संधिवात-केवळ सांधेदुखी नव्हे

डॉ. अविनाश भोंडवे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

मानवी जीवनात वेदना देणारे असंख्य आजार आहेत. काही वेदना तात्पुरत्या असतात, तर काही वेदना दीर्घकाळ टिकतात. पण असेही वेदनामय आजार असतात, की जे आयुष्यभर पिच्छा पुरवतात. संधिवात हा असाच एक आजार आहे. 

मानवी शरीरात जन्मजात २७० हाडे असतात आणि तारुण्यात प्रवेश करेपर्यंत त्यातील बरीच हाडे एकत्र जोडली जातात. पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीत एकूण २०६ हाडे असतात. ही हाडे विविध सांध्यांनी एकत्र जोडली जातात. असे एकंदरीत ३६० सांधे मानवी शरीर जन्मतः सांभाळत राहते. या सांध्यांची शरीरातील विभागणी पाहू गेल्यास - 
शरीराचा भाग                                सांध्यांची संख्या
कवटी                                           ८६
मान आणि गळा                             ६ 
छाती                                            ६६
कंबर आणि ओटीपोट                       ७६ 
दंड, हात आणि हाताची बोटे              ६४ 
मांड्या, पाय आणि पायाची बोटे         ६२ 

सांध्यांचे प्रकार 
दोन किंवा अधिक हाडे एकत्र येऊन सांधा तयार होतो खरा, पण त्याचे बरेच प्रकार आहेत. नुसती रचना पाहू गेलो तर खांदा आणि खुबा हे सांधे बॉल आणि सॉकेट पद्धतीचे; गुडघा आणि कोपराचे सांधे बिजागरीप्रमाणे; मनगटे, मणके आणि पायाच्या घोट्याचे सांधे एकमेकांवर सरकणारे (ग्लायडिंग); तर हातापायांच्या बोटांचे आणि जबड्याचे सांधे वाटोळा उंचवटा करून (कॉण्डिलॉइड) पद्धतीचे आणि हाताच्या अंगठ्याचे सांधे घोड्याच्या खोगीराप्रमाणे असतात. सांध्यांच्या अंतर्गत घटकात असलेले टिश्‍यूदेखील वेगवेगळे असतात. कवटीचे सांधे तंतुमय पदार्थांनी बनतात. ते जुळून गेलेले अaसतात आणि त्यात हालचाल होत नाही. काही सांधे कुर्चेने बनतात, पण बहुसंख्य सांध्यांमध्ये दोन्ही-तिन्ही हाडांत हालचाल सुलभ व्हावी म्हणून सायनोव्हिअल द्राव नावाचा एक द्रवपदार्थ असतो. 

संधिवात 
सर्वसाधारणपणे सांधे दुखण्याला संधिवात समजले जाते. मात्र बोलीभाषेतल्या संधिवात शब्दात आणि ‘संधिवात’ या वैद्यकीय आजारात फरक आहे. सांधे अनेक कारणांनी दुखतात, उदा. आपण खूप चाललो, प्रथमच बैठका मारण्याचा व्यायाम केला, खूप धावपळीचा प्रवास झाला, एखाद्या सांध्यावर आघात झाला, खूप थंडी पडली, ताप आला तर आपले सांधे ठणकतात. पण केवळ सांधे दुखणे म्हणजे संधिवात नव्हे. शरीरातील चयापचय क्रियेतील दोषामध्ये जेव्हा सांध्यांच्या आवरणावर सूज येते, त्याला संधिवात किंवा वैद्यकीय भाषेत ‘ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिस’ म्हणतात. 
सांध्यांना सूज येऊन होणारा हा संधिवात म्हणजे एक त्रासदायक प्रकरण असते. यामध्ये शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीमध्ये (इम्युन सिस्टिम) दोष निर्माण होतो. आपल्या शरीराची ही प्रणाली खरेतर बाहेरून आक्रमण करणारे रोगजंतू, विषाणू किंवा शरीराला धोकादायक पदार्थांवर आक्रमण करून त्यांचा नाश करण्यासाठी असते. पण या प्रणालीत दोष निर्माण होऊन आपल्या शरीरातील सांध्यांवर आक्रमण होते आणि सांध्यांना सूज येते. सांध्यांतले सायनोव्हियम सुजले, की त्यामुळे कूर्चा आणि हाडांना खड्डे पडून दोन-तीन महिन्यांतच सांध्यांचा नाश व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर हाडांना जोडून ठेवणारे स्नायू आणि त्यांचे दोर (लिगामेंट्‌स) कमकुवत होतात आणि सांध्यांचा आकार बदलून त्यात विकृती निर्माण होऊ लागते. त्यामुळे आजारांच्या या प्रकाराला ‘ऑटो-इम्युन डिसीज’ म्हणतात. 

लक्षणे  

  • सांधे सुजतात, स्पर्श केल्यास ते गरम लागतात आणि खूप दुखतात. 
  • सकाळी उठल्यावर सांधे कडक आणि ताठर असतात.  
  • अनेकदा ताप येतो, खूप थकवा येतो आणि वजनात घट होऊ लागते. 
  • संधिवातात सुरुवातीला हातांच्या आणि पायांच्या बोटांना सूज येते. 
  • आजार जसजसा वाढू लागतो, तसतसे मनगटे, गुडघे, घोटे, कोपर, खांदे आणि खुब्याचे सांधे यामध्ये सूज येते. 

    ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिसने त्रस्त ४० टक्के रुग्णांना सांध्यांबरोबर त्वचा, डोळे, फुफ्फुसे, हृदय, रक्तवाहिन्या, मूत्रपिंडे, मज्जातंतू, हाडातील मगज आणि लालोत्पादक पिंडे यांनाही सूज येण्याचा त्रास होतो. 
    अनेक रुग्णांमध्ये सांधे काही काळ खूप सुजतात आणि त्यानंतर सूज नाहीशी होऊन रुग्णाला बरे वाटते. असा त्रास कमी-जास्त होत राहतो. पण या काळात अंतर्गतरित्या सांध्यांच्या हाडांची झीज सातत्याने सुरूच राहते. कालांतराने ते वेडेवाकडे होतात. 

विशेष गोष्टी  

  • संधिवात होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांत जास्त असते. 
  • संधिवात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो, पण आकडेवारीनुसार ४० ते ६० वयोगटात त्याचे प्रमाण जास्त असते. 
  • एखाद्याच्या आईवडिलांना, भावाबहिणींना, जवळच्या रक्ताच्या नात्यात संधिवात असल्यास त्याला ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिस होण्याची शक्‍यता अधिक असते. 
  • ज्यांना अशी आनुवंशिकता असते, अशा व्यक्ती धूम्रपान करत असतील तर त्यांना संधिवात लवकर होतो आणि त्याची लक्षणे व वेदना जास्त तीव्र असतात. 

    ॲस्बेस्टॉस, सिलिका या गोष्टींचा संपर्क जास्त असेल तर हा आजार होतो असेही सर्वेक्षणात आढळून आले आहे. अमेरिकेतील ९/११ दुर्घटनेत वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळल्यामुळे जी धूळ निर्माण झाली त्यामुळे तेथील अनेक रुग्णांमध्ये संधिवाताची सुरुवात झाली असेही ध्यानात आले आहे. 
    अतिवजनवाढ किंवा स्थूलत्वामध्ये संधिवात होण्याची शक्‍यता बळावते. 

शरीरावर होणारे परिणाम 
संधिवात हा दीर्घकाळ त्रास देणारा आजार असतो, त्यामुळे त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. यामध्ये...  
    हाडे ठिसूळ होणे ः ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिसमुळे आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजे कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. याचा परिणाम किरकोळ कारणांनी हाडांची फ्रॅक्‍चर्स उद्‌भवण्यात होतो. 
    संधिवाताच्या गाठी ः शरीरावर, सांध्यांवर विशेषतः कोपरावर आणि शरीरांतर्गत फुफ्फुसांमध्ये संधिवाताच्या गाठी निर्माण होतात. यांना ऱ्हुमॅटॉइड नोड्यूल्स म्हणतात. संधिवाताच्या रुग्णांना डोळे शुष्क पडणे, तोंडाला सतत कोरडेपणा वाटणे असे त्रास उद्‌भवतात. याला ‘स्योग्रेन्स सिंड्रोम’ म्हणतात. 
    जंतुसंसर्ग ः या आजारात शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये दोष निर्माण होतो. तसेच प्रतिकारशक्ती आणखी कमी होते.  
    बेडौलपणा ः संधिवातामध्ये शरीरातील मेदाचे प्रमाण स्नायू आणि मांसल भागांपेक्षा जास्त होते. त्यामुळे शरीराचा डौल बिघडतो. 
    कार्पल टनेल सिंड्रोम ः यात मनगटाची हाडे सुजल्यामुळे त्यातून जाणारे मज्जातंतू दबून जातात आणि बोटे बधिर होऊन त्यातील शक्ती कमी होण्याचा त्रास होतो. 
    हृदयविकार ः रक्तवाहिन्या कडक होऊन त्या बंद होण्याची शक्‍यता उद्‌भवते. तसेच हृदयाची जी वेष्टणे असतात त्यांना सूज येऊन पेरिकार्डायटिस होऊ शकतो. 
    फुफ्फुसे ः संधिवातात फुफ्फुसांना इजा होते. त्यामुळे श्‍वास घेताना अडथळा होणे, दम लागणे असे प्रकार उद्‌भवतात. 
    लिम्फोमा ः शरीरातील रसवाहिन्या आणि रसग्रंथींमध्ये दोष निर्माण होऊन लिम्फोमा हा कर्करोगाचा एक प्रकार उद्‌भवू शकतो. 
    रोगनिदान ः डॉक्‍टरांनी रुग्णाची शारीरिक तपासणी करताना आणि त्याच्या आजाराचा इतिहास समजून घेताना बरेचसे निदान होते. त्याची खात्री करून घेण्यासाठी रक्ततपासणी करावी लागते. यात इ.एस.आर., सी.आर.पी., आर.ए. फॅक्‍टर, ॲण्टिसीसीपी ॲण्टिबॉडीज या तपासण्या कराव्या लागतात. रुग्णाच्या शरीरातील ड जीवनसत्त्व, कॅल्शियम यांच्या पातळीची पडताळणीदेखील केली जाते. रुग्णाच्या आजाराची व्याप्ती जास्त असेल तर एक्‍सरे, एमआरआय, सोनोग्राफीसारख्या तपासण्या कराव्या लागतात. 

उपचार 
    नॉन स्टीरॉइड अँटि इन्फ्लेमेटरी ड्रग्ज (एनएसएआयडी) ः या गटातील औषधे आजाराच्या सुरुवातीच्या काळात परिणामकारक ठरतात.
    स्टीरॉइड्‌स ः ही औषधे जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा वापरावी लागतात. प्रेड्‌नीसोलोन, डेक्‍सामिथाझोन आणि अन्य प्रकारची ही कॉर्टिकोस्टीरॉइड्‌स सांध्यांची सूज आणि वेदना वेगाने कमी करतात आणि सांधे खराब होण्याची क्रिया मंदावतात. मात्र ही दीर्घकाळ द्यायची नसतात. ती एकदम बंद न करता, त्यांची मात्रा हळूहळू कमी करायची असते. 
    डिसीज मॉडिफाइंग एजंट्‌स ः ही औषधे या आजाराची वाढ मंद करतात, त्यामुळे सांधे आणि त्याच्या बाजूचे स्नायू, लिगामेंट्‌स खराब होण्याचे टळू शकते. या प्रकारात मोडणारी औषधे म्हणजे मिथोट्रिक्‍सेट, लेफ्लूनोमाईड, हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्विन, सल्फासलाझिन. मात्र यांचा वापर करताना त्यांचा यकृत, रक्तपेशी निर्मिती, फुफ्फुसांवरील परिणाम या साइड इफेक्‍ट्‌सचा पाठपुरावा ठेवावा लागतो. 
    बायॉलॉजिकल एजंट्‌स ः संधिवातामध्ये रोगप्रतिकार प्रणालीत दोष निर्माण होतात. त्यामुळे या प्रणालीवर कार्य करणारी ही नवी औषधे आल्यापासून असंख्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 
    व्यायाम ः सांध्यांना आजाराच्या सुरुवातीपासून व्यायाम मिळाल्यास त्यांची हालचाल, गतिशीलता बऱ्याच प्रमाणात टिकवता येते. त्यासाठी फिजिओथेरपी, ॲक्‍युपेशनल थेरपी यांचा चांगला उपयोग होतो. 
    इतर पद्धती ः आयुर्वेद, होमिओपॅथी यांचा उपचार घ्यायला हरकत नाही, मात्र त्यासाठी अधिकृतपणे पदवी मिळवलेल्या डॉक्‍टर्सना प्राधान्य द्यावे. आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या नावावर रुग्णांना भुलवणाऱ्या बोगस वैदूंपासून जपून राहावे. 

लहान मुलांचा संधिवात 
चौदा वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात ही एक वेगळीच समस्या आहे. मुलांमध्ये सांधेदुखीची सुमारे शंभरापेक्षा अधिक कारणे असतात. त्यातही अर्थात ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिस महत्त्वाचा आहे. वाढत्या वयाच्या मुलांत सांध्यांच्या जवळच उंची वाढवणाऱ्या हाडांची वाढणारी टोके असतात. त्यामुळे सांधा बिघडला की वाढ खुंटते. लहान मुलांच्या संधिवाताचे एकूण सात उपप्रकार आहेत. ते सारे संधिवात मोठ्या माणसांसारखेच असले, तरी लहान वयामुळे या संधिवाताकडे जास्त गांभीर्याने पाहणे गरजेचे असते. 
लहान वयात होणारा आणखी एक महत्त्वाचा संधिवात म्हणजे ‘ह्युमॅटिक फीवर.’ घशातल्या स्ट्रेप्टोकॉकस जंतूंविरोधी शरीरात जे प्रतिकण तयार होतात. परिणामतः एकानंतर एक सांधे सुजत जातात. या संधिवातात हृदयाच्या झडपा खराब होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे असे जंतू वारंवार उद्‌भवू नयेत म्हणून वयाच्या तीस-पस्तीस वर्षांपर्यंत पेनिसिलीन देतात. माणसाच्या शरीराची हालचाल थांबवणारा, वेदनादायक असा हा संधिवात टाळता जरी येत नसला, तरी त्याची लक्षणे ओळखून वेळेत उपचार करणे खूप महत्त्वाचे असते.  

संबंधित बातम्या