनेत, डाव्या-उजव्या बाजूंच्या क्षमतेत किंवा केंद्रांच्या जागेत फरक नसतो. केवळ शारीरिक कार्यांसाठी त्या व्यक्ती आपला उजवा आणि डावा मेंदू वेगळा वापरतात. ही सवय जन्मजात असते. डावखुरेपणा किंवा उजवा हात वापरण्याचा कल हा बहुतांशी जनुकीय आणि अनुवांशिक असतो.  

सजगता : आपल्या आजूबाजूच्या त्याप्रमाणेच स्वतःच्या आंतरिक घटनांकडे, गोष्टींकडे आणि व्यवहारांकडे लक्षपूर्वक ध्यान देणे हे महत्त्वाचे कार्य दोन्ही बाजूंना होते. बाह्य जगातील गोष्टींबाबत डावा मेंदू तर आंतरिक घटनांकडे लक्ष पुरवण्यात उजवा मेंदू क्रियाशील असतो.    

व्यक्तिगत फरक : मेंदूचा डावा भाग कार्यक्षम आहे, की उजवा हे व्यक्तिसापेक्ष असते. काही व्यक्ती डाव्या बाजूतील केंद्रांचा वापर सुलभतेने करतात तर काही उजव्या बाजूतील कार्यांचा सक्षम वापर करतात. याबाबतीत हात वापरण्यातला डावे-उजवेपणा बाजूला राहतो. २०१४ मध्ये मायकेल कोर्बालिस यांनी केलेल्या संशोधनात, मेंदूच्या डाव्या बाजूतील भाषाविषयक केंद्र वापरण्याची क्षमता उजवा हात वापरणाऱ्या ७० टक्के लोकांत दिसली तर त्याचवेळेस ९० टक्के डावखुरे लोकसुद्धा डाव्या बाजूतील हे केंद्र तितक्‍याच सहजतेने वापरताना आढळले.  थोडक्‍यात सांगायचे झाले तर डावखुरा आणि उजवखुरा अशी माणसांच्या हात वापरण्याच्या सवयींची विभागणी होत असली, तरी डावा मेंदू आणि उजवा मेंदू यात मेंदूची विविध केंद्रे असतात आणि ती सर्वच व्यक्तीत एकसारखी असतात. फक्त सवयीने किंवा प्रयत्नांनी ती केंद्रे अधिक क्षमतेने वापरता येतात. त्यासाठी डावा-उजवा असा फरक होत नाही.

आजची शिक्षण पद्धती आणि मेंदूचा विकास
मेंदूमधल्या या डाव्या-उजव्याचे ज्ञान लहान मुलांच्या बौद्धिक वाढीच्या काळात वापरता येईल का? याचा विचार साहजिकच होणे गरजेचे ठरते. प्रत्येकाच्या मेंदूची बौद्धिक क्षमता अतिउत्तम, उत्तम, मध्यम की कनिष्ठ ही जन्मापासून ठरलेली असते. त्याप्रमाणे त्या बालकाची बुद्धिमत्ता पुढील काळात दिसून येते. पण मेंदूतील विशेष केंद्रे जी डाव्या किंवा उजव्या भागात विखुरलेली असतात. ती सक्षम केली तर काही बुद्धिमत्तेच्या काही गोष्टीत नक्कीच सुधारणा होऊ शकते.  

उदा.डाव्या मेंदूने अधिक कार्य करणारे लोक माहितीचे उत्तम विश्‍लेषण करू शकतात. ते साधारणतः प्रोग्रॅमर्स, इंजिनिअर्स, प्रोजेक्‍ट मॅनेजर्स बनतात. थोडक्‍यात ते तांत्रिक माहीतगार असतात. याउलट ज्यांचा उजवा मेंदू अधिक क्रियाशील असतो,ते अमूर्त बाबींचा सहज विचार करणारे असतात,े बहुधाकलावंत, वाद्यवादक, नर्तक,लेखक, विचारवंत बनतात. लहानपणापासून मेंदूच्या डाव्या व उजव्या भागामधील महत्त्वाच्या गोष्टींचा योग्य तऱ्हेने वापर करायला मुलांना शिकवले तर ती ’बॅलन्स्ड ब्रेनचाईल्ड’बनतात.

डाव्या मेंदूत कार्यकारणभाव वापरायला शिकवणारी, बारकाईने अभ्यास करायला लावणारी, वास्तवावर भर देण्यास लावणारी केंद्रे असतात. डाव्या मेंदूचा वापर योग्य पद्धतीने केल्यास ही मुले गणित आणि विज्ञानात पारंगत होतात. 

 या मुलांमध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ याबद्दलच्या कल्पना स्पष्ट असतात. नवी माहिती गोळा करणे, आपले ज्ञान वाढवणे, मिळालेल्या माहितीचे सार काढणे याबाबतीत ही मुले तरबेज बनतात. वस्तूंची नावे, त्यांचा क्रम, त्यांची विशिष्ट रचना त्यांना छान समजते. एखादे काम करताना कोणती पद्धत अमलात आणायची याची जाणीव त्यांना उत्तम असते. ते वास्तवात जगतात, सुरक्षित आयुष्य  त्यांना लाभते.  उजव्या मेंदूचा वापर केल्यास भावनांचा विचार, कल्पकता, समग्रपणे विचार मांडणे, चिन्हे आणि  प्रतिमा जाणून घेणे, धर्म आणि तत्त्वज्ञानाची ओढ असणे, दुसऱ्याची कला समजून तिला दाद देणे, उच्च दर्जाचा कल्पना विलास करणे, वेळप्रसंगी धोका पत्करणे,

प्रत्येक गोष्टीची शक्‍याशक्‍यता तपासणे या गोष्टी त्यांना जमू लागतात. 

मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांचा वापर करणे मुलांना शिकवल्यास त्यांच्या बौद्धिक क्षमतेत लक्षणीय फरक दिसून येतो. त्यांच्या भावी करिअरचादेखील विचार करून या गोष्टी विकसित करता येतात. या शिवाय काही विशेष मुलांमधील डिसलेक्‍सिया (लेखन दोष), डिसग्राफिया (वाचन दोष), डिसकॅलक्‍युलिया (गणन दोष) यांचा उपचार करता येऊ शकतो. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत उजव्या मेंदू गोलार्धाचा उपयोग करण्याकडे सर्वांचा कल असतो असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. विद्यार्थी जेवढे अधिक पुस्तकी शिक्षणावर अवलंबून राहतात, तितके ते ’स्ट्रॅटेजिकल’ विचार करण्यात कमी पडतात. वयाच्या सातव्या वर्षी फक्त १० टक्के मुले अत्यंत उच्च दर्जाची कलाकार म्हणून ओळखली जातात. कारण त्यांना आपण एका साचेबंद अभ्यास पद्धतीत कोंडून ठेवल्याने त्यांच्यातली निर्मितीक्षमता वापरण्याची संधीच डावलली जाते. डाव्या मेंदूचा विकास ठराविक विद्यार्थ्याला परीक्षेच्या दृष्टीने ’हुशार’ बनवतो, पण बुद्धिमान आणि कल्पक कलाकार बनवू शकत नाही. 

मुलांनी त्यांच्या मेंदूची क्षमता १००  टक्के वापरत आणलीच पाहिजे. याची उदाहरणे द्यायची असतील तर-

  • भाषा विषयामध्ये सृजनशीलता विकसित व्हावी. 
  • गणित आणि भूमिती चित्रकला आणि संगीताशी जोडून घ्यावी.
  • विज्ञानातल्या आकृत्या रंगीबेरंगी चित्रांतून आणि ॲनिमेशनमधून समजून द्यावे. 
  • प्रश्नोत्तरे आणि तर्कनिष्ठ विचार प्रत्यक्ष बोलण्याची संधी द्यायला हवी.

शिकलेल्या गोष्टींचा फीडबॅक देण्याची संधी हवी. एखादी गोष्ट आवडली की नाही, ती योग्य वाटते की नाही, हे मोकळेपणाने सांगताही यायला हवे. मुलांच्या भावनांना, त्यांच्या मतांना शालेय वर्गामध्ये स्थान नसल्यामुळे, बुद्धीची व्यापकता वाढण्याऐवजी भीती, अपमान, शिक्षा अशा  नकारात्मक भावना जोर धरतात. खरे शिक्षण म्हणजे मेंदूच्या दोन्ही बाजूंचा जास्तीत जास्त वापर करायला लावणारे असते. मेंदूतल्या ठराविकच केंद्रांना काम देणारे आजची शिक्षण आणि परीक्षा पद्धती त्यामुळेच अपुरी आहे.

संबंधित बातम्या