भोंडल्याचा खेळ

सुप्रिया सुधाकर खासनीस
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून अनेक सण समारभांची परंपरा चालत आलेली आहे. हे सण, उत्सव, व्रते ठरविताना माणसाचा, निसर्गाचा, प्राणिसृष्टीचाही विचार झालेला दिसून येतो. निसर्गाचे व वृक्षवेलींचे मानवी जीवनातील महत्त्व, त्यांचे आपल्यावरील उपकार, स्त्रीशक्तीची महती इत्यादीचा परिचय सण, व्रते व उत्सव यामधून होत असतो. 

आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून अनेक सण समारभांची परंपरा चालत आलेली आहे. हे सण, उत्सव, व्रते ठरविताना माणसाचा, निसर्गाचा, प्राणिसृष्टीचाही विचार झालेला दिसून येतो. निसर्गाचे व वृक्षवेलींचे मानवी जीवनातील महत्त्व, त्यांचे आपल्यावरील उपकार, स्त्रीशक्तीची महती इत्यादीचा परिचय सण, व्रते व उत्सव यामधून होत असतो. 

भारतीय समाज हा कृषिप्रधान आहे. पावसाळी नक्षत्रामध्ये हस्त नक्षत्र महत्त्वाचे मानले जाते. रब्बी हंगामातील पिके तरारून वर येत असताना त्यांना अधिक टवटवी यावी म्हणून हस्त नक्षत्राची पूजा केली जाते. पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करायची हा हादग्यामागचा हेतू दिसून येतो. हादगा म्हणजे मेघाची प्रतिकात्मक पूजा होय.

महाराष्ट्रातील मुलींचे, तसेच स्त्रियांचे आवडते व्रत म्हणजे हादगा होय. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. आश्‍विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, की त्या दिवसापासून पुढे सोळा किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत स्त्रिया-मुली अत्यंत उत्साहाने हादगा खेळतात. काही ठिकाणी घराच्या भिंतीवर सोंडेमध्ये माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्यावर लाकडी मंडप घालून फळा फुलांच्या माळा घालतात. तसेच घरोघरी मुली जमिनीवरील किंवा पाटावर रांगोळी अथवा धान्याने हत्ती काढतात व त्याच्याभोवती फेर धरून हादग्याची गाणी म्हणतात. 

हस्त नक्षत्राची पूजा हादगा किंवा भोंडला या नावाने ओळखली जाते. विदर्भ व खानदेशात ज्याप्रमाणे शिवशक्तिची पूजा केली जाते. त्याप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात आश्‍विन महिन्यात हादग्याची पूजा केली जाते. हस्ताची पूजा म्हणजे नव्या वर्षाच्या मांगल्याची, सधनतेची, सुखासमाधानाची पूजा होय. पावसाची पूजा म्हणजे निसर्गाच्या शक्तीची पूजा. भोंडला एक पर्जन्यपूजा मानली जाते. हस्त नक्षत्राशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याला हादगा असे नाव पडले असावे. हस्ताचा पाऊस मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करीत असल्याने हा उत्सव फार मानाचा मानला जातो.

 भोंडला खेळताना पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे रोज एकेका गाण्याची भर घालून शेवटच्या दिवशी सोळा गाणी म्हटली जातात. गाणे संपल्यावर खिरापत वाटली जाते. गाण्याप्रमाणे रोज खिरापतींची संख्याही वाढत जाते. शेवटच्या दिवशी सोळा खिरापती केल्या जातात. हल्ली वेळेच्या अभावी आश्‍विन हस्त नक्षत्रापासून पुढे किंवा नवरात्रात पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एकाच दिवशी हादगा खेळला जातो. 

पश्‍चिम महाराष्ट्रात जसा हादगा किंवा भोंडला साजरा होतो, तसा वऱ्हाड- खानदेश या प्रांतात भुलाबाईचा उत्सव मोठ्या डामडौलाने होतो. भाद्रपद पौर्णिमेपासून आश्‍विन पौर्णिमेपर्यंत भुलाबाईची पूजा चालते. भुलाबाई म्हणजे पार्वती. भुलोबा म्हणजे शंकर. लोकांचे हित, कल्याण व्हावे यासाठी देवाधिदेव महादेव यांची पूजा करायची असते असे समजले जाते. आरास केलेल्या देवळीत (कोनाड्यात) भुलोबा व भुलाई यांची मातीची चित्रे मांडून त्यांची पानाफुलांनी पूजा केली जाते. या काळात भुलाई माहेरपणाला येते असे मानले जाते. कोजागरी पौर्णिमेला या चित्रांचे पूजेसह विसर्जन केले जाते. वऱ्हाडात जेव्हा भुलाईची पूजा करतात. त्यावेळी महाराष्ट्रात हादग्याची पूजा करतात. हादग्याची प्रेरणा मूलतः कृषी परंपरेत आहे. आश्‍विन महिना हा स्कंद पूजेचा महिना समजला जातो. आश्‍विन पौर्णिमेला भुलाईच्या व भोंडल्याच्या सोहळ्याची सांगता होते.

हादग्याचा सण साजरा करण्याच्या पद्धती निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी पूजेसाठी पाच खडे आणतात व त्यांची पानाफुलांनी पूजा केली जाते. काही ठिकाणी जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्ती काढतात व त्याला रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून सजविले जाते. त्याची पूजा केली जाते. वऱ्हाड खानदेशात शंकर पार्वती व गणपती यांच्या मूर्तीची स्थापना करून भुलाबाईची गाणी म्हटली जातात. तर गुजरातमध्ये याचेच रूप ‘गरबा’ असे झालेले दिसून येते. भोक पाडलेल्या घड्यामध्ये दिवा ठेवून स्त्रिया गाणी म्हणतात. त्याला ‘गरबा’ असे म्हणतात. महाराष्ट्रात हादगा किंवा भोंडल्याची गाणी हा लोकगीतांचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखली जातात. यांची मूळ संख्या सोळा असली, तरी त्यात आणखी काही गाण्यांची भर पडलेली दिसून येते. जुन्या काळच्या लग्न झालेल्या मुलींची सासर-माहेरच्या हकीकती ही गाणी सांगत असतात. त्यामुळे गाणी म्हणताना एकापेक्षा एक चढाओढीचे अनुभव सांगणारी गाणी म्हटली जातात. हादगा हा पर्जन्यविधी असल्याने पावसाळ्याची अखेर व बरसातीचा आनंद या गाण्यांनी सूचित केलेला आढळून येतो.    

संबंधित बातम्या