हवामानबदल अन्‌ आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

जानेवारी महिन्यात संक्रांत झाल्यावर थंडी कमी कमी होत हवा थोडीफार उबदार होऊ लागते. पण या वर्षीच्या २६ जानेवारीच्या ध्वजवंदनाला भारतीयांना थंडीत कुडकुडत जावे लागले आणि फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसात तर उष्ण हवेच्या चटक्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातल्या कित्येक गावांना हिमालयातील थंड हवेचा तडाखा सहन करावा लागला. हिवाळ्यात उकाडा, उन्हाळा-हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात पावसाचा पत्ता नाही, अशा बदलत्या हवामानाला बघून कित्येक वृद्धांनी ‘काळ बदलला’ अशी विधानेही केली. 

सत्तर-ऐंशी पावसाळे पाहिलेल्या या वृद्धांचे हे विधान अजिबात दुर्लक्षित करण्याजोगे नाही. गेल्या १३० वर्षात पृथ्वीवरील वातावरण हळूहळू पण सातत्याने तापत चालले आहे. त्यात भर म्हणून की काय, वाढत्या प्रदूषणाने श्वसनासाठी लागणारी शुद्ध हवासुद्धा मिळेनाशी होऊ लागली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणजे संपूर्ण जगातल्या मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होत असलेले गंभीर दुष्परिणाम. शरीरातील एकूण एक अवयवांवर आणि शरीरातील सर्व संस्थांवर होणारे हे परिणाम आता सर्वांनाच... दृग्गोचर होत आहेत. 

शरीरसंस्थांवर होणारे परिणाम
 श्वसनसंस्था : बदलत्या हवामानामुळे परागकण, बुरशीजन्य कण, धूळ अशा हवेतून पसरणाऱ्या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे श्वसनसंस्थेमध्ये ॲलर्जी निर्माण होऊन दमा, सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, न्यूमोनिया असे आजार वाढीस लागतात.

 • वातावरणातील बदलांमुळे फुलांचे बहरण्याचे ऋतूदेखील बदलत चालले आहेत. या बदलांचा परिणाम झाल्याने फुलातून निर्माण होणारे परागकण कोणत्याही मोसमात आज हवेत मुक्तपणे विहरत असतात. त्यामुळे दम्याच्या रुग्णात वाढ झाली आहे.
 • अतिवृष्टीमुळे बुरशीसारख्या सूक्ष्म जिवाणूंची संख्या अपरिमितरित्या वाढत चालली आहे, त्यामुळे श्वसनसंस्थेचे अनेक विकार वाढत आहेत.
 • हवेतील प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड असे दूषित वायू निर्माण होत आहेत. 
 • वाढलेले तापमान, हवेतील आर्द्रता आणि समुद्रकिनाऱ्यावर वाढलेले उद्योगधंदे आणि शहरे यामुळे काही विषारी सागरी वायू पसरत आहेत. 
 • दुष्काळामुळे धुळीचे प्रमाण वाढले. यामुळे श्वसनसंस्थाचे आजार आणि गुदमरून जाण्याच्या घटना वाढल्या.
 • प्रदूषणयुक्त शहरात थंडीच्या दिवसात धूम्रधुके (स्मॉग) निर्माण होते. यामुळे दमा, सीओपीडी, न्युमोनिया असे आजार  वाढत चालले आहेत. 

कर्करोग - या बदलत्या हवामानात उन्हाची तीव्रता जास्त जाणवते. अशा उन्हाळ्यात सूर्याच्या प्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेचे क र्करोग जास्त प्रमाणात होतात. त्याचवेळेस हवामानातील रासायनिक घटक फुफ्फुसांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. 
 हृदयविकार आणि अर्धांगवायू - प्रदूषणामुळे निर्माण झालेले अनारोग्यकारक वायू, हवेत वाढलेले परागकण आणि इतर दूषित कण या साऱ्यांच्या परिणामामुळे हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. एकुणातील वाढत्या तापमानामुळे ‘हीट स्ट्रेस’ वाढतो, यात हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, रक्तामध्ये गुठळ्या होणे असे गंभीर प्रकार उद्‌भवतात. त्यातूनच हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायू या दोन्ही गंभीर आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.

पोषणासंबंधी आजार - दुष्काळामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये घट होऊन कुपोषणाची समस्या उभी ठाकते, त्याचप्रमाणे जैविकदृष्ट्या विषारी पदार्थ, पाण्यात सोडली जाणारी रसायने, पाण्यातील रोगजंतू आणि त्यातून उद्‌भवणारे प्रदूषण, या साऱ्याचा परिणाम म्हणून समुद्र आणि इतर पाण्याचे साठे, पिण्याचे पाणी म्हणून असुरक्षित होत आहे. त्यामुळे मासे आणि इतर जलचरांवर पोट भरणाऱ्या मानवी वसाहतींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम वाढत आहेत. याच बरोबर प्रदूषण तसेच कीटकनाशकांच्या वाढत्या वापर यामुळे शेतमाल आणि फळबागायत यांच्यावर परिणाम होऊन शाकाहारी आहारातून निर्माण होणाऱ्या समस्यासुद्धा वाढल्या आहेत. 

 तापमानातील फरक : गेल्या काही वर्षात दरवर्षी किमान १० ते १५ वेळेस कमाल आणि किमान तापमानातील अंतर वाढते आहे. बऱ्याचदा ही परिस्थिती दोन-तीन आठवडे टिकून राहते. हवामानातील उच्च आणि निम्न अशा प्रकारांतील अंतर वाढत चालल्याने तीव्र उन्हाळ्यातील उष्माघात आणि थंडीमुळे गारठून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. 
उच्च आणि निम्न तापमानातील कमालीचा वाढलेला फरक आणि हवेतील आर्द्रता यामुळे काही जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात. परिणामतः स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा अशा आजारांच्या जीवघेण्या साथी जगभरात दरवर्षी येत आहेत.
 गर्भवती स्त्रिया आणि बालके : ओल्या किंवा कोरड्या दुष्काळामुळे होणाऱ्या अन्नधान्याच्या तुटवड्याचा परिणाम गर्भार स्त्रियांच्या आणि बालकांच्या पोषणावर होऊन कुपोषण, माता-बालमृत्यू यांचे प्रमाण वाढते. शेतीमध्ये आणि फळ बागायतीत कीटकनाशके वापरल्याने होणारे दुष्परिणाम यात भर टाकतात.

 मानसिक आजार : दुष्काळ, दुष्काळामुळे होणारी आर्थिक अडचण, कामधंद्यासाठी राहते गाव सोडून जावे लागणे याचा परिणाम होऊन चिंता, नैराश्‍य असे प्रकार घडतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.
 मज्जासंस्थेचे विकार : शेतीतील कीटकनाशके, हवेतील विषारी वायू, पाण्यातील दूषित रसायने, पाण्यातील वाढती खनिजे यांचा परिणाम मज्जासंस्थेवर होऊन हातापायांची आग होणे, हातपाय सुजणे, डोके दुखणे, मळमळणे, सतत उलट्या जुलाब होणे असे आजार वाढले आहेत. 
 कीटकजन्य आजार : हवामानातील बदलांचा परिणाम म्हणून विविध प्रजातीचे डास, माश्‍या, पिसवा यांच्या संख्येत खूप वाढ झाली. परिणामत: त्यांच्यामुळे पसरणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुन्या, झिका, जपानी मेंदुज्वर या आजारांच्या रुग्णांची संख्या न भूतो-न-भविष्यती वाढली. त्याचप्रमाणे काही पक्षी, माकडे यांनी निर्माण होणारे बर्ड फ्लू, इबोला असे आजारही निर्माण झाले.
 जलजन्य आजार - पाण्याचे प्रदूषण, महापूर आणि दुष्काळ यामुळे पिण्याच्या पाण्यातील जंतुसंसर्ग, कुपोषण यामुळे कावीळ, विषमज्वर, अतिसार, असे जलजन्य कमालीचे आजार वाढले. याशिवाय महापूर, दुष्काळ, जंगलातील वणवे, ढगफुटी, अतिवृष्टी, सागरी चक्रीवादळे यात सापडलेल्यांची प्रत्यक्ष जीवितहानी होते, ती वेगळीच.

काही भविष्यदर्शी उपाय
 वृक्षारोपण : वनस्पती सूर्यप्रकाशात हवेतील कार्बन डायऑक्‍साईड शोषून घेतात. वृक्षराजी आणि जंगले वेगाने कमी होत जाणे हे एक पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मूलभूत कारण आहे. त्यामुळे वृक्षतोडीवर कडक बंधने आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करता येईल तेवढे आवश्‍यक आहे.
 वाहने : पेट्रोलियम इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिक कार्स, मोटर्स, स्कूटर्स याना प्राधान्य द्यायला हवे. जगाला २०५० पर्यंत  कार्बनचे शून्य उत्सर्जन साध्य करावेच लागेल.
चीनने २०३० हे आपले सर्वाधिक उत्सर्जन वर्ष असेल, अशी घोषणा केली आहे. म्हणजे त्यानंतर चीन कार्बन उत्सर्जन कमी करेल. अजूनतरी आपण कार्बन उत्सर्जन कधी कमी करणार याची मर्यादा ठरवलेली नाही. भारत कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित विकासासाठी या शतकाच्या मध्यापर्यंतचे धोरण तयार करत आहे. त्याच्या अभ्यासावर पुढील दिशा ठरणार आहे. भारताने अक्षय उर्जेबाबत स्वतःची काही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टेही ठेवली आहेत. मात्र, त्यात अनेक अडथळे आहेत. उदा. अक्षय ऊर्जा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवावी लागेल. मात्र, स्टोअरेज बॅटरीची किंमत वेगाने कमी होत नाही. त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य ठरू शकत नाही. भारतात वाहतूक व्यवस्थेची वाढती मागणी हे दुसरे मोठे आव्हान आहे. सध्या भारतात सायकल आणि सायकल रिक्षा यांची संख्या भरपूर आहे. मात्र जसजसे आर्थिक स्थैर्य येत जाते, तसतसे मोटर आणि मोटारसायकल घेण्याचे आकर्षण वाढत जाते.

आरोग्य खाते आणि हवामान खाते
भौतिकशास्त्राच्या उन्नतीमुळे हवामानशास्त्रदेखील आज अतिशय प्रगतशील झाले आहे. त्यामुळे हवामानातील अनेक बदल  हे खूप आधीच जाणून घेता येतात. त्याचा वापर केल्यास, एखाद्या प्रदेशात येऊ घातलेली तीव्र उष्णतेची लाट, थंडीची लाट, महापूर, दुष्काळ यांचे तंतोतंत अनुमान काढले जाऊ शकते आणि त्याचा इशारा तेथील रहिवाशांना देऊन हानीचे निवारण करता येते. 
उच्च तापमान, निम्न तापमान यातील फरक कुठल्या काळात वाढेल? हवेची आर्द्रता केव्हा वाढेल किंवा खूप कमी होईल? याचा अंदाज अगोदर दिल्यास, त्याकाळात निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांबाबत आधीच खबरदारी घेता येईल. चक्रीवादळाबाबत अशी अनुमाने देऊन लाखो लोकांचे प्राण वाचविले जाण्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. याच तत्त्वावर हेसुद्धा होऊ शकते.  
वातावरणातील प्रदूषणाचे मोजमाप सातत्याने केले जाते आणि ते जाहीरसुद्धा होत असते. मात्र, एखाद्या काळातल्या हवामान बदलाचा या प्रदूषणाशी संयोग होऊन कुठले गंभीर त्रास उद्‌भवतील याबाबत सावधानतेचे अभ्यासपूर्ण इशारे देणारी यंत्रणा तयार व्हायला हवी.
थोडक्‍यात सांगायचे तर, हवामान खाते आणि आरोग्य खाते यांचे सर्वेक्षण सातत्याने चालूच असते. पण त्यांनी एकत्रितपणे असा प्रकल्प राबवयला तर हवामानातील बदल आणि त्यामुळे आरोग्याबाबत निर्माण होणारे धोके यांचा एक संकीर्ण तक्ता तयार होऊ शकेल. मानवी आरोग्यातील हवामानामुळे होणारे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्‍यात आणता येतील. वातावरणातील बदलाला अनुसरून अनेक उपाय तातडीने आणि सक्तीने अमलात आणल्याशिवाय संपूर्ण जगाला निरामय करण्याची स्वप्ने फोल ठरतील.

भविष्यातील अनुमान : जागतिक आरोग्य संघटनेने हवामानातील या बदलांमुळे होणाऱ्या जीवितहानी आणि आरोग्यसेवेबाबत अनुमान जाहीर केले आहे. त्यानुसार-

 • इ.स.२०३० ते २०५० या काळात जगभरात दरवर्षी २,५०,००० हून जास्त लोक कुपोषण, मलेरिया, जुलाब आणि हीट स्ट्रेसमुळे मृत्युमुखी पडतील.
 • याचा परिणाम म्हणून इ.स. २०३० पासून जगाच्या आरोग्यक्षेत्राच्या खर्चाचा बोजा दरसाल २ ते ४ अब्ज डॉलर्सने (१३ ते २६ दशअब्ज रुपये) वाढेल.  
 • जगातील अप्रगत देशांना याचा सर्वात जास्त फटका बसेल.
 • वाहतुकीमुळे आणि हरित वायुंमुळे होणारे प्रदूषण या काळात आटोक्‍यात आणल्यास आरोग्याचा दर्जा उंचावू शकेल. माणसाने कार्बन वायूंचे उत्सर्जन करणे आजच्या घडीला पूर्णपणे थांबवले, तरीही सध्या अस्तित्वात असलेल्या वायूंचे परिणाम हवामानबदल आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांचे परिणाम इथून पुढच्या काही शतकांपर्यंत तरी होत राहतील.
 • कार्बन डायऑक्‍साईडमुळे हवामानात होणारे काही बदल कित्येक शतके कायम राहतील. जर वातावरणातून हा वायू मोठ्या प्रमाणात काढून घेतला, तरच हे चित्र वेगळे दिसेल.
 • तापमानवाढीमुळे जमिनीतील कार्बन, शिफ्टिंग बायोम्स, बर्फाचे आवरण, सागरी तापमान, समुद्राच्या पातळीतील वाढ आणि यामुळे परिसरात होणारे अनुषंगिक बदल या गोष्टी पूर्ववत होण्याला काही शतके, सहस्त्रकांचा काळ लागतो.
 • कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जन असेच सुरू राहिल्यास, समुद्राच्या पाण्याची आम्लता वाढत जाऊन सागरी जीवांच्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतील.
 • सागरी पातळीतील वाढ ही इ.स. २१०० नंतरही काही शतकापर्यंत कायम राहील. ही वाढ किती प्रमाणात असेल, हे भविष्यात आपण किती प्रमाणात हरित वायू वातावरणात सोडतो यावर अवलंबून असेल.

संबंधित बातम्या