हा राग सोड सोड...

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

क्रोधात्‌ भवति संमोहःI संमोहात स्मृतिविभ्रमःII
स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो I बुद्धिनाशात्‌ प्रणश्‍यति II

येणाऱ्या रागामुळे त्याचा कसा टप्प्याटप्प्याने विनाश होतो, हे भगवत्‌ गीतेतील या श्‍लोकात सांगितलेले आहे. तसे पहिले तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचे माणसाच्या मानसिकतेवर आणि आयुष्यावर विपरीत परिणाम होतात, पण रागामुळे आयुष्याचा आणि आरोग्याचा असा दोन्हीचा विनाश होतो.

तसे पहिले तर राग येणे ही सर्वसामान्य मानवी नैसर्गिक भावना आहे. नापसंती, चिडचिड, तिरस्कार या रागाचे सौम्य आणि प्राथमिक टप्पे आहेत. कुणी टीका केली, धमकी दिली किंवा नैराश्‍य आले तर त्याची प्रतिक्रिया रागात उमटते. भीती, एकटेपणा, दुःख या भावना तीव्र झाल्यावरदेखील राग येतो. जेंव्हा रागाचा भडका उडतो तेंव्हा माणसाची सारासार बुद्धी, तर्कसंगत विचार भ्रष्ट होतात आणि माणूस काहीही असमंजसपणे, अविवेकी, अवास्तव, असंयुक्तिक बोलू लागतो.

एखाद्याला जेंव्हा अमर्याद राग येतो तेंव्हा त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्याचे दैनंदिन आयुष्याची चाकोरी बिघडते. त्याच्या कामात चुका होऊ लागतात, एकाग्रता टिकत नाही, वैयक्तिक जीवनात वादळे येतात, कौटुंबिक संबंध विस्कळित  होतात. केवळ मानसिक नव्हे तर रागाचे शारीरिक परिणामसुद्धा अनेक असतात. राग आल्यावर छातीचे ठोके वाढतात, कानशिले तप्त होतात, हातपाय थरथरू लागतात, रक्तदाब उसळतो आणि त्याचे परिणाम हृदयावर आणि रक्ताभिसरणावर दिसू लागतात. राग व्यक्त करण्याचे अनेक प्रकार दिसून येतात. खूप मोठ्याने ओरडणे, दात-ओठ खाणे, डोळे वटारून बघणे, भुवया उंचावून आठ्या पडून बघणे, कृद्ध चेहरा करून एखाद्यावर दीर्घ कटाक्ष टाकणे, एखाद्याच्या अंगावर धावून जाणे, शारीरिक हल्ला करणे, हिंसाचार करणे अशा असंख्य तऱ्हा आपण बघत असतो.

राग येण्याची कारणे
राग ही एक तीव्र स्वरूपाची भावनात्मक, अंतर्गत शारीरिक क्रियांमध्ये वेग आणणारी आणि अतर्क्‍य शारीरिक हालचाली घडवणारी अभिव्यक्ती असते. राग येण्याची अनेक करणे असतात.

 •  दुःख - विशेषतः आवडीची वस्तू हरवणे, जवळची व्यक्ती आव्हानक मृत्यू पावणे
 •  लैंगिक नैराश्‍य   निराशा आणि अपयश
 •  एखाद्याचे उद्धटपणे वागणे, अन्याय होणे
 •  खूप थकवा आल्यावर विश्रांती न मिळणे
 •  भूक   वेदना   एखाद्याने चिडवणे, त्रास देणे, अपमानित करणे   फसवणूक, अप्रामाणिकपणा   जोडीदाराकडून व्यभिचार 
 •  पेचप्रसंगात सापडणे   कमालीचा ताणतणाव, आर्थिक विवंचना   ट्रॅफिक जॅम 
 •  दुकानात किंवा अन्यत्र अयोग्य सेवा मिळणे
 •  एखाद्याला त्याचे वैगुण्य स्पष्टपणे सांगणे 
 •  एखाद्या रुग्णाला असाध्य आजार झाला आहे असे सांगणे

थोडक्‍यात एखाद्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या गोष्टींना धक्का बसतो, तेंव्हा रागाची भावना निर्माण होते. या महत्त्वाच्या गोष्टी बहुधा स्वाभिमान, पैसा, प्रेम, न्याय अशा मूलभूत तत्त्वांशी निगडित असतात.

रागाचे परिणाम
शारीरिक - राग आल्यावर ॲड्रिनॅलिन, नॉरॲड्रिनॅलिन, कॉर्टिसॉल असे शरीरातील काही महत्त्वाचे हार्मोन्स जास्त स्त्रवतात. त्यांचे परिणाम शरीरावर दिसतात.

 • छातीत धडधडणे, दुखणे  
 • रक्तदाब वाढणे  
 • हृदयविकाराचा झटका येणे  
 • लकवा मारणे  
 • दम लागणे  
 • डोके दुखू लागणे  
 • झोप न येणे  
 • पाठ दुखणे
 • पोट बिघडणे  
 • वेदना सहन न होणे
 • त्वचा रोग होणे  
 • रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन सतत सर्दी-खोकला होणे, फ्लू होणे

मानसिक परिणाम ः सतत रागाची परिसीमा ओलांडत गेल्यास त्या व्यक्तीमध्ये काही महत्त्वाचे मानसिक त्रास उद्भवतात.

 • नैराश्‍य  
 • लहरीपणा  
 • आहाराकडे दुर्लक्ष  
 • व्यसने - धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधे
 • न्यूनगंड  
 • स्वतःला इजा करून घेणे,
 • आत्महत्येचे विचार येणे किंवा त्यासाठी प्रवृत्त होणे

रागाचे नियोजन
सतत येणाऱ्या रागाने आयुष्याची घडी जेंव्हा विस्कटू लागते, तेंव्हा त्या क्रोधाला तळ्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध उपचार घ्यावे लागतात. रागाचे नियोजन किंवा ’अँगर मॅनेजमेंट’ म्हणजे राग गिळून टाकण्यास शिकवणे किंवा राग येऊच नये असे काही करणे नव्हे. 
राग येणे ही नैसर्गिक भावना असल्यामुळे आपल्याला राग येतो आहे हे ओळखणे आणि त्यानंतरची परिस्थिती योग्यरीत्या  हाताळणे आणि धीरगंभीर पण शांत राहून आपल्या भावना योग्य शब्दात तसेच योग्य देहबोलीत व्यक्त करणे गरजेचे असते. मनात उसळणाऱ्या क्रोधाशी दोन हात करण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. 

कुणासाठी आवश्‍यक?
रागाच्या भरात कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती ज्यांना सतत वाटते की मला राग आवरता येत नाही.

 • कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी, शेजाऱ्या-पाजाऱ्याशी, कामावरच्या लोकांशी, अनोळखी लोकांशी सतत भांडणे, कुरबुरी होत राहतात  
 • थोडे काही घडले की जे गुद्दागुद्दीवर येतात.  
 • मुलांना आणि बायकोला सतत मारहाण करतात  
 • जे बोलताना राग आल्यावर मारून टाकण्याची किंवा तोडफोड, जाळपोळीची धमकी देतात  
 • राग आल्यावर जे समोरच्या वस्तू आपटतात, भिरकावतात, तोडफोड करतात  
 • वाहन चालवताना राग आला तर जे बेभानपणे गाडी चालवतात
 • अशा पद्धतीची स्वभाववैशिष्ट्ये ज्यांच्यात आढळतात, त्यांनी क्रोध नियोजनासाठी उपचार घेण्याची गरज असते.

क्रोध नियोजनाचे उपचार
हे उपचार एकट्याला किंवा अशा प्रकारचा त्रास असणाऱ्या व्यक्तींच्या गटाला एकत्रित करूनही दिले जातात. एखाद्या व्यक्तीला जर चिंता, नैराश्‍य किंवा काही मानसिक आजार असतील तर त्याचे उपचारही या समवेत केले जातात. 
क्रोध नियंत्रणाचे तीन पैलू आहेत :

 •  शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे
 •  पूर्वीच्या क्रोधाचा मनावरील भक्कम पगडा ओळखणे
 •  सजगतेचा अभाव, स्वभावातील दोष, उणिवा आणि चुका दूर करणे

या उपचारात तुम्हाला कशामुळे राग येतो किंवा कोणत्या परिस्थितीत तुमचा शांतपणा नष्ट होतो, हे ओळखायला लावणे हा पहिला टप्पा असतो. आणि तशी परिस्थिती निर्माण होऊ लागली की राग जागा होण्यापूर्वीच कोणताही आक्रमकपणा न ठेवता ती परिस्थिती नियंत्रणात आणायला शिकणे, हा त्याचा दुसरा टप्पा असतो.

’रागावणे चांगले नाही’, अशी आठवण स्वत:ला कितीही वेळा करू दिली, तरी जेंव्हा राग येतो तेंव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी रागाचे मूळ कारण लक्षात घ्यावे. कोणत्या व्यक्ती, परिस्थिती, घटना, जागा यामुळे राग येतो याची पक्की नोंद ठेवावी. 

जेंव्हा आजूबाजूला काही दोष, उणिवा दिसतात आणि त्या स्वीकारता येत नाहीत तेंव्हा  रागाची भरती येते आणि निघून जाते आणि अनेकदा ती लाट खेद व पश्‍चात्ताप मागे ठेवून जाते. जेंव्हा राग येतो, तेंव्हा ती व्यक्ती सजग नसते. रागामुळे ते दोष, त्या उणिवा दूर होवू शकत नाही, हे प्रथम जाणून घ्यावे. ती परिस्थिती सजगतेने, आहे तशी स्वीकारल्यानेच ते दोष, त्या उणिवा दूर होतील हे पक्के समजून घ्यावे. 

राग यायला लागला, की आपण काय करतो, आपल्यात काय बदल होतो याची जाणीव ठेवावी. उदा. आवाज चढू लागतो, श्वास वेगाने व्हायला लागतो, त्या जागेतून निघून जावेसे वाटते. किंवा निराशा, दुःख, तिरस्कार, अपराधीपणाची भावना असे काही वाटू लागते. नाहीतर डोळ्यातून अश्रू यायला लागतात. समोरच्या व्यक्तीवर रागीट आणि कुत्सित शब्दांचा, शिव्याशापांचा भडिमार करावासा वाटतो. की राग आल्यावर समोरच्या व्यक्तीला लाथाबुक्‍क्‍यांनी ठोकून काढावेसे वाटते. या पैकी कोणते विचार  आपल्या मनात येतात याचा  शोध घ्यावा आणि ते पुरते व कायमचे टाळण्याचा प्रयत्न करावा. मनाला आणि मनोवेगाला प्रत्यक्षपणे हाताळणे सोपे नसते. त्यासाठी काही वेगळे प्रयत्नसुद्धा करावे लागतात.

 • राग येऊ लागला की थोडे एकटे राहून शांत व्हायचा प्रयत्न करावा. आपल्या वर्तनाचे अवलोकन करावे. काय चुकले याचा शोध घ्यावा आणि काय टाळावे याबद्दल पक्की खूनगाठ बांधावी.
 • संभाषणात आपल्याला राग येईल अशी परिस्थिती येत असेल तर विषय बदलावा.
 • मन शांत करण्याचे काही उपाय नियमित करावेत. यात ध्यान लावणे, राग येऊ लागला की १  ते २० आकडे उलटे म्हणणे, श्वासाची वाढती गती कमी करून दीर्घश्वसन करणे, किंवा नुसते डोळे मिटून बसणे हे उपाय महत्त्वाचे असतात.
 • दहा ते पंधरा मिनिटे योगासने केल्याने शरीरातील अस्वस्थता निघून जाण्यास मदत होते. सूर्य नमस्काराच्या काही फेऱ्यानी सुरवात करणे चांगले. इतर व्यायाम प्रकारांपेक्षा योगासनांमुळे शरीर आणि श्वासामध्ये समन्वय प्राप्त होतो. योगासनांमुळे शरीराला दिलेल्या ताण-दाब-पिळामुळे ऊर्जेची पातळी वाढते.
 • व्यायाम करणे. धावणे, पाळणे, सायकलिंग करणे असे व्यायाम हे उत्तम क्रोध नियंत्रक असतात. 
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान ७ तास झोप रोज रात्री मिळावी लागते, कारण जागरणे झाल्यास अथवा अपुरी निद्रा झाल्यास राग येण्याचे प्रमाण खूप वाढते.

हळूहळू या पर्यायांचा नक्कीच उपयोग होऊ लागतो आणि राग येण्यापूर्वीच व्यक्ती शांत होऊ लागते.

विशेष सूचना

 • रागाची रोजनिशी ठेवावी. त्यात राग येण्याचे प्रसंग, त्याची कारणे यांचे तपशीलवार विवेचन लिहावे. कशाचा उपयोग झाला, कशाचा झाला नाही हे सुद्धा नोंदवावे. 
 • राग गिळून टाकू नये, तो व्यक्त करायची वेळ लांबणीवर टाकावी. आपले मन शांत झाल्यावर स्पष्ट शब्दात आणि आक्रमक पवित्र न घेता राग व्यक्त करावा.
 • निराशाजनक शब्द वापरणे टाळावे. उदा. ‘संपले सगळे.‘ ‘सारे कष्ट मातीमोल झाले‘. या ऐवजी, ‘ हे सारे त्रासदायक आहे, पण ठीक आहे, पुढच्यावेळी असे होऊ नये.‘
 • ’नेहमीच’ ’कधीच शक्‍य नाही’ असे शब्द वापरू नयेत. त्यामुळे राग चढत जातो आणि समोरची व्यक्ती कायमची दुखावली जाते.
 • नियमितपणे घडणाऱ्या त्रासदायक घटना टाळण्याचे नियोजन आधीच करावे. अशाप्रसंगी वापरायचे ’गोड’ आणि तणाव न वाढवणारे शब्द आधीच आठवून ठेवावे. एखाद्याची टवाळी करणारे विनोद, कुचकट भाषा टाळावी.
 • एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीत चुका शोधण्यापेक्षा किंवा असे कसे झाले म्हणून दोष देण्यापेक्षा त्या परिस्थितीवर  उपाय शोधणे यावर भर द्यावा. त्याने रागाचे प्रसंग तर घडत नाहीतच, पण अवघड परिस्थिती काबूत आणता येते.
 • क्रोधाच्या भावना नियंत्रित केल्याने व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदल घडवू शकतात आणि कधीही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागणारी सजगता वाढते. भगवत गीतेतील श्‍लोकानुसार, वारंवार येणारा राग संबंधांमध्ये दुरावा निर्माण करतो. क्रोधाचा अग्नी सर्वात आधी संबंधांना जाळतो. जुने संबंधही क्षणिक क्रोधाला बळी पडतात. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर ती व्यक्ती विश्वास गमावून बसते त्यानंतर मान-सन्मान, स्वभाव आणि आरोग्य नष्ट होते.

संबंधित बातम्या