हाडांचे भक्कम आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

मानवी शरीरात हाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शरीराला हाडांमुळेच आकार येतो. लहान मुलांच्या हातापायांच्या हाडांची वाढणारी लांबी, त्यांची उंची वाढवते. बरगड्यांच्या हाडांच्या पिंजऱ्यामुळे हृदय आणि फुफ्फुसे सुरक्षित राहतात, तर कवटीच्या हाडांमुळे मेंदूचे रक्षण होते. शरीरातील असंख्य स्नायूंमुळे आपल्या विविध हालचाली आपण करतो, पण ते स्नायू कुठल्याना कुठल्यातरी हाडांनाच जोडलेले असतात. सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे हाडांमध्ये आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियमचा साठा होतो. जन्मापासून हाडांच्या वाढीला सुरवात होते ते वयाच्या तिशीपर्यंत. यातील पहिल्या टप्प्यात हाडांची लांबी, रुंदी आणि घनता वाढत असते. मुलींच्या बाबतीत१४ ते १६ वर्षे आणि मुलांच्या बाबत१६ -१८ वर्षे असा हा काळ असतो. त्यानंतर तीस वर्षे वयाचा टप्पा गाठेपर्यंत हाडांची घनता वाढत राहते. ही घनता हाडात साठवलेल्या कॅल्शियममुळे येते. तिशीनंतर मात्र हाडांमधील कॅल्शिअम आणि इतर खनिजे कमी होत जाऊन त्यांची घनता कमी होत ती विरळ होऊ लागतात. 

हाडांच्या सुरवातीच्या विरळतेला ’ऑस्टिओपेनिया’ म्हणतात आणि ती अधिक विरळ होऊन जेव्हा ठिसूळ बनतात, तेव्हा त्याला ’ऑस्टिओपोरोसिस’ म्हणतात. हाडांमधील कॅल्शिअम आणि इतर खनिजांची घनता ’बोन मिनरल डेन्सिटी’ या नावाने ओळखली जाते. ऑस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा महत्त्वाचा विकार मानला जातो. वाढत्या वयाबरोबर हाडांमधील कॅल्शिअम कमी होण्यास सुरवात होते. तो प्रौढावस्थेत लक्षणे दाखवणारा, पण लहान वयापासूनच उद्‌भवणारा आजार आहे. त्यावर उपाय आहेत. पण नंतर उपचार करण्यापेक्षा आधीपासूनच हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त हितावह आहे. 

ऑस्टिओपोरोसिसची कारणे
 वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये ॲण्ड्रोजन आणि स्त्रियातील इस्ट्रोजेन या हार्मोन्सची होणारी कमतरता. या कारणाने चाळीस ते पन्नास या वयात नैसर्गिकरीत्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांमध्ये हा त्रास उद्‌भवण्यास सुरवात होते. ज्या स्त्रियांच्या गर्भाशय, स्त्री-बीजांडकोश काही आजारांमुळे शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकलेले असतात त्यांना हा त्रास कमी वयात होऊ शकतो. पुरुषांमध्ये साधारणतः साठीनंतर हा आजार डोके वर काढू लागतो. 

 आहारात कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्वाचा अभाव - हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शिअम आणि फॉस्फेट या खनिजांचा वापर करते. कॅल्शिअम ह्रदय, मेंदू तसेच दुसऱ्या अवयवांसाठी देखील आवश्‍यक असते. योग्य प्रमाणात शरीरात कॅल्शिअम नसेल तर त्याचा परिणाम हाडांवर आणि मांसावर होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ म्हणजेच थोड्याशा आघाताने मोडणारी बनतात. यासाठी वयाच्या ३० वर्षापर्यंत हाडाचा विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याने आहारात कॅल्शिअम योग्य प्रमाणात असणे आवश्‍यक असते. 

 थायरॉईड हार्मोनची कमतरता
 हाडांचा कर्करोग
 काही विशिष्ट औषधांचा अतिरेकी वापर- यामध्ये स्टीरॉइडस, स्तनाच्या कर्करोगात वापरले जाणारे ॲरोमाटेज, मानसिक रोगांवरची काही औषधे (एसएसआरआय), फेनीटॉइन सोडिअम हे अपस्मारावरील औषध, मेथोट्रिक्‍सेट हे रक्ताच्या कर्करोगावरील आणि संधिवातावरील औषध येतात. 

 बैठी जीवनशैली, शारीरिक व्यायामांचा आणि हालचालीचा अभाव खूप दीर्घकाळ अंथरुणाला खिळवून ठेवणारी व्याधी  अतिरिक्त धूम्रपान आणि मद्यपान आनुवंशिकता

इतर कारणे
पुरुषांपेक्षा स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यातही खूप सडपातळ आणि लहान चणीच्या व्यक्तींना तो जास्त होतो. आफ्रिकन कृष्णवर्णीयांमध्ये तो कमी प्रमाणात असतो, मात्र श्वेतवर्णीय आणि आशियायी देशातील नागरिकांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. पोटाच्या शस्त्रक्रिया, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो होऊ शकतो. क्रॉह्न्स डिसीज, सिलीअक डिसीज अशासारखे पोटाचे काही आजार झाल्यावर किंवा कुशिन्ग्ज डिसीजमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता बळावते.

ऑस्टिओपोरोसिसचा प्रतिबंध
यासाठी वयाच्या तिशीपासूनच जीवनशैलीत बदल करावे लागतात. आहारातील कॅल्शिअम, ड जीवनसत्त्व यांचा समावेश योग्य प्रमाणात पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मासे यात या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात असतात. शरीराचे वजन वाढून स्थूलत्व येऊन देऊ नये. वजन आणि शरीराला प्रमाणबद्ध ठेवावे. दररोज किमान ६ कि.मी. पायी चालावे. त्यामुळे हाडांची बळकटी वाढते. वजन उचलण्याचा व्यायाम, योगासने ही देखील उपयुक्त असतात.

निदान
हाडांची मजबुती ठरवण्यासाठी त्यांची घनता तपासतात. त्यालाच ’बोन मिनरल डेन्सिटी’ (बीएमडी) म्हणतात. साधारणपणे वयाच्या ३० व्या वर्षी हाडांची घनता ही सर्वाधिक असते. त्यानंतर ती हळूहळू कमी होत जाते. हाडांची घनता मोजण्याच्या तपासणीला ’डेक्‍सा स्कॅन’ म्हणतात. आजकाल संपूर्ण शरीराची तपासणी करण्याचे जी ’पॅकेजेस’ असतात, त्यामध्ये बऱ्याचदा डेक्‍सा स्कॅनही केला जातो.

अल्ट्रासोनोग्राफी, क्वांटिटेटिव्ह कॉम्प्युटेड टोमोग्राफी अशा काही तपासण्यांच्या मदतीने सुद्धा हाडांची घनता मोजता येते. डेक्‍सा म्हणजे ’ड्युअल एनर्जी एक्‍सरे ॲबसॉर्शिओमेट्री’.  डेक्‍सा स्कॅनरमध्ये दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या क्ष-किरण लहरी वापरल्या जातात आणि   म्हणूनच या पद्धतीला डेक्‍सा म्हणतात. जास्त क्षमतेच्या लहरी आणि कमी क्षमतेच्या लहरींमधील फरकाच्या मदतीने हाडांची घनता मोजली जाते. यातून होणारा क्ष-किरणांचा मारा छातीचा एक्‍सरे काढताना होणाऱ्या माऱ्यापेक्षाही कमी असतो, साहजिकच या तपासणीचे त्रास कमी असतात. संपूर्ण तपासणीला साधारणपणे १५ ते २० मिनिटे लागू शकतात. ही तपासणी वेदनारहित असते. यात कोणतेही इंजेक्‍शन किंवा सलाईन वापरावे लागत नाही. तपासणीआधी नेहमीचे जेवण घेतले तरी चालते. मात्र साधारण २४ तास आधीपासून कॅल्शिअमची पूरक औषधे बंद ठेवावी लागतात.

 खुब्याचे हाड आणि मणका या दोन ठिकाणची घनता तपासून त्याच्या सहाय्याने शरीरातील इतर हाडांना असणाऱ्या फ्रॅक्‍चरच्या धोक्‍याचा अंदाज वर्तविला जातो.

 ३० वर्षे वयाच्या निरोगी व्यक्तीच्या हाडांच्या घनतेशी रूग्णाच्या हाडांच्या घनतेची तुलना करून रुग्णाचा ’टी-स्कोअर’ काढला जातो.

जागतिक आरोग्य संस्थेने ऑस्टिओपोरॉसिसच्या निदानासाठी काही व्याख्या बनवल्या आहेत.
नॉर्मल टी स्कोअर ----> ० ते -१ या दरम्यान

ऑस्टिओपेनिया (काही प्रमाणात ठिसूळ झालेली हाडे) ---->-१ ते -२.५मधील टी-स्कोअर
ऑस्टिओपोरोसिस (ठिसूळ हाडे) --->
-२.५ किंवा त्याहून कमी असलेला टी-स्कोअर

तुमचा टी-स्कोअर ऑस्टिओपेनिया या वर्गात असेल, तर हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्‍चर्सचा धोका २ ते ३ पटीने अधिक असतो आणि टी-स्कोअर जर ऑस्टिओपोरोसिस या वर्गात असेल तर असा धोका ५ पटीने अधिक असू शकतो.

बोन डेन्सिटी कुणाची करावी 

 •     ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रिया 
 •      ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता असलेल्या ६५ वर्षे वयाच्या आतील स्त्रिया
 •      ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता असणारे पुरूष
 •      अस्थिरोगतज्ञांनी सल्ला दिला असल्यास.

लक्षणे 
    भारतात ऑस्टिओपोरोसिसचे सुमारे साडे तीन कोटीहून जास्त रुग्ण आहेत. साधारणत: वयाची ४५ वर्षे झाल्यावर या आजाराची सुरवात होते, मात्र साठीनंतर हा आजार जास्त त्रासदायक होतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे आजार झाल्या-झाल्या लगेच दिसून येत नाहीत. याचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची फ्रॅक्‍चर्स. सामान्यत: माणसाची हाडे सहजासहजी मोडत नाहीत, पण ऑस्टिओपोरोसिसमध्ये  छोट्याशा आघाताने, घसरून पडल्याने हाडे मोडतात. त्यामुळे यांना फ्रॅजाईल फ्रॅक्‍चर्स अशी संज्ञा आहे. ही फ्रॅक्‍चर्स पाठीचे मणके, माकडहाड, मनगटाची हाडे यांच्या बाबतीत आढळून येतात.

 • ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडे आकुंचन पावतात. हाडातील टिशुघट्ट आणि मांसल भागांचे विघटन होते.
 • कंबरेचा खालील भाग, मान सतत दुखत राहते.
 • ढगाळ हवामानात तसेच थंडीत हाडांमध्ये कमालीच्या वेदना होऊ लागतात.
 • शरीराच्या हालचाली मंदावतात आणि हालचाल करताना वेदना होतात.

उपचार
    ज्या स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे पक्के निदान झालेले असते, त्यांना ॲलेन्ड्रोनेट, रिसेड्रोनेट, झोलेन्ड्रोनिक ॲसिड अशा बायोफॉस्फोनेटचा वापर करायलाच हवा. यामुळे कंबरेच्या आणि मणक्‍यांच्या हाडांची फ्रॅजाईल फ्रॅक्‍चर्स टळू शकतात. ही औषधे किमान पाच वर्षे द्यावी लागतात. त्यानंतर जरी ही औषधे दिली तर त्यांचा अधिक चांगला परिणाम होतो. ज्या रुग्णांना बायोफॉस्फोनेट वापरता येणार नाहीत त्यांना टेरीपॅराटाईड आणि डिनोसुमॅब वापरावे. 
    स्त्रियांमध्ये यापूर्वी इस्ट्रोजेन, रॅलॉक्‍सिफेन अशी औषधे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी दिली जात. ती देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश आंतराष्ट्रीय संघटनेने दिले आहेत. 
    रुग्णाला डी-३ जीवनसत्त्व आणि पूरक स्वरूपात दिले जाते. यासाठी गोळीच्या स्वरुपातील कॅल्शिअम १५०० मिलिग्रॅम आणि डी-३ जीवनसत्त्व १००० युनिट्‌स दररोज घेणे गरजेचे असते. 
    क जीवनसत्त्वदेखील बोन डेन्सिटी वाढविण्यास उपयुक्त असते. 
    ’सिलेक्‍टिव्ह इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर’चा (एसइआरएम) यासाठी विशेष वापर केला जातो. 

ऑस्टिओपोरोसिसचे धोके टाळण्यासाठी
आज भारतीयांची आयुर्मर्यादा ६७ ते ७० दरम्यान गेली आहे. साहजिकच त्यामुळे घराघरात ज्येष्ठ नागरिक असणारच आहेत. घरातील हालचालीत किरकोळ कारणाने घसरून पडणे आणि खुब्याच्या हाडांचे, कंबरेचे, मांडीच्या हाडांचे फ्रॅक्‍चर होणे, कवटीला दुखापत होणे, मेंदूला मार लागणे अशा दुर्दैवी घटना ही एक सर्वत्र मोठ्या प्रमाणात घडणारी बाब आहे. अशी फ्रॅक्‍चर्स वृद्धांसाठी गंभीर ठरू शकतात. त्यासाठी काही प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे ठरते.

 • घरात सर्व खोल्यात प्रकाश व्यवस्थित हवा. खिडक्‍यातून प्रकाश पुरेसा येत नसल्यास योग्य प्रकाश देणारे विजेचे दिवे हवेत.
 • खोल्यांना आणि दारांना उंबरे नसावेत. त्यामध्ये पाय ठेचकाळून पडण्याच्या घटना जास्त आढळतात. 
 • घराच्या अंतर्गत पायऱ्या नसाव्यात. असल्यास त्यांना कठडे किंवा रेलिंग असले पाहिजे. घरातल्या फरशांवर पाय अडकतील असे समान किंवा कारपेट नसावीत.
 • बाथरूम आणि टॉयलेट्‌समध्ये घसरून पडण्याच्या घटना खूपच जास्त असतात. त्यामुळे त्यात ॲण्टि-स्किड फरशा बसवाव्यात. ते शक्‍य नसल्यास ॲण्टि-स्किड मॅट्‌स वापराव्यात. त्याचप्रमाणे बाथरूम आणि संडासच्या आत तोल गेल्यास भिंतीच्या कडेने, हात धरण्यासाठी छोटे रेलिंग लावावे.
 • घरात जमिनीवर अस्ताव्यस्त सामान पडलेले नसावे.

माणसाच्या शरीरात संपूर्ण वाढ झाल्यावर हाडे असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या हाडांच्या दृढतेची काळजी आपण सदैव घेणे गरजेचे असते. आहार, व्यायाम, चांगल्या-वाईट सवयी यातूनच हाडांच्या आरोग्याची निगा राखली जाते. मात्र माणसाच्या शरीराला भक्कम करणाऱ्या या महत्त्वाच्या शरीरसंस्थेबाबत आजही सर्वसामान्यांमध्ये जागृतीचा अभाव आहे.

संबंधित बातम्या