मातृदुग्धपेढी

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

आईच्या उदरातून जन्मलेल्या नवजात अर्भकासाठी मातेचे स्तनपान हाच सर्वश्रेष्ठ आणि संपूर्ण आहार असतो. मातेच्या दुधात त्या बालकाला आवश्‍यक असलेले सर्व घटक अगदी योग्य प्रमाणात असतात. पहिल्या ४ ते सहा महिन्यात केवळ आईचे दूध हे बाळाचे खाद्यही असते आणि पेयही असते. या काळात त्यास कोणतेही इतर अन्न किंवा पाणीसुद्धा लागत नाही. नवजात बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत ठेवले तर प्रसूतीनंतर एका तासातच स्तनपान देता येते. मातेने वारंवार स्तनपान केले तर तिच्या दुधामध्येही वाढ होते. जवळजवळ 
प्रत्येक आई बालकास यशस्वीपणे आपले दूध पाजू शकते. स्तनपानाद्वारे बालके व मुलांचे जीवघेण्या रोगांपासून संरक्षण होते. मात्र काही विशेष परिस्थितींमध्ये बाळ आणि त्याची आई यांचे स्तनपानाचे नाते दुरावते. यात

  •     आईला एचआयव्ही किंवा तत्सम एखादा संसर्गजन्य अथवा दुर्धर आजार असणे
  •     स्तनामध्ये दोष असणे
  •     संप्रेरकामध्ये दोष असल्याने दूध न येणे
  •     स्तनाग्रांमध्ये दोष असणे
  •     प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतिपश्‍चात मातेचा मृत्यू होणे. 

अशा बाळांना स्वतःच्या मातेचे दूध जरी मिळाले नाही तरी इतर कोणत्या तरी आईचेच दूध मिळावे याकरिता ’मातृदुग्ध पेढी’ किंवा ’ह्यूमन मिल्क बॅंक’ ही संकल्पना राबवली जाते.  

इतिहास
फार पूर्वीपासून कुठलाही नातेसंबंध नसलेल्या बाळाला आपले दूध पाजणाऱ्या स्त्रियांना ’दाई मां’ म्हणत असत. अशा दायांची पुरातन काळापासून इतिहासात नोंद आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात ही प्रथा चांगलीच प्रचलित होती. १५व्या शतकात दायांना होणाऱ्या सिफिलीससारख्या आजारांमुळे ही प्रथा काहीशी मागे पडली. परंतु भारतातल्या ब्रिटिश ऑफिसर्सच्या मुलांना दुधासाठी ‘ओली दाई’ (वेट नर्सेस) ठेवण्याची प्रथा १८व्या आणि १९व्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. 

२० व्या शतकात आईचे दूध न मिळणाऱ्या अर्भकांना पावडर स्वरूपातले दूध तसेच बेबी फीडिंग फॉर्म्युला देण्याची टूम निघाली. मात्र या पावडरीमधून बाळाला मातेच्या दुधातून जशी मिळते, तशी रोग प्रतिकारशक्ती मिळत नाही हे सिद्ध झाले. तसेच या बेबी फीडिंग फॉर्म्युल्याद्वारे पोषण होणाऱ्या बालकात जुलाबांचे विकार सतत होणे आणि त्यामुळे बालके दगावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आले. यातून या इन्फन्ट फॉर्म्युल्यामधील फोलपणा सिद्ध झाला, आणि मातेच्या दुधाचे महत्त्व पुन्हा एकदा सामोरे आले. २० व्या शतकाच्या अखेरीस या प्रथेचे ‘मातृ दुग्धपेढी’च्या स्वरूपात शास्त्रीयदृष्ट्या पुनरुज्जीवन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) आणि युनिसेफने  मध्ये जाहीर केलेल्या संयुक्त परिपत्रकात, ‘स्वतःच्या मातेचे दूध घेऊ न शकणाऱ्या बाळाला त्याच्या मातेचे स्तनातून पंपाद्वारे काढलेले किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध हेच सर्वात उत्तम असते आणि ते देण्यासाठी मातृदुग्धपेढ्या स्थापन केल्या पाहिजेत’ असे ठासून प्रतिपादन केले होते.

१९९१ मध्ये डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी भारतातील पहिली मातृ दुग्धपेढी मुंबईत सुरू केली. महाराष्ट्रात सध्या ज्या मातृदुग्ध पेढ्या आहेत, त्यात सर्वात जास्त म्हणजे पाच दुग्धपेढ्या मुंबईत आहेत. त्यामध्ये जे.जे. हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि ठाण्याचे राजीव गांधी हॉस्पिटल यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यात ससून हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल्स, डी.वाय.पाटील हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर येथे कार्यान्वित असलेल्या दुग्धपेढ्या आहेत. भारतभरात नवी दिल्ली, गोवा, बडोदा, सूरत, हैदराबाद, होशगाबाद, उदयपूर, जयपूर, कोलकाता, चेन्नई अशा अनेक शहरात जिथे दान केलेल्या मातृदुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण आणि वाटप करणाऱ्या मातृदुग्धपेढ्या उत्तम रीतीने कार्यरत आहेत.

आकडेवारीनुसार, भारतात दर एक हजार प्रसूतींमध्ये ८७ बालके मृत जन्मतात, जिवंत जन्मलेल्या एक हजार बालकांमधली ४३ बाळे जन्मल्यावर १ महिन्याच्या आत मरण पावतात. यामध्ये मातेचे दूध न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या ५ टक्‍क्‍याहून जास्त असते. अशा बालकांना मातृदुग्ध पेढीची योजना एक प्रतिबंधक वैद्यकीय उपाय म्हणून उपयुक्त ठरू शकते.

लाभार्थी
    मुदतपूर्व जन्म झालेले बाळ, 
    जन्मत: खूप कमी वजन असलेली बालके
    प्रसूतीनंतर मातेला गंभीर आजार झाल्यामुळे आईच्या दुधाला वंचित होणारी अर्भके 
    जनरल ॲनॅस्थेशियाखाली झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेने जन्माला आलेली बालके
    सपाट किंवा स्तनाच्या आत गेलेली स्तनाग्रे असलेल्या मातांची बालके .
    जुळे, तिळे म्हणून जन्मलेली बाळे 
    मूल न झाल्याने दत्तक घेतली गेलेली बालके

दुग्धदान करणाऱ्या स्त्रिया 
दूध येत असलेल्या ज्या स्त्रियांना आपल्या बाळाला पाजल्यावरही अतिरिक्त दूध येते अशा या मातांना दुग्धदान करता येते. याशिवाय अपुऱ्या दिवसात प्रसूती झालेल्या बाळांच्या माता, आजारी किंवा टाळूमध्ये दोष असलेल्या बाळांच्या माता, जन्मानंतर काही काळात ज्यांचे बाळ दगावले अशा माता, ज्यांना बाळ मोठे झाल्यावरही दूध येत राहते अशा काही स्त्रिया दुग्धपेढीसाठी दूध देऊ शकतात. 

दुग्धदानासाठी अपात्र 
 दुग्धदान करणाऱ्या मातांना एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी, सिफीलीस, क्षयरोग अशापैकी कोणताही संसर्गजन्य आजार असून चालत नाही. या स्त्रियांना त्यांच्या पूर्वायुष्यात काही आजार होऊन गेल्याचा इतिहास असल्यास त्याही दुग्धदान करण्यास त्या अपात्र ठरतात. ज्या स्त्रिया दुग्धदान करतात त्यांची दर तीन महिन्यांनी या आजारांबाबत तपासण्या व्हाव्या लागतात. कमर्शिअल सेक्‍स वर्कर, मानसिक विकृती असलेल्या स्त्रिया, एचआयव्ही पॉझिटिव्ह, हिपॅटायटीस बी, तसेच सी पॉझिटिव्ह, व्ही.डी.आर.एल. पॉझिटिव्ह, अवयवदानामधील लाभार्थी, नशीली औषधे, तंबाखू, मद्यप्राशन अशी व्यसने असलेल्या स्त्रिया, गंभीर वैद्यकीय आजार असलेल्या महिला, स्वखुशीने दुग्धदानासाठी तयार नसलेली माता यांच्याकडून दुग्धपेढीसाठी दूध घेतले जात नाही.

दुग्धपेढीचे कार्य कसे चालते?
इस्पितळांमध्ये मातृदुग्ध पेढी सहसा नवजात शिशू अतिदक्षता कक्ष (एन.आय.सी.यु.) किंवा बाळंतपणाच्या वॉर्डाशेजारी असते. दुग्धपेढीचा प्रमुख अधिकारी पेढीचे पर्यवेक्षण, नियोजन, विकास आणि मूल्यमापन करतो. पेढीच्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये दुग्धन व्यवस्थापन परिचारिका, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जीवरसायन शास्त्रज्ञ, परिचर, सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक यांचा समावेश असतो.

यंत्रसामग्री 
दुग्धपेढीमध्ये आवश्‍यक असलेल्या यंत्र सामुग्रीत मॅन्युअल आणि इलेक्‍ट्रॉनिक ब्रेस्ट मिल्क पंप, दूध साठवण्याचे पायरेक्‍स किंवा प्रॉपिलीनने बनवलेले भांडे, किंवा घट्ट आणि मोठे तोंड असलेले दंडगोलाकार स्टेनलेस स्टीलचे भांडे, २० अंश सेंटिग्रेड तापमानाला दूध साठवण करू शकणारा फ्रीझर, यात तापमान वाढू लागल्यास किंवा जास्त कमी झाल्यास गजर करून सूचना देणारा अलार्म, वातानुकूलक आणि जनरेटर, शेकर वॉटर बाथ विथ थर्मोस्टॅटिक कंट्रोल अशी मायक्रोबायॉलॉजी संबंधी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे असतात.  

संकलन आणि साठवण 
दुग्धदान करण्यास पात्र असलेल्या स्त्रिया आणि माता अनेकदा इस्पितळातच असतात, त्या पेढीसाठी दुग्धदान करतात. यामध्ये नवप्रसूत माता आणि रुग्णांबरोबरच रुग्णालयातील महिला कर्मचारी, नर्सेस एवढेच काय पण महिला डॉक्‍टरही हे काम एक सामाजिक कार्य म्हणून करताना आढळल्याची कित्येक उदाहरणे आहेत. पण दुग्धपेढीच्या एकूण साठवण शक्तीपेक्षा कमी संकलन होत असल्यास बाहेरील योग्य स्त्रियांनादेखील दुग्धदानासाठी स्वीकारले जाते. हे दूध मॅन्युअल यंत्राने स्तन पिळून किंवा मिल्क पंप वापरून काढले जाते. पुण्यातील ससून रूग्णालयाकरिता रोटरीने ठिकठिकाणी फिरून दुग्ध संकलन करणारी एक मोबाईल व्हॅनदेखील उपलब्ध केली आहे. ज्यावेळेस मातेचे दूध संकलन करून तिच्याच बाळासाठी वापरले जाते, तेव्हा त्याची साठवण करणे आवश्‍यक नसते. मात्र दुग्धदान करणाऱ्या स्त्रियांचे दूध इतरांच्या बालकांसाठी वापरले जाते, तेव्हा त्याची साठवण करावी लागते. दुग्धपेढीतर्फे स्वतःच्याच बाळांना स्वतःचे दूध देणाऱ्या मातेच्या दुधाची तपासणी करणे गरजेचे नसते, मात्र इतर बाबतीत साठवण करण्यापूर्वी दुधाची त्यातील जंतुसंसर्गाबाबत मायक्रोबायॉलॉजिकल तपासणी केली जाते. जर तपासणीत खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे १०५ कॉलनींपेक्षा जास्त कॉलनीज आढळल्यास ते मातृदुग्ध वापरले जात नाही. दुग्धदान देणाऱ्या ४ ते ५ मातांचे दूध एकत्रित करून दूध साठवण्याच्या भांड्यात भरले जाते. यापेक्षा जास्त मग त्याचे झाकण घट्ट लावून, जमा केल्याच्या तारखेनुसार शीतपेटीत ठेवले जाते. तत्पूर्वी काही पेढ्यात त्यावर पाश्‍चरायझेशनची  प्रक्रिया केली जाते. म्हणजे ते ५६ ते ६२.५ अंश सेंटीग्रेडपर्यंत तापवून मग त्यावर शीतप्रक्रिया केली जाते.

  या दुधाचे तापमान सर्वसाधारणपणे १५ ते २५ अंश सेंटीग्रेडपर्यंत राखावे लागते. मातृदूध हे चार ते सहा तासापर्यंत व्यवस्थित राहू शकते. नेहमीच्या फ्रीजमध्ये हेच दूध पाच ते सात दिवसांपर्यंत राहते, तर शीतपेटीत उणे २० अंश सेंटीग्रेडपर्यंत ठेवल्यास ते सहा महिन्यांपर्यंत व्यवस्थित राहू शकते. फ्रिज किंवा शीतपेटीतून बाहेर काढलेले दूध जास्तीत २४ तासांच्या आत बाळांना द्यावे लागते. हे दूध उकळवून देण्याची किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून देऊ नये. 

वितरण 
डॉक्‍टरांनी किंवा पालकांनी केलेल्या विनंतीनुसार बाळाचे नाव आणि नोंदणी क्रमांक टाकून मातृदुध हे बर्फाने भरलेल्या व्हॅक्‍सिन कॅरियरमधून पुरवले जाते. सर्वात आधी साठवलेले दूध प्रथम वितरित केले जाते. पुरवठा केल्यानंतर ते दूध सामान्य तापमानाला आल्यानंतर ४ ते ६ तासात बाळांना देणे आवश्‍यक असते.

गुणवत्ता शाश्वती
मातृदुग्ध पेढीतून पुरवठा केलेल्या दुधाच्या प्रत्येक नमुन्याचे गुणधर्म एका रजिस्टर मध्ये नोंदवून ठेवले जातात. यामध्ये दूध पूर्ण निर्जंतुकीकरण केल्यानंतरही त्यात जंतूसंसर्ग आढळल्यास सर्व प्रणालीची पूर्ण शहानिशा आणि तपासणी करावी लागते. दुग्धदान करणाऱ्या मातांची पूर्व तपासणी, दूध साठवण्याच्या प्रक्रियेतील सर्वंकष काळजी घेतल्यानेच आजवर कुठल्याही दुग्धपेढीतील दुधामुळे बालके आजारी पडल्याची घटना घडलेली नाही.  
भारतातील मातृदुग्धपेढ्या या स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जातात. त्यात दुग्धदान करणाऱ्या स्त्रियांना पैसे दिले जात नाहीत किंवा दूध घेणाऱ्या बाळांच्या कुटुंबांकडून कोणताही आर्थिक आकार घेतला जात नाही. 

काही अडचणी 
दुग्धपेढ्या ही दुधाविना पोषण न होणाऱ्या आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या अर्भकांना वाचवण्याचा शास्त्रीय मार्ग आहे. पण तरीही अतिरिक्त दूध येणाऱ्या माता दुग्धदान करत नाहीत. त्याचप्रमाणे बाळाने दूध पिणे बंद केल्यावर किंवा एखाद्या मातेचे बाळ मरण पावल्यास येणारे दूध दुग्धपेढीला देण्याऐवजी हार्मोन्स वापरून बंद करण्याचा मार्ग स्वीकारला जातो. जर सरकारी आणि खासगी स्तरावर डॉक्‍टरांनी आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व संस्थांनी याबाबत जनजागृती केल्यास या अडचणी नक्कीच दूर होऊ शकतील. 

संबंधित बातम्या