व्यवसायजन्य आजार व प्रतिबंध

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

आजच्या जीवनात आर्थिक मिळकतीला कमालीचे महत्त्व अाहे. कुणी जीवनमान उंचावण्यासाठी तर कुणी अधिक श्रीमंत होण्यासाठी व्यवसाय-धंदा करत असतात. याशिवाय समाजातले अनेक जण आपली रोजीरोटी कमावण्यासाठी अशा कामधंद्यात इमाने इतबारे नोकरी करत असतात. या प्रत्येक व्यवसायात काही धोके असतात, आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक असतात. निरनिराळ्या व्यवसायातील दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाय करणे आणि ते परिणाम होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे यासाठी वैद्यकीय क्षेत्राची एक शाखा कार्यरत असते. यालाच ’ऑक्‍युपेशनल हेल्थ सायन्स’ म्हणतात.

इ.स.१९६० पर्यंत या शाखेला ’इंडस्ट्रियल मेडिसीन’ म्हटले जायचे. पण आजच्या युगात कारखाने सोडता अनेक क्षेत्रे अशी आहेत, की त्यातही त्या व्यवसायामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. भारतासारख्या देशात कारखान्यांच्या बाहेरच जास्त कामकरी जनता आहे. तिचे आरोग्य पाहण्यासाठी काहीही यंत्रणा नाही. उदा. शेती व्यवसायातल्या कामगारांचे आजार, त्यात असलेले धोके, विविध क्षेत्रातील असंघटित कामगार, बालकामगार, सफाई कामगार असे असंख्य वर्ग आहेत. शिवाय आजच्या संगणक युगात बीपीओ आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आणि उच्च पगाराची नोकरी असलेल्या मॅनेजमेंट वर्गाच्या आरोग्यसमस्या हा एक नवा वेगळा विषय निर्माण झालेला आहे. कामगारांच्या आरोग्य सुरक्षेबाबत देशात अनेक कायदे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याबाबत खूप सखोल विचार करून वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

व्यवसायजन्य आजारातील धोके 
निरनिराळ्या कामधंद्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धोके आणि आजार संभवतात. त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येते,

  • कामामधील शारीरिक इजा : यांत्रिकी उद्योगात काम करताना हातोडयाचा किंवा कुऱ्हाडीचा घाव बसणे, यंत्रामध्ये शरीराचा अवयव सापडून तो शरीरावेगळा होणे, बांधकाम उद्योगात, रंगारी व्यवसायात उंचावरून पडणे, जबर मार लागणे इत्यादी प्रकार होत असतात. अनेक व्यवसायात छोटे-मोठे अपघात तर सतत होताच असतात.
  • शारीरिक तणाव : कुठल्याही प्रकारच्या ऑफिसात, बॅंकांमधील कर्मचारी, आयटी उद्योगातील कर्मचारी यांना संगणकावर सतत बसून काम करायला लागल्याने होणारा बोटांचा त्रास, दिवसात ६ ते ८ तास बसून काम करायला लागल्याने होणारे पाठीचा-मानेचा स्पॉण्टिलॉसिस आज मोठ्या प्रमाणात दिसतात. शेतमजुरी करणाऱ्या स्त्रीपुरुषांमधील कंबरदुखी, वाहतूक-नियंत्रक पोलिसांना होणारा पायांच्या रक्तवाहिन्या फुगण्याचा ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा त्रास नित्य दिसून येतो.
  • भौतिक गोष्टी : इलेिक्ट्रक भट्टी, रासायनिक कारखाने यातील तीव्र उष्णता व हवेचा दाह, कोल्ड स्टोरेजमधील गारठा, आयटी व्यवसायात खूप कमी तापमान ठेवणारी एअरकंडिशनिंग, इस्पितळातील क्ष-किरण आणि स्कॅन विभागात काम करणाऱ्या डॉक्‍टर्स आणि कामगारांवर होणारा किरणोत्सर्ग, धातूच्या वस्तू बनवणाऱ्या, मोटारी बनवणाऱ्या आणि मेकॅनिकल यंत्रणा वापरणाऱ्या कारखान्यातील ध्वनिप्रदूषण-गोंगाट, सतत कंपन सहन करणे, सर्वच कारखान्यात होणाऱ्या विजेच्या तारांमध्ये होणाऱ्या बिघाडाने बसणारे प्राणघातक विद्युत धक्के अशा भौतिक इजा हे त्या त्या व्यवसायात असलेले आरोग्यविषयक धोकेच असतात.  
  • सूक्ष्म कण आणि धूलीकण : गिरणीमध्ये श्वासावाटे पीठ, कापड गिरणीत कापसाचे जंतू सिमेंटच्या कारखान्यात त्याची धूळ, हळदीच्या कामगारांमध्ये हळदधूळ, खडी कारखान्यात सिलिका अशा सूक्ष्म कणांचा आणि धुळीचा श्वासमार्गात प्रवेश होऊन श्वसनाला त्रास होणे, दम लागणे, कायमचा खोकला होणे हे त्रास तर होतातच; पण ही धूळ श्वासमार्गात आणि फुफ्फुसात साचत जाऊन त्यांचे फुफ्फुसातील वायुकोष निकामी होत जातात. 
  • रासायनिक दुष्परिणाम : रासायनिक उद्योगात ॲसिड अंगावर उडणे, विषारी वायू फुप्फुसात जाणे असे प्रकार आढळतात. शिवाय फॉस्फरससारखी काही रसायने शरीरावर हळूहळू गंभीर परिणाम करतात. मिथेन, कार्बनडायऑक्‍साईड, कार्बनमोनोक्‍साईड, अमोनिया, हायड्रोजन सल्फाईड, नायट्रोजन, फॉरमाल्डीहाईड अशा वायूंचे प्राणगंभीर परिणाम होऊ शकतात. 
  • धातूंचे परिणाम : धातू आणि खाण व्यवसायात तांबे, शिसे, लोह, पारा, आर्सेनिक अशा धातूंचा शरीरावर प्राणघातक परिणाम होतो. 
  • जैविक दुष्परिणाम : जनावरांशी, प्राण्यांशी आणि जंगलांशी संबंध असलेल्या व्यवसायात वन्यप्राणी, साप, विंचू, कुत्रे अशा प्राण्यांचे दंश, गाईगुरांपासून होणाऱ्या जखमा, जंतकृमी, जीव-जंतूंपासूनचे धोके, लिंगसांसर्गिक आजार हे सर्व या गटात मोडतात. इस्पितळातील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्‍टरांना रुग्णांमुळे होणारे संसर्गजन्य आजार हा एक ज्वलंत विषय आहे. क्षय रोग, मलेरिया, इबोला, एचआयव्ही अशाने बाधित रुग्णांवर उपचार करताना तो आजार होऊन असंख्य आरोग्यसेवकांनी आणि डॉक्‍टरांनी आपले प्राण गमावले आहेत. 
  • कर्करोग : निरनिराळ्या रासायनिक पदार्थांच्या उत्पादनाचे कारखाने, रंगाचे कारखाने, किरणोत्सारी पदार्थांशी संबंधित उद्योगधंदे, ॲस्बेस्टॉसशी संबंधित उद्योग, रबर उद्योग, खाण उद्योग अशात काम करणाऱ्या कामगारांमध्ये कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आढळते. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट आणि आयोनायझिंग रेडीएशनशी संबंधित असलेल्या उद्योगात कर्करोगाची शक्‍यता जास्त असते.
  • मानसिक दुष्परिणाम : कामाच्या ठिकाणी मानसिक ताणतणाव सतत राहिल्याने कायमस्वरूपी विकार जडू शकतात. आजच्या स्पर्धेच्या युगात कामाच्या डेडलाईन्स, टार्गेट्‌स, नोकरी टिकवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, वरिष्ठांचे वागणे, ऑफिसच्या अंतर्गत राजकारण अशा गोष्टींनी मानसिक तणाव निर्माण होऊन चिंता, नैराश्‍य आणि हताशपणा वाढीला लागले आहे. अतिरिक्त धूम्रपान आणि मद्यपान या व्यसनांचे मूळही यात सापडते.  

भारतातील व्यावसायिक आरोग्य
आपल्या देशात व्यवसायजन्य आजारांबद्दल प्रशिक्षित डॉक्‍टरांची वानवा आहे. या आजारांवर इतर सर्वसाधारण आजारांप्रमाणेच तपासण्या आणि उपचार केले जातात. सर्वसाधारण डॉक्‍टरांना व्यवसायजन्य आजारांबद्दल फारशी माहितीही नसते. आजच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात त्याचा अजूनही समावेश नसल्याने डॉक्‍टरांचाही नाईलाज असतो. एखाद्या रुग्णाच्या इलाजामध्ये त्याच्या लक्षणानुसार तत्सम साथीच्या किंवा जंतुसंसर्ग होणाऱ्या रोगांवरील उपाययोजना खासगी आणि सरकारी वैद्यकीय सेवेकडून केली जाते. आणि अपरिचित अशा व्यवसायजन्य आजारांच्या शक्‍यता लक्षात न येऊन त्याकडे दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ,
 वेल्डिंग करणाऱ्या व्यक्तींना होणारा ‘फ्युम फीवर’ 
     व्यवसायजन्य फुफ्फुसांचे आजार (न्युमोकोनिओसिस) आणि त्यासारखीच लक्षणे असणारा फुफ्फुसांचा क्षयरोग
     दम्याचे कारण परागकण, ॲलर्जी किंवा कारखान्यातील कापसाचे तंतू अथवा टोल्यूइन-डाय-आयसोसायनेट असे पदार्थ असू शकतात. 
     कावीळ ही कार्बन टेट्रा क्‍लोराइड किंवा टीसीईच्या विषबाधेनेही होऊ शकते. 
     त्वचेचा रोग खनिज तेल, निकेल, आर्सेनिकसारखे रासायनिक पदार्थ कामावर हाताळताना होणाऱ्या सतत स्पर्शामुळे होऊ शकतात.
आपल्या देशातील उद्योजक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धोक्‍यांमुळे होणाऱ्या अशा आजारांकडे किंवा त्रासांकडे फारसे लक्ष देत नाहीत. उद्योजकांचे व्यवसायजन्य आजारांबद्दल असलेले अज्ञान आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यरक्षणाकरिता खर्च करायची त्यांची नापसंती ही करणे आढळतात. मध्यम आणि छोट्या उद्योगामधील आणि सार्वजनिक सेवाक्षेत्रामध्ये बहुधा कामाच्या ठिकाणी आवश्‍यक ती सुरक्षेची साधनेही पुरवली जात नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारी व्यवसायजन्य आजारांना बळी पडतात. याची उदाहरणे म्हणजे-
     अतिआवाजाच्या त्रासाने बहिरेपणा येणारे हेवी इंडस्ट्री कामगार  
     लेप्टोस्पायरोसिस होणारे सफाई कामगार 
     टीबीला बळी पडणारे टीबी हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि डॉक्‍टर्स व्यवसायजन्य आजारामुळे कर्मचाऱ्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. सुदैवाने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये आणि देशातील काही अग्रगण्य मोठ्या उद्योगांमध्ये व्यावसायिक आरोग्याबद्दल जाण दिसून येते.

उपाय
अशा स्वरूपाचे आजार न होण्याकरिता काय करता येईल आणि साऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक धोक्‍यांपासून कसे वाचविता येईल याचा विचार व्यावसायिक आरोग्यशास्त्रामध्ये (ऑक्‍युपेशनल हेल्थ सायन्स) केला जातो.  
 कारखान्यातील अथवा उद्योगामधील कर्मचाऱ्यांशी, सुरक्षा अधिकाऱ्यांशी, अभियंत्यांशी आणि मॅनेजमेंटशी चर्चा करून सुरक्षित आणि आरोग्याला पोषक अशा कार्यपरिस्थितीची निर्मिती केली जाते.
 काम करताना आवश्‍यक असल्यास विशेष पोशाख, हातमोजे, बूट्‌स, मास्क, गरजेप्रमाणे डोळ्यांना किंवा कानांना रक्षण करणारी साधने उपलब्ध करून ती वापरण्याचे प्रशिक्षण देणे. त्याची गरज सतत बिंबवत राहणे यासाठी प्रयत्न केले जातात.
 किरणोत्सारी उद्योगात शरीरावर होणारा किरणोत्सर्ग मोजणारा पोशाख दिला जातो.
 ऑफिस किंवा कार्यालयात तातडीक औषध योजनांची तयारी आणि प्रशिक्षण देणे, काही घडल्यास कामगारांना त्वरित औषध योजना अथवा इस्पितळाची सोय ठेवणे    
 कायद्यानुसार वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून कर्मचाऱ्यांना व्यवसायजन्य आजार होत नाहीत याची खात्री केली जाते. 
 आपल्या व्यवसायामुळे होणाऱ्या त्रासांची, आजारांची आणि धोक्‍यांची योग्य ती माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाते. 
 त्यांच्या आरोग्य संवर्धनाकडे संवर्धनाकडेही लक्ष पुरविले जाते.
 डॉक्‍टरांना स्वतःचे ज्ञान सतत वाढवीत राहणे, माहितीचे संकलन आणि संशोधन करीत राहणे यासंदर्भात आवश्‍यक असते. 

व्यावसयिक आरोग्यातील अडचणी
व्यवसायजन्य आजारांची माहिती उद्योजकांकडून सरकारी खात्यांकडे नियमितपणे दिली जात नाही उलट ती दडविली जाते किंवा अत्यल्प प्रमाणात नोंदली जाते. असे आजार किंवा धोके होणार नाहीत अशाप्रकारे कारखान्याचे डिझाईन, बांधणी आणि कामाच्या पद्धतीची आखणी केली जात नाही. व्यवसायजन्य आजार होणे हे कामाचाच एक अपरिहार्य भाग आहे अशी असंख्य कामगारांची समजूत असते. व्यवसायजन्य आजार केवळ टाळता येतात, त्यांवर रामबाण उपाय नसतो याची जाणीव उद्योजकांना होणे आवश्‍यक आहे.

बहुसंख्य कामगार नेते पगार, बोनस, सुट्या, वैद्यकीय फायदे, धोकादायक कामाकरिता वेगळा धोकाभत्ता या मुद्द्यांचा आग्रह धरून आपल्या मागण्या मांडत वाटाघाटी करीत असतात. परंतु कर्मचारी, युनियनचे पुढारी, कारखान्यातील अधिकारी, मॅनेजमेंट आणि डॉक्‍टर यांनी एकत्रितपणे विचार करून त्या त्या उद्योगातले किंवा कार्यालयातले व्यवसायजन्य धोके नाहीसे करण्यासाठी महत्वाचे उपाय आखले आणि ते कार्यवाहीत आणले, तर कर्मचाऱ्यांची सुरक्षा व त्यांचे आरोग्यरक्षण दोन्हीही निश्‍चितच साध्य होईल.   

संबंधित बातम्या