ई-कचऱ्यातून ऑलिंपिकची पदके

इरावती बारसोडे 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

विशेष
 

आगामी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक खेळ जपानमधील टोकियो येथे जुलै २०२० मध्ये होणार आहेत. खेळाच्या दृष्टीने २०२० चे ऑलिंपिक दिमाखदार असेलच, पण पर्यावरण शाश्‍वततेच्या दृष्टीनेही ते कायम लक्षात राहील. ‘बी बेटर, टुगेदर - फॉर प्लॅनेट ॲण्ड द पीपल’ ही यंदाच्या खेळाची शाश्‍वत संकल्पना! 

ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक खेळांमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्यांच्या गळ्यात पडणाऱ्या पदकांचे यावेळी एक वेगळे वैशिष्ट्य असेल. ते म्हणजे, दोन्ही खेळांमधील विजेत्यांना देण्यात येणारी सर्व सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पूर्णतः इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याचा पुनर्वापर करून तयार करण्यात येणार आहेत. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुनर्वापरातून पदके तयार करण्यात येत आहेत. याआधी २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्येही असा प्रयत्न झाला होता. मात्र, रौप्य आणि कांस्य पदकांपैकी फक्त ३० टक्के पदके ई-कचऱ्याच्या पुनर्वापरातून तयार झाली होती. ‘टोकियो ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक नियोजन समिती’ने हा विक्रम मोडण्याचा निर्धार केला आहे. 

नियोजन समितीने २०१७ मध्येच याची तयारी सुरू केली होती. समितीने पदकांसाठी नवीन धातू विकत घेण्यापेक्षा ई-उपकरणांचा पुनर्वापर करण्याचे ठरवले. यामुळे खर्चही कमी झाला आणि कचऱ्याच्या पुनर्वापराचा प्रसारही झाला. एप्रिल २०१७ मध्ये ‘ओल्ड मेटल्स, न्यू मेडल्स’ अर्थात ‘जुने धातू, नवी पदके’ या योजनेची सुरुवात झाली. पदकांसाठी लागणारे सोने, चांदी आणि कांस्य धातू वापरलेले, टाकून देण्याच्या लायकीचे झालेले स्मार्ट फोन्स, लॅपटॉप्स, टॅबलेट्‌स, डिजिटल कॅमेरे यांसारख्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरांमधून काढण्यात येत आहेत. ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक या दोन्ही खेळांतील विजेत्यांसाठी सोने, चांदी आणि कांस्य धातूंची मिळून साधारण ५ हजार पदके तयार करण्यात येणार आहेत. सर्व पदकांसाठी एकूण ३०.३ किलो सोने, ४,१०० किलो चांदी आणि २,७०० किलो कांस्य धातू लागणार आहे. त्यातील बहुतांश धातू आता गोळा झाले आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पासून वापरलेली ई-उपकरणे घेण्याचे थांबवण्यात येणार असल्याचे नियोजन समितीने जाहीर केले आहे. कांस्य धातू जून २०१८ मध्येच १०० टक्के गोळा झाला होता. तर, सोने ऑक्‍टोबर अखेरपर्यंत ९० टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजेच २८.४ किलो आणि चांदी ८५ टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजे ३,५०० किलो जमा झाली होती.  ई-उपकरणांचा आवश्‍यक तेवढा संग्रह झाला, की त्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. त्यानंतर त्यांचे भाग सुटे करण्यात येतील. कंत्राटदारांकडून धातू वितळवून आल्यानंतर तिन्ही धातूंची पदके तयार केली जातील. यंदाच्या पदकांचे डिझाईन या वर्षभरात प्रसिद्ध केले जाणार आहे. 

ही योजना सर्वसमावेशक आहे, कारण यामध्ये सरकारी यंत्रणांबरोबरच जपानी नागरिकांचाही खूप मोठा सहभाग होता. नियोजन समितीने नागरिकांना त्यांना नको असलेली ई-उपकरणे दान करण्याचे आवाहन केले होते. योजना सुरू झाल्यापासूनच संपूर्ण जपानमधून वापरलेले स्मार्ट फोन्स, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे या व यांसारख्या इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा खच येऊन पडू लागला. याशिवाय जपानमधील उद्योग आणि व्यवसायांकडूनही ई-उपकरणे गोळा करण्यात आली आहेत. नोव्हेंबर २०१८ पर्यंत ४७,४८८ टन वापरलेली ई-उपकरणे गोळा करण्यात आली. जपानमधील साधारण २४०० एनटीटी डोकोमो दुकानांमध्ये सुमारे ५० लाख (५ मिलियन) वापरलेले फोन लोकांनी आणून दिले. काही कंपन्यांनीही वापरलेले फोन दिले आहेत. उदा. जपान पोस्ट कंपनी लिमिटेडने कंपनीने सुमारे ३० हजार वापरलेले फोन या उपक्रमासाठी दान केले आहेत. उपक्रम सुरू झाला तेव्हा जपानमधील ६२४ स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये सहभागी होत्या. आता जवळपास ९० टक्के म्हणजेच १,५९४ स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आहे. नियोजन समिती ई-कचऱ्याच्या पुनर्वापरातून पदके तयार करून थांबलेली नाही. याशिवाय, शून्य कार्बन ध्येय गाठण्याच्या उद्देशाने यंदाच्या ऑलिंपिकमध्ये विजेसाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यात येणार आहे. पर्यावरणावर ताण येऊ नये म्हणून खेळांसाठी नवीन इमारती न उभारता यापूर्वी टोकियोमध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळांच्या इमारतींचाच वापरण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. अपारंपरिक स्रोतांचा प्रसार व्हावा यासाठी, खेळाडूंना राहण्यासाठी लाकडापासून बनवलेली निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर वापरलेल्या पाण्याचा आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टरेशन सिस्टिम बसवण्यात आली आहे. खेळांच्या कालावधीमध्ये तयार होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ६५ टक्के कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. थोडक्‍यात काय, तर टोकियो २०२० ऑलिंपिक खेळांच्या माध्यमातून जपान शाश्‍वततेकडे सकारात्मक वाटचाल करत आहे आणि तीही एकट्याने नाही, तर संपूर्ण जगाच्या सहभागाने!   

संबंधित बातम्या