लोणच्यांचे मसाले

निर्मला देशपांडे
सोमवार, 4 मार्च 2019

लोणचे विशेष

लग्नकार्याचे-पक्वान्नांचे जेवण असो, की एखादी पार्टी किंवा घरचे रोजचे जेवण... ताटात डाव्या बाजूला लोणचे असतेच. टेस्टी, आंबट-गोड चवीचे लोणचे जेवणाची लज्जत आणखीनच वाढवते. काही पदार्थांबरोबर तर लोणचे हटकून लागतेच. उदा. भाजणीचे थालीपीठ, मऊ भात, उपमा वगैरे. कधी कधी तर भाजी थोडी कमी असेल, तर घरातल्या बरणीतले लोणचे दुसऱ्या भाजीचे काम करते, असे हे लोणचे. लोणच्याचे मसाले हे लोणच्याची मुख्य चव असते. आपल्या देशात सर्व प्रांतांमध्ये लोणची केली जातात. प्रांतानुसार मसाला वेगवेगळा केला जातो. पण आपल्या महाराष्ट्रात मेथी, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, तेल हे पदार्थ योग्य प्रमाणात घालून लोणच्याचा पारंपरिक मसाला केला जातो. काही लोणच्यांमध्ये एखादा पदार्थ कमी-जास्त असतो. उदा. लिंबाच्या लोणच्यात मोहरी पूड नसते. लोणचे करणे, हे तसे निगुतीचे काम आहे. त्याकरिता स्वच्छता व सर्व जिन्नस करायची साधने, लोणचे ठेवण्याची बरणी व्यवस्थित कोरडी असणे अतिशय आवश्‍यक असते. मग लोणचे अगदी वर्षभर उत्तम टिकते. बघूया काही लोणच्यांचे मसाले.

लोणच्याचा तयार मसाला
साहित्य : पाव किलो मोहरीची डाळ, ३ टेबलस्पून तळलेल्या मेथीची भरड पूड, पाऊण वाटी लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.), ३ टेबलस्पून हळद, दीड टेबलस्पून हिंग पूड, पाव किलो बारीक मीठ, अर्धी वाटी रिफाइंड तेल.
कृती : तेल गरम करून गॅसवरून उतरवून ठेवावे. त्यात तिखट, हळद, हिंग पूड घालावी. गार झाल्यावर त्यात मीठ, मोहरीची डाळ मिसळावी. असा हा तयार मसाला सर्व प्रकारच्या लोणच्यांसाठी वापरता येतो.

पारंपरिक लोणचे मसाला 
साहित्य : एक किलो चांगल्या घट्ट, ताज्या कैरीच्या फोडी, दीड वाटी मीठ, वाटीभर मोहरीची डाळ, अर्धी वाटी लाल तिखट, पाव वाटी हळद, ४ चमचे तळलेली हिंग पूड, २ चमचे तळलेल्या मेथीची पूड, पाव लिटर तेल.
कृती : तेलाची फोडणी करावी. ती गार झाल्यावर त्यातील अर्धी फोडणी व निम्मे मीठ कैरीच्या फोडींना चोळावे. नंतर तिखट, उरलेले मीठ, हळद, हिंग पूड, मेथी पूड, मोहरीची डाळ सर्व एकत्र करून मसाला बनवावा व कैरीच्या फोडी घालाव्यात.

कैरीचा उपवासाचा लोणचे मसाला
साहित्य : कैरीच्या २५० ग्रॅम फोडींसाठी प्रत्येकी ५० ग्रॅम मीठ व साखर, लाल तिखट अडीच टीस्पून, १ टीस्पून जिरेपूड, दीड इंच आले.
कृती : आले तासून किसावे. कैरीच्या फोडी, आल्याचा कीस एकत्र करून त्यात इतर सर्व पदार्थ घालावेत.

लिंबू लोणचे मसाला 
साहित्य : डझनभर लिंबांसाठी अर्धी वाटी लाल तिखट, एक ते दीड वाटी मीठ, अर्धा किलो साखर अगर गूळ.
कृती : लिंबाच्या आठ फोडी कराव्यात. तिखट, मीठ, साखर किंवा गूळ एकत्र करून मसाला तयार करावा.

आवळ्याचा लोणचे मसाला 
साहित्य : अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धी वाटी लाल मोहरी, पाव वाटी लाल भडक तिखट, २ चमचे तेलात तळलेल्या मेथीची पूड, हिंग पूड, अंदाजे पाव किलो किंवा चवीप्रमाणे गूळ अथवा साखर, फोडणीचे साहित्य, चवीप्रमाणे मीठ.
कृती : मोहरी मिक्‍सरवर फिरवून बारीक करावी. दीड वाटी पाण्यात घालून भरपूर घुसळावी. गूळ अगर साखर, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, मेथी पूड व वाटलेली-फेसलेली मोहरी, असे सर्व एकत्र करावे व मसाला तयार करावा. आवळ्याचा कीस घालून वर अर्धी वाटी तेलाची हिंग, हळदीची थंड झालेली फोडणी घालावी.

लिंबाचा पारंपरिक लोणचे मसाला 
साहित्य : डझनभर लिंबांसाठी अर्धी वाटी तिखट, एक ते दीड वाटी मीठ, १ चमचा तळलेल्या मेथीची पूड, चमचाभर हिंग पूड, २ चमचे हळद, लिंबाचा रस. 
कृती : तिखट, मीठ, तळलेल्या मेथीची पूड, हिंग, हळद आणि लिंबाचा रस, असे सगळे पदार्थ एकत्र करून मसाला तयार करावा.

ओल्या हळदीचा लोणचे मसाला 
साहित्य व कृती : पाव वाटी मोहरीची डाळ, एक चमचा तळलेल्या मेथीची पूड, चमचाभर तळलेली हिंग पूड, हे तिन्ही पदार्थ एकत्र करून मसाला करावा.

सरसूच्या तेलातील पंजाबी लोणचे मसाला
साहित्य : दोन किलो कैरीसाठी ३० ग्रॅम कांद्याचे बी, ३० ग्रॅम किंचित ठेचलेले धने, २ टेबलस्पून थोडी ठेचलेली बडीशेप, १ टेबलस्पून हळद, २ टेबलस्पून लाल तिखट, ३० ग्रॅम तळलेल्या मेथीची भरड पूड.
कृती : कांद्याचे बी, धने, बडीशेप, हळद, तिखट, चवीप्रमाणे मीठ असे सर्व पदार्थ एकत्र करून मसाला तयार करावा.

उत्तर प्रदेशी लोणचे मसाला
साहित्य : पाव किलो कैऱ्यांसाठी अर्धा चमचा हिंग पूड, १ टेबलस्पून जिरे, ५ मोठे वेलदोडे, दीड कप साखर, अर्धा कप मीठ, एक टीस्पून मिरे, अर्धा टेबलस्पून लवंगा, एक टेबलस्पून तिखट.
कृती : हिंग व मीठ एकत्र वाटावे. जिरे, मिरे, लवंगा थोड्या शेकून घ्याव्यात. त्यात वेलदोडे घालून सर्व एकत्र वाटावे. सर्व एकत्र करून मसाला तयार करावा.

हिरव्या मिरच्यांचा लोणचे मसाला 
साहित्य : पाव किलो हिरव्या मिरच्यांसाठी अर्धी वाटी मोहरीची डाळ, २ चमचे तेलात तळलेल्या मेथीची पूड, पाऊण वाटी मीठ, २ चमचे हिंग पूड, २ चमचे हळद, वाटीभर लिंबाचा रस, वाटीभर तेल.
कृती : मोहरीची थोडीशी कुटलेली डाळ लिंबाच्या रसात फेसावी. त्यात हळद, एक चमचा हिंग पूड, मेथी पूड व मीठ घालून एकत्र कालवावे व लोणचे मसाला तयार करावा. जास्त आंबट नको असल्यास लिंबाचा रस कमी घालावा.

संबंधित बातम्या