लक्ष्य निश्‍चित करावे

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कव्हर स्टोरी
भारताने स्वतःच स्वतःच्या युद्धक्षमता वाढवल्या पाहिजेत. भारत हा जगातील बलाढ्य देश आहे. त्यामुळे अशा क्षमता वाढविताना कोणताही देश हस्तक्षेप करू शकणार नाही. दहशतवाद्यांना वाटले असेल, की अशा हल्ल्यातून आमची मानसिक दुर्बलता दिसेल, पण तसे होणार नाही. भारतीय लष्कर पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवेल, हे निश्‍चित. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारत देशाच्या वीरपुत्रांना संपूर्ण देश श्रद्धांजली वाहत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चे निघत आहेत. देशातील प्रत्येक शहराच्या, गावाच्या वेगवेगळ्या भागात ‘कॅंडल मार्च’ निघत आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची मोठी लाट निर्माण झाली आहे. कारण, गेल्या काही वर्षांमधील हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेनेच हा केला असून त्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. या घातपाती कारवाईमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याबाबत आपल्याला काहीही माहीत नाही, असे कितीही दाखवले तरीही पाकिस्तानचे लष्कर, तेथील ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) हे दहशतवाद्यांचा छुप्या युद्धासाठी फायदा घेत आहेत. 

जैशे महंमद संघटनेच्या अतिरेक्‍यांनी इंडियन एअरलाइन्सच्या ‘आयसी ८१४’ या विमानाचे काठमांडूवरून २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण केले. ते कंदाहार येथे - दहशतवाद्यांच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित ठिकाणी नेले व तत्कालीन भारत सरकारशी वाटाघाटी केल्या. त्या वाटाघाटीतून संघटनेने आपला म्होरक्‍या मसूद अजहर याची सुटका करून घेतली. या सर्वांमागे ‘आयएसआय’ असल्याचेही नंतर पुढे आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या घटनेकडे पाहण्याची गरज आहे. इतका मोठा हल्ला अनपेक्षितपणे, उत्स्फूर्तपणे निश्‍चित घडत नाही. त्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन केले जाते. देशातील फुटीरतावाद्यांच्या मदतीशिवाय हे नियोजन शक्‍य होत नाही. त्यामुळे यात निश्‍चित फुटीरतावाद्यांचा सहभाग आहे. देशाच्या बाहेरून येणाऱ्यांपेक्षाही देशातील काहीजण त्यांना अशा कटात मदत करतात, हाच सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो. आपणच आपल्या देशाचे, मातृभूमीचे शत्रू होतो. 

उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे तळ ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून उद्‌ध्वस्त केले. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. याची व्याप्ती बघून केंद्र सरकारने तीनही संरक्षण दलांना कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. तरीसुद्धा त्याच प्रकाराने ‘सर्जिकल स्ट्राईक’ कारवाया करणे शक्‍य नसते. कारण, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शत्रूही तयार असतो. सध्या संपूर्ण पाकिस्तान लष्कराला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या वेळी आपल्या देशावर हल्ला होतो, तेव्हा त्याचे उत्तर देणे हे नैसर्गिक आहे. हे तत्त्व जगमान्य आहे. त्यामुळे योग्य वेळी भारतीय लष्कर या हल्ल्याचे अचूक उत्तर देईल, अशी खात्री आपल्या सर्वांना आहे. 

दहशतवाद्यांच्या अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लक्ष्य निश्‍चित असले पाहिजे. उरी हल्ल्यानंतर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये ही लक्ष्यं नेमकेपणाने ठरविण्यात आली होती. त्याची खात्री करण्यात आली होती. त्यामुळे त्याला मोठे यश मिळाले. संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन पराक्रम’ सुरू करण्यात आले होते. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘ब्रिफिंग’ करताना हल्ल्याचे नेमके लक्ष्य निश्‍चित करणे आवश्‍यक असल्याचे मी सांगितले होते. कारण, तसे न केल्यास जगाची सहानुभूती मिळविण्यासाठी पाकिस्तान काहीही करू शकते. त्यात स्वतःच्या देशातील महिलांवर हल्ला करून किंवा त्यांच्याच देशातील शाळकरी मुलांना ठार मारून, ही कारवाई शत्रूराष्ट्राने केली आहे, असे दाखविण्याइतपत खालची पातळी पाकिस्तान गाठू शकते. कारण, अशा घटनांमधून जगाची सहानुभूती आपल्याला मिळेल, अशी त्यांनी योजना असते. 

बऱ्याचवेळी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे ही अशाच ठिकाणी असतात, जिथे शत्रूला सहजासहजी हल्ला करता येणार नाही. हल्ला केलाच, तर जगाची सहज सहानुभूती आपल्याला मिळेल, अशी त्यांची योजना असते. या प्रशिक्षणासाठी खूप काही पायाभूत सुविधा लागत नाही. कोणत्याही एका छोट्या घरात हे प्रशिक्षण देता येते. अशा मोक्‍याच्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी मानवी हेरगिरी (ह्यूमन इंटेलिजन्स) सगळ्यात प्रभावी असते. त्यामुळे पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्याचे नियोजन करताना देशातील हेरखात्याकडून आलेल्या माहितीची मदत घेतली पाहिजे. 

उरीमध्येही एक बटालियन ते तळ सोडून जात असताना हल्ला झाला होता, तसाच हा हल्लादेखील ‘सीआरपीएफ’चे जवान सुटीवरून तळावर जात असतानाच झाला. त्यावरून असे दिसते, की ‘पोस्ट’ सोडताना किंवा तिची जबाबदारी स्वीकारताना हल्ले होत आहेत. ही वेळ ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहे. बसमध्ये जाणाऱ्या जवानांना मारण्यात कोणताच पुरुषार्थ नाही. 

पाकिस्तानविरुद्ध काय करता येईल? 
या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. लष्करी कारवाई हादेखील त्यातील एक भाग आहे. व्यूहरचनात्मक, राजनैतिक, आर्थिक, व्यापार, दळणवळण अशा वेगवेगळ्या मार्गांचा यासाठी वापर करणे ही काळाची गरज आहे. पाकिस्तानला आपण १९९६ मध्ये दिलेला ‘विशेष राष्ट्र दर्जा’ (मोस्ट फेवर्ड नेशन) काढून घेतला, हे हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून उचललेले सर्वांत पहिले पाऊल आहे. अर्थात, पाकिस्तानने आपल्याला हा दर्जा कधीच दिला नव्हता. त्यातून पाकिस्तानला भारतात व्यापार करण्यासाठी यातून मोठ्या प्रमाणात सवलत मिळत होती. ती तातडीने बंद करण्यात आली आहे. त्याने लगेच खूप मोठा परिणाम होणार नसला, तरीही थोडा-फार परिणाम निश्‍चित होईल. कारण, भारताच्या अनेक वस्तू दुबईतून पाकिस्तानमध्ये आणल्या जातात. अशी पर्यायी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. पण, भारताने हा हल्ला किती गांभीर्याने घेतला आहे, याचा स्पष्ट संदेश देण्यासाठी हा योग्य मार्ग केंद्राने स्वीकारला आहे. 

‘इंडस वॉटर ट्रीटी’चे आपण आपल्या वाट्याचेही पाणी पाकिस्तानमध्ये सोडत आहोत. अधिकृतपणे जेवढे पाणी आपण घेऊ शकतो, तेही आपण पाकिस्तानला देतो. ते पाणी पूर्ण क्षमतेने आपण वापरले पाहिजे. त्याचे कारणही असे आहे, की पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत आहे. 

पाकिस्तानचे उत्पादन जगातील ज्या-ज्या देशात जाते, तेथे त्या मालाची भारताने निर्यात करावी. तो माल पाकिस्तानपेक्षा स्वस्तात विक्री करावा. त्यातून त्यांची व्यापारात कोंडी करता येईल. त्यात अर्थशास्त्रीय युद्धपद्धतीचा वापर करता येईल. त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नसले तरीही भविष्यात त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानवर होतील. तेथील नागरिकांवर होतील. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे, हे सुरुवातीला भारताने घोषित केले पाहिजे. हा देश दहशतवादी आहे, असे आपण जाहीर न करता दुसऱ्या देशांना आपण सांगत आहोत, की तुम्ही पाकिस्तानला दहशतवादी घोषित करा. तर, हा मार्ग सोडून आपण स्वतः पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करायला हवे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी व्यूहात्मक हालचाली केल्या पाहिजेत. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासूनच अमेरिकेची कृपादृष्टी या राष्ट्रावर राहिली आहे. पाकिस्तान म्हणजे जगातील दहशतवाद्यांचे केंद्र आहे, असे भारताने वारंवार सांगूनही त्यावर अमेरिका विश्‍वास ठेवत नव्हती. अखेर, अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्रावर (डब्ल्यूटीसी) हल्ला झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडले. त्यानंतर अमेरिकेची पाकिस्तानबद्दलची भूमिका बदलत गेली. 
पाकिस्तानला जागतिक बॅंकेने मदत थांबवली तरीही चीन आणि अरब देशांकडून त्याला सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या अशा कारवायांचा थेट फटका पाकिस्तानला बसत नाही. ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे चीन सध्या पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करत आहे. पण, चीनलाही हा मित्र घातक ठरेल, तेव्हा चीनचेही डोळे खाडकन उघडतील. 

का होतात असे हल्ले? 
देशाची सामरिक शक्ती सातत्याने वाढली पाहिजे. पण, हे चित्र सध्या आपल्याकडे दिसत नाही. देशाच्या हवाई दलाच्या ताफ्यात १९७१ मध्ये ४४ स्वाड्रन होती. पण, त्यानंतर त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तीनही दलांमधील देशाची सामरिक शक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. यातून पाकिस्तानसारखा देश विचार करतो, की अशा हल्ल्यानंतर भारताने त्यांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला तरीही ते काय करू शकतात? कारण, आपल्या मर्यादा त्यांना माहीत असतात. 
भारतात स्थिर सरकार आहे. भारत आर्थिकदृष्ट्या सबळ होत आहे. अशावेळी भारतीय समाज जाणीवपूर्वक दुबळा केला जातो. त्यासाठी जात, धर्म, पंथ अशी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने परकीय शक्ती करतात. देशात आपापसांत भांडणे लावायची आणि त्याचा फायदा घेण्याची खेळी खेळली जाते. पण, या हल्ल्यानंतरची एक सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, विरोधकदेखील पंतप्रधानांच्यामागे ठामपणे उभे राहिले आहेत. 
राष्ट्रीय सुरक्षितता ही आधुनिक काळात फक्त लष्करापुरती मर्यादित राहिलेली नाही. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी सामाजिक ऐक्‍य हादेखील महत्त्वाचा घटक म्हणून पुढे येत आहे. समाजातील कच्चे दुवे शोधून त्यांच्या माध्यमातून देश अशांत ठेवण्याचा प्रयत्न या शक्ती करत असतात. या सर्वांतून देशाची एकसंध शक्ती विखुरली जाते. दंगलींमधून आपलेच लोक आपल्याच लोकांना मारत असल्याने त्याचा निश्‍चित फायदा पाकिस्तानसारखे शत्रू राष्ट्र घेते. मुंबईतील साखळी बाँबस्फोट असो, की मुंबईवरचा २६/११चा हल्ला असो, की देशाची सार्वभौम शक्ती असलेल्या संसदेवरचा हल्ला, की पठाणकोट हवाई दलावरचा हल्ला.. या प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत केलेली दिसते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याची शक्ती सामाजिक ऐक्‍यात असते. त्यामुळे ते वाढले पाहिजे. 

भविष्यात याला प्राधान्य हवे 
हेरगिरी यंत्रणा सक्षम करणे ः भविष्यात हेरगिरीचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार करावा लागणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आता त्यात अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेंसर्स, उपग्रह यातून अचूक माहिती संकलन करता येते. त्याचे विश्‍लेषण करून शत्रूच्या गोटातील अनेक गुप्तवार्ता मिळविता येतात. 

सैन्याचे मनोबल वाढविणे ः सैन्याचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी नीट विचार करून लष्कराबद्दल बोलले पाहिजे. हे सामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांसाठी लागू आहे. लष्करातील जवान दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये असताना त्यांच्या विरोधात बोलणे योग्य नाही. कारण, पुलवामामध्ये हल्ला झाला त्याच दिवशी सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने वैद्यकीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. आपण कोणत्याच राज्यातील कोणत्याच समाजाच्या विरोधात नाही, असा संदेश यातून मिळतो. भारतीय लष्कर कोणत्याच दृष्टीने मानवी हक्कांची पायमल्ली करत नाही. 

स्थानिक नागरिकांची मदत घेणेः संपूर्ण काश्‍मीर अशांत असल्याचे चित्र भारतीयांपुढे किंबहुना जागतिक समुदायापुढे उभे केले जाते. पण, प्रत्यक्षात काश्‍मीरमधील पाच जिल्हे वगळता संपूर्ण खोऱ्यात शांतता आहे. त्या इतर जिल्ह्यांमधील स्थानिक नागरिकांची मदत आपल्याला घेतली पाहिजे. पाकिस्तानने १९६५ मध्ये भारतावर आक्रमण केले होते, तेव्हा काश्‍मीरमधील देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून भारतीय लष्कराला मदत केली होती. त्यामुळे काश्‍मीरमधील लोकांमध्ये देशभक्ती आहे. त्यांना भारतातच राहायचे आहे. त्यांची मुले देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकत असतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्यातील भारतप्रेम सहज कळते. फक्त त्यातील जे लोक फुटीरवादी आहे, जे देशविरोधी काम करतात, त्यांना पकडण्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य मिळवलेच पाहिजे. 
युद्ध क्षमता वाढविणे ः लष्कर, नौदल आणि हवाई दलाची युद्धक्षमता वाढविली पाहिजे. त्यात हवाई दलाचे स्वाड्रन असतील, नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौका असतील, किंवा लष्कराच्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र अशी भेदक क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पावले टाकणे आवश्‍यक आहे. 

व्यूहरचनात्मक डावपेच ः देशाने व्यूहरचनात्मक डावपेच वाढविण्याची गरज आहे. पाकिस्तान हीच दहशतवादाची जन्मभूमी आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. तेथून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करत आहेत. चीन पाकिस्तानला आत्ता मदत करत असला तरीही चीन हा त्यांच्या देशातील मुस्लिमांना सध्या प्रचंड त्रास देत आहे. त्याबाबत कोणतेही मुस्लीम राष्ट्र अवाक्षरही बोलू शकत नाही. त्याचे कारण चीनची प्रचंड शक्ती हे आहे. पण, अमेरिकेला जसे ‘९/११’च्या हल्ल्यानंतर कळाले, तसेच चीन पोसत असलेला पाकिस्तान त्याच्यावरच हल्ला करेल, त्या वेळी अमेरिकेप्रमाणे चीनलाही भारत पूर्वीपासून म्हणत होता ते किती बरोबर आहे, याची जाणीव होईल. तसेच, पाकिस्तानबरोबर ‘सायबर वॉर’ हा देखील एक पर्याय आहे. त्याचाही वापर भारताने केला पाहिजे. 
 चीनचा अनधिकृत व्यापार बंद करावा ः चीनमधून सहजपणे स्वस्तातील माल भारतात येतो. आपणही तो खरेदी करतो. पण, त्याचे पैसे चीनला मिळतात आणि चीन हाच पैसा पुढे भारताच्या विरोधी कारवायांसाठी पाकिस्तानला देते. हे समीकरण डोक्‍यात ठेवून भारतीयांनी चीनचा अनधिकृत व्यवहार बंद पाहिजे. चीनला संपूर्ण जगाच्या बाजारपेठांमधून विरोध आहे. त्यामुळे चीनी मालासाठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चीनचा अनधिकृत व्यापार बंद करून त्यांची काही प्रमाणात कोंडी करणे आवश्‍यक आहे. 

मानसिकता बदलण्याची गरज ः भारतात आपण संरक्षक दल म्हणतो. त्यातून आपली मानसिकता ही कायम ‘डिफेन्सिव्ह’ असते. ही मानसिकता बदलण्यासाठी ‘संरक्षक दल’ असे न म्हणता ‘सशस्त्र सेना दल’ असे म्हणणे आवश्‍यक आहे. त्यातून आपली मानसिकता बदलते. संरक्षक दल म्हटले की आपण कायम बचावात्मक पवित्र्याचा विचार करतो. सशस्त्र दल म्हटले, की आपली बघण्याची दृष्टी बदलते. 

माध्यमांमधूनही मर्यादित चर्चा व्हावीः राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांवर माध्यमांमधून सध्या चर्चा होतात. त्यातील दिल्या जाणाऱ्या माहितीचा - विशेषतः तज्ज्ञांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीचा शत्रूराष्ट्र कसा उपयोग करेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे माध्यमांनी आणि त्यात बोलणाऱ्यांनी स्वतःवर लक्ष्मण रेषा घालून घेतली पाहिजे. त्यातून सैन्याचे मनोबल कसे वाढेल, याकडे चर्चेचा सूर असणे अपेक्षित आहे. अशा काळात संपूर्ण राष्ट्र सैन्यदलांच्या मागे भक्कमपणे उभे हा देखील एक चांगला संदेश असणे जरुरी आहे. अशा तऱ्हेने ऐक्‍य आणि देशप्रेम जर वृद्धिंगत केले तर मरण पावलेल्या सुपुत्रांना ती श्रद्धांजली होईल.  

(शब्दांकन ः योगीराज प्रभुणे) 
 

संबंधित बातम्या