हाच तो चहा! 

ब्रिटिश नंदी 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहामहात्म्य 
 

कुणी काय खावे आणि खाऊ नये, हा जसा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे, तसेच काय प्यावे आणि पिऊ नये हा अधिकारदेखील लोकशाहीने हरेक नागरिकाला दिला आहे. भारतात काहीही पिण्याचे स्वातंत्र्य असले, तरी चहा पिण्याचे स्वातंत्र्य हे सर्वांत पवित्र व सार्वभौम आहे. होय, आम्ही चहा पिण्याच्या अधिकाराबद्दलच बोलत आहोत. चहा हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असून तो आम्ही पिणारच! माहिती अधिकार, शिक्षणाधिकार यांच्यासह माणसाला ‘चहाधिकार’ही बहाल होणे ही काळाची गरज असून यासाठीच आम्ही ‘राइट टु टी’ हे चहास्वातंत्र्याला वाहून घेतलेले राष्ट्रीय अभियान छेडले आहे. इन्शाल्लाह, लौकरच आम्हाला यश (आणि चहाची बोलावणी) येतील, अशी आशा वाटते. 

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्‍तीला चहा हा मिळालाच पाहिजे, अशी आमची कळकळ आहे. चहा हे जीवनातील स्थैर्याचे प्रतीक असून तो सेवन करणाऱ्याच्या कित्येक चिंता सहजी दूर होतात, हा सर्वानुभव आहे. तथापि, कित्येक दुर्दैवी लोकांना चहाची महती न पटल्याने ते चहा सोडतात-बिडतात. हे सर्वथा गैर आहे. पर्वडत असताना किंवा बव्हंशी फुकट मिळत असतानाही चहा सोडणे, हे एकप्रकारे निष्कारण शाळा सोडून गुरे वळायला जाण्यापैकी आहे. इन अदर वर्डस, याला अवदसा आठवणे असे म्हणतात. 

‘देअर इज नो फ्री लंच इन धिस वर्ल्ड’ म्हणजेच फुकट भोजन या जगीं अस्तित्वात नसते, कुणी ना कुणी त्याची किंमत मोजलेलीच असते, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. चहाचेही बव्हंशी तसेच आहे. चहा घरातला असो, टपरीतला असो वा कुठल्याही ‘अमृततुल्य’मधला; त्याची किंमत कुणीतरी दिलेलीच असते. दुर्दैवाने चहाला मार्केटमध्ये फार दुय्यम लेखले जाते. ‘तो अमका ना... कद्रू आहे, कद्रू! परवा गेलो होतो, तेव्हा चहासुद्धा विचारला नाहीन्‌...’ असे एखाद्याबद्दल बोलले जाते. ‘नाना’चा चहा आणि ‘आण्णा’चा चहा मराठी संस्कृतीत (पक्षी ः पुण्यात) सुप्रसिद्धच आहे. यावरून एखाद्याला ‘चहा विचारणे’ हा एक धोरणात्मक निर्णय असतो, हे सिद्ध होते. किंमत कमी असली तरी चहापाण्याची विविध रूपे असतात हे लक्षात घ्यावे. आता चहाची विविध रूपे याविषयी थोडेसे - 

सकाळचा चहा ः हे प्रकरण थेट पचनाशी निगडित आहे. अनेकांना या चहाशिवाय काहीच होत नाही. तो लागतोच! आमच्या परिचयातला एक इसम चहाचा कोप घेऊनच स्वच्छतागृहात जातो, यात सारे काही आले! सकाळचा चहा ही एक अनिवार्य अशी गोष्ट आहे. आस्वादाची नव्हे. 

दुसरा चहा ः हा बहुतेकदा घरातील भांड्यात उरलेला किंवा नाक्‍यावरील हाटिलातला असू शकतो. हे तरतरी आणणारे उत्तेजक पेय म्हणता येईल. हा चहा आणि सिगारेट यांचे विशेष सख्य दिसून आले आहे. 

तिसरा चहा ः हा साधारणतः सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास घ्यावा. जेवणास अंमळ उशीर असताना आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी घेतला जाणारा हा घोट आहे. याचा संबंध प्रायः फायली, संगणक किंवा तत्सम कार्यसामग्रीशी जास्त असतो. फायलींवर पडलेली वर्तुळे याच कपाची असतात. 

चौथा चहा ः भोजनानंतर आणि पानाच्या आधी घेतला जाणारा हा घोटभर ऐवज. शहाण्या चहाबाजाला तिसऱ्या चहानंतर बहुतेकदा खिश्‍यात हात घालावा लागत नाही, त्यातला हा सर्वांत बेस्ट चहा! 

पाचवा चहा ः दुपारच्या सुमारास मेजावर टेकल्या टेकल्या, किंवा कुणी अभ्यागत आले तर मागविण्यात येणारा हा चहा. हा टोटल प्रोफेशनल चहा असतो. शिवाय हा मागवावा लागतो, पण मागविल्याप्रमाणे येतोच असेही नाही! 

सहावा चहा ः याचे सख्य खारी किंवा मारी असल्या बिस्कुटांशी असते. सहाव्या चहात बुचकळलेले बिस्कुट अतिचविष्ट लागते असे एक दीर्घ निरीक्षण आहे. 

सातवा चहा ः घरच्या वाटेवर लागण्यापूर्वीचा उगीचच चहा. 

आठवा चहा ः घरच्या वाटेवरचा चहा. 

नववा चहा ः घरची अथवा मित्रमंडळींनी बोलावलेल्या ‘बैठकी’च्या ठिकाणी पोचण्यापूर्वीचा चहा. हा प्रायः दिवसभरातला अंतिम चहाकप असतो. काही लोकांना रात्री भोजनाच्या आसपास चहाची तल्लफ येते किंवा जाग्रणे करणाऱ्या मनुष्यांचे पुढील काळोखात दोनेक चहा होतात. पण बव्हंशी जनसामान्यांसाठी नववा चहा हाच अखेरचा चहा असतो. 

ज्यांच्या कारकिर्दीत ‘चहापाणी’ या शब्दाला महत्त्व आहे, त्यांच्यासाठी दुसऱ्या चहानंतरचे सर्व चहा हे चहापाणी या सदरात मोडतात. हे चहा कपाच्या रूपात न येता, सुरनळी, गड्‌डी, चवड अशा स्वरूपातही येतात. 

...कुणी म्हणेल, एका चहाच्या कोपाचे येवढे काय कवतिक? पण आम्ही त्यांस पटवून देऊ की ज्या जगात चहाची चाह होते, तो देश प्रगतिपथावर दौडतो. पहा, आज अवघा युरोप आणि तुर्कस्थान वगैरे देश चहा पिऊन पिऊन केवढे प्रगत झाले. ब्रिटिशांनी या चहाच्या जोरावरच चीनला कैक वर्षे चीची करावयास भाग पाडले ना? चहा नसता तर औद्योगिक क्रांती तरी शक्‍य झाली असती काय?
चहाची महती सांगण्यापूर्वी या अमृततुल्य पेयाचा घुटकाभर इतिहास माहीत करून घेणे इष्ट ठरेल. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी चीनमधील एका गुराख्याने चुलीवर पाणी उकळत ठेवले असताना वाळक्‍या पाचोळ्यातील काही पाने त्या उकळीत पडली व अननुभूत सुगंधाने त्याचे मन वेडावून गेले. हा पाचोळा चहाच्या पत्तीचा होता हे सांगणे नलगे! सदर चिनी गुराख्याने त्या उकाळ्याचा घुटका घेऊन ‘च्या मारी, हे भारी आहे...’ असे उद्‌गार काढले. त्या उद्‌गारातील ‘च्या मारी’चा प्रवास पुढील पाच हजार वर्षांत चहा-मारी बिस्किटापर्यंत झाला, हा इतिहास तर सर्वविदितच आहे. अर्थात काही बुद्धिजीवींना चहापत्तीच्या उत्पत्तीसंदर्भातील हा पुरावा पुरेसा वाटत नाही. पण आम्ही म्हणतो की या उठाठेवीपेक्षा चहा ठेवावा, हे उत्तम! 

पुढे कालांतराने चिन्यांची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातील ईशान्येकडील आसाम साइडला चहाचे मळे लावले. चिनी चहाची रोपे, लागवडीची पद्धत वगैरे इकडे आणले आणि आजमितीस तीन चतुर्थांश जग भारतीय चहाचे घुटके घेत रोज सकाळी आपापली आन्हिके उरकते आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्या ब्रिटिशांनी दीडशे वर्षे भारतखंडास गुलामीत ढकलले त्या ब्रिटिशांच्या इंग्लंड देशातील बहुसंख्य साहेबांस भारतीय चहास रोज सकाळी तोंड द्यावे लागते, याचा आम्हास विलक्षण अभिमान वाटतो. 

चहा-चपाती किंवा गुडीशेव-चहा ही विषान्ने असल्याचे काही वैद्य करड्या आवाजात सांगतात. सांगोत! आमच्या मते चहा-चपाती ही न्याहारी ‘राजाची न्याहारी’ आहे. हल्ली तर चहाच्या अतिसेवनाने शरीराची हानी होते, असे सांगणारे लोक भेटू लागले आहेत. चहाने शरीराची नेमकी हानी काय होते? असे विचारल्यास हे लोक म्हणतात की ‘आम्लपित्त होते!’ भले!! निमित्तास टेकलेल्याला साबुदाणा खिचडीनेही आम्लपित्त होते. हे लोक मिसळ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी उसळते, असेही काहीबाही सांगतात. मिसळ खाल्ल्याने आम्लपित्ताचा संपूर्ण निचरा होऊन पचनसंस्थेच्या विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या पोटातील अनेक कृमीकीटकांचा नाश होतो, हे खरे आयुर्वेदिक सत्य आहे. चहाबद्दलही तेच सांगता येते. जे घडण्यासाठी प्लेटभर मिसळ कामाला येते, तेच काम चहाचा एक कप करतो. सारांश, चहा हे एक संजीवक पेय असून देशातील हरेक नागरिकास ते उपलब्ध होणे गरजेचे आहे. चहा या संजीवक पेयाचा महिमा आम्ही काय वर्णावा? प्राचीन काळी पाणी हेच जीवन असे म्हटले जात असे. परंतु, आम्ही त्यात बदल करीत आहोत. ज्या कुण्या महाभागाने (चहाभागाने म्हणावे काय?) चहाचा शोध लावला त्यास आमचे त्रिवार वंदन असो. 

चहा हे निःसंशय भारताचे राष्ट्रीय पेय आहे. काही चहाटळ लोक मुद्दाम अन्य कुठल्यातरी पेयाचे नाव घेतील. पण ते खरे नाही. घेणारे काय, ताडीचेही नाव घेतील. घेवोत बापडे! नुसते नाव घेण्याने काही होत नसते. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते असावे, हा प्रश्‍न विचारण्यासाठी आम्ही नुकताच एक सर्व्हे घेतला. त्यातील शेकडा ५३ टक्‍के लोकांनी चहा हेच नाव घेतले. १२ टक्‍के लोकांनी ‘काफी’ सांगितले. तीन टक्‍के लोकांनी ‘वेलचीयुक्‍त काफी’ असेही नमूद केले. सहा टक्‍के लोकांनी नारळपाण्याकडे कल दाखवला. दोन टक्‍के लोकांनी अनुक्रमे पालक ज्यूस, कारल्याचा रस, कोरफडीचा रस यांची महती रकान्यात भरली. आठ टक्‍के लोकांच्या मते दूध हेच खरे राष्ट्रीय पेय होते. एक टक्‍का लोकांनी ‘बोर्नव्हिटा’ आणि ‘फंटा’ यांना पसंती दिली, तर तब्बल १३ टक्‍के लोकांनी गटारी अमावस्येला अर्ज भरल्याचे लेखी पुरावे दिले. अखेर चहाची जीत झाली, हे काय सिद्ध करते? 

बालपणी आम्हांस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नेण्यासाठी म्हणून आलेल्या एका काकांनी बशीला मिशी लावून ‘चहा पितोस का बाळ? फुर्रर्र...’ अशी चवकशी केली होती. तेव्हा त्यांना आम्ही ‘होऽऽ तर...’ असे बाणेदार उत्तर दिले होते. ‘पिऊ नये हो... लहान मुलांनी चहा पिणे वाईऽऽट... फुर्रर्र’ असे बशीतली मिशी वर करून सांगणाऱ्या या काकांनी आताशा चहाची बदनामी सोडली असेल, अशी आशा आहे. कारण ज्या पेयाने या महान राष्ट्रास पंतप्रधान दिला, त्या महान पेयाची बदनामी करणे सांप्रतकाळी आम्लपित्ताचे कारण ठरू शकते. चर्चेमुळे राष्ट्र वाढते आणि चहामुळे चर्चा वाढते, या लॉजिकनुसार चहामुळे राष्ट्र वाढते, हे विधान सत्य ठरते. हल्ली तर आम्ही टपरीवरील चहावाल्याशीदेखील अदबीने बोलतो. न जाणो भविष्यात त्याचीच भाषणे आम्ही चहाच्या घोटासह भक्‍तिभावाने ऐकू! अशी आहे चहाची महती... जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला ललामभूत ठरलेला हाच तो चहा! हाच तो चहा... हे विधान उलटे वाचले तरी सत्य ठरते, आणखी काय हवे?

फोटो फीचर

संबंधित बातम्या