मूळव्याध-मुळातूनच दूर करा

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र

काही व्यक्ती आपल्या खूप त्रासदायक आजाराबाबत शब्दही काढत नाहीत. जणू काही आपल्याला काही आजार असल्याचे दुसऱ्यांना कळले तर आपल्यावर आभाळच कोसळेल अशी त्यांना मनोमन बहुधा भीती वाटत असते. अगदी डॉक्‍टरांना दाखवायलाही लाज वाटते. अशा अवघड जागच्या दुखण्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे मूळव्याधीचा.

भारतात आजमितीला साधारणतः ४ कोटी लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे. दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही वर्षांपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळिशीनंतर उद्भवणारा आजार समजला जायचा. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील युवक युवतींनाही मूळव्याध होऊ लागली आहे. मूळव्याधीग्रस्त एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. मूळव्याधीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी २० नोव्हेंबर  हा दिवस जगभर ’जागतिक मूळव्याध दिन’ म्हणून साजरा होत असतो. गुदद्वाराशी म्हणजेच शरीराच्या मुळाशी होणाऱ्या व्याधीला मूळव्याध म्हणतात. याला वैद्यकीय परिभाषेत हिमोऱ्हॉइड्‌स किंवा पाइल्स म्हणतात. हिमोऱ्हॉइड्‌स म्हणजे रक्तवाहिन्या आणि असंख्य पेशीसमूह गुदद्वाराशी जमा होऊन झालेला मांसल भाग असतो. आजाराच्या टप्प्यांप्रमाणे त्यांचा आकार कमी जास्त असतो. गुदद्वाराच्या बाह्यभागाबाहेर असलेल्या मूळव्याधीला, बाह्य मूळव्याध किंवा ’एक्‍स्टर्नल पाइल्स’ म्हणतात. तर गुदद्वाराच्या आत २ आणि ४ सेंमी आत असलेल्या मुळव्याधीला ’इंटर्नल पाइल्स’ म्हटले जाते. ही अंतर्गत मूळव्याध खूप लोकांत सर्वसामान्यपणे आढळते.

कारणे
 मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला गुदाशय म्हणतात. गुदाशयावर जेंव्हा सातत्याने खूप ताण पडत जातो, तेंव्हा गुदद्वार आणि गुदाशयातील रक्तवाहिन्यांवर ताण पडून त्या आकाराने लांब होतात, सुजून रुंद होतात, फुगतात आणि पाइल्सचा त्रास सुरू होऊ लागतो.
गुदाशयावर ताण पडून पाइल्स होण्यामागे जी निरनिराळी कारणे असतात, त्यात  दीर्घकालीन बद्धकोष्ठता  सातत्याने जुलाब होणे  व्यायामाचा किंवा कामाचा भाग म्हणून खूप जड वजन सतत उचलणे गरोदरपणा  शौचाला कुंथणे किंवा जोर लावण्याची सवय  शौचाला लागल्याची उर्मी सातत्याने दाबून ठेवणे किंवा टाळणे   ही येतात. 
व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत मांसाहार व रुक्ष पदार्थ खाणे, अति तिखट सेवन, सतत बैठे काम, व्यायामाचा अभाव, अनियमित दिनचर्या, शौचाला आल्यावर ती दाबून टाळत राहणे, अतिजागरणे, व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश, गुदद्वारावर जोर देणे, सतत उन्हात फिरणे, पाणी कमी पिणे अशा गोष्टी मूळव्याधीला निमंत्रण देतात. आजच्या अद्ययावत जीवनशैलीत कमोडचा वापर आणि दैनंदिन अनियमित धावपळ यामुळे आपल्याकडेही, विशेषत: तरुण वर्गात मूळव्याधीचे प्रमाण वाढते आहे.पाइल्सचा त्रास आनुवंशिक असू शकतो. उतारवयात पाइल्स होण्याची शक्‍यता वाढते.

लक्षणे
 सुरवातीला बहुसंख्य रुग्णांमध्ये मूळव्याधीची लक्षणे अगदी किरकोळ असतात. मूळव्याधीची लक्षणे सर्वसाधारणपणे अशी असतात.  शौचाला झाल्यावर तांबडे लाल रक्त पडते. हे कधीकधी थेंब थेंब पडते, पण बऱ्याचदा पिचकारी उडाल्याप्रमाणे पडते.  शौचाला झाल्यावरही पोट साफ झाल्यासारखे वाटत नाही.  गुदद्वारा भोवतालच्या भागाला खाज सुटते, ते लाल होते आणि हुळहुळल्यासारखे वाटते. शौचाला होताना क्वचितप्रसंगी थोडे दुखते.
 गुदद्वाराभोवती गुठळी असल्याचे जाणवते. याला कोंब म्हणतात. ही गुठळी म्हणजे रक्त साकळून तयार झालेली रक्तवाहिनी असते. याला थ्रोम्बोज्ड पाइल्स म्हणतात.  वेळेवर वैद्यकीय उपचार न घेतल्यास पाइल्समध्ये काही गुंतागुंतीची लक्षणे आढळतात. उदा. सतत रक्तस्त्राव होत राहून रुग्णाच्या हिमोग्लोबिनमध्ये घट होऊन रुग्ण ॲनेमिक बनतो.  मूळव्याधीमधील रक्तवाहिनीतला रक्तप्रवाह अडकून तिथे रक्ताची गाठ होते. याला स्ट्रॅन्ग्युलेटेड हिमोऱ्हॉइड्‌स म्हणतात.  अशा मूळव्याधीच्या मांसल भागात आणि रक्तवाहिन्यात जंतुसंसर्ग होतो आणि तिथे गळू निर्माण होते, त्याची सूज वाढते आणि तो संसर्ग पसरतो. गुदद्वार आणि त्याच्या बाजूचा स्नायू यांच्याभोवती पू तयार होऊ शकतो. मूळव्याधीतील जंतुसंसर्गामुळे आतील पू शरीराबाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग शोधतो. त्यामधून भगेंद्र किंवा ’हाय एनल फिश्‍च्युला’ निर्माण होतात.  यामध्ये अनेकदा गुदद्वाराची आकुंचन क्षमता नष्ट होऊन शौचावरचा ताबा नष्ट होऊन कपड्यात न कळत शौचाला होऊ लागते. याला ’फीकल इंकॉन्टीनन्स’ म्हणतात. 

 मूळव्याधीमध्ये गुदद्वाराभोवताली तीन मुख्य कोंब असतात. घड्याळातील २ , ७ आणि ११ या स्थानांप्रमाणे त्या आढळून येतात. यांना ’प्रायमरी पाइल्स’ असे म्हणतात. इतर जागी असणाऱ्या कोंबांना ’सेकंडरी पाइल्स’ असे संबोधले जाते. या मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होण्याचे प्रमाण जास्त असते. फार काळ दुर्लक्ष केल्यास अंतर्गत कोंब बाहेर येऊन गुदद्वाराची संपूर्ण चंबळच बाहेर येते.
अंतर्गत पाइल्सचे टप्पे मूळव्याध साधारणपणे चार टप्प्यात आढळते. या टप्प्यांना मूळव्याधीची अवस्था किंवा  इल्सच्या ग्रेड्‌स म्हणतात.
ग्रेड १- यात मूळव्याधीची अगदी सुरवात असते. त्यांना थोडी सूज असते, पण गुदद्वाराच्या बाहेर त्या दिसत नाहीत.
ग्रेड २- पहिल्या टप्प्यापेक्षा त्या वाढलेल्या असतात. इतर वेळी त्या गुदद्वाराच्या आतील बाजूस राहतात, पण शौचाला होताना त्या गुदद्वाराच्या बाहेर येतात. मात्र शौचाची क्रिया पूर्ण झाल्यावर त्या आपोआप आत जातात.
ग्रेड ३- या अवस्थेत मूळव्याध गुदद्वारातून बाहेर पूर्ण लोंबू लागतात. याला ’प्रोलॅप्स्ड हिमोऱ्हॉइड्‌स’ म्हणतात. त्यातून रक्त पडताना जाणवते. मात्र शौचानंतर त्या पुन्हा आत ढकलता येतात.
ग्रेड ४- या टप्प्यात मूळव्याध आत ढकलता येत नाही. त्या पूर्णपणे बाहेर लोंबत राहतात. या टप्प्यात त्वरित उपचाराची गरज असते.

बाह्य मूळव्याध 
यात गुदद्वाराच्या बाहेरील बाजूने रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या होतात. त्या फुगतात, त्यांना खाज सुटत राहते. त्यातील रक्त गोठल्यामुळे त्या दुखतात. त्यात जंतूसंसर्ग होतो. यांना ’थ्रोम्बोज्ड पाइल्स’ म्हणतात. यातही त्वरित उपचाराची गरज असते.

निदान
रुग्णाच्या शौचाबाबत असणाऱ्या तक्रारीवरून उदा. शौचाला रक्त पडणे, रक्ताची चिळकांडी उडणे, गुदद्वाराला खाज येणे इत्यादी आणि लक्षणांवरून मूळव्याधीचे प्राथमिक निदान डॉक्‍टर करतात. रुग्णाची तपासणी करताना बाह्य निरीक्षणांवरून पाइल्सच्या प्रकाराची आणि टप्प्याची कल्पना येऊ शकते. ’डिजिटल रेक्‍टल एक्‍झामिनेशन’ म्हणजे ग्लोव्हज घालून गुदद्वाराची बोटांनी केलेली तपासणी महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे प्रोक्‍टोस्कोप हे उपकरण गुदद्वारातून आत घालून मूळव्याध तपासली जाते. यात त्याचे व्याप्ती निश्‍चित कळते. रुग्णाला आतड्याचे अन्य आजार असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन, आतड्याची दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी म्हणजे कोलॉनोस्कोपी करणे अनेकदा आवश्‍यक असते. आतड्याच्या कर्करोगामध्येदेखील पाइल्स होऊ शकतात. आतड्याच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता  कोलोनोस्कोपी खूप महत्त्वाची ठरते. रुग्णाच्या पोटाचा सिटीस्कॅन केल्यास अशा कर्करोगांची शक्‍यता दूर करता येते.

उपचार
मूळव्याध होऊ नये म्हणून काही काळजी घेतल्यास आणि सुरवातीच्या काळात मूळव्याध रोखण्यासाठी उपाय केल्यास ती टाळता येते. 
प्रतिबंधक उपाय : मूळव्याध होऊ नये किंवा झाल्यास वेळेत आटोक्‍यात यावी यासाठी मुख्यत्वे जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.
आहार : मांसाहार केल्यास शौचाला घट्ट होते. त्यामुळे सतत मांसाहार करणे टाळावे. याउलट ज्यामध्ये तंतूमय पदार्थ किंवा फायबर असते अशा घटकांचा समावेश आहारात जरूर असावा. या पदार्थात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, कोशिंबिरी, ताजी फळे यांचा दररोज समावेश असावा. फायबरमुळे शौचाला मऊ होऊन जोर करावा लागत नाही. त्याचबरोबर रोज २-३ लिटर पाणी घेणे आवश्‍यक ठरते. दही, ताक, घरगुती सरबते यांचा वापर करणे, नाश्‍ता, जेवण वेळच्या वेळी घेणे हे आवश्‍यक असते.
व्यायाम : अतिरिक्त वजनवाढ झाल्यास मूळव्याध होण्याची शक्‍यता वाढते. जास्त वजने उचलणे टाळावे. त्यामुळे पोटावर आणि गुदाशयावर दबाव येऊन मूळव्याधीचा त्रास होतो. याउलट चालणे, धावणे, जॉगिंग, पोहणे, सायकल चालवणे अशा व्यायामांनी वजन कमी होऊन मुळव्याधीचे त्रास कमी होतात.
विश्रांती : रात्रीची झोप किमान ७ -८ तास व्हायला हवी. जागरणे करणाऱ्यांना मूळव्याधीचा त्रास हमखास होतो. 
औषधोपचार : शौच मऊ होण्याकरिता इसबगोल, लिक्विड पॅराफिन, एरंडेल, क्रिमॅफिन, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, लॅक्‍टयुलोझ यांसारखी औषधे वापरता येतात. गुदद्वाराचा दाह कमी करण्याकरिता अनेक प्रकारची वेदनाशामक मलमे उपलब्ध आहेत. वेदना फार असल्यास वेदनाशामक गोळया आणि जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविकांचाही वापर केला जातो. संडासला जाऊन आल्यावर टबात कोमट पाणी घेऊन त्यात बसून शेक घेण्याने दाह कमी होतो. वरील सर्व उपचारांनी आराम न मिळाल्यास शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबिण्यात येतो.

शस्त्रक्रिया : हा रोग अनेक दिवस लपवला जातो आणि मग तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात शस्त्रक्रिया हा उपचार आहे. या रोगात पथ्य फारच जरुरी आहे. सर्वसाधारणपणे मूळव्याधीच्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्‍यकता भासते. यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. 
१. बॅण्डिंग : दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रेडच्या पाइल्ससाठी हा उत्तम उपाय असतो. यामध्ये मूळव्याधीच्या उगमाशी इलॅस्टिक बंध घट्ट आवळून ठेवला जातो आणि त्या मूळव्याधीचा रक्तप्रवाह खंडित केला जातो. दोन-चार दिवसात त्या पाइल्स निर्जीव होऊन गळून पडतात. यात कमीत कमी रक्तस्त्राव होतो आणि रुग्ण लवकर कामावर रुजू होऊ शकतो. मात्र एकावेळी जास्तीत जास्त दोनच कोम्बांवर हा इलाज केला जाऊ शकतो.
२. स्क्‍लेरोथेरपी : लहान कोंब असल्यास मूळव्याधीच्या कोंबात फिनॉल आणि बदामाच्या तेलाचे इंजेक्‍शन देऊन फायदा होऊ शकतो. सहा आठवडयांच्या अंतराने तीन वेळा अशा प्रकारचे इंजेक्‍शन देता येते. तिसऱ्या आणि दुसऱ्या ग्रेडमध्ये हा उपचार केला जातो. 
३. इन्फ्रारेड कोॲग्युलेशन : इन्फ्रारेड किरणांच्या तीव्रतेने यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील पाइल्सचे कोंब जाळले जातात.
४. हिमोऱ्हॉइडेक्‍टोमी : पूर्वापार चालत आलेली ही शस्त्रक्रिया पाइल्स पूर्ण बरी करू शकते. यात वाढलेल्या पाइल्स शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे काढून टाकल्या जातात.  
५.स्टेपलर : यामध्ये स्टेपलरच्या पिनांसारख्या पिन्स मूळव्याधीच्या उगमाशी टाचून त्यांचा रक्तपुरवठा खंडित करून त्या निर्जीव केल्या जातात. यामध्ये क्वचित प्रसंगी गुदाशयाचा भाग गुदद्वारात घसरला जाण्याची (रेक्‍टल प्रोलॅप्स) शक्‍यता असते.
६. नवे उपाय : अल्ट्रासाऊंड सर्जरी, लेझर सर्जरी असे नवे पर्याय आज विकसित झालेले आहेत.

संबंधित बातम्या