वेदनामय पायांची कहाणी 

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

तुमचे पाय कधी दुखतात? सुजतात? काळजी नका करू.... असे पायांचे त्रास असणारे तुम्ही एकटेच नाही आहात. दर ४ भारतीयांमध्ये तिघांना आयुष्यात कधी ना कधी पायांचा त्रास झालेला असतो, किंवा होणार असतो. हे त्रास खूप वेदनादायी आणि बेचैन करणारे असतात. दोन पायांवर चालणाऱ्या माणसाला त्यातील बहुतेक आजारांची मुळीच जाणीव नसते, त्यामुळे योग्य ती काळजी घेतली जात नाही आणि त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत जाते. त्यामुळे गंभीर नसले तरी त्रासदायक आणि कधी कधी वैगुण्य निर्माण करणाऱ्या पायांच्या संबंधित काही आजारांची थोडी माहिती प्रत्येकाला असणे आवश्‍यक ठरते.

बुनिअन
यात पायाच्या अंगठ्यापाशी सूज येऊन एक गुठळी येते. अंगठा दुखत राहतो आणि हळूहळू तो पायाच्या आतल्या बाजूला झुकत जाऊन वाकडा होत जातो. इतर सांध्यांवर त्याचे परिणाम होऊन चालणे वेदनामय बनते. याच्या उपचारात पुढील बाजूस थोडे रुंद असलेले आणि टाच फारशी उंच नसलेले बूट वापरावे लागतात. बुटांच्या आतील कडांवर अंगठ्याचे घर्षण होऊ नये म्हणून मऊसर कपड्याची छोटी घडी ठेवावी. चपला वापरणे तसे सोयीचे पडते. सांध्याची सूज कमी करणाऱ्या गोळ्या, सूज कमी करणारी मलमे, शेकणे यांचा वापर करूनही बरे न वाटल्यास अस्थिरोग तज्ज्ञाकडून वाकडे झालेले बोट सरळ करण्याची शस्त्रक्रिया करणे भाग पडते. 

कॉर्न्स आणि घट्टे
खूप घट्ट पादत्राणे, चपला, बूट यांच्याशी पायाच्या बाह्यकडांचे घर्षण होऊन घट्टे बनतात. क्वचित प्रसंगी पायांना काट्यांनी अथवा अन्य तीक्ष्ण वस्तूंनी झालेल्या जखमांमुळेही कॉर्न्स तयार होते. यासाठी खूप कडक चामड्याची आणि घट्ट होणारी पादत्राणे वापरू नयेत. पायात मोजे न घालता बूट घालणे टाळावे. या त्रासाने चालताना पायांवर वजन येऊन ती दुखतात, अशावेळेस कापसाच्या मऊ घड्या त्याच्यावर लावाव्यात. 
 कॉर्न्स किंवा घट्टे सॅलिसिलिक ॲसिड आणि लॅक्‍टिक ॲसिड यांचे मिश्रण असलेला द्राव पायांवर रात्री झोपताना लावल्यास हळूहळू निघून जातात. प्रसंगी शस्त्रक्रिया करून ती काढावी लागतात. परंतु मनानेच कॉर्न कॅप्स वापरण्याचे प्रयोग करू नयेत.

गाउट
शरीरामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढले, की त्याचे स्फटिक बनतात आणि ते पायाच्या अंगठ्याच्या मुळाशी जमा होतात. त्यामुळे तिथे सूज येऊन दुखते, तळवा आखडतो आणि चालणे कठीण होते. गाउटचा त्रास एकदा सुरू झाला, की पुढे अनेक दिवस तो काबूत येत नाही. 
या आजारात प्रथिनयुक्त खाणे, विशेषतः मांसाहार टाळावा लागतो. त्याचप्रमाणे युरिक ॲसिड कमी करणारी औषधे नियमितपणे घ्यावी लागतात. तीव्र त्रास झाल्यास सूज कमी करणारी औषधे आणि स्टीरॉइड्‌सदेखील घ्यावी लागतात. जर वेळेवर आणि नियमित औषधे न घेतल्यास अंगठ्याचा सांधा वेडावाकडा होतो. ही विकृती दूर करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

प्लांटर वॉर्टस
पायाच्या तळव्याला होणारी ही विषाणूजन्य इन्फेक्‍शन्स असतात. यामध्ये तळव्यावर छोटे फोड येतात, ते तळव्यावर पसरतात आणि सूज येते. त्यामुळे चालणे अशक्‍य बनते, असे रुग्ण सार्वजनिक तलावात पोहत असल्यास त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो.   
   सॅलिसिलिक ॲसिड लावून हे वॉर्टस बरे होऊ शकतात. पण वेळप्रसंगी कॉपर सल्फेटसारखी काही रसायने, लेझर, सर्जिकल कॉटरी वापरूनही त्याचा इलाज करावा लागतो. 

चिखल्या
पायाच्या बोटांमधील बेचक्‍यात बुरशीजन्य संसर्ग होणे म्हणजे चिखल्या. याला ॲथलिट्‌स फीट असेही म्हणतात. यात बेचक्‍याची त्वचा सुजते, तिचे पापुद्रे निघतात, त्यात फोड होतात, जखमा होतात आणि पू होतो. पाण्यात काम करणाऱ्या व्यक्तींना, पाय दीर्घकाळ ओले राहिल्याने हा त्रास होतो. सतत पायात सतत बूटमोजे घालणाऱ्यांनासुद्धा चिखल्या होऊ शकतात. चिखल्या होऊ नयेत याकरिता पाण्यात काम केल्यानंतर तसेच आंघोळीनंतर पाय आणि पायाच्या बेचक्‍या पुसून कोरड्या करणे आवश्‍यक असते. नित्य वापरातले बूट अधून मधून उन्हात ठेवावेत, मोजे रोजच्या रोज बदलावेत. ॲण्टीफंगल मलमे आणि गोळ्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने काही काळ घेतल्यावर हा त्रास पूर्ण बरा होऊ शकतो. मात्र जाहिरातीतील मलमे वापरू नयेत. 

पायाच्या नखांचे आजार
पायाच्या नखाच्या जखमात बुरशीजन्य संसर्ग होऊन नखे बेढब आणि विद्रूप होतात. सतत बूट वापरणाऱ्या व्यक्तींना याचा त्रास झाल्यास तो पायाच्या सर्व नखांत पसरतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होणारा हा देखील संसर्गजन्य आजार आहे. पोहण्याचे तलाव, स्पा, एकमेकांचे मोजे-बूट वापरणे यातून तो पसरतो. हा आजार काबूत आणण्यासाठी दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. यामध्ये लेझर उपचारही उपयुक्त ठरू शकतात.

हॅमर टो
पायाच्या बोटात असलेल्या दोषांमुळे तसेच पायाच्या आकारापेक्षा आखूड बूट वापरणाऱ्यांना हा आजार होतो. यात पायाच्या बोटांचे स्नायू आकसतात, बोटांचे मधले सांधे आकसून उंचावतात आणि ती वक्राकार बनून एखाद्या हातोड्यासारखी दिसतात. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या पायाचा आकार वाढत जात असतो, पण वाढत्या आकाराप्रमाणे बूट न बदलता, आखूड आकाराचे बूट वापरत राहिल्याने हा त्रास हमखास होऊ शकतो. यातही चालणे, पळणे वेदनामय होते. शस्त्रक्रियेद्वारे हा दोष दूर करावा लागतो.

इनग्रोन तो नेल्स
आखूड किंवा खूप घट्ट बसणारे बूट वापरणाऱ्या मुलांना आणि तरुणांना  हा आजार होतो. पायाची नखे खूप आखूड किंवा अर्धवट कापल्यानेसुद्धा हा त्रास उद्भवतो. काही व्यक्तींमध्ये बुनिअनसारख्या त्रासामुळे हा आजार उद्भवू शकतो. यात पायाच्या बोटांच्या नखांचे कोपरे खालच्या बाजूने वळून नखाखालील मांसामध्ये घुसतात. त्यामध्ये सूज येते, जंतुसंसर्ग होतो आणि पायांना वेदना होतात. 
हा आजार प्राथमिक स्वरूपात असतानाच सैल पादत्राणे वापरणे, नखे बोटांच्या वरील भागाला समांतर कापणे याकडे लक्ष पुरवावे लागते. रोज रात्री झोपताना कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पाण्यात एप्सम सॉल्ट टाकल्यास अधिक आराम मिळतो. त्यानंतर पाय कोरडे करून त्यावर ॲण्टिबायोटिक मलम लावावे. त्रास खूप वाढलेला असल्यास छोटी शस्त्रक्रिया करून पायाचे नख पूर्ण काढावे लागते. त्यानंतर चांगले नख येते, त्याची प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी लागते.

सपाट पाय
आपल्या पायांच्या हाडांची रचना एखाद्या कमानीसारखी असते. उभे असताना, चालताना, पळताना पायावर शरीराचे पूर्ण वजन पेलले जाते. हे वजन सहजतेने पेलण्यासाठी या कमानी असतात. या विशेष रचनेमुळे चालताना पायाच्या बोटांचे तळवे, पायाच्या आतील कडा आणि टाचा एवढाच भाग जमिनीला स्पर्श करतो. परंतु काही व्यक्तींमध्ये जन्मजात या कमानी सपाट असतात, किंवा काहींमध्ये एखाद्या अपघाताने पायाच्या हाडांना किंवा स्नायूंना इजा होऊन त्या सपाट होतात. साहजिकच अशा व्यक्तींचा पाय जमिनीला पूर्ण टेकला जातो. 
  सपाट पायांच्या व्यक्ती जास्त वेळ उभ्या राहिल्यास, अधिक चालल्यास त्यांचे पाय दुखू लागतात. हा त्रास टाळण्यासाठी त्यांना विशेष प्रकारची पादत्राणे वापरावी लागतात. तसेच त्यात मऊ कापडाची किंवा स्पंज असलेले ‘इनसोल’ वापरावे लागतात. अशा व्यक्तींनी रबरी तळ असलेली पादत्राणे वापरावीत. कडक तळ असलेली किंवा तळ नसलेली पादत्राणे वापरल्यास त्यांचे पाय जास्त लवकर आणि अधिक प्रमाणात दुखतात.

टाचांच्या भेगा - जळवात
पायांना सतत माती लागत असेल तर पायांना भेगा पडतात. त्या रुंदावून त्यात जंतूंचा शिरकाव होतो, त्यांना सूज येते, त्यात पू भरतो. अशा वेळेस पाऊल टाकणेही अशक्‍य होते. हे टाळण्याकरिता अंघोळीच्या वेळेस स्क्रबर वापरून तळपाय रोजच्या रोज स्वच्छ घासावेत. पाय मऊ ठेवण्यासाठी ते रात्री झोपताना कोमट पाण्यात १०-१५ मिनिटे सोडावेत. त्यानंतर ते कोरडे करून व्हॅसलिन किंवा मॉइश्‍चरायझर मलम लावावे.    

उंच टाचांच्या चपलांचे परिणाम 
पाश्‍चात्य जीवनशैलीत स्त्रिया उंच टाचांच्या चपला वापरतात. आपल्याकडेही आता ही फॅशन चांगलीच रुजली आहे. या चपलांमुळे 

  • पायाच्या मागील बाजूस असलेल्या दोरास (टेन्डो अचायलीस) सूज येते, त्याला इजा होते आणि कायमच्या वेदना होत राहतात. 
  • पायांच्या आणि टाचेच्या हाडांमध्ये विकृती निर्माण होण्याची शक्‍यता बळावते.  उंच टाचांच्या बुटांची मागील बाजू पायाच्या मागे सतत घासली जाऊन तिथे एक कायमस्वरूपी गाठ होऊ शकते. याला ’पंप बंप’ म्हणतात.
  • उंच टाचांची पादत्राणे वापरताना शरीराचे वजन पायाच्या बोटांच्या मुळावर पेलले जाऊन त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो. त्या भागातील हाडांवर असा सतत दाब राहिल्याने बोटांच्या हाडांना सूक्ष्म आकाराची (हेअरलाइन) स्ट्रेस फ्रॅक्‍चर होतात. 
  • उंच टाचांची पादत्राणे वापरताना पायाच्या घोट्याचे स्नायू आकसले जाऊन तिथे दीर्घकाळ राहणारी चमक भरू शकते. अशा स्त्रियांना एरवी साध्या चपला घालूनही चालणे मुश्‍कील होते. 
  • पायाच्या सांध्यांना कायमची सूज येऊन घोट्याचा संधिवात होण्याची शक्‍यता जास्त असते.
  • पायांची बोटे वाकडी होण्याची शक्‍यता असते.

शास्त्रीय दृष्ट्या चपलांच्या टाचांची उंची २ इंचापेक्षा जास्त नसावी आणि अशा चपला कमीत कमी वेळा वापराव्या. टाचा जितक्‍या अरुंद तितक्‍या त्या जास्त धोकादायक असतात. साहजिकच ‘स्टीलेटो’ हा अगदी अरुंद आणि टोकदार टाचांचा प्रकार सर्वात धोकादायक ठरतो.          

सपाट चपला
आजकाल अजिबात टाच नसलेल्या सपाता, फ्लिप फ्लॉप्स, बॅले फ्लॅट्‌स वगैरे वापरण्याचीही प्रथा दिसून येते. काही जुन्या जमान्यातल्या व्यक्ती चामड्याच्या सपाट असलेल्या कोल्हापुरी चपला वापरतात, साधू-संत खडावा वापरतात, तर काही व्यक्ती रबरी स्लीपर्सला प्राधान्य देतात. अशा सपाट चपलांनी पायाच्या तळव्यातील मांसल थर (प्लांटर फेशिया) ताणला जाऊन त्याला सूज येते आणि सुया टोचल्याप्रमाणे पायाच्या तळव्यात वेदना होतात. याला ’प्लांटर फेसायटीस’ म्हणतात.
टोकदार टाचांचे बूट स्त्रिया आणि पुरुषांमध्येही प्रचलित आहे. मात्र त्यात पायांच्या बोटांची टोके दबली जाऊन बुनिअन, हॅमर टो, इनग्रोन तो नेल्स असे त्रास सहज उद्भवतात.  
चपला वापरल्याने पायांना बाह्य गोष्टींनी इजा सहज होऊ शकते. पायांना धूळ, माती, चिखल सहज लागतो. त्यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. स्लीपर्स, फ्लिप फ्लॉपच्या तळव्यातून तीक्ष्ण खडे, काटे, काचांचे सूक्ष्म तुकडे पायाच्या तळव्यात घुसून इजा होऊ शकते.  तसेच सपाट चपलांच्या टाचा काही काळाने झिजतात आणि पायाच्या टाचा बाहेर राहतात. त्यामुळे टाचांना जखमा होऊ शकतात.  मधुमेही व्यक्तींच्या पायांना इजा झाल्यास त्यात जंतुसंसर्ग होऊन पायांना गॅंगरीन होऊन पाय धोक्‍यात येऊ शकतो. या कारणांकरिता मधुमेही व्यक्तींनी एकतर बूट वापरावेत किंवा सॅण्डल्सचा वापर करावा. आपल्या हातांची काळजी  आपण जास्त घेतो. पण पायांच्या व्यथा ही बोलत असतात, त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नये. पायांची काळजी घेणे म्हणजे आरोग्याचा पाया मजबूत करणे.
 

संबंधित बातम्या