विजयाचा इजा-बिजा-तिजा!

अनंत बागाईतकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

भाष्य
बांगलादेशातील निवडणुकीमध्ये शेख हसीना यांचा अवामी लीग हा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. सलग तिसऱ्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होतील. हसीना यांचा पक्ष सलग तिसऱ्यांदा का जिंकला? या राजकीय परिस्थितीचा भारतावर काय परिणाम होईल? याचा घेतलेला वेध...

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना वाजीद यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाने २९९ पैकी २५८ व मित्रपक्ष नॅशनल पार्टीने २२ जागा जिंकून एकंदर २८० जागांवर कब्जा केला. शेख हसीना यांच्या विजयाची ही ‘हॅट-ट्रिक’ ठरली. सलग तिसऱ्या विजयात एकतर्फी महाकाय बहुमत मिळाल्याने विरोधी पक्षांच्या भुवया उंचावणे आणि निकालांबद्दल शंका व्यक्त करणे अपरिहार्यपणे झाले. त्यामुळेच विजयानंतर पत्रकारांनी जेव्हा शेख हसीना यांना ‘एवढा मोठा विजय कसा?’ असा प्रश्‍न केला असता शेख हसीना यांनी पत्रकारांना ‘का नसावा?’ असा प्रतिप्रश्‍न केला. शेख हसीना यांचा विजय बांगलादेशासाठी, बांगला देशाच्या विकासासाठी आणि भारतीय उपखंडातील स्थिरतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. भारताबरोबर मैत्री व शांततापूर्ण संबंधांमधील त्या एक प्रमुख भागीदार असल्याने त्यांचा विजय हा भारतासाठी निर्विवाद महत्त्वाचा आहे. २००८, २०१३ आणि आता २०१८ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शेख हसीना यांनी विजयी वाटचाल कायम राखली आहे. यात आणखी एक भावनिक व महत्त्वाची बाब पण गुंतलेली आहे. १६ डिसेंबर १९७१ हा बांगला देश निर्मितीचा ‘मुक्तिदिन’ मानला जातो. त्याला आता २०२१ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होतील. बांगलादेशाच्या निर्मितीचे श्रेय शेख हसीना यांचे वडील शेख मुजिबूर रहमान यांच्या लढ्याला दिले जाते. त्यामुळेच त्यांना ‘बांगलादेशाचे राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाते. बांगलादेश निर्मितीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांच्या कन्या शेख हसीना या देशाच्या पंतप्रधानपदी असतील हाही एक सुवर्ण किंवा बंगाली भाषेत ‘सोनार’ योगायोगच म्हणावा लागेल.

बांगलादेशातील घडामोडी विचारात घेताना बांगला देशातील अंतर्गत परिस्थिती आणि भारत-बांगलादेश संबंध या दोन दृष्टिकोनांना प्राधान्य द्यावे लागेल. कारण भारताच्या सीमा ज्या देशांना लागून आहेत त्यात बांगला देशाचाही समावेश होतो आणि त्यामुळेच बांगलादेशात एक मैत्रीपूर्ण राजवट सत्तारूढ असणे, ही बाब भारताला लाभकारक मानली जाते. पाकिस्तानात कितीही मैत्रीपूर्ण राजकीय व नागरी राजवट सत्तेत आली तरी तेथील सेनादल आणि आयएसआय या दोन संस्थांच्या वर्चस्वामुळे तेथील नागरी राजवट दबावाखाली राहते. सुदैवाने बांगलादेशात परिस्थिती बदलली आहे, असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती आहे. बांगलादेशातही लष्करी राजवटी येऊन गेल्या आणि तेथील लष्करानेही नागरी किंवा मुलकी राजवटीला नियंत्रणाखाली ठेवण्याचे प्रयत्न केलेले होते. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली. राजकीय नेतृत्व व लष्करी नेतृत्व यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचे बहुतांशाने यशस्वी म्हणता येतील असे प्रयत्न केले गेले आणि तूर्तास सेनादले आणि राजकीय नेतृत्व यांच्यात उल्लेखनीय प्रमाणात समन्वय आढळतो. यामध्ये सेनादलांच्या अधिकारांना संरक्षित करतानाच राजकीय नेतृत्वाचे नागरी व मुलकी म्हणजेच राज्यकारभाराचे अधिकार अबाधित ठेवण्याबाबत बहुतांशी मतैक्‍य आढळून येत आहे. त्यामुळेच बांगलादेशात गेल्या किमान पंधरा ते वीस वर्षात लष्करी उठाव झाले नाहीत किंवा एखादी लष्करी राजवटही सत्तारूढ झाली नाही. 

शेख हसीना यांनी २००८ मध्ये सत्तेत आल्यापासून जाणीवपूर्वकपणे व प्राधान्याने सेनादलांबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर दिला होता. याची काही कारणे होती. त्यांच्या आवामी लीग पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) या पक्षाची पार्श्‍वभूमी ही लष्कराशी निगडित होती. या पक्षाच्या प्रमुख बेगम खलिदा झिया या माजी लष्करशहा जनरल झियाउर रहमान यांच्याच पत्नी आहेत. जनरल झिया यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्याकडे या पक्षाची सूत्रे आली. या पक्षाची स्थापना जनरल झिया यांनीच केली होती. जनर झिया यांच्याप्रमाणेच बांगलादेशाने जनरल एच.के. ईर्शाद यांची राजवटही अनुभवली होती. अर्थात त्यावेळच्या लष्करी राजवटींच्या प्रमुखांची पाळेमुळे किंवा त्यांच्यावरील लष्करी संस्कारात पूर्वाश्रमीच्या पाकिस्तानी लष्कराचा प्रभाव होता. पूर्व पाकिस्तानातील सत्ता इस्लामाबादमधील पाकिस्तानी सत्ताधीशांनी केवळ लष्कराच्या जोरावरच निष्ठूरपणे राबविली होती. परंतु कालांतराने ती लष्करी पिढीही बहुतांश प्रमाणात अस्तंगत होत गेली. पुढच्या किंवा नव्या पिढीचे लष्करी नेतृत्वही पुढे येत गेले व परिस्थिती बदलत गेली. शेख हसीना यांनी आर्थिक विकास व प्रगती या दोनच मुद्यांना प्राधान्य दिले. बांगलादेशात आर्थिक सुधारणा अत्यंत नेटाने आणि आक्रमकपणे राबविण्यावर त्यांनी भर दिला. त्याच्याच जोडीला सर्वसाधारण शिक्षणाप्रमाणेच विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयी व सुविधा त्यांनी निर्माण करताना नवशिक्षण प्राप्त युवकांना देशाच्या आर्थिक विकास व प्रगतीत सामावून घेतले. त्याचे फलित आता बांगलादेशात दिसू लागले आहे. एकेकाळी गरिबीने पिचलेल्या बांगलादेशात उच्च-अभिजन आर्थिक वर्ग आणि दरिद्री जनता असे अतिशय भयंकर विषम वर्गीय चित्र दिसत असे ते पालटायला लागले. बांगलादेशात सधन असा मध्यमवर्ग तयार होऊ लागला. सर्वसामान्यांना आर्थिक सुधारणांची फळे पदरात पडताना दिसू लागली. यातून बांगलादेशात सर्वसाधारण पातळीवर स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. बांगलादेशाचा विकासदर वाढला. याचे सकारात्मक परिणाम सेनादलांवर होणेही स्वाभाविक होते व त्यांनी देखील राजकीय सत्तेबरोबर सौहार्दाचे संबंध राखण्यास महत्त्व दिले. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास शेख हसीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत बांगलादेशाला विविध पातळ्यांवर स्थिरता देण्याची यशस्वी कामगिरी करून दाखवली आणि त्यांची दखल बांगलादेशाच्या अर्वाचिन इतिहासकारांनाही घ्यावी लागेल. शेख हसीना यांची ही आर्थिक विकास व प्रगतीला प्राधान्य देणारी नव-राजकीय भूमिका बांगलादेशाच्या जनतेने पसंत केली. विशेषतः युवक वर्गानेही त्याचे स्वागत केले कारण आर्थिक विकास व प्रगतीच्या पहिल्या टप्प्यातील गतिमुळे त्यांना नोकऱ्या व रोजगार मिळालेला होता.

याउलट बेगम झिया यांच्या ‘बीएनपी’ पक्षाने बदलती जागतिक परिस्थिती, आर्थिक सुधारणा, विकास व प्रगती या मुद्यांकडे दुर्लक्ष केले. बांगलादेश निर्मिती व मुक्ततेस विरोध करणाऱ्या कट्टरपंथी जमाते इस्लामबरोबर या पक्षाची आघाडी अद्याप कायम राहिली आहे. बांगलादेशाचे कट्टर इस्लामीकरण करण्याचे ध्येय बाळगणारी ही संघटना व पक्ष आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणारी ही पुराणमतवादी मंडळी आहेत. त्यांच्या दृष्टीने बदलती जागतिक परिस्थिती, आर्थिक विकास व प्रगती यांना कवडीची किंमत नाही. परिणामी आर्थिक प्रगती व विकासाची फळे चाखणाऱ्या आणि चाखू इच्छिणाऱ्या आकांक्षी वर्गांनी (ॲस्पिरेशनल क्‍लासेस) या बीएनपी-जमाते इस्लामी आघाडीला नाकरणे अटळ होते. शेख हसीना यांच्यावर निवडणूक यंत्रणेत गडबड करणे, घातपात करणे असे आरोप लावण्यात आलेले आहेत. कदाचित काही प्रमाणात निवडणुकीत गडबडीचे प्रकारही झाले असतील, अशी शक्‍यता गृहीत धरुनही शेख हसीना यांच्या नेतृत्वाबाबत देशात असलेली सकारात्मकता याचा फायदा त्यांना झाला. याउलट बीएनपी-जमाते इस्लामी यांनी जनतेसमोर विकास व प्रगतीची कोणतीही विषयपत्रिका सादर केली नाही. त्यांच्या प्रचाराचा भर प्रामुख्याने शेख हसीना यांच्या विरोधात राहिला. केवळ व्यक्तिविरोधाच्या आधारे विरोधकांनी केलेला प्रचार मतदारांना मानवला नसावा आणि त्यांनी शेख हसीना यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.

तिसऱ्यांदा सत्तेवर येणे हे सुखद असले तरी त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच गंभीर असतात. यश मिळविण्यापेक्षा ते पचविणे आणि त्यानुसार लोकांना चांगली कामगिरी करून दाखविणे हे आव्हान असते, आणि त्या कसोटीवर त्या राज्यकर्त्याला उतरावे लागते. शेख हसीना यांच्या विजयानंतर त्यांना भारतीय पंतप्रधानांनी तत्काळ फोन करून अभिनंदन केले. त्या पाठोपाठ चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनीही त्यांना फोन केला होता. गेल्या काही वर्षांपासून चीनचा दक्षिण आशिया तसेच अग्नेय आशियातील रस सातत्याने वाढत आहे. नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांना स्वतःच्या पंखाखाली घेण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. या विभागात परंपरेने भारताबद्दल सदिच्छा बाळगणारे वरील देश समाविष्ट होतात. आपल्या धनदांडगेपणाच्या किंवा सभ्य भाषेत आपल्या मुबलक आर्थिक साधनसंपत्तीच्या जोरावर चीन या विकसनशील व तुलनेने लहान असलेल्या देशांना आपल्या कह्यात घेऊ पहात आहे. सुदैवाने काही अपवादात्मक प्रसंग वगळता भारताबद्दलची सदिच्छेची भावना अद्याप टिकून आहे. अलीकडेच श्रीलंकेत चीन-धार्जिण्या राजकीय शक्तींनी सत्तापालटाचे प्रयत्न केले होते. ते यशस्वी झाले नाहीत. व्हिएतनाम व कंबोडिया हे देश अद्याप भारताबरोबर आहेत. बांगलादेशानेही भारताची मैत्री मनापासून स्वीकारलेली आहे. त्यामुळे बांगलादेशातील शेख हसीना यांचा विजय हा भारताच्या दृष्टीनेही उपकारक मानावा लागेल.

भारत व बांगलादेशांदरम्यान केवळ मैत्री नसून तिचे स्वरूप भागीदारीचे अधिक आहे. बांगलादेशात भारतीय गुंतवणूक आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही या मैत्री व भागीदारीचे पैलू महत्त्वाचे आहेत. शेख हसीना यांच्या राजवटीने भारतविरोधी सक्रिय कट्टरपंथी जिहादी घटक व शक्तींना नेस्तनाबूत करण्याबरोबरच त्यासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण यामध्येही सहकार्य केले आहे. भारताच्या दृष्टीने हे सहकार्य बहुमोल आहे. किमानपक्षी बांगलादेशाची सीमा शांत व सुरक्षित असण्याचा लाभ भारताला मिळत आहे. म्यानमारमधून निर्वासित व नागरिकत्व नाकारलेल्या काही लाख रोहिंग्या मुस्लिमांचा लोंढा बांगला देशामुळे रोखला गेला. अन्यथा तो भारतापर्यंत येण्यास वेळ लागला नसता. बांगला देशाने कॉक्‍स बझार येथेच म्यानमार सीमेला लागूनच या लाखो रोहिंग्यांना आश्रय दिला. त्यासाठी बांगलादेशाला संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक विदेशी व पाश्‍चात्त्य देशांनी व संस्था-संघटनांनी सढळ मदत केली. बांगलादेशानेही ते कर्तव्य चोख बजावले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची शाबासकी मिळविली.

 बांगलादेशात बहुतांशी स्थिरता आलेली आहे, असे मानायला भरपूर जागा आहे. परंतु सेनादलांबद्दलची साशंकता आणि भययुक्त भावना अद्याप राजकीय नेतृत्वाच्या मनातून गेली नसल्याचे आढळून येते. बांगलादेशातील निवडणुकांच्या काळात तेथे भेट दिली असता शेख हसीना यांचे राजकीय सचिव एच.टी.इमाम तसेच काही मंत्री यांच्याबरोबर वार्तालाप करण्याची संधी मिळाली. अनेक वरिष्ठ पत्रकारांबरोबरही गप्पा मारण्याचा योग आला. या विविध वर्गातील मंडळींबरोबरच्या बोलण्यातून जाणवलेली बाब म्हणजे, या देशात आता मोठी जागरूकता आढळून येते. सोशल मीडियाचा प्रसारही येथे व्यापक आहे. त्यातून नवा आकांक्षावादी वर्ग निर्माण होताना आढळतो. शेख हसीना यांनी आर्थिक विकास व प्रगतीचा मुद्दा यशस्वीपणे मतदारांसमोर सादर करून निवडणुकीत सत्ता व यश संपादन केले आहे. परंतु यापुढील काळात त्यांना विकासाची प्रक्रिया व गती यामध्ये सातत्य राखण्याचे आव्हान आहे. शिक्षणसंस्थातून सुशिक्षित होऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना नोकऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शेख हसीना यांच्या सरकारपुढे नवनवे रोजगार निर्माण करण्याचे आव्हान आहे. म्हणजेच हा सुशिक्षित तरुणांचा वर्ग त्यामध्ये सामावून घेतला जाऊ शकतो. त्यासाठी परकी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर द्यावा लागेल. बांगलादेश अद्याप अनेक पातळ्यांवर मागासलेला आहे व विशेषतः पायाभूत सोयी-सुविधा यांच्या क्षेत्रात या देशात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध  होऊ शकतात. यामुळे तरुणांमधील असंतोष आटोक्‍यात राहू शकतो. 

बांगलादेशाचे इस्लामीकरण करणे, कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देणे यासाठीचे प्रयत्न सतत चालू आहेत. तेही एक मोठे व गंभीर आव्हान शेख हसीना यांच्यासमोर आहे. कट्टरपंथीय मंडळी हुशार आहेत. शेख हसीना या नको इतक्‍या भारत-धार्जिण्या आहेत आणि भारताच्या ओंजळीने त्या पाणी पितात असा प्रचार करून कट्टरपंथी मंडळी बांगलादेशी स्वाभिमान व अस्मितेचा मुद्दा व धार्मिकता व कट्टर इस्लामीकरण यांचे प्रभावी ‘कॉकटेल’ तयार करताना आढळतात. कधीकधी त्याला प्रतिसाद मिळताना आढळतो. परंतु बांगलादेशातील राज्यकर्त्यांसमोर येणाऱ्या अडचणीबाबत भारतीय नेतृत्वाने नेहमीच सकारात्मकता दाखविलेली आहे व ती अडचण समजावून घेण्याची वृत्तीही दाखविलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत किंवा शेख हसीना यांच्या राजवटीत फारसे पेचप्रसंग आलेले नाहीत. परंतु एका बाजूला आर्थिक सुधारणांची प्रक्रिया चालविणे व त्या माध्यमातून एका नव्या व आधुनिक बांगलादेशाची उभारणी करण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे कट्टरपंथी व पुराणमतवादी धार्मिक शक्तींच्या कारवाया, त्यांचे अडथळे व प्रसंगी घातपाती कारवाया यांचा मुकाबला करून या शक्तींना आटोक्‍यात ठेवणे, ही तारेवरची कसरत शेख हसीना यांना करावी लागत आहे. आतापर्यंत तरी त्या या कसोटीवर यशस्वीपणे उतरल्या आहेत. आता त्यांच्या या तिसऱ्या ‘इनिंग’मधील कामगिरीवर सर्वांचेच लक्ष राहील!
 

संबंधित बातम्या