एअर कंडिशनर किती थंड?

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

साधारणतः तीस-चाळीस वर्षांपूर्वी घरातला पंखा ही एक चैनीची गोष्ट असायची. पण हळू हळू हवामान गरम होत गेले. शीतल छाया देणारे वृक्ष नाहीसे होत गेले. प्रत्येक घरात पंखे आले. साधारणतः २००० च्या सुमारास तोवर फक्त ऑफिसात असलेले एअर कंडिशनर घराघरांत आले. आधी फक्त उन्हाळ्यात वापरले जाणारे एसी लवकरच वर्षातले ९-१० महिने वापरणे गरजेचे झाले. सर्वसामान्य माणसाला जागतिक स्वरूपाच्या या ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसू लागले. या वर्षीतर या जागतिक उन्हाळ्याने कमालच केली. इंग्लंडमध्ये अनेक शहरातले रस्ते चक्क वितळले, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात तापमानाचा पारा तब्बल ४९ अंश सेल्सिअसपर्यंत चढला, कॅनडामधील कयुबेक या एरवी शीतप्रदेश समजल्या जाणाऱ्या प्रांतात उष्माघाताने ७० लोक मृत्युमुखी पडले आहेत.

भारतातील परिस्थिती
गेल्या दहा वर्षात भारतात सुमारे दहा हजार लोक उष्माघाताने मृत्युमुखी पडले आहेत.  २००४ पासून आतापर्यंत या मृत्यूच्या कारणांमध्ये ६१ टक्के वाढ झाली आहे. यात सर्वांत जास्त संख्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातली आहे. उष्माघाताने या राज्यात उष्माघाताच्या मृत्यूंच्या एकुणापैकी २० टक्के मृत्यू होतात. भारतात साधारणपणे उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे झेपावतो. भारतातल्या अनेक भागात, विशेषतः मध्य भारतात ५० अंशाच्या आसपासही तो घुटमळत राहतो. उन्हाळ्यातील या दाहक हवेमुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे सतत घाम येतो. त्याचवेळेस वातावरणातील उष्णतेने शरीरातील पाण्याचे बाष्पीकरण होत राहते आणि शरीरातील पाण्याचे तसेच क्षारांचे प्रमाण कमी होत जाते. याचा परिणाम म्हणून कामातला उत्साह कमी होतो, एकाग्रता नष्ट होते आणि सतत मरगळल्यासारखे वाटते. क्षार व पाणी आणखी कमी झाल्यावर पायांना गोळे येणे, अंग दुखणे, मळमळणे, चक्कर येणे, डोके दुखणे असे त्रास जाणवू लागतात. पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले तर उष्माघाताचा झटका येऊन मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो. वेळप्रसंगी कोमामध्ये जाऊन मृत्युमुखी पडू शकतो.  मात्र हे उष्णतेचे परिणाम आपल्या घरातील किंवा ऑफिसातील  तापमान पाच ते दहा अंशाने कमी केल्यास टाळता येते. पंखा, झाडांची शीतल छाया, थंड पाण्याने अंघोळ, तलावात पोहणे यांचा याकरिता नक्की उपयोग होतो. मात्र शरीराच्या तापमानास  ३७ अंशांपेक्षा थोडे कमी राखले तर जास्त उत्साहवर्धक आणि तरतरीत वाटते.त्याकरता आजकाल एअर कंडिशनर वापरण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. भारतात असा नियमितपणे घरात, ऑफिसात, वाहनात एअर कंडिशनर किती लोक वापरू शकतात? आकडेवारीनुसार फक्त २३ टक्के भारतीय लोकांना एअर कंडिशनर परवडू शकतो. मात्र ज्यांना त्याची खरी गरज असते असे ७७ टक्के लोक या सुखापासून वंचित राहतात. उष्माघाताने मरण पावणाऱ्या या व्यक्ती एअर कंडिशनर वापरू न शकणाऱ्या गरीब गटातील आहेत. 

शीतल एअर कंडिशनरचा विरोधाभास 
आजच्या शहरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेल्या एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, विविध पर्फ्युम्स अशा अनेक गोष्टीत सीएफसी, सीटीसी, कार्बन टेट्राक्‍लोराइड हे वायू वापरलेले असतात. यांच्या वापराने पर्यावरणातील ओझोन वायूच्या थराचा ऱ्हास होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर १५ ते ३० किलोमीटर उंचीवर ओझोन वायूचा थर असतो. ओझोनचा हा थर सूर्याच्या अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांपासून पृथ्वीचा बचाव करीत असतो. आपल्या आरोग्याला घातक अशा अल्ट्रा व्हायोलेट किरणांच्या पृथ्वीवरील प्रवेशाला हा थर पायबंद घालतो. या किरणांमुळे मनुष्याला कर्करोग होऊ शकतो, जनावरांमध्ये प्रजननाच्या समस्या उद्भवू शकतात आणि पृथ्वीचे तापमानही प्रमाणापेक्षा वाढून ग्लोबल वॉर्मिंग होते.

थोडक्‍यात भारतातील २३ टक्के लोक हे आपले जीवन सुखकर करण्यासाठी जो एसी वापरतात त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग होऊन उन्हाळ्याची तीव्रता वाढते आणि हा तीव्र उन्हाळा बाकीच्या ७७ टक्के लोकांना उष्माघाताकडे घेऊन जातो, हा एक गंभीर विरोधाभास आहे.  तात्पुरता गारवा देणारे एसीच आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवत आहेत. एसी चालवायला जास्त वीज लागते. अतिरिक्त विजेच्या या गरजेमुळेच पर्यावरणात उष्णतेचे प्रमाण वाढते आहे. अधिक तापमान वाढल्यावर अधिकाधिक लोक  एसी वापरणार आणि मग तापमान आणखी वाढणार. असे हे दुष्टचक्र सुरूच राहील. पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते २००१ नंतरची १७ वर्षं सर्वाधिक तापमानाची ठरली आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार २०५० पर्यंत एसीसाठी लागणाऱ्या विजेची मागणी तिप्पट होईल. म्हणजे जेवढी वीज आज अमेरिका, युरोपियन महासंघ आणि जपान एकत्रितरीत्या वापरतात, तितकी वीज २०५० पर्यंत फक्त एसीसाठी लागेल.

एअर कंडिशनरचे फायदे-तोटे
एअर कंडिशनर वापरल्याने उन्हाच्या तीव्रतेपासून आणि पर्यायाने उष्माघातापासून सुटका नक्कीच होते. मात्र त्याचे आपल्या आरोग्यावर काही चांगले परिणाम आणि बरेच दुष्परिणाम होतात. 

फायदेः 

 • अतिरिक्त तापमानाचा आपल्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेवर परिणाम होत असतो. तापमान कमी असल्यास बौद्धिक आणि शारीरिक कामगिरी उत्तम होते. यासाठी अभ्यासाची खोली, महत्त्वाच्या चर्चा व निर्णय घेण्याची बोर्ड रूम, बौद्धिक कामे केली जाणारी ऑफिसेस, शारीरिक क्षमता वापरावी लागणारे कारखाने यात एसीचा उपयोग होऊन कामाचा दर्जा चांगला राहतो.
 • कला, मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी आणि तणाव कमी होण्यासाठी एसीची शीतलता उपयुक्त ठरते. उष्ण तापमानात चिडचिड आणि तणाव वाढतो.
 • वातानुकूलित खोली कीटक, पाली अशापासून मुक्त असते.
 • घाम कमी येतो किंवा येत नाही, त्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन डीहायड्रेशन होण्याची शक्‍यता दुरावते.
 • योग्य काळजी घेऊन वातानुकूलित यंत्रणा बसवली असल्यास त्यामधील हवेचा दर्जा उत्तम राहतो आणि त्याचा आरोग्यावर अपेक्षित चांगला परिणाम होतो.
 • बाह्य वातावरणाचे तापमान जर शरीराच्या तापमानापेक्षा म्हणजे ३७ अंशांपेक्षा सातत्याने जास्त असेल तर, कमीत कमी २६ अंशापर्यंत जर खोलीचे तापमान राहिले तर ते आरोग्याला उत्तम असते.

एसीचे तोटे
     अवयवांच्या क्षमतेवर परिणाम ः आपल्या शरीराचे तापमान ३७ अंश असते. २४ अंशांपेक्षा कमी अशा अतिशीतल हवेत शरीराचे बाह्य आणि अंतर्गत तापमान तितकेच कमी होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि परिणामतः रक्तपुरवठा मंदावतो, हातापायांना, स्नायूंना आणि शरीरातील सर्वच अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही, आणि त्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

 • डोकेदुखी ः एसीचे तापमान २४ अंशांपेक्षा खूप कमी असल्यास सर्दी होऊन नाकातून पाणी वाहू लागते. त्याचबरोबर कवटीतील सायनसेसमध्ये स्राव निर्माण होऊन असह्य डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते. 
 • अंगदुखी आणि सांधेदुखी ः सतत एसीमध्ये बसल्याने अवयवांचा रक्तपुरवठा कमी झाल्याने अंगदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी निर्माण होतात. त्याचबरोबर स्नायू आखडून कंबर, खांदे, पाठ यात चमक निर्माण होऊन अंग आखडणे हात- पाय आखडणे अशा समस्या निर्माण होतात
 • ताप ः दिवसभर एसीत राहून बाहेर एकदम जास्त तापमानात गेल्याने शरीराचे तापमान नियंत्रण बिघडून ताप येण्याची शक्‍यता असते. बऱ्याचदा दुपारच्या वेळीएसीतून निघून बाहेरच्या गरम हवेत आल्यावर ताप येण्याची शक्‍यता वाढते.
 • त्वचाविषयक समस्या ः वातानुकूलित यंत्रणेमुळे खोलीमधील हवेतील सर्व आर्द्रता शोषली जाते. सतत एसीमध्ये राहिल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे खाज सुटणे, पुरळ येणे, इसब वाढणे असे त्रास दिसू लागतात.
 • लठ्ठपणा ः सातत्याने एसीमध्ये बसल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा वापर कमी होतो. त्यामुळे लठ्ठपणात वाढू शकतो.
 • श्वसनाचे विकार ः 
 • खोलीमधील वातानुकूलित यंत्रणा सुरू असताना सर्व दारे, खिडक्‍या बंद ठेवल्या जातात. त्यामुळे ताजी हवा खोलीमध्ये प्रवेश करू शकत नाही अशा कोंदट हवेमुळे डोकेदुखी, श्वास गुदमरणे असे त्रास होऊ शकतात. 
 • अति थंड हवेने श्वासनलिकेतील स्राव वाढतात तसेच श्‍वासनलिका आकुंचन पावते. यामधून दमा, खोकला, सीओपीडी असे विकार बळावतात. 
 • गंभीर त्रास - एसीच्या अतिशीत तपमानात सतत राहिल्यावर शरीराचे अंतर्गत तापमान ३७ अंशाच्या खाली जाऊ शकते. यामधून गंभीर अवस्था निर्माण होऊ शकतात.
 • ३६ अंश - थोडी हुडहुडी भरते. 
 • ३५ अंश - कडाक्‍याची थंडी वाजून हातपाय बधिर होऊ लागतात. त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्याने त्वचा निळसर पडू लागते. हृदयाच्या स्नायूंचे रक्ताभिसरण कमी झाल्याने छातीत धडधडू लागते.
 • ३४ अंश - अंग थंड पडू लागते. बोटे निळसर-काळसर पडू लागतात. विचारशक्ती बधिर होते. बुद्धीविभ्रम होऊ लागतात. 
 • ३३ अंश - झोपाळल्यासारखे वाटू लागते. बुद्धीविभ्रम वाढतो. श्वासाचा वेग मंदावतो. हृदयाचे ठोके कमी पडू लागतात. 
 • ३२  अंश - भास होऊ लागतात. व्यक्ती अर्धवट शुद्धीत जाते. 
 • ३१ अंश ते २८ अंश - कोमा किंवा पूर्ण बेशुद्धावस्था येते.
 • २६ ते २४ अंशांपर्यंत शरीराचे तापमान उतरल्यास व्यक्ती जिवंत राहू शकत नाही.  

व्यावहारिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसाबाबत एसीमध्ये शरीर एवढ्या कमी तापमानापर्यंत जाण्याची अजिबात शक्‍यता नसते.  मात्र अतिशीत हवेत लहान मुले, वृद्ध जास्त काळ राहिले तर त्यांच्यावर ही वेळ येऊ शकते.

खबरदारीच्या काही गोष्टी
वातानुकूलित केलेल्या जागा म्हणजे ऑफिसेस, घरे, कार यांच्या खिडक्‍या रोज उघडून आतील हवा बाहेर जाने गरजेचे असते. तसेच त्यात जमा होणारी धूळ, कचरा रोजच्यारोज स्वच्छ करावीत. अन्यथा एखाद्या बंद खोक्‍याप्रमाणे परिस्थिती उद्भवते. आपल्या उच्छ्वासातून बाहेर पडणारा कार्बन-डाय-ऑक्‍साईड, शिका-खोकल्यातून बाहेर पडणारे जंतू आणि विषाणू, धूळ आणि त्या जागेत निर्माण होणारे अशुद्ध वायू पुनःपुन्हा आपल्या श्वासात जाऊन आजार उद्भवू शकतात.
  वातानुकूलित यंत्रणा बसवताना ती योग्य पद्धतीनेच बसवली गेली पाहिजे आणि तिचा नियमित मेंटेनन्स व्हायला हावा.
  या यंत्रणेतील पाण्यात डेंग्यूचे दास वाढण्याची दाट शक्‍यता असते. त्याची नित्य तपासणी करत राहावे.
  तापमान शक्‍यतो २४ अंशापर्यंत ठेवावे. लवकरच देशात विक्रीला येणाऱ्या एअर कंडिशनरचे ’सेटिंग’ २४ अंश सेल्सिअसच असावे, असे भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ठरवले आहे. 
     वातावरणातील उष्म्याचा दाह कमी करण्यासाठी विज्ञानाने दिलेले एअर कंडिशनरसारखे साधन अतिरेकी वापराने पर्यावरणातील उष्णता वाढवायला कारणीभूत ठरत आहे. साहजिकच त्याचा यथायोग्य 
आणि गरजेपुरताच वापर करणे हे आपल्या आणि पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी हितावह ठरेल.  
 

संबंधित बातम्या