जॉर्ज फर्नांडिस नावाचा झपाटा 

अनंत बागाईतकर 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

स्मरण
 

जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असतानाचा हा प्रसंग आहे. ‘सकाळ’च्या कोल्हापूर वर्धापनदिनानिमित्त पुरवणीसाठी मुलाखत घ्यायची होती. मुलाखतीची वेळ रात्री नऊची असली तरी ती प्रत्यक्ष सुरू होण्यास दहा वाजले होते. मुलाखत, त्यानंतर अवांतर गप्पा होता होता बारा-साडेबारा कधी वाजून गेले ते कळले नाही. निघण्याची वेळ झाली. जाताजाता जॉर्जनी म्हणाले, ‘(आणखी) बसलो असतो पण सकाळी साडेचार वाजता निघायचे आहे.’ ‘कुठे?’ म्हणून विचारल्यावर उत्तर आले ‘सियाचिन.’ हा माणूस झोपतो कधी? आणि खरोखरच झोपतो तरी का, असा प्रश्‍न मनात आल्याखेरीज राहिला नाही. 

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्त्वात आक्रमकता, साहस व दुर्दम्य असा आशावाद आणि सकारात्मकता पूर्णत्वाने भरलेली होती. त्यांच्या सक्रियतेच्या अखेरच्या क्षणापर्यंत हे त्यांचे पैलू कायम राहिले होते. संकटसमयी स्वतःला झोकून देण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि ते करताना त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नव्हते. 

फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात कामगार चळवळीपासून झाली. यातूनच त्यांचा संसदीय राजकारणात आणि संसदेत प्रवेश झाला. संसदेच्या माध्यमातूनच ते केंद्रीय पातळीवर मंत्री झाले आणि एक कार्यक्षम व सक्षम मंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. त्यांचे सार्वजनिक जीवन या तीन प्रमुख टप्प्यात विभागलेले होते. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली होती. सतत नावीन्याचा ध्यास त्यांना असे आणि एखाद्या विषयाने त्यांना झपाटल्यानंतर तो पूर्णत्वाला नेल्यानंतरच ते स्वस्थ बसत असत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोकण रेल्वे हे त्याचे जितेजागते उदाहरण आहे. आज देशभरात ‘मेट्रो मॅन’ म्हणून ज्या श्रीधरन यांची वाहवा केली जाते त्यांची कोकण रेल्वेसाठी निवड करणारे फर्नांडिस होते. विश्‍वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी फर्नांडिस यांना रेल्वे खात्याची जबाबदारी दिली होती. खरे तर फर्नांडिस यांच्या ज्येष्ठतेला ते खाते किती योग्य होते याबाबत त्या वेळी चर्चाही झाली होती आणि खुद्द फर्नांडिस हेही त्याबाबत समाधानी नव्हते. तरीही त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि कोकण रेल्वेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावून आपली छाप त्या खात्यावर उमटवली. फर्नांडिस यांनी रेल्वेमंत्री झाल्यानंतर केलेल्या वार्तालापांमध्ये ते कोकण रेल्वेनिर्मितीला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केलेलेच होते. त्यामुळे इतकी वर्षे रेंगाळलेला प्रकल्प ते कसा मार्गी लावणार याबाबत उत्सुकता होती. रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सभागृहाकडे जाताना ते भेटले असता त्यांनी रेल्वे अर्थसंकल्पानंतर भेटू तेव्हा सविस्तर तपशील देतो असे सांगितले आणि ते आश्‍वासन पाळले. कोकण रेल्वे प्रकल्प कालबद्ध म्हणजेच विशिष्ट व ठरविलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही व्यावहारिक मार्गांचा अवलंब केला. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयापेक्षा स्वतंत्र असे कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले. त्याचे प्रमुख कुणाला करायचे याचा प्रश्‍न निर्माण झाल्यावर स्वतः फर्नांडिस यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कोकण रेल्वेचे कामकाज वेळेत पूर्ण कसे करायचे या प्रश्‍नावर श्रीधरन यांनी या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंकडून कामाला सुरुवात करण्याची कल्पना मांडली आणि फर्नांडिस यांनी तत्काळ ती उचलून धरली. त्यांनी श्रीधरन यांना त्या महामंडळाची जबाबदारी दिली. बघता बघता कोकण रेल्वे प्रकल्पाने गती घेतली आणि तो वेळेत पूर्ण झाला. कोकण रेल्वेबाबत बोलताना त्यांनी पत्रकारांना सांगितले होते, की ते रेल्वेमंत्रीपद राहील किंवा न राहील; परंतु हा प्रकल्प चालू राहिला पाहिजे आणि त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. यासाठी त्याचे महामंडळात रूपांतर करण्याची योजना त्यांनी तयार करून पूर्णत्वाला नेली. 

संरक्षणमंत्रिपद मिळाल्यानंतर फर्नांडिस यांनी पुन्हा त्यांच्या धडाडीचा परिचय दिला. ‘जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी’ म्हणून ज्याचे वर्णन केले जाते त्या सियाचिन भागाला भेट देण्याचा त्यांनी जणू विक्रमच नोंदविला. १७ ते १८ वेळा त्यांनी या युद्धभूमीला भेट दिली व तेथील समस्या समजावून घेतल्या. तेथील जवानांच्या अडचणी समजावून घेतल्या, नुसत्या ऐकून घेतल्या नाहीत तर त्यावर तत्काळ उपाययोजनाही केल्या. अत्यंत प्रतिकूल अशा हवामानात देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे मोल लावणाऱ्या या जवानांचे या तळावरील जीवनमान जास्तीतजास्त सुसह्य करण्यासाठी फर्नांडिस यांनी सतत प्रयत्न केले. सियाचिनमधील जवानांसाठी विशेष भत्त्यांची तरतूद करून त्यांना आर्थिक आधार मिळवून दिला. अति-उंच व विरळ हवामानात राहताना जवानांना विशिष्ट प्रकारचे पोशाख परिधान करणे अपरिहार्य असते. प्रथम ते पोशाख आयात केले जात, पण फर्नांडिस यांनी हळूहळू आयातीबरोबरच तसे पोशाख भारतातच तयार करून परकी चलन वाचविण्याबरोबरच त्याच्या किमतीही परवडण्याच्या पातळीवर आणल्या. फर्नांडिस यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या कारकिर्दीतच मिग-२१ विमानांच्या अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली होती. हे प्रकार इतके टोकाला गेले, की या विमानांची ‘फ्लाइंग कॉफिन्स’ किंवा ‘उडत्या शवपेट्या’ अशी नावे ठेवून संभावना होऊ लागली. फर्नांडिस यांना असली संकटे किंवा आव्हाने म्हटल्यावर दुप्पट उत्साह संचारत असे. त्यांनी स्वतःच या विमानातून उड्डाण करून हे विमान सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. ही विमाने त्याकाळी प्रशिक्षणासाठी वापरली जात कारण भारताकडे प्रशिक्षणार्थी जेट विमानेच नव्हती. मिग-२१ विमाने ही काही प्रशिक्षणार्थी विमाने नव्हती, तर चक्क लढाऊ विमाने होती व केवळ तडजोड म्हणून हवाई दलातर्फे त्यावर प्रशिक्षण दिले जात असे. त्यामुळे या विमानांची गती ही प्रशिक्षणाला साजेशी नसल्याने नव्या वैमानिकांना वेग व गतीचा अंदाज येत नसे व त्यात हे अपघात होत. यानंतर प्रशिक्षणार्थी जेट विमाने खरेदी करण्यात आली. 

फर्नांडिस संरक्षणमंत्री असतानाच कारगिल संघर्ष उद्‌भवला. या संघर्षाला आपल्या संरक्षण सिद्धतेमधील ढिलाई कारणीभूत ठरली होती, ही कितीही कटू असली तरी वस्तुस्थिती होती. परंतु फर्नांडिस यांनी भारतीय लष्कर आणि जवानांचीच बाजू घेतली आणि ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ किंवा लष्करी ढिलाईची टीका केवळ अमान्य केली नाही, तर त्याचा प्रतिवादही केला. जवानांच्या कल्याणासाठी त्यांनी अखंड काम केले. कारगिल संघर्ष शेवटच्या टप्प्यात असताना फर्नांडिस यांच्याबरोबर त्या भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली. द्रासच्या दुर्गम भागात एका खंदकात जवानांबरोबर गप्पा मारत असताना जवानांनी एक अडचण मांडली. सीमेवर तैनात जवानांची पत्रे किंवा मनीऑर्डरी यासाठी पंधरा दिवसातून एकदा सेना डाकसेवेचा कर्मचारी सीमेवर जाऊन पत्र व मनीऑर्डरींची देवाणघेवाण करीत असे. जवानांचे म्हणणे होते, की हा ‘संदेश-दूत’ दर आठवड्याला आला तर ते सोयीचे ठरेल. ही बाब संरक्षणमंत्र्यांच्या कानावर घालाल काय अशी या जवानांनी विचारणा केल्यावर त्यांना ‘निश्‍चितपणे घालतो’ असे सांगितले. परतीच्या वाटेवर फर्नांडिसांना ही माहिती दिली. त्यांनी अक्षरशः क्षणाचाही वेळ न घालविता बरोबरच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट तत्काळ लागू करण्यास सांगितले. फर्नांडिस यांच्या कामाचा झपाटा असा विलक्षण असे! 
फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्त्वात आक्रमकता ठासून भरलेली होती. त्यामुळेच त्यांच्या काळातील तरुणांचे ते ‘हिरो’ होते. ते नायकत्व त्यांना आयते मिळालेले नव्हते, तर त्यासाठी असंख्य आंदोलनात तेवढ्याच असंख्य वेळा खाल्लेला पोलिसांचा मार-लाठ्या व काठ्या कारणीभूत होत्या. ‘पोलिसांचा सर्वाधिक मार व लाठ्या खाल्लेला राजकारणी’ ही त्यांना मिळालेली उपाधी सार्थ होती. एक-दोनवेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्लेदेखील झालेले होते. परंतु ते डगमगले नव्हते आणि त्यांची हिंमत व साहस तसूभरही कमी झाले नव्हते. हॉटेल कामगार, गोदी कामगार, महापालिका कामगार, बेस्ट कर्मचारी, मुंबईतले टॅक्‍सीचालक, अहमदाबादमधले रिक्षा व टॅक्‍सी चालक अशा असंख्य संघटना त्यांनी बांधल्या होत्या. जन्मजात कामगारनेते असे त्यांना म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. 

फर्नांडिस यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना त्यांची संसदीय कारकीर्द नजरेआड करणे अशक्‍य आहे. दुर्दैव हे की आपल्या विलक्षण प्रभावी वक्तृत्वाने संसद गाजविणारा हा संसदपटू ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’च्या किताबापासून वंचित राहिला. यामागे राजकीय मत्सर-असूया असावी, की निव्वळ निष्काळजीपणा असावा हे न समजणारे कोडे आहे. दोनच प्रसंगांचा उल्लेख फर्नांडिस यांच्या संसदीय कारकिर्दीच्या समृद्धतेचे दर्शन घडविणारे आहेत. हर्षद मेहता यांनी शेअर बाजारात केलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणणे आणि लोकसभेत सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्यावरील चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यास सरकारला भाग पाडण्याची कामगिरी फर्नांडिस यांनीच केली होती. हा गैरव्यवहारही बॅंकांशीच संबंधित होता आणि त्यावेळची फर्नांडिस यांची भाषणे वक्रोक्ती, व्यंग, आक्रमक टीका यांनी परिपूर्ण असत. वक्तृत्वाचे सर्वोत्कृष्ट नमुने म्हणून ही भाषणे ऐतिहासिक आहेत. यावेळी केंद्रात पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार होते. पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामस्वामी यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्रकरण होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प. बा. सावंत यांच्या समितीनेदेखील रामस्वामी यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवलेला होता. रामस्वामी यांना काढून टाकण्यासाठी महाभियोग म्हणजेच ‘इंपिचमेंट’ हा एकमेव मार्ग होता. फर्नांडिस यांनी त्यात पुढाकार घेतला होता. सत्तारूढ काँग्रेसने सुरुवातीला पाठिंबा दिला. महाभियोगाची सूचना व ठराव मंजुरीनंतर प्रत्यक्ष महाभियोगास संसदेत (लोकसभेत) प्रारंभ झाला. रामस्वामी यांनी कपिल सिब्बल यांना वकील म्हणून नेमले होते आणि सिब्बल यांनी नियमानुसार लोकसभागृहाच्या अध्यक्षीय आसनाच्या बरोबर समोर असलेल्या दरवाजात करण्यात आलेल्या विशेष सोयीद्वारे युक्तिवाद केला होता. परंतु रामस्वामी यांच्याविरुद्धचा प्रमुख ठराव फर्नांडिस यांचा असल्याने त्यांनी प्रथम बाजू मांडली आणि रामस्वामी यांना पदमुक्त करणे कसे आवश्‍यक आहे ते सांगितले होते. ते त्यांचे भाषण हादेखील अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनच संसदीय इतिहासात नोंदले गेले. सिब्बल हे एक उत्कृष्ट वकील आहेत. परंतु फर्नांडिस हे काही वकील नव्हते. किंबहुना ते केवळ शालान्त परीक्षेपर्यंतच शिकलेले होते. परंतु, त्यांची मांडणी कसलेल्या नामांकित कायदेपंडितांनाही लाजवणारी होती. फर्नांडिस यांना अनेक भाषा अवगत होत्या. कोकणी, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी, तुळू, तेलगू, तमीळ यासह जवळपास ११ भाषा त्यांना ज्ञात होत्या व त्यात ते बोलू शकत असत. 

फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. फर्नांडिस यांच्यासारखा धर्मनिरपेक्षता सर्वोच्च मानणारा नेता भाजपबरोबर कसा गेला हा प्रश्‍न अनेकजण विचारतात. फर्नांडिस यांनीच ‘सकाळ’ला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखत-मालिकेत यावर प्रकाश टाकला होता. लालूप्रसाद यांच्या गुंडगिरी व भ्रष्टाचाराची बजबजपुरी मानलेल्या राजवटीच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला होता. त्यासाठी जनता दलातून बाहेर पडून समता पक्ष स्थापन केला होता. भ्रष्टाचार व गुंडगिरीच्या विरोधात अन्य विरोधी पक्षांनी एकत्र व्हावे असे आवाहन केले होते. परंतु उलट सर्व विरोधी पक्षांनी त्यांना राजकीयदृष्ट्या बहिष्कृत केले. सांप्रदायिकतेच्या विरोधात लालूप्रसाद यांच्यासारख्या धर्मनिरपेक्ष नेत्याची साथ कशी सोडता येईल असा युक्तिवाद केला गेला. राजकीयदृष्ट्या बहिष्कृत फर्नांडिस व नीतिशकुमार यांनी केवळ अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली. त्यासाठी संयुक्त कार्यक्रमाचा आग्रह धरतानाच भाजपने ३७० कलम, समान नागरी संहिता व अयोध्या हे मुद्दे उपस्थित करायचे नाहीत ही अट त्यात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतरच ही भाजप-आघाडी अस्तित्वात येऊ शकली. या आघाडीचे संयोजक म्हणून फर्नांडिस सक्रिय राहिले व शेवटपर्यंत त्यांनी त्यांचे सर्वपक्षीय संबंध उपयोगात आणून आघाडीचे सरकार यशस्वी केले. फर्नांडिस यांचा काँग्रेसविरोध असला, तरी काँग्रेसमधले असंख्य नेते त्यांचे चांगले मित्र होते. आर. वेंकटरमण हे राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांची व फर्नांडिस यांची मैत्री अबाधित राहिली होती. एकदा त्यांच्याकडे नाश्‍त्यासाठी जाऊन आल्यानंतर फर्नांडिस यांना भेटण्याची संधी मिळाली होती आणि त्या भेटीत वेंकटरमण यांनी त्यावेळच्या लोकसभा निवडणुकांच्या हालचाली कशा सुरू झाल्या होत्या व निवडणुका साधारण कधी होतील याची माहिती त्यांना दिली होती. ती माहिती त्यांनी दिली व त्याआधारे ‘स्पेशल बातमी’ झाली होती. 

फर्नांडिस यांचा काँग्रेसविरोध किंवा त्याहीपेक्षा घराणेशाहीस असलेल्या विरोध टोकाचा होता. त्यांच्या विरोधात शवपेटी घोटाळ्यावरून आरोप झाल्यानंतर ते अक्षरशः मानसिकदृष्ट्या जखमी झाले होते. या आरोपातून त्यांची सहीसलामत सुटका झाली. फर्नांडिस यांच्या काही सहकाऱ्यांमुळे ते अडचणीत आले. परंतु ते डाग त्यांच्यावर लागू शकले नाहीत. भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांवरून काँग्रेसने त्यांच्यावर संसदीय बहिष्कार टाकला होता. फर्नांडिस यांच्यातल्या निखळ संसदीय लोकशाहीवाद्याच्या तो जिव्हारी आघात होता. त्यातून ते सावरू शकले नाहीत. फर्नांडिस हे भावनाशीलही होते. मधू लिमये यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. मधू लिमये यांच्या निधनानंतर घरी रात्रभर रडत बसलेल्या फर्नांडिस यांना सावरणे अवघड झाले होते. फर्नांडिस सार्वजनिक जीवनात होते असे म्हणण्यापेक्षा फर्नांडिस यांचे जीवन सार्वजनिक होते. म्हणूनच फर्नांडिस या नावापेक्षा लोकांना ते ‘जॉर्ज’ म्हणून अधिक प्रिय होते. त्यांच्या व्यक्तिगत आणि इतरही असंख्य आठवणी आहेत. त्यांची गणती आकड्यात होणारी नाही. त्यांची स्मृती, त्यांच्या आठवणी व त्यांचे व्यक्तिमत्त्व विसरले जाणारे नाही...  

संबंधित बातम्या