आरोग्याचे राहू-केतू 

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू, केतू, शनी, मंगळ असे ग्रह, त्यांची दशा, त्यांचे वक्री होणे आणि अनिष्ट युती होणे याबाबत बरीच चर्चा केली जाते. सर्वसामान्य माणसाला त्यातील बारकावे कळत नाहीत. पण अमुक ग्रह तमुक स्थानी आला किंवा त्याची फलाण्या ग्रहाशी युती झाली की ते खूप त्रासाचे असते, असे ज्योतिषी सांगतात. मग बऱ्यापैकी धावपळ आणि खर्च करून त्यावर उपाय केले जातात. 

आपल्या आरोग्याबाबत असेच आहे. आरोग्याला पायदळी तुडवणाऱ्या काही सवयी अनेक आजारांना जन्म तर देतातच, पण एखादी अनिष्ट सवय आणि आजार हे जर एकत्र आले, तर त्यांची युती जिवाला धोकादायक ठरू शकते. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन आजारांची व्याप्ती जगभरात वाढत चाललेली आहे आणि याच जीवनशैलीत व्यसनांचे प्रमाण सर्व सामाजिक स्तरात पसरत चालले आहे. धूम्रपान आणि मद्यपान या व्यसनांची युती मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्याशी झाली, तर त्या व्यक्तीच्या जिवावर बेतू शकते. त्यातही धूम्रपानाची सवय ही जास्त व्यापक आणि तितकीच गंभीर समजली जाते. 

मधुमेह आणि धूम्रपान 
मधुमेहाच्या सर्व प्रकारांमध्ये म्हणजे टाइप-१, टाइप-२, गर्भवतींचा मधुमेह, औषधांमुळे होणारा मधुमेह यामध्ये रक्तातील ग्लुकोज -  साखरेचे प्रमाण वाढलेले असते. या साऱ्यांमध्ये टाइप-२ या प्रकारातल्या रुग्णांची संख्या सर्वांत जास्त असते. प्रमाणाबाहेर वाढणारे वजन, सदोष आहार आणि व्यायामाचा अभाव असणारी बैठी जीवनशैली ही टाइप-२ मधुमेह होण्याची प्रमुख कारणे असतात. 
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि खोकल्याचे आजार होतात असाच साऱ्यांचा समज असतो. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर तसे चित्रही आजकाल असते. पण अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या सरकारी संस्थेनुसार टाइप-२ मधुमेह होण्यास धूम्रपान हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना टाइप-२ मधुमेह होण्याची शक्‍यता ४० टक्‍क्‍यांनी जास्त असते. एखादी व्यक्ती जेवढे जास्त प्रमाणात धूम्रपान करते, तेवढी त्याला मधुमेह होण्याची शक्‍यता जास्त असते आणि त्यांची साखर नियंत्रित करायला औषधांची मात्रा जास्त लागते. 
टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांना इन्शुलिनचे इंजेक्‍शन द्यावे लागते. मात्र ते जर धूम्रपान करत असतील तर त्यांच्या रक्तातील साखर सतत कमी-जास्त होत राहते आणि ती नियंत्रित करणे अवघड होऊन बसते. मधुमेहाच्या सर्व प्रकारांमध्ये, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या मधुमेहातील गुंतागुंत वाढते आणि खालीलपैकी अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. 

रेटायनोपाथी
यात १. डोळ्यामधील दृष्टीपटलावर रक्तस्राव होऊन अंधत्व येऊ शकते. २. मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. ३. हृदयविकार ४. अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. 

पायांवरील परिणाम
पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे पाय बधिर होणे, पायांना बऱ्या न होणाऱ्या जखमा होणे, त्यात जंतुसंसर्ग होऊन पाय तोडण्याची वेळ येणे असे त्रास होऊ शकतात. 

लैंगिक अकार्यक्षमता 
कारणे : वर उल्लेखिलेले सर्व आजार शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या बदलांशी संबंधित असतात. हे बदल मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये (मॅक्रोव्हॅस्क्‍युलर) आणि सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये (मायक्रोव्हॅस्क्‍युलर) निर्माण होणाऱ्या दोषांमुळे घडून येतात. मधुमेहामध्ये रक्तातील प्रमाणाबाहेर वाढलेल्या शर्करेमुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरावर दुष्परिणाम होत असतात. नेमके असेच परिणाम धूम्रपानातील निकोटिन आणि अन्य घटकांमुळेदेखील होत असतात. साहजिकच धूम्रपान आणि मधुमेह यांचा समसमासंयोग झाल्यावर हे आजार होण्याची शक्‍यता दुपटीने वाढते.  हे सर्व आजार नंतर गंभीर स्वरूप धारण करतात आणि मुख्यत्वे ते अपरिवर्तनीय असतात. एकंदरीत धूम्रपान हे त्याज्य व्यसन असतेच, पण मधुमेही व्यक्तींनी धूम्रपानाचे व्यसन कायमचे सोडून देणे अगत्याचे असते. शिवाय ज्यांना मधुमेहाची आनुवंशिकता आहे, जे अति-स्थूल आहेत अशांनी तर धूम्रपानापासून जरा चार हात दूरच राहणे उत्तम. 

उच्च रक्तदाब आणि धूम्रपान 
आपल्या शरीराला आवश्‍यक असलेल्या रक्ताचा पुरवठा रक्ताभिसरण संस्थेद्वारे होतो. ही संस्था हृदय आणि रक्तवाहिन्यांचे शरीरभर पसरलेले जाळे यांनी बनलेली असते. हृदय म्हणजे या संस्थेतील स्नायूंनी बनलेला, रक्ताचे चलनवलन करणारा प्रमुख अवयव असतो. सतत तालबद्ध रीतीने हृदय आकुंचन - प्रसरण पावत असते. हृदयाच्या या तालबद्ध हालचालींमुळे रक्त शरीरभर फिरत राहते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो, म्हणजेच ज्या दाबामळे रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (ब्लड प्रेशर) म्हणतात. 
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावून रक्तदाब वाढतो. नित्य धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. धूम्रपान जितके अधिक तितका उच्च रक्तदाबाचा विकार होण्याची शक्‍यता अधिक असते. तंबाखूत असलेल्या निकोटिन आणि कार्बन मोनॉक्‍साईड अशा विषारी घटकांमुळे नॉरॲड्रिनॅलीन नावाचे रासायनिक संप्रेरक अधिक प्रमाणात स्रवते आणि रक्तदाब वाढतो. या शिवाय धूम्रपानाचा आणि घटकांचा परिणाम रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरावर होऊन रक्तवाहिन्या कठीण होतात. 

उच्च रक्तदाब आणि धूम्रपानाचे दुष्परिणाम 
उच्च रक्तदाबामुळे आणि धूम्रपानाच्या एकत्रित परिणामाने रक्तवाहिन्यांवर आणि हृदयावर दीर्घकालीन आणि अपरिवर्तनीय गंभीर परिणाम होतात. 

 • हृदयाची कार्यक्षमता कमी होते : उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला आकुंचन-प्रसरणाचे कार्य करून हृदयातील रक्त शरीरात पोचवण्यास खूप त्रास होतो. त्यामुळे हृदयाचा आकार वाढून हृदय काही काळाने रुंदावते. मात्र त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. यालाच ‘हार्ट फेल्युअर’ असे म्हणतात. 
 • हृदयविकाराचा झटका : उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चौपट असते. उच्च रक्‍तदाबाच्या रुग्णांना छातीत दुखण्याचा त्रास (अंजायना) होण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते. 
 • मूत्रपिंडावर परिणाम : उच्च रक्तदाब दीर्घकाळ राहिला, तर रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ लागते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामतः: शरीरात मीठ आणि इतर त्याज्य पदार्थांची पातळी वाढते. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते. मूत्रविसर्जनाचे कार्य कमी प्रमाणात होऊ लागते. याचा परिणाम होऊन रक्तदाब अधिक प्रमाणात वाढतो, चयापचय क्रियेत गंभीर दोष निर्माण होतात आणि रुग्ण दगावू शकतो. 
 • अर्धांगवायू : अति उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. 
 • अंधत्व : डोळ्यातील दृष्टिपटलावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष किंवा अंधत्व येऊ शकते. 
 • डिसेक्‍टिंग ॲन्युरिझ्म : उच्च रक्तदाबामुळे काही रुग्णांमध्ये महारोहिणीच्या बाहेरील थराचा काही भाग अगदी पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. ही अत्यंत गंभीर आणि प्राणघातक अवस्था असते. यात रुग्णाच्या जिवाला कमालीचा धोका असतो. 

     रक्तदाब वाढत राहून तो नीटपणे आटोक्‍यात ठेवला नाही तर रुग्णाची आयुर्मर्यादा नक्कीच खुंटते.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब 
एकुणातल्या ३५ टक्के मधुमेही रुग्णांना उच्च रक्तदाबाचा विकार असतो असे अनेक  संशोधनातून आणि सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. हे दोन्ही आजार एकत्रित असणे ही गंभीर आजारांची नांदीच ठरते. ज्या रुग्णांना सुरुवातीला फक्त मधुमेह असतो, त्यांच्या शरीरक्रियेत खालील बदल घडून रक्तदाबाची सुरुवात होते - 

 • रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. 
 • शरीरातील द्रव पदार्थांचे एकुणात प्रमाण वाढते. 
 • शरीरातील इन्शुलिन स्रवणे कमी-अधिक होत राहते. 
 • या दोन्ही आजारांची मूलभूत कारणे तशी सारखीच असतात. अतिरिक्त वजनवाढ, सदोष आहार, व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता ही आजच्या सदोष, बैठी जीवनशैलीची वैशिष्ट्ये आहेत. नेमकी तीच रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजारांना कारणीभूत ठरतात. साहजिकच ते एकत्रितपणे उद्भवण्याची शक्‍यता टाळता येणे कठीण असते. 

मात्र हे दोन्ही आजार जेव्हा एखाद्यामध्ये एकत्रित असतात, तेव्हा हृदयविकार, अर्धांगवायू, मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणे, अंधत्व हे गंभीर त्रास त्याला होण्याची शक्‍यता तिपटीने जास्त असते. हे रुग्ण जर धूम्रपान करत असतील तर हे गंभीर त्रास कमी वयात आणि खूप तीव्रतेने उद्‌भवणे अधोरेखित होते. 

धूम्रपान सोडणे 
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, लखनौ, कोलकता, पुणे या भारतातील शहरात झालेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणामध्ये काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. 

 • धूम्रपानाचे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव असूनही, ९० टक्के लोकांना धूम्रपान सोडणे खूप कठीण जाते. 
 • धूम्रपान करणाऱ्यांपैकी २५ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असूनही ते धूम्रपान करतात. 
 • धूम्रपान करणाऱ्या दहापैकी आठ जणांना सकाळी झोपेतून उठल्या उठल्या धूम्रपानाची तीव्र इच्छा होते. 
 • धूम्रपान करणाऱ्या पुरुषांपैकी ४६ टक्के जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. 
 •  पाचपैकी चार जणांमध्ये कार्बन मोनॉक्‍साइडचे प्रमाण धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आढळले. 
 • उच्च रक्तदाब आणि धूम्रपानाने वाढलेली रक्तातील कार्बन मोनॉक्‍साइडची वाढलेली पातळी या दोन्हींचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. 
 • धूम्रपान करणाऱ्यांपैकी ९३ टक्के लोकांना त्यांच्या डॉक्‍टरांनी धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिलेला असतो, पण त्यातील अवघे १६ टक्के लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तीन महिन्यांतच ते पुन्हा सिगारेट ओढू लागतात. 
 • धूम्रपान करणाऱ्यांपैकी सुमारे २२ टक्के लोकांना ही सवय वयाच्या चोविसाव्या वर्षाच्या आत लागली आणि १६ टक्के लोकांनी धूम्रपानाला सुरुवात केवळ मजा म्हणून केली. 
 • धूम्रपानाची सवय केवळ गंमत म्हणून सुरू होते व नंतर ती प्राणघातक होते. 
 • धूम्रपान सोडणे हे अत्यंत कठीण काम आहे आणि बहुतेक लोक यात यशस्वी होऊ शकत नाहीत, हे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. हा आकृतिबंध थोड्याफार फरकाने सर्व शहरांत समानच आहे. 

तंबाखू सेवनाने भारतात दरवर्षी नऊ लाख लोक आपले प्राण गमावतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, तंबाखूने होणाऱ्या आजारांमुळे देशाला दरवर्षी साडेतीन कोटी डॉलर्सचा फटका बसतो. त्यामुळेच धूम्रपान करणाऱ्यांना ते सोडण्यासाठी मदत करणे राष्ट्रीय आरोग्याच्या दृष्टीने तसेच आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.  धूम्रपान करणाऱ्या बहुतेक लोकांना धूम्रपानाचे परिणाम किती गंभीर आहेत याची जाणीव असूनही ते धूम्रपान करत राहतात. त्यांच्या मते धूम्रपानामुळे ताण कमी होतो आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढते. या समजुतीमधला फोलपणा अनेक संशोधनात स्पष्ट झाला आहे. उलट धूम्रपान करणारे लोक ते न करणाऱ्यांच्या तुलनेत मानसिक तणावाला अधिक बळी पडतात. 
 

संबंधित बातम्या