शुक्रतारा निखळला

अतुल दाते, श्रीधर फडके
शुक्रवार, 11 मे 2018

स्मरण

पूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान असल्यापासून मी बाबांचे स्वर ऐकत आलो आहे. साधारणतः मी ७,८ वर्षांचा असल्यापासून मला अंदाज येऊ लागला, की माझे बाबा फार मोठे आसामी आहेत. ते खूप मोठे गायक आहेत. त्यांचा हात धरून मी जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला जायचो, तेव्हा रसिकांच्या टाळ्यांचा तो आवाज माझ्या कानांतून अजूनही जात नाही. बाबांच्या सगळ्याच गाण्यांना वन्स मोअर मिळत असे. त्यांच्या सुरेल स्वरांमध्ये श्रोते तुडुंब चिंब होत. बाबांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांचे गारुड काय असते याचा अनुभव मी अनेक वर्षे घेतला आहे. पुढे त्यांच्या संगीतातील प्रभावामुळे मलाही गाणे शिकावे असे तीव्रतेने वाटू लागले आणि मी गाणं शिकायचा प्रयत्न केला. मी गाणं शिकायला लागलो तेव्हा आरंभीच विचार केला, की माझा आवाज, त्याचा पोत श्रोत्यांना आवडेल असा आहे का? का मी केवळ वारसा म्हणून संगीत शिकणार आणि गाणार? माझ्यात जर श्रोत्यांना बांधून ठेवण्याची कला नसेल तर माझे गाणे व्यर्थ आहे! मी वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत गाणं शिकण्याचा प्रयत्न केला. स्वतःला आजमावून पाहिले आणि आत्मपरीक्षण केले तेव्हा मला जाणवले. माझ्या वडिलांची गाण्यातील शिखरावरची उंची मला गाठता येणार नाही हे माझ्या ध्यानात आले. बाबा, गाताना आपला आत्मा शब्दांमध्ये ओतत..  ’भातुकलीच्या खेळामधली’ गाण्यात रसिकांच्या काळजाला हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात होते!

’हे सामर्थ्य, ही कला माझ्यात नाही हे जाणून मी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला. त्यामागे एक असाही विचार होता, की माझी आणि त्यांची तुलना होताना माझं डावं गाणं, त्यांचं नाव, त्यांची प्रतिमा त्यामुळे खराब होईल! माझ्या निर्णयामुळे बाबा व्यथित झाले, ‘‘अतुल, तू रियाझ कर, रियाझाने आवाज खूप सुटतो, तुला खूप चांगलं गाता येईल ’’ असं ते सांगत असत. 

पण अरुण दातेंचा मुलगा खूप वाईट गातो. वडिलांच्या आवाजाची त्याला सर नाही , असं त्यांच्या कानांवर पडू नये असं मला सातत्याने वाटत असे. बाबांचे नाव कायम अबाधित राहावे म्हणून मी कधीही गायलो नाही. अपेक्षाभंगाचंही दुःख असतं ना! गाण्यापेक्षा मी बाबांचे गाण्याचे कार्यक्रम आयोजित करू लागलो. 

एखादं गाणं गाताना ते एका व्यक्तीसमोर किंवा अनेकांसमोर गाताना त्यातील गुणवत्ता कायम असावी, असं आजोबांनी बाबांना शिकवून ठेवलं होतं. गाण्यातील गंमत कधीच जाता कामा नये असं त्यांना प्रकर्षाने वाटे. बाबा, त्यांच्या तालमीदेखील कठोरपणे, न कंटाळता करत. तालमीमध्येसुद्धा त्यांचा दर्जा कधीच निकृष्ट नसे.. ५० ते ६० हजार श्रोत्यांच्या मैफिलीत बाबा जितक्‍या ताकदीने गात तितकीच त्यांची किमया लहान मैफिलीत देखील असे. ५०,६० वर्षे एखादा गायक किमान ५,६ पिढ्यांना ज्ञात आहे, लोकप्रिय आहे. ते ही भावगीतं गाऊन असे उदाहरण विरळ. गजानन वाटवे, सुधीर फडके, अरुण दाते या गायकांनी आपलं भावजीवन समृद्ध करून ठेवलं आहे. बाबांची गाण्याची परंपरा त्यांचा शिष्य मंदार आपटे पुढे नेतो आहे. मंदार आपटेसह ’नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आम्ही २० वर्षे सतत प्रयोग करतो आहे. बाबांनी किमान २७०० कार्यक्रम केले, पण या कार्यक्रमांसाठी त्यांनी ३ हजारपेक्षा अधिक तालमी केल्या. रसिकांना कार्यक्रमाचा निखळ आनंद मिळावा यासाठी ते खूप मेहनत घेत. गंमत म्हणजे बिर्ला टेक्‍स्टाईलमध्ये बाबा व्हाइस प्रेसिडेंट पदावर होते. तिथेही सर्वोच्च पदावर काम करतांना त्यांनी आपल्या नोकरीचा आब राखला आणि अतिशय मनमिळाऊ म्हणून लौकिक मिळवला.  

आजोबा, बाबा इंदूरचे स्थायिक होते, होळकर महाराजांच्या दरबारात होणाऱ्या संगीत मैफली ऐकून आजोबांचे संगीताचे कान अतिशय परिपक्व झाले होते. पु.ल. देशपांडे यांनी आजोबांना ‘रसिकाग्रहणी’ ही पदवी दिली होती. आपल्या आईच्या पोटात असताना त्यांनी कुमार गंधर्व यांची अनेक गाणी ऐकली होती. कदाचित संगीताचे हे गहिरे सखोल ज्ञान बाबांकडे आले असेल.

बाबा गेले तेव्हा आम्हाला भेटण्यासाठी आलेले विनोद तावडे म्हणाले, ‘‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी देणगी मिळावी म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही अरुण दातेंकडे आलो तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी आम्हाला भरपूर देणगी दिली. ते फार मोठ्या मनाचे होते असा मनाची श्रीमंती असलेला गायक आता कुठे पुन्हा भेटायचा?’’  

बाबांनी अनेक कार्यक्रम ’चॅरिटी’साठी केले, पण त्याविषयी चर्चा केली नाही. अनेक गरजूंसाठी कार्यक्रम केले, स्वतः एक रुपयाही मानधन घेतले नाही, फक्त माझ्या वादकांना त्यांची बिदागी द्या असं ते म्हणत. बाबांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण केली. अनेकांना नोकऱ्या लावून दिल्या. होतकरू हुशार विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसायानिमित्य अमेरिकेत पाठवण्याची सोय केली. बाबांचे दातृत्व तसे कधीही प्रकाशात आले नाही, तसे ते उजेडात येऊ नये म्हणून त्यांनी दक्षता घेतली होती. मुद्दामहून वेळप्रसंगी चांगलं वागणाऱ्या व्यक्ती समाजात असतात. पण बाबा मुळातच मृदू, दयाळू आणि माणूस म्हणून थोर होते. माणसातलं देवत्व जपणाऱ्या बाबांनी देवाकडे मात्र पाठ फिरवली होती ! हो, ते देव मानत नसत. त्यांनी देवळात कार्यक्रम केलेत, पण देवळात जाऊनही देवांचं दर्शन घेतलं नाही. माझ्यात जे चांगले गुण आहेत ते माझ्या आई-वडिलांमुळे, गुरूंमुळे मला लाभले. माझ्यातल्या अवगुणांना मी स्वतः जबाबदार आहे! 

बाबा गेले! आणि मी वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक यांना मुकलो... 

ही पोकळी, त्यांचे अस्तित्व कधीही न भरून येणारे आहे... 

खरंच बाबा शुक्रतारा होते!

शाबासकीचा हात विसरणार नाही
श्रीधर फडके
अरुणदाते म्हणजे भावगीत विश्वातील एक अढळ स्थान! ध्रुव तारा जणू! भावगीत आणि अरुण दाते हे समीकरण कधीही वेगळे होऊ शकणार नाही. अरुण दाते मला खूप ज्येष्ठ होते. अगदी गुरुस्थानी होते. त्यांचं पहिला गाणं ’शुक्रतारा , मंद वारा ’ हे मी प्रथम ऐकलं तेव्हा मी शाळेत होतो. बहुधा, ’आपली आवड’ या रेडिओवरच्या कार्यक्रमात मी हे गीत ऐकलं. बाबूजी (गायक-संगीतकार सुधीर फडके) माझ्याच घरात, माझ्या वडिलांचे गाणं माझ्या कानांवर लहानपणापासून पडत असल्याने स्वरांमधील गोडवा काय असतो हा अनुभव होताच. पण बाबुजींनंतर अरुण दाते यांचे स्वर जसजसे कानांवर पडू लागले, तसा गाण्यातला गोडवा काय असतो हे मला कळू लागलं! 
अरुण दाते यांचे स्वर-सूर गझल पद्धतीतील गीतांसाठी अत्युत्तम होता. तरल, ह्रदयाला भिडणारे त्यांचे स्वर आणि एक से एक त्यांनी गायलेली भावगीतं प्रत्येक पिढीतील श्रोत्यांच्या हृदयात अलवार झिरपत गेली. अवीट गोडीची गाणी आणि मनापासून, समरसून गाणारा हा दर्दी कलावंत हे एक भन्नाट मिश्रण होतं. ‘या जन्मावर’, ‘स्वरगंगेच्या...’, ‘भातुकलीच्या’ अशी असंख्य गीतं आज सगळ्या पिढीसाठी अमूल्य ठेवा आहेत. अरुण दातेंनी फार मोठा काळ नाही, कालखंड गाजवला! त्यांच्या आवाजाला वयाचे बंधन नव्हतं. लहान-थोर सगळ्यांच्या गळ्यातील ते ताईत बनले.
गायक म्हणून त्यांची थोरवी मी काय सांगणार? अरुण दाते ज्यांना ठाऊक नाहीत असा मराठी माणूस नाही ! पण माणूस म्हणून त्यांची माणुसकी तितकीच मोठी होती. साधारण २,३ वर्षांपूर्वी मुंबईत वाशीला कार्यक्रम होता. मी माझी आणि बाबूंजींची गाणी गाणार होतो. अरुण दाते विंगेत उभे होते. त्यांना मी पाहताच मी वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी मला इतकी छान शाबासकी आणि भरभरून आशीर्वाद दिले, की मी त्या क्षणी खूप भारावून गेलो होतो! एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताने दुसऱ्या कलावंताला दिलेली ती मनःपूर्वक दाद होती. त्यांनी माझ्या पाठीवर ठेवलेला तो प्रेमाचा हात, शाबासकीचा हात मी विसरू नाही शकणार!

(दोन्ही लेखांचे शब्दांकन पूजा सामंत यांनी केले आहे)

फोटो फीचर

संबंधित बातम्या