रिडिफाइन्ड टी

सोनाली शेंडे-बोराटे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा स्टार्टअप
लोकांच्या दैनंदिन गरजेचा व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चहाला राहुल चव्हाण यांनी ‘करिअर’ म्हणून निवडण्याचे ठरवले आणि त्यातूनच जन्म झाला ‘रिडिफाइन्ड टी’ या आउटलेटचा! सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राहुल यांच्या या प्रवासाविषयी...

पाऊस म्हटलं भिजणं जेवढं अनिवार्य तेवढंच पाऊस म्हटलं, की चहाप्रेमींसाठी फक्कड चहा अपरिहार्य!

बाहेर मस्त पाऊस पडत असताना ऑफिसच्या कामाच्या व्यापातून भिजायला तर जाता येऊ शकत नाही. पण मग त्यातून मार्ग काढत मस्त वाफाळलेल्या चहाचा कप हातात घेऊन हा पावसाचा नजारा अनुभवण्याचा आनंद लुटला जातो. कधी ऑफिसच्या बाल्कनीत, कधी कॅंटीनमध्ये, तर कधी एखाद्या टपरीवर असा आल्हाददायी अनुभव घेतला जातो. चहाला कोणतीही वेळ आणि कोणतेही कारण पुरेसे ठरते. कधी कामाचा ताण आला म्हणून तर कधी कामाला सुरवात करायची म्हणून तर कधी मित्रांसोबत गप्पांचा फड रंगविण्यासाठी चहाचा आधार घेतला जातो. अशा या लोकांच्या दैनंदिन गरजेचा व जिव्हाळ्याचा विषय असलेला चहाला सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राहुल चव्हाण यांनी ‘करिअर’ म्हणून निवडण्याचे ठरवले आणि त्यातूनच जन्म झाला ‘रिडिफाईन्ड टी’ या आऊटलेटचा!

सातारा जिल्ह्यातील कराड जवळील ‘पेर्ले’ हे राहुल यांचे मूळ गाव. घरी आई-वडील, आणि बहीण, भाऊ. वडील शेतकरी तर आई गृहिणी. मुलांनी शिक्षण घेऊन चांगली नोकरी पकडून आयुष्यात स्थिरस्थावर व्हावी, अशी त्यांचीही चारचौघांसारखीच अपेक्षा! त्याप्रमाणे राहुल एमसीए पूर्ण करून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका चांगल्या कंपनीत रुजूही झाले. चार वर्षे या करिअरमध्ये अपेक्षित प्रगतीही साधली. पण काहीतरी वेगळं करायचं आहे, हा विचार मनात रुंजी घालू लागला. बराच विचार करून शेवटी त्यांनी चहा या क्षेत्रात उतरायचे ठरवले. यामागची भूमिका स्पष्ट करताना राहुल सांगतात, ‘एक तर मी पहिल्यांदाच व्यवसायात उतरत असल्याने सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच अनुभवत होतो. फार मोठी गुंतवणूक असलेला बिझनेस मी करू शकत नव्हतो. मग लक्षात आलं, चहाचा व्यवसाय हा कमी भांडवलात व चांगला प्रतिसाद असलेला बिझनेस होऊ शकतो. अगदी सामान्य व्यवसाय असला तरी मला यात वेगळी ओळख बनवण्यासाठी भरपूर संधी आहे, असं लक्षात आलं. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या ठिकाणी चांगला चहा मिळाला, तर पुढच्या वेळी त्याच चवीचा चहा मिळेल याची शाश्वती नसते. तसेच कप विसळण्याच्या पद्धती, आतील स्वच्छता याबद्दलही बरेचदा नाराजी व्यक्त केली जाते. म्हणूनच चवीतील सातत्य, कमालीची स्वच्छता, ग्राहकांना तत्परतेने सेवा या बाबी कटाक्षाने पाळल्या जातील, याकडे राहुल यांनी सुरूवातीपासूनच लक्ष दिले. त्यामुळेच तर चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘रिडिफाईन्ड टी’ प्रवास एका आऊटलेटपासून दहा आऊटलेट्‌सपर्यंत पोचला आहे. हडपसर, विमाननगर, बाणेर, कोथरूड, कर्वेनगर, खराडी, हिंजेवाडी अशा आयटी पार्कमध्ये त्यांची आऊटलेट्‌स आहेत. त्यातील हिंजवडी आऊटलेट आठवड्यातील एक दिवस वगळता २४ बाय ७ तर इतर सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत सुरू असते. इतर ठिकाणी अनेकजण फ्रॅंचायजीसाठी विचारणादेखील करत आहेत.

इंजिनिअर असल्यामुळे या क्षेत्रातील लोकांची नेमकी गरज राहुल बरोबर ओळखू शकतात. अनेकदा आयटीमधील लोकांना शनिवारी-रविवारी काम पूर्ण करण्यासाठी ऑफिसला बोलावले जाते. सुट्टीच्या दिवशी असं कामावर येणं तसं नकोसच वाटणारं असतं. त्यामुळेच राहुल यांनी या ‘लिटल एक्‍स्ट्रॉ एफर्ट’ घेणाऱ्यांसाठी ‘लिटल एक्‍स्ट्रॉ ऑफर’ सुरू केल्या. या छोट्या उपक्रमाचे खूप कौतुक झाले. असाच एक प्रयोग राहुल यांनी महिला दिनानिमित्त केला होता. सुंदर मेसेज असलेले कप त्यांनी खास यासाठी बनवून घेतले होते.

राहुल यांच्यासाठी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापर्यंतचा मधला काळ परीक्षा घेणारा होता. ‘पूर्ण विचारांती मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कंपनीतील मॅनेजरने माझ्यासमोर पाच वर्षे अमेरिकेला जाण्याची ऑफर ठेवली. तेव्हा पुन्हा जरा गोंधळलो. ही ऑफर स्वीकारली तर आयुष्य उत्तमरीत्या सेट होऊ शकणार होतं. पण माझ्या अंतर्मनाने मात्र नोकरी सोडण्याचाच कौल दिला आणि नेमक्‍या मोबदल्याची खात्री नसलेल्या या व्यवसायात मी उतरलो.’ असं राहुल सांगतात. 

मधल्या काळातले सहा-सात महिने ते घरीच होते. या काळात अनेकांना भेटून कल्पना सांगितली. हॉटेलमध्ये जाऊन लोकांच्या चहाच्या सवयीसुद्धा अभ्यासल्या. आऊटलेटच्या नावातूनच त्याची संकल्पना स्पष्ट व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. नाव ठरवायलाही त्यांना दीड-दोन महिने गेले. चहातील घटकांचे प्रमाण ठरवण्यासाठी त्यांनी बराच अभ्यास केला. पाश्‍चिमात्य व भारतीय पद्धतींचे निरीक्षण केले. त्यांची व आपली संस्कृती व मानसिकता आणि त्यातून आपल्याकडे काय योग्य आहे, याचा निर्णय घेतला. सर्व तयारी झाल्यानंतर गुंतवणुकीसाठी भांडवलाचा प्रश्न आला. पीएफ व बचतीतले पैसे त्यांनी यात घातले. तरीही आणखी गरज असल्याने दागिने मोडून, कर्ज घेऊन त्यांनी पैसे उभे केले. त्यानंतर आवश्‍यक त्या सर्व मशिन्सची खरेदी झाली आणि पहिले आऊटलेट मगरपट्ट्यात जून २०१५ मध्ये सुरू झाले. चहाविषयी बोलताना राहुल सांगतात, ‘त्यापूर्वी माझा चहाशी संबंध फक्त चहा पिण्यापुरताच. ‘रिडिफाईन्ड टी’च्या निमित्ताने मी चहावर प्रयोग करू लागलो. त्याआधी मी कधी चहा बनवत नव्हतो. मला हवा तसा चहा बनवायला सहा महिने लागले.’’  

पूर्णपणे झोकून देऊन काम करून राहुल यांनी आज व्यवसाय २ कोटींच्या उलाढालीपर्यत नेला आहे.
‘रिडिफाइन्ड टी’चे आऊटलेट हे ओपन किचन संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे कोणते दूध वापरले जाते, कसा चहा बनतो, हे ग्राहक प्रत्यक्ष पाहू शकतात. नवीन आऊटलेट सुरू झाल्यावर तासाभरातच ते ऑटोपायलट मोडवर जाते. त्यामुळे त्याची देखभाल व व्यवस्थापन करणेही सोईस्कर होते. याबाबत राहुल सांगतात, ‘सगळ्या गोष्टींच्या जागा आम्ही ठरवलेल्या आहे. उजवीकडे काय, डावीकडे काय, कपांची जागा कुठे, प्रिमिक्‍सचं प्रमाण असं सगळं सुरवातीच्या ट्रेनिंगमध्येच कर्मचाऱ्यांना शिकवलं जातं. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होतात.’

जास्तीत जास्त लोकांची मागणी पूर्ण करणारा तरीही आटोपशीर असा मेन्यू राहुल यांनी तयार केला आहे. ‘स्पेशल चहा’मध्ये जिंजर व मसाला चहा न टीमध्ये तुलसी व लेमन, डिलाईट ग्रीन टीमध्ये ऑरेंज व स्टॉबेरी, कॉफीमध्ये फिल्टर व कोल्ड कॉफी हे पर्याय तर चहासोबत खाण्यासाठी टोस्ट व बनमस्का असे मोजकेच पदार्थ ठेवले आहेत. त्यामुळे मेन्यू कार्डमधून काय हवंय ते ठरवताना ग्राहकांना गोंधळ होत नाही व बरीच गर्दी असली तरी सर्वांना तत्परतेने सेवा देणे शक्‍य होते. राहुल यांचा हा प्रयत्न म्हणजे ‘डिस्ट्रक्‍टिव्ह इनोव्हेशन’ म्हणता येईल. ७०-८० रुपयांत तुम्हाला हवा तसा चहा मिळेल. पण ८-१० रुपयांत मिळणाऱ्या चहाचा तेवढा दर्जा नसेल. या दोन्हीचा समतोल साधून त्यांनी कमी पैशात उत्तम दर्जा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ग्राहकांनाही ‘रिडिफाइन्ड टी’ला आपलंस केलं आहे. ‘ग्राहकांचाही खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतो. काऊंटरवरून फोन नंबर घेऊन लोक फोन करून, एसएमएस किंवा व्हॉटसॲपवर मेसेज करून प्रतिक्रिया कळवतात. असे अभिप्राय सुखावणारे व आणखी पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारे ठरतात.’ अशा शब्दांत राहुल ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

सर्व आऊटलेटमध्ये एकाच चवीचा चहा याबरोबरच आणखी एक बाब म्हणजे सर्व ठिकाणी असणारी ‘३६० डिग्री विंडो’ या विंडोमध्ये व्हाइट इझ न्यू ब्लॅक,८४ नेव्हर विल बी ८४ अगेन, ऑल स्टार्टस विथ ड्रीम्स, स्टॉप वरिंग अबाऊट द स्टार्ट, युवर बेस्ट पार्ट इज ॲट द इन्ड, ‘थिंक डिफरंट’ असे कोटस वाचायला मिळतात. ताण घालवणारे, विचारांना चालना देणारे असे कोट्‌स चहाच्या घोटाबरोबर वाचताना, त्यावर चर्चा करताना इथे अनेकजण दिसतात. 

आतापर्यंतच्या वाटचालीवर राहुल समाधानी आहेतच. पण नजीकच्या काळात आणखी काही हटके करण्यासाठी काही संकल्पनांवर त्यांचे काम सुरू आहे. याबाबत राहुल सांगतात, ‘ज्या ज्या ठिकाणी चहा पोहचलाय तेथे आम्हाला जायचंय. पुण्यात दिवसाला एक लाख कप चहा देण्याचा विचार आहे. लवकरच आम्ही ॲपवर येतोय.’’ अशाच हटके विचार करण्याच्या सवयीतून काहीतरी भन्नाट शोध लागतात आणि पुढे जाऊन ते ट्रेंड सेट होतात. राहुल चव्हाण यांचे ‘रिडिफाइन्ड टी’ हे चहाच्या क्षेत्रातील असेच एक उदाहरण ठरू शकेल, असं म्हणायला हरकत नाही.

वाचनाची खूप आवड आहे. अनेक मोठ्या व्यक्तींची प्रेरणादायी चरित्रे मी वाचली आहेत. माझ्या संघर्षाच्या काळात याच विचारांनी मला मार्ग दाखवला होता. त्यामुळेच अनेक मोठ्या लोकांची प्रेरणादायी वाक्‍ये मी आउटलेटमध्ये लावली आहेत. आपलं आयुष्य ३६० अंशात बदलण्याची ताकद या विचारांमध्ये असते. हे कोट वाचल्यावर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. लोकांना पटकन समजत नाही. त्यांचे अर्थ लावणे, ते कोट समजून घेणे ही प्रक्रिया मजेशीर असते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या