गोष्टरंग... बुंग बॅंग बुंग 

विद्यानिधी वनारसे (प्रसाद) 
गुरुवार, 22 मार्च 2018

उपक्रम    
 

गोष्टरंग’विषयी पहिल्यांदा मी गेल्या वर्षी ऐकलं होतं. ‘क्वेस्ट’ या शैक्षणिक संस्थेचा हा उपक्रम गीतांजली कुलकर्णीच्या पुढाकारानं आणि चिन्मय केळकरच्या दिग्दर्शनाखाली साकार होतोय असं समजलं होतं. पुढं ‘गोष्टरंग’ची टीम पुण्यात प्रयोगासाठी येते आहे असं कळल्यावर एक प्रयोग आमच्या संस्थेतही आयोजित केला होता. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी गोष्टींची नाटुकली सादर करणं ही कल्पनाच धमाल होती. प्रयोग बघताना मुलांना येणारी मजा प्रत्यक्ष अनुभवली होती आणि आपणही कधीतरी असा प्रयोग करून बघावा असं मनात पक्कं बसलं होतं. 

त्यामुळेच ‘यंदा ‘गोष्टरंग’साठी गोष्टी बसवायला तुला आवडेल का?’ असा गीतांजलीचा फोन आला तेव्हा विचार करण्याचा प्रश्‍नच नव्हता. फोनवर ‘होय’ म्हणेपर्यंत डोक्‍यात वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या होत्या. आपल्याला आनंददायी वाटणारी आणि मनापासून करावीशी वाटणारी एखादी गोष्ट इतक्‍या सहजपणे आणि इतक्‍या लगेच साध्य झाली तर आनंदाव्यतिरिक्त दुसरं काय होणार! 

या आनंदाच्या भरातच गोष्टी वाचायला सुरवात केली. गीतांजली पुण्यात आलेली असताना ‘क्वेस्ट’च्या पुण्यातल्या ऑफिसात पहिली ‘अधिकृत’ भेट झाली. सोनाळा परिसराविषयी गीतांजली भरभरून बोलली. तिथल्या आश्रमशाळा, तिथली मुलं, आजूबाजूची परिस्थिती याविषयीचं तिचं आकलन आणि त्या मुलांविषयी असणारी आस्था तिच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होती. त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे ‘तिथली’ मुलं आणि ‘इथली’ मुलं यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ‘इथल्या’ मुलांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या संधींची तुलना ‘तिथल्या’ मुलांशी करताच येऊ शकणार नाही याची प्रकर्षानं जाणीव झाली. या गोष्टीची कल्पना होतीच, पण तिची जाणीव मात्र पुन्हा एकदा नव्यानं झाली. 

आणि मग विविध पुस्तकं वाचायला सुरवात झाली. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी कुठल्या गोष्टी उपयुक्त ठरतील? त्या गोष्टी पुरेशा नाट्यमय आहेत का? कुठल्या गोष्टी ‘बघताना’ मुलांना मजा येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टी बघितल्यावर मुलांना त्या गोष्टीचं पुस्तकसुद्धा बघावंसं वाटेल? 

मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा पाहिला अनुभव म्हणजे गोष्टी ऐकणं. गोष्ट ऐकताना ती गोष्ट मुलांच्या मनात घडत असतं. ते घडणं अनुभवताना ‘आपण कल्पना करतो’ म्हणजे नक्की काय करतो याची समज मुलांना येत जाते. हे गोष्टींचं विश्‍व मोठं जादुई असतं. त्यातलं काहीच खरं नसतं, पण तरीसुद्धा सगळं अगदी खरंखुरं पण असतं. ‘मेक बिलीव्ह’च्या संकल्पनेशी मुलांचा आलेला हा पहिला संपर्क असतो. गोष्ट ऐकताना पहिल्यांदा मुलांच्या मनात ‘नाटक’ घडायला लागलेलं असतं. मग एखाद्या गोष्टीतला छोटा मुलगा ‘मी’सुद्धा असू शकतो किंवा माझा जिवलग मित्रही असू शकतो किंवा तो तिसराच कुणी असतो; ज्याचं चित्र मी माझ्या मनानं रंगवतो. तो कदाचित माझा जानी दोस्तसुद्धा होऊन जातो. गोष्टींच्या जगात फेरफटका मारताना हे जग फार सुंदर आहे, मजेदार आहे यावर मुलांचा विश्‍वास बसत असतो. या जगात मला खूप काही करता येऊ शकतं हे सुद्धा हे गोष्टींचं जग माझ्यावर ठसवत असतं. या गोष्टीरूपातूनच मुलांना आजूबाजूच्या जगाचं आणि जगण्याचं आकलन होत असतं. 

‘गोष्टरंग’मध्ये तर या गोष्टी मुलांना एक पाऊल पुढं घेऊन जातात. इथं या गोष्टींना दृश्‍यरूप मिळतं. मुलांच्या मनातल्या कल्पनेला मूर्त रूप मिळतं. गोष्टीतली पात्र जिवंत होतात. गोष्ट सांगतानाच कधी कधी ती मुलांशी पण बोलतात. याचंही मुलांना अप्रूप वाटतं. 

‘गोष्टरंग’ हा एक पाठ्यवृत्ती प्रकल्प आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या नव्वद अर्जांमधून फक्त पाच जणांची निवड करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली ही तरुण मुलं आणि मुली लहान मुलांसाठी काम करायला उत्सुक आहेत ही वस्तुस्थिती अतिशय आनंद देणारी होती. दरम्यान, तीन गोष्टी नक्की झाल्या होत्या. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी ‘जपून रे सत्तू’, तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी ‘बुजगावण्यांची वरात’ आणि पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी ‘चिपको रुजले त्याची गोष्ट’ आणि मग तीस जूनला सगळे सोनाळ्यात पोचले. सोनाळा हे पालघर तालुक्‍यातलं अगदी छोटंसं गाव. वाड्याच्या पुढं साधारण दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तिथं जाताना मजल दरमजल करीतच पोचावं लागतं. इथं ‘क्वेस्ट’चं ऑफिस आहे. आता महिनाभरात तीन गोष्टी तयार करायच्या होत्या. याच महिन्यात माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मला दहा दिवस परदेशी जायचं होतं. त्यामुळं पहिल्या दहा दिवसात तीनही गोष्टी बसवण्याचं काम मला संपवायचं होतं. हे जरा अवघड होतं. पण निवड झालेली मुलं प्रशिक्षित अभिनेते-अभिनेत्री असल्यामुळं हे जमू शकेल असं वाटत होतं. एक जुलैला कामाला सुरवात झाली आणि एक मजेदार गोष्ट लक्षात आली. सोनाळ्यात काम करताना, शहरात होते तशी दमणूक होत नव्हती. तिथल्या वातावरणातला शांतपणा सगळ्यांनाच एक प्रकारचा मानसिक निवांतपणा देत होता. त्यामुळं कामाचा उरक एरवीपेक्षा खूपच जास्त होता. ज्या कामासाठी दहा दिवस लागतील असं वाटलं होतं ते प्रत्यक्षात पाच दिवसातच पूर्ण झालं होतं. तीनही गोष्टींचा प्राथमिक आकृतिबंध पाचव्या दिवशी तयार झालेला होता. 

दरम्यान मुलांबरोबर शारीरिक हालचालींवर काम करण्यासाठी आदिती वेंकटेश्‍वरन उपस्थित होती. लहान मुलांसाठी नाटक करताना शरीराचा कसा कसा उपयोग करता येईल यावर तिनं मुलांकडून कसून काम करून घेतलं. ‘जपून रे सत्तू’ या गोष्टीचं नाट्य रूपांतर करताना, बुजागावण्यांच्या हालचाली बसवताना, दिची आणि तिच्या मित्रांच्या नृत्यमय हालचाली बसवताना या अभ्यासाचा नटांना खूपच फायदा झाला. समीर दुबळे यांच्याबरोबर संगीतविषयक काम सुरू झालं. लहान मुलांच्या गोष्टींमध्ये लिखित गाणी नव्हती, पण मुलांनी आणि समीरनं मिळून ती तयार केली. सहज गुणगुणता येतील अशा चाली समीरनं दिल्या. तबल्याच्या तालांचे बोल वापरून काय करता येईल याचाही विचार झाला. ‘धंधडतक, धंधडतक, धंधडतक, ताम ताम’ किंवा ‘धंधडक ततडक, धंधडक ततडक, धंधडक ततडक, ताम धिताम’ यांचा वापर करून मजेदार हालचाली निर्माण केल्या गेल्या. भाषा, शब्द, त्यांचे अर्थ आणि अर्थहीन शब्दांना देता येणारा अर्थ या सगळ्याची फारच सुरेख गुंफण या संगीताच्या कामातून होऊ लागली. त्याचवेळी मधुरा पेंडसे हिनं वेशभूषा आणि नेपथ्य यांवर काम सुरू केलं. मदतीला सोनाळ्याचा राजू होताच. पाबळच्या विज्ञानाश्रमातून प्रशिक्षण घेऊन आलेला राजू हे एक अजब रसायन आहे. सत्तूच्या गोष्टीचा पडदा, बुजागावण्यांची वेशभूषा, दीचीच्या जंगलाचा पडदा यांच्यातल्या शक्‍यता समोर येऊ लागल्या. आजूबाजूला उपलब्ध असणारी साधनं वापरून काय काय तयार करता येऊ शकेल यावर पुष्कळ विचार झाला. त्याचबरोबर प्रयोगानंतर मुलांबरोबर करण्याच्या विविध खेळांमध्ये यापैकी कशाचा वापर करता येऊ शकेल का याचाही यावेळी ऊहापोह होत गेला. 

पहिले दहा दिवस सगळ्यांसाठीच नव्या नवलाईचे होते. आजूबाजूला हिरवंगार जंगल, सकाळपासून नाटकाची तालीम, जेवायला गरमागरम वाफाळलेला भात आणि रस्सा, तालमीमध्ये चहाचा रतीब... आणि अधून मधून गीतांजलीनं केलेले खाण्यापिण्याचे लाड. ईश्‍वरभाईंचं जेवण, आमच्या कामात आम्हाला काही त्रास होऊ नये, कमी पडू नये म्हणून लक्ष्मणभाईंची सगळीकडं असलेली नजर, आयुष आणि साधना या दोन लहानग्यांचा दंगा... आणि हो, जीवा, जिप्सी, जाई आणि जुई! एकुणात सगळी मजाच! 

पहिला प्रयोग ‘क्वेस्ट’मधल्या मोठ्या प्रेक्षकांसमोर केला होता. पण खरी परीक्षा ३१ जुलैला होणार होती. त्या दिवशी अजून दोन प्रयोग जवळच्या दोन शाळांमध्ये होणार होते. प्रेक्षकांमध्ये शाळेतले पहिलीपासून ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी होते. ज्यांच्यासाठी हे प्रयोग रचले आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचणं सगळ्यात महत्त्वाचं. बहुतेक वेळा मी बसवलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग मी पाहू शकत नाही. त्या दिवशी मी स्वतः दुविधेतच होतो. शाळेत पोचलो पण प्रयोग बघावा की न बघावा ते ठरत नव्हतं. एकदा वाटत होतं, नको, पण मग पुन्हा मनात येई की ‘असं कसं! बघायला तर हवंच!’ त्या शाळेच्या हॉलमध्ये बसलेली ती सगळी मुलं पाहिली आणि पाय निघेना. मग तिथल्याच एका बाकावर बसलो. दरम्यान नटसंचानं ठरवलं होतं की मुलांचा वयोगट पाहता एक गोष्ट रद्द करून दोनच गोष्टी करूया. प्रयोग सुरू झाला. माझं लक्ष रंगमंचावर होतंच, पण समोर बसलेल्या मुलांचे चेहरे बघून खरं नाटक तिथे सुरू आहे अशी भावना झाली. पहिली गोष्ट संपताक्षणी मी म्हणालो की गोष्ट रद्द करू नका. तीनही गोष्टी करा. मुलं इतकी रंगून जाताहेत. आपण कशाला ठरवायचं त्यांना काय आवडेल आणि काय नाही ते.. आणि मग उरलेल्या दोन्ही गोष्टी झाल्या. 

त्या दिवशी त्या मुलांच्या चेहऱ्यांवरचे क्षणोक्षणी बदलणारे भाव पाहिले आणि लक्षात आलं की त्या क्षणी त्या मुलांच्या चेहऱ्यासारखं नाट्यपूर्ण दुसरं काही तिथं नव्हतं. तिथं अभिनय नव्हता, नाटक करण्याचा अभिनिवेश नव्हता, पण जगण्यातला निरागसपणा ओसंडून वाहात होता. गोष्ट अशी पण असते याचं अप्रूप तिथं होतं. मुलं हसत होती, कधी आनंदून टाळ्या वाजवीत होती, कुणाकडं चकित होऊन बघत होती, कुणावर नाराज होत होती, तर कधी हळूच डोळेसुद्धा पुसत होती... ‘याचसाठी केला होता अट्टहास’चा वेगळाच अर्थ समोर दिसू लागला होता. 

या तीनही गोष्टींचे प्रयोग पालघर परिसरातल्या आश्रमशाळांमध्ये झालेच, पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांतही झाले. रोज सकाळी उठून नाटकाची ट्रंक उचलायची आणि निघायचं हे नित्यनियमानं सुरू होतं. होता होता शाळांचं पाहिलं सत्र संपलं आणि आम्हीही दुसऱ्या सत्राच्या तयारीला लागलो. पुन्हा तीन नवीन गोष्टींचा शोध सुरू झाला. त्यातून ‘माझ्या आईची साडी’, ‘बोन्डापल्लीची बावळी गोष्ट’ आणि ‘कपिलेने घेतला झोका’ या तीन गोष्टी निवडल्या. पुन्हा एकदा तालमी, वेगवेगळ्या गोष्टी करून बघणे, शारीरिक हालचाली, संगीत, नेपथ्य, वेशभूषा या सगळ्या आघाड्यांवर काम सुरू झालं आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रयोगांना सुरवात झाली. 

असा प्रकल्प राबविणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. याचं अर्थकारण सांभाळणं ही तर तारेवरची कसरतच आहे. ‘क्वेस्ट’सारखी मोठी संस्था, अनेक सुहृद, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जोडली गेलेली मंडळी या सगळ्यांमुळंच हा प्रकल्प राबविणं शक्‍य झालं. अर्थात अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी मदत करणारे जेवढे जास्त हात पुढे येतील तेवढे हवेच असतात. 

‘गोष्टरंग’ कशासाठी हा प्रश्‍न सहसा कुणी विचारला नाही. पण त्याचं उत्तर मात्र जरासं वेगळं आहे. अनेकदा नाटक करणाऱ्या मंडळींना या प्रकल्पात नाटक करण्याची आणि अधिक प्रयोग करण्याची संधी दिसते. पण ‘गोष्टरंग’ प्रामुख्यानं मुलांना पुस्तकाच्या दिशेनं, पुस्तकांच्या जवळ नेण्यासाठीचा प्रकल्प आहे. त्यांना पुस्तकाकडं जावंसं वाटायला हवं. नाटक बघून झाल्यावर मुलं जेव्हा पुस्तक उघडतील तेव्हा त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंदही मिळायला हवा. तर कदाचित ही मुलं पुन्हा पुन्हा पुस्तकांकडे जातील. एरवी अनेकदा ‘हल्लीची मुलं काही वाचत नाहीत हो’ असं आपण ऐकत असतो. त्यावर ‘गोष्टरंग’ हा एक अतिशय रंजक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. आपली पाठ्यपुस्तकं अनेकदा अधिकाधिक कंटाळवाणी करण्याकडं आपला कल असतो. शिवाय अभ्यासाचं पुस्तक म्हटलं, की त्याच्याबरोबर एक अकारण गांभीर्य जोडलं जातं. पण पुस्तकांमध्येसुद्धा मजा असते हे या निमित्तानं मुलांना जाणवायला लागतं. मुळात अशी मजा करणं यात गैर काहीही नाही हे शिक्षकांनी आणि पालकांनीही समजून घेण्याची गरज आहे. 

या ‘इथल्या’ शाळेत जाणाऱ्या मुलांचं जगणं कसं असेल? या ‘इथली’ मुलंही फक्त परीक्षेचाच विचार करत असतील? ‘इथल्या’ मुलांचं इथल्या निसर्गाशी असलेलं नातं टिकून राहात असेल? ‘इथले’ शिक्षक इथल्या मुलांना गणित आणि शास्त्र आलं नाही तर जगण्यात काही अर्थ नाही असं सांगत असतील? ‘इथल्या’ मुलांना मजा करायला शिकवावं लागत असेल? असे एक ना अनेक प्रश्‍न तिथल्या शाळेतल्या बाकावर बसून मला पडत होते. त्यावेळी माझी आई श्‍यामला वनारसे हिच्या दोन ओळी मला सारख्या आठवत होत्या... 

‘पाखरांसारख्या मुलांची शर्यतीची घोडी बनवू नका. एकदा ढापणं लावून त्यांना शर्यतीत पळणारी घोडी बनवलीत की तुम्हाला त्यांची पुन्हा पाखरं बनवता यायची नाहीत. आज तुम्ही त्यांना पास-नापासाच्या लगामात धरलंत तर तुम्हाला साधं त्यांचं पाखरूपण परत देता येत नाही म्हणून ती तुम्हाला शंभरदा, हज्जारदा, कोटीदा नापास ठरवतील.’ 

त्या छोट्या मुलांचा हात धरूनच ‘गोष्टरंग’ हळू हळू आपल्या पायावर उभं राहायला शिकलं. यंदाचं काम आता संपत आलंय. लवकरच नवीन पाच जणांची निवड होईल, नवीन संच कामाला लागेल आणि आश्रमशाळांतली मुलं तर वाटच पाहात असतील... गोष्टरंग... बुंग बॅंग बुंग!

फोटो फीचर

संबंधित बातम्या