वंध्यत्व-शाप आणि उ:शाप

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

मातृत्व हे स्त्रीला निसर्गाने दिलेले वरदान आहे, पण वंध्यत्व हा शाप आहे. या शापाला उ:शाप म्हणून वैद्यकीय शास्त्राने अनेक वर्षे सातत्याने संशोधन करून नवनव्या निदान पद्धती आणल्या आणि त्याचे आधुनिक उपचारदेखील प्रत्यक्षात उतरवले. 
वंध्यत्वासाठी उपचार घेण्यापूर्वी कोणत्याही जोडप्याला त्यांना मूल का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये जे दोष निघतील त्या त्या प्रमाणे उपचार केले जातात.   

निदान
वैद्यकीय इतिहास : वंध्यत्वाचे निदान करताना अगोदर जोडप्याच्या वैयक्तिक आरोग्याबाबत माहिती घेतली जाते. त्यांना पूर्वीपासून असलेले आजार, कोणत्याही कारणासाठी झालेल्या शस्त्रक्रिया, औषधोपचार, त्यांची लैंगिक माहिती आणि एकमेकांशी होणाऱ्या समागमाबाबत माहिती घेतली जाते.

पुरुषांची तपासणी : वैद्यकीय इतिहासानंतर पुरुषांची शारीरिक आणि लैंगिक अवयवांची तपासणी केली जाते आणि प्रयोगशाळेत त्यांच्या वीर्याचे विश्‍लेषण केले जाते. मूल न होण्याच्या एकूण कारणांपैकी अर्धीअधिक कारणे पुरुष वंध्यत्वात असतात असे अनेक सर्वेक्षणात आढळून आले आहे. पण आधुनिक वंध्यत्व उपचारांमुळे तसेच जैवतंत्रज्ञानातील सहभागामुळे पुरुष वंध्यत्वाच्या चिकित्साच्या दिशा स्पष्ट होत आहेत. यापूर्वी फक्त ‘सीमेन ॲनॅलिसिस’ म्हणजे वीर्याचे शास्त्रीय पृथक्करण केल्यावरच शुक्राणूंच्या कार्यक्षमतेचे प्रमाण आणि फलनक्षमता लक्षात यायची. पण आता ’स्पर्म डीएनए फ्रॅगमेन्टेशन टेस्ट’ तसेच ‘हायपो ऑस्मोलर स्पर्म फंक्‍शन टेस्ट’ यांसारख्या अत्याधुनिक तपासण्यांमुळे शुक्राणूंच्या कार्यक्षमतेबद्दल अधिक माहिती मिळवून उपचार पद्धत ठरवता येते.

स्त्रिया : स्त्रियांच्या बाबत त्यांचा वैद्यकीय इतिहासासोबत त्यांच्या मासिक पाळीच्या नियमितपणाबाबत माहिती घेतली जाते. त्यानंतर त्यांची शारीरिक तपासणी विशेषतः लैंगिक अवयवांची अंतर्गत तपासणी बारकाईने केली जाते. त्यानंतर त्यांच्या संप्रेरकांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. अल्ट्रा साऊंड सोनोग्राफीद्वारे गर्भाशय आणि बीजांडकोषांमधील दोषांबाबत माहिती घेतली जाते. गर्भाशयाच्या बीजवाहक नलिका आतून खुल्या आहेत का हे पहायला (ट्यूबल पेटन्सी टेस्ट) ‘हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी’ सारखे विशेष प्रकारचे एक्‍सरे काढले जातात.
 वंध्यत्वाच्या उपचारासाठी आलेल्या जोडप्यांमध्ये या तपासण्या केल्यावर ८० टक्के जोडप्यांमध्ये खालील दोष सापडतात. 
    स्त्रीबीजाचे विमोचन होण्याची (ओव्ह्युलेशन) बाबत दोष असणे. 
    स्त्रीबीजनलिका काही अडथळ्यामुळे बंद झालेल्या असणे. (ट्यूबल ब्लॉक) 
    त्या जोडप्यातील पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये काही विशेष दोष असणे 

यातील साधारणतः ५ ते १५ टक्के जोडप्यांमध्ये सर्व तपासण्या नॉर्मल असतात आणि कुठलाही दोष आढळत नाही, पण तरीही मूल होत नसते.  स्त्री वंध्यत्वामध्ये ’ॲण्टी मुलेरियन हामोर्न्स’ ही  रक्‍ताची तपासणी केल्यावर गर्भधारणा क्षमता अचूक तपासता येते. कारण वाढत्या वयाप्रमाणे स्त्री बीजकोषाची क्षमता कमी होत जाते. ‘एन्डोमेट्रियल ब्लड फ्लो’सारखी कलर डॉप्लर सोनोग्राफी केल्याने गर्भाशयातील रक्तपुरवठा मोजता येतो. गर्भाशयातील आतील आवरणाला एन्डोमेट्रियम असं म्हणतात. त्याला रक्तपुरवठा बाहेरून आत होत असतो. गर्भाशयात गर्भ रुजताना रक्तपुरवठा आतून बाहेर होतो. जर रक्तपुरवठा कमी असेल तर गर्भधारणेस बाधा येते. अशा समस्येमध्ये आधुनिक औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेद्वारे  गर्भाशयातील रक्तपुरवठा सुधारता येतो. आजकाल लॅपरोस्कोपीसारख्या दुबिर्णीच्या तपासानेदेखील वंध्यत्वाचे निदान करून त्वरित दुबिर्णीद्वारे शस्त्रक्रियेचे उपचार होऊ शकतात. इच्छा असूनही लग्नानंतर ३ ते ४ वर्षात मूल होत नसल्यास पती आणि पत्नी दोघांनीही चाचण्या करून घेणे आवश्‍यक  असते. बहुतांश दांपत्यांना समुपदेशन व योग्य सल्ला दिल्यानंतर मूल होण्यास मदत होते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अशा अनेक दांपत्यांच्या वाट्याला आज अपत्यप्राप्तीचा आनंद आला आहे किंवा येण्याची आशा निर्माण झाली आहे.

उपचार
लग्नानंतर २ वर्षे झाल्यावर अपत्यप्राप्ती होत नसेल, तर कोणतीही दिरंगाई न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्‍टरकडे उपचारास सुरवात करावी. या उपचारांच्या सुरवातीला जोडप्याचे समुपदेशन केले जाते. या दरम्यान संकोच न बाळगता डॉक्‍टरांना आपल्या वैवाहिक कामजीवनाविषयी संपूर्ण माहिती त्यांनी देणे अपेक्षित असते, ज्यायोगे डॉक्‍टरांनी केलेले उपचार त्यांना उपयुक्त ठरतील. वैद्यकीय सल्ल्यानुसारच वैद्यकीय तपासण्या कराव्यात.

प्राथमिक उपचार : सोनोग्राफीद्वारे बीजांडकोषाची तपासणी करून आवश्‍यक वाटल्यास औषधोपचाराद्वारे गर्भधारणेसाठी सुयोग्य असे स्त्रीबीज तयार केले जाते.
बीजांडकोषातून स्त्रीबीज विमोचन होऊन बाहेर पडू शकत नसेल, तर काही विशिष्ट औषधे वापरून ते साधले जाते. 

लॅप्रोस्कोपी : यामध्ये बेंबीजवळ एक छोटे छिद्र पाडून दुर्बीण यंत्राच्या मदतीने गर्भनलिकेची तपासणी करतात या तपासणीमध्ये जननेंद्रियातील असलेले रोग अथवा अडचणी अत्यंत सूक्ष्मपणे तपासल्या जातात. आवश्‍यक असल्यास तत्काळ योग्य ते उपचार करून जननेंद्रियातील दोष दूर केले जातात.

हिस्ट्रोस्कोपी : या पद्धतीने गर्भाशयाच्या आतील भागाचे परीक्षण करून, वैद्यकीय उपकरणाने खरवडून आतील स्तराचा भाग  तपासणीसाठी प्रयोगशाळेतमध्ये पाठवला जातो.या तपासणीमुळे स्त्रीबीज निर्मितीमधील अडचणी, गर्भाशयातील जंतूसंसर्ग इत्यादी गोष्टींचे निदान करता येते. त्या अनुषंगाने पुढील उपचार पद्धती ठरवली जाते

ट्युबोप्लास्टी (मायक्रोसर्जरी) : गर्भनलिका बंद असल्यामुळे होणाऱ्या वंधत्वाच्या निराकरणासाठी बंद असलेली बीजनलिका पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. ट्युबोप्लास्टी ही वंध्यत्वावर मात करणारी छोटी शस्त्रक्रियाच होय. ट्युबोप्लास्टीला ’रिकॅनलायझेशन ऑफ फॅलोपिअन ट्यूब’ असेही म्हणतात. बीजनलिका (फॅलोपिअन ट्यूब) ही गर्भाशयात स्त्रीबीज वाहून आणण्याचे कार्य करते. बीजनलिका कुठे, किती ठिकाणी आणि कशामुळे बंद आहेत हे शोधून त्यावर उपाययोजना केली जाते. ट्युबोप्लास्टीत ऑपरेशन करून गर्भनलिकेतील दोष दूर केला जातो. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व विशेष यंत्रतंत्राच्या सहाय्याने ( मायक्रोसर्जरी ) केली जाते. यामुळे वंध्यत्वावर मात शक्‍य होते. व्हिडिओ लॅप्रोस्कोपच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये शरीरावर कोणत्याही प्रकारे बाह्य छेद घेतला जात नाही. कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेने जरी बीजनलिका बंद केली असली, तरी ती या शस्त्रक्रियेने पुन्हा कार्यरत करता येते.

लॅप्रॉटॉमी : यात पोटावर छेद दिला जातो आणि मग शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तर पुढच्या ६ ते १२ महिन्यात गर्भधारणा होऊ शकते. 

टेस्ट ट्यूब बेबी आयव्हीएफ : टेस्ट टयूब बेबी किंवा इन व्हिट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) द्वारे गर्भधारणा ही वंध्यत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पद्धत आहे. जगातील पहिल्या टेस्ट टयूब बेबीचा जन्म २५ जुलै १९७८ रोजी इंग्लंडमधील ओल्डहॅम जनरल हॉस्पिटल, ग्रेटर मॅंचेस्टर, इंग्लंड येथे झाला. त्यानंतर लगेचच ६ ऑक्‍टोबर १९७८ मध्ये भारतात कोलकाता येथे डॉक्‍टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या नावे ‘दुर्गा’ हिच्या जन्माची नोंद झाली. या तंत्राचा शोध लागून आता जवळजवळ ४० वर्षे होत आली. एवढ्या कालावधीत जगभरात लाखो बालके जन्मास आली आहेत. यामध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या २० व्या दिवसापासून इंजेक्‍शन्स दिली जातात. ती रोज एक अशी २० ते २५ दिवस घ्यावी लागतात. यामध्ये एक पाळी येते आणि दुसऱ्या दिवसापासून बीजांडकोषात स्त्रीबीजे तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्‍शन्स सुरू केली जातात. पाळीच्या नवव्या दिवसापासून ‘फॉलिक्‍युलर स्टडी’ केला जातो. त्यात बीजांडकोषातील फॉलिक्‍युल्सची वाढ १८ मिलिमीटर पेक्षा जास्त झाली, की इंजेक्‍शन देऊन ३६ तासांनी तयार झालेली स्त्रीबीजे बीजांडकोषातून सुईने बाहेर काढली जातात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो.  यामध्ये रुग्णाच्या पोटावर कोणतीही शस्त्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली स्त्रीबीजे आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेत मीलन घडवून आणले जाते. त्यानंतर शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ इन्क्‍युबेटरमध्ये २ ते ३ दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भाशयात सोडला जातो. हा गर्भ गर्भाशयात रूजतो. ९ महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते. या प्रक्रियेमध्ये यश येण्याचे प्रमाण जास्त चांगले आहे. काही जोडप्यात पहिल्याच प्रयत्नात ही प्रक्रिया यशस्वी होते, तर काही जणांमध्ये तीन चार वेळा प्रयत्न करावे लागतात.

आय.यु.आय. प्रक्रिया  : पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी आययुआय (इंट्रा युटेराइन इनसेमिनेशन) या पद्धतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्‍यता वाढते. यामध्ये गर्भपिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य एका सूक्ष्म नळीने सोडले जाते.  स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्‍शन देऊन बीजांडकोशात स्त्रीबीजे परिपक्व केली जातात. त्याचा फॉलीक्‍युलर स्टडीकरून ३६ तासानंतर आययुआय केले जाते.

इक्‍सी (आय.सी.एस.आय.) प्रक्रिया : ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी इक्‍सी (इंट्रा सायक्‍लोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्‍शन) याचा उपयोग होतो. या प्रकारात आयव्हीएफसारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्राणू स्त्री बीजांवर न सोडता आतमध्ये इंजेक्‍शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्‍यकता नसते.

एम्ब्रियो डोनेशन : पतीमध्ये शुक्राणू आणि पत्नीचे बीजांड दोन्ही तयार होत नसतील तर दुसऱ्या जोडप्याचा गर्भ संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. यामुळे स्त्री गर्भवती राहू शकते. या प्रकारात दोन्ही जोडप्यांची कायदेशीर लेखी संमती आवश्‍यक असते.

‘सरोगसी’ : जन्मत: जर एखाद्या स्त्रीला गर्भाशय नसेल किंवा काही कारणांनी ते काढून टाकले असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच बीजांडकोषात स्त्रीबीज तयार करून पतीचे शुक्राणू वापरून गर्भ तयार होतो तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसऱ्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी स्त्री हा गर्भ वाढवते तिला सरोगेट मदर म्हणतात.

गर्भाशय प्रत्यारोपण : ज्या स्त्रियांना गर्भाशयाच्या काही आजारांमुळे गर्भधारणा होणे अशक्‍य असते. त्यांना मूल दत्तक घेणे किंवा सरोगसी हा पर्याय असतो. पण याही गोष्टी ज्यांना नको असतात, त्यांच्यासाठी आज गर्भाशय प्रत्यारोपण (युटेराईन ट्रान्सप्लांट) हा पर्याय आज उपलब्ध झालेला आहे. यामध्ये एका निरोगी स्त्रीचे गर्भाशय अशा मूल नसलेल्या स्त्रीच्या शरीरात बसविले जाते आणि तिला मातृत्वासाठी सक्षम केले जाते.
 
इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाईड रिसर्च या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगात १५ टक्के महिला वेगवेगळ्या कारणांमुळे आई होऊ शकत नाहीत. यापैकी ३ ते ५ टक्के महिलांना गर्भाशयाचे आजार झालेले असतात. या स्त्रियांना याचा उपयोग होऊ शकतो. पुण्याच्या डॉ. शैलेश पुणतांबेकरांनी याप्रकारच्या काही यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. संपूर्ण जगात केवळ  ४२ गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचे एका जागतिक अहवालात म्हटले आहे. मात्र यातील केवळ ८ महिला या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर गरोदर राहिल्या आहेत. थोडक्‍यात सांगायचे तर, नैसर्गिक कारणांनी, अपघातांनी किंवा आजारांनी मातृसुखापासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना विज्ञानाने अनेकविध उपाय शोधून काढले आहेत, आणि ते या पुढेही संशोधिले जातील यात शंकाच नाही. वंध्यत्वाच्या शापाला विज्ञानाने दिलेले हे उ:शापच नाहीत का?        (उत्तरार्ध)

संबंधित बातम्या