फळभाज्यांची लोणची
लोणचे विशेष
आंबा, कैरी, लिंबू ही लोणची नेहमीच केली जातात, वेगळ्या चवीसाठी इतर फळं व भाज्यांची लोणची करून पहा...
गवारीचे लोणचे
साहित्य : पाव किलो गवारीच्या शेंगा, तीळ, खोबरे, खसखस, एक चमचा मोहरीपूड, मेथीपूड, एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, हळद
कृती : गवार ओल्या टॉवलने पुसाव्यात. मग त्याचे छोटे तुकडे करावेत. कडक उन्हात वाळवावे. एका काचेच्या बाऊलमध्ये भाजलेले तीळ, खोबरे (सुके), खसखस वाटून घ्यावी. त्यात मोहरीपूड, मेथीपूड, हिंग पावडर, लाल तिखट, ठेचलेला ओवा, एक लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ व साखर, हळद, सुंठ पावडर, बडीशेप पावडर, काळी मिरपूड हे सर्व एकत्र करुन कालवावे. त्यात गवारीचे तुकडे मिसळावे. सर्व एकजीव करावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरावे. साधारण आठ दिवसात लोणचे मुरेल. मधे मधे लिंबूरस घालावा. प्रत्येकवेळी वाढताना, बाऊलमध्ये लोणचे घालावे व त्यावर खमंग तेलाची फोडणी द्यावी.
पायनॅपल पिकल
साहित्य : मध्यम आकाराचे एक अननस, चवीनुसार मीठ, तेल, एक चमचा जिरे, एक चमचा हिंग, ४ टीस्पून लाल तिखट , अर्धा टीस्पून मिरपूड, १ टीस्पून बडीशेप पूड, एक टीस्पून हिंगपूड
कृती : अननसाची साले काढावीत व चकत्या कराव्यात. मग कडक भाग काढावा व बारीक काप करावेत. बाऊलमध्ये मीठ घालून त्यात ठेवावे. गॅसवर कढईत ६ टेबलस्पून तेल तापवावे. त्यात राई, जिरे, हिंग यांची फोडणी करावी व ती थंड होऊ द्यावी. दुसऱ्या बाऊलमध्ये ४ टीस्पून लाल तिखट, ३ टीस्पून मोहरी पूड , एक टीस्पून भाजलेली मेथी पूड, गूळ पावडर, अर्धा टीस्पून मिरपूड, एक टीस्पून बडीशेप, ४ टीस्पून गूळ पावडर, अर्धा टीस्पून मिरपूड, १ टीस्पून बडीशेप पूड, हिंगपूड (सुवास जास्त येईल इतपत व जरुरीप्रमाणे), मीठ, हे सर्व एकत्र करून मसाला बनवावा. त्यात वरील फोडणी घालून ढवळावे. मग अननसाच्या फोडी घालाव्यात. हे मिश्रण एकत्र कालवावे. मग घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत तयार लोणचे भरावे. बरणीच्या झाकणाला दादरा बांधावा. ७-८ तासांनी चमचमीत आंबट-गोड लोणचे तयार.
बीटरूट पिकल
साहित्य : एक बीटरुट, मीठ, तेल, मेथी दाणे, हिंग, लाल मिरच्या
कृती : बीटरुट शिजवावे. थंड झाल्यावर साले काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. मीठ लावावे, ढवळावे व बाऊलमध्ये ठेवावे. गॅसवर एका कढईत खोबरेल तेल घालावे, त्यात मेथी दाणे, हिंग, लाल मिरच्या परताव्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पावडर करावी. कढीत तेल घालावे. राई, जीरे परतावे. तडतडले, की त्यात मसाला पावडर घालावी. मंद आचेवर ढवळ राहावे. बीटरुटचे तुकडे व चिंच कोळ घालावा; आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालावी. मिश्रण सुके होईपर्यंत परतावे. थंड झाल्यावर काचेच्या जारमध्ये काढावे व भातासोबत किंवा चपातीसोबत खावे.
फ्लॉवरचे लोणचे
साहित्य : फ्लॉवर, व्हिनेगर, गुळाची पावडर, गाजर, तेल, लसूण पेस्ट
कृती : अर्धा कप व्हिनेगर व एक कप गुळाची पावडर घालून पाक करावा. फ्लॉवर तुरे, गाजर यांचे काप गरम पाण्यात चार मिनिटे ठेवावे. नंतर सुकण्यासाठी आठ तास ठेवावेत. गॅसवर पॅन ठेवावा त्यात राई तेल घालावे, दोन चमचे आले - लसूण पेस्ट घालून परतावे. मंद आचेवर उभा कापलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा. आता त्यात आवडीच्या भाज्या घालाव्यात. लाल मिरची पावडर, गरम मसाला व मीठ घालून ढवळावे. गुळाचा पाक घालावा व मंद आचेवर १० मिनिटे शिजवावे. चविष्ट लोणचे तयार. घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरावे व उन्हात २ दिवस ठेवावे.
तोंडली लोणचे
साहित्य : पंधरा-वीस तोंडली, १० काश्मिरी मिरच्या, ५ बेडगी मिरच्या, चमचाभर मेथी दाणे, ५ लवंगा, आल्याचा तुकडा, चिंचेची ३ बुटूके, ३ चमचे गूळ, मीठ, अर्धा वाटी कच्च्या कैरीचा कीस व पाव वाटी दळलेली साखर, तेल.
कृती : तोंडली स्वच्छ धुवावीत. उभी पातळ लांब चिरावीत. एका बाऊलमध्ये काढावीत. त्यात मीठ घालावे व ७-८ तास झाकून ठेवावे. नंतर चाळणीत निथळत ठेवावीत. एका प्लेटमध्ये काढावीत. त्यावर मलमलचा कपडा बांधावा व उन्हात ४-६ तास वाळवावी. १० काश्मिरी मिरच्या, ५ बेडगी मिरच्या, चमचाभर मेथी दाणे, ५ लवंगा, आल्याचा तुकडा, चिंचेची ३ बुटूके, ३ चमचे गूळ हे साहित्य घेऊन मसाला वाटावा. गॅसवर पॅनमध्ये २ चमचे तेल घालावे व मसाला परतावा.आता यात सुकलेली तोंडली घालावी. जास्त आंबटपणा येण्यासाठी अर्धा वाटी कच्च्या कैरीचा कीस व पाव वाटी दळलेली साखर घालावी. सर्व ढवळावे. मंद आचेवर झाकण ठेवून अर्धा तास शिजवावे. थंड होऊ द्यावे. त्यानंतर घट्ट झाकणाच्या काचेच्या बाटलीत भरावे. वरपर्यंत तेल घालावे. १५ दिवस मुरण्यास ठेवावे.
मद्रास ओनियन पिकल
साहित्य : छोट्या आकाराचे ८ ते १० कांदे, मीठ, हळद, एका लिंबाचा रस, रेड चिली सॉस किंवा लाल मिरचीचा लसणीचा ठेचा, लाल मिरची पावडर,तेल
कृती : एका काचेच्या बाऊलमध्ये छोटे कांदे स्वच्छ पुसून ठेवावेत. त्यात मीठ, हळद, लिंबूरस घालून २ तास ठेवावे. जे पाणी सुटेल ते काढून घ्यावे. बाऊलमध्ये हे कांदे, लाल मिरची पावडर, राईचे तेल, मीठ स्वादानुसार, रेड चिली सॉस किंवा लाल मिरचीचा लसणीचा ठेचा घालावा. चांगले ढवळावे. स्वादानुसार मीठ घालावे. हे लोणचे शिजवायचे नाही, असेच खाण्यास पण खूपच झणझणीत लागते. भाकरीबरोबर खाल्ल्यास लज्जत वाढते. फ्रीजमध्ये ठेवावे व जरुरीप्रमाणे वापरावे.
कोथिंबिरीचे लोणचे
साहित्य : कोथिंबिरीची एक जुडी स्वच्छ निवडलेली, २ टीस्पून धने पावडर, २ टीस्पून काळी मिरपूड,२ टीस्पून जिरेपूड, २ टीस्पून बडीशेप पूड, २ टीस्पून लाल तिखट , तेल, ३ टीस्पून आमचूर पावडर
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये मकई तेल वाटीभर तापवावे. त्यात धने पावडर, काळी मिरपूड, जिरेपूड, बडीशेप पूड, लाल तिखट हलकेसे भाजून घ्यावे. थंड होऊ द्यावे. मग त्यात स्वादानुसार मीठ, आमचूर पावडर घालावी नंतर कोथिंबीर पाने घालून कालवावे. काचेच्या बाटलीत भरावे. २ दिवसांनी मुरल्यावर खावे.
पत्ता कोबी आचार
साहित्य : कोबीची पाने, सफरचंद, लाल मिरच्या,कांदा, आले, लसूण , २ चमचे व्हिनेगर ,
कृती : एका काचेच्या बाऊलमध्ये कोबीची पाने (स्वच्छ धुतलेली) घ्यावीत. त्यात मीठ घालावे. तासाभरात पाणी सुटेल. मग ही पाने पिळावीत. सर्व पाणी काढून टाकावे. पाने कोरडी करावीत. असे केल्यामुळे उग्र वास जाईल. सफरचंदाचे काप करावेत. मिक्सरमध्ये सफरचंदाचे काप, कांदा, आले-लसूण याचे वाटण करावे. तसेच मिक्सरमध्ये ऑलिव्ह ऑइल, लाल सुक्या मिरच्या, व्हिनीगर, मीट याची पेस्ट करावी. घट्ट झाकणाच्या बरणीत कोबी पाने, सफरचंदाचे वाटण, मिरची पेस्ट घालावी. साखर, २ चमचे व्हिनेगर, काळे तीळ (भाजलेले), मीठ जरुरीप्रमाणे घालून तेल वरपर्यंत घालावे. ४ दिवस बरणी उजेडापासून दूर, घरातच मोकळ्या जागी ठेवावी म्हणजे हे लोणचे चांगले मुरते व खावयास तयार होते.
मिक्स फळांचे लोणचे
साहित्य : आपल्या आवडीची बेरी फळे - ब्ल्युबेरी, ब्लॅकबेरी, अर्धा वाटी गूळ पावडर. १ टीस्पून बेडगी मिरची पावडर, ३ टेबलस्पून गोड चिंचेचा कोळ, हळद
कृती : आपल्या आवडीची बेरी फळे - ब्ल्युबेरी, ब्लॅकबेरी इत्यादी स्वच्छ धुवावी व कोरडी करावी. उन्हात वाळण्यासाठी ठेवावी. गॅसवर पॅनमध्ये तेल तापवावे. त्यात हळद मीठ स्वादानुसार, १ टी स्पून बेडगी मिरची पावडर, ३ टेबलस्पून गोड चिंचेचा कोळ घालावे. उकळी आणावी. अर्धा वाटी गूळ पावडर घालावी. मंद आचेवर उकळावे. दाटसर मिश्रण झाले, की गॅस बंद करावा. आता वाळवलेल्या फळे घालावीत. चांगल्या मुरु द्यावे. थंड होऊ द्यावे. त्यानंतर काचेच्या बरणीत भरुन झाकण घट्ट लावावे. हे लोणचे गरमागरम भाताबरोबर - चपाती फुलक्यांबरोबर छान लागते.
लाल भोपळ्याचे लोणचे
साहित्य : मोठ्या आकाराचा लाल भोपळा, तेल, जीरे, हिंग, लाल मिरच्या, तमालपत्र, आमचूर पावडर, लोणचे मसाला
कृती : लाल भोपळाच्या साली काढून बारीक तुकडे करावेत. गॅसवर कढीत तूप/ तेल तापवावे. त्यात राई, जीरे, हिंग, लाल मिरच्या, तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यात भोपळ्याचे तुकडे, मीठ, लाल तिखट घालावे. झाकण ठेवून गरगट शिजवावे. मग त्यातक आमचूर पावडर, लोणच्याचा मसाला घालावा. ढवळावे. सर्व एकजीव करावे. आवडीप्रमाणे गूळ पावडर घालावी. गॅस बंद करावा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरावे. वरपर्यंत तेल घालावे म्हणजे बुरशी येणार नाही. फ्रीजमध्ये ठेवावे.