शारदीय नवरात्र

श्रीकांत नवरे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

प्रत्येक घराण्याचे एक विशिष्ट कुलदैवत असते. कुलदैवत याचा अर्थ एक कुलस्वामी व एक कुलस्वामिनी. कुलस्वामी म्हणजे गणपती, विष्णू, शंकर, खंडोबा, नृसिंह वगैरे देव; आणि कुलस्वामिनी म्हणजे रेणुका, कालिका, योगेश्‍वरी, यमाई, एकवीरा वगैरे देवी. इष्टदेवता आणि कुलदेवता या दोहोंमध्ये फरक आहे. इष्टदेवता ही आवड, स्वभाव, प्रवृत्ती, गरज, सोय, त्या देवतेचे वैशिष्ट्य वगैरे कारणांमुळे प्रत्येकाने स्वतः स्वीकारलेली असते; पण कुलदेवतेच्या बाबतीत मात्र तसे नसते. कुलदेवता ही घराण्याच्या मूळ पुरुषाने स्वीकारलेली असते आणि ती तुम्हाला स्वीकारावीच लागते.

प्रत्येक घराण्याचे एक विशिष्ट कुलदैवत असते. कुलदैवत याचा अर्थ एक कुलस्वामी व एक कुलस्वामिनी. कुलस्वामी म्हणजे गणपती, विष्णू, शंकर, खंडोबा, नृसिंह वगैरे देव; आणि कुलस्वामिनी म्हणजे रेणुका, कालिका, योगेश्‍वरी, यमाई, एकवीरा वगैरे देवी. इष्टदेवता आणि कुलदेवता या दोहोंमध्ये फरक आहे. इष्टदेवता ही आवड, स्वभाव, प्रवृत्ती, गरज, सोय, त्या देवतेचे वैशिष्ट्य वगैरे कारणांमुळे प्रत्येकाने स्वतः स्वीकारलेली असते; पण कुलदेवतेच्या बाबतीत मात्र तसे नसते. कुलदेवता ही घराण्याच्या मूळ पुरुषाने स्वीकारलेली असते आणि ती तुम्हाला स्वीकारावीच लागते. त्यामुळे एकाच कुटुंबातील निरनिराळ्या घटकांची इष्टदेवता निरनिराळी असली, तरी त्या कुटुंबाची किंवा त्या घराण्याची कुलदेवता मात्र एकच असते. अर्थात मूळ पुरुषाची स्थावर किंवा जंगम मालमत्ता तुम्हाला हक्क, अधिकार, वहिवाट, कायदा इत्यादीनुसार प्राप्त होते. तशी परिस्थिती कुलदेवतेच्या बाबतीत नसते. त्यामागे कोणाचा आग्रह, सक्ती, दडपण, धाकदपटशा किंवा कायदा नसतो. श्रद्धा, भावना, परंपरा, आस्था, निष्ठा इत्यादीमुळे आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषाने स्वीकारलेली कुलदेवता आपण स्वीकारत असतो.

आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारे शारदीय नवरात्र हा असाच एक कौटुंबिक कुलधर्म कुलाचार आहे. या शारदीय नवरात्राखेरीज चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत प्रामुख्याने तीन नवरात्र त्या त्या देवतेच्या भक्तांच्या कुटुंबीयांचे प्रचलित आहेत. त्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केले जाणारे वासंतिक देवी नवरात्र, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी (चंपाषष्ठी) पर्यंत चालणारे मल्हारी - म्हाळसा नवरात्र किंवा खंडोबा नवरात्र आणि पौष शुद्ध नवमीस प्रारंभ होऊन पौष शुद्ध पौर्णिमेस समाप्त होणारे शाकंभरी नवरात्र. त्याचप्रमाणे श्रीराम, हनुमान, नृसिंह, पांडुरंग, दत्तात्रेय, बालाजी इत्यादी देवतांची नवरात्रही त्या त्या देवतेच्या भक्तांकडे त्या त्या विशिष्ट वेळी होत असतात. ही सर्व नवरात्र कमी अधिक दिवस चालत असली, तरी देवीच्या नवरात्राप्रमाणेच त्यातील कार्यक्रम असल्यामुळे त्यांनाही नवरात्र हेच नाव मिळाले आहे.   

 आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून केले जाणारे देवीपूजनात्मक शारदीय नवरात्र हे नित्य आहे आणि काम्यही आहे. नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा असे गृहीत धरले जाते. वास्तविक ते तसे नाही. कारण तिथीचा क्षय किंवा वृद्धी यामुळे आठ किंवा दहा दिवस येतात. नऊ दिवस किंवा नऊ रात्रींचा कुलाचार म्हणजे नवरात्र असा या शब्दाचा अर्थ नाही, तर आश्‍विन शुद्द प्रतिपदेपासून  महानवमी पर्यंत  घटस्थापना, नंदादीप इत्यादी करावयाचे कर्म म्हणजे नवरात्र. त्यामध्ये दिवस किती (८,९,१०) हा प्रश्‍न नाही. पूर्वी मीमांसाकारांचा ‘नामधेय’ हा सिद्धांत या ठिकाणी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी वापरलेला आहे.

या नवरात्रात घटस्थापना हा मुख्य विधी असतो. एक मातीची वेदी (ओटा) करतात. त्यावर घट स्थापना करुन त्याभोवती धान्य पेरतात. त्या घटावरील पात्रामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवतात आणि नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचार पूजा करतात. तिच्यावर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा फुलांच्या माळा सोडतात. काहीकडे घटस्थापनेसाठी मातीची वेदी करत नाहीत, तर घरच्या देवघरातील कुलधर्माचे टाक किंवा केवळ हळकुंड सुपारी ताम्हणात मांडून त्याचीच दररोज षोडशोपचार पूजा करतात व त्यावरुनच नऊ दिवस रोज एकेक अशा नऊ माळा लावण्यात येत असतात. कोकणामध्ये नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. त्याचप्रमाणे त्या धान्यांच्या मोठ्या लोंब्या आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. घटावरील पात्रात स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन, प्रातःकाली, माध्यानकाली व प्रदोषकाली याप्रमाणे तीन, दोन अथवा एकवेळ केले जाते. त्याप्रमाणे नऊ दिवस सप्तशथीचा पाठ व शेवटच्या दिवशी हवन, उपवास नक्त किंवा एकभुक्त इत्यादी नियम, सुवासिनी, कुमारिका पूजन-भोजन इत्यादी कृत्ये केली जातात. नवरात्राचे नऊ दिवस अखंडदीपाची स्थापना करतात. 

  पूर्वी प्रत्येक घराण्याची नवरात्र व्रताची स्वतःची हस्तलिखित पोथी असायची. अजूनही काही निवडक घराण्यांमध्ये या हस्तलिखित पोथ्या दृष्टीस पडतात. या नवरात्र व्रतामध्ये पूजा प्रधान आहे. उपवासादिक व स्तोत्रे, जप इत्यादी त्याची अंगे आहेत. पूजेचे प्राधान्य सांगितले असल्याकारणाने काही कुलामध्ये जप इत्यादिकांचा अभाव आढळतो. नवरात्र कर्मामध्ये पूजेचा अभाव मात्र कोणत्याही कुलामध्ये आढळत नाही. ज्या कुलामध्ये नवरात्र करत नाहीत, त्यामध्ये पूजाही नसते. 

नवरात्राच्या नऊ दिवसात विशेषतः अष्टमीला काही घरांमध्ये जोगवा मागण्याचा कुलाचार आहे. देवीच्या नावाने इतरांच्या घरी जाऊन कोरड्या धान्याची भिक्षा मागायची व धान्याचा भोजन-प्रसाद म्हणून घ्यावयाचा याचे नाव जोगवा. यामध्ये  श्रीमंत-गरीब असा भेद नसतो. देवीचा प्रसाद ही त्यामागे भावना असते. आश्‍विन शुद्ध अष्टमीला घागरी फुंकण्याचा कुलाचार असतो. तांदळाच्या पिठीच्या उकडीचा मुखवटा करुन त्याला देवीचे रूप देऊन महालक्ष्मी म्हणून त्याची पूजा करताना. या प्रसंगी काही स्त्रिया दोन्ही हातांनी घागर उचलून तिच्यात फुंकर घालून नाद घुमवितात. नवरात्रामध्ये सप्तशती स्तोत्राच्या सातशे मंत्रांनी जो होम केला जातो तो नवमीच्या दिवशीच करावा; पण काही ठिकाणी अष्टमीला आरंभ करुन नवमीला होम समाप्त करण्याचा कुलाचार दृष्टीस पडतो. नवमीच्या दिवशी होमाचा आरंभ व समाप्ती करणे श्रेयस्कर असले, तरी नवमी हा नवरात्रोत्थापनाचा दिवस असल्याने आणि होमाला तो दिवस व्यावहारिकदृष्ट्या सोयीचा नसल्याने शास्त्रलोप आणि शास्त्रहानी होऊ न देता एखादा अपवाद वगळता अष्टमीलाच हा होम करण्याच प्रघात आहे. त्याचप्रमाणे अष्टमीला हा जो होम केला जातो त्याचा दररोज जो पाठ केला जातो त्याच्याशी काहीही संबंध नाही

सप्तशती पाठाचे साधा पाठ, योजना पाठ, पल्लव पाठ आणि संपुट असे चार प्रकार आहेत. निरनिराळ्या कामना लक्षात घेऊन योजना, पल्लव आणि संपुट हे पाठांचे प्रकार सांगितलेले आहेत. नवरात्राच्या नऊ दिवसात काम्य पाठांची अनुष्ठाने सहसा घडत नाहीत. केवळ नवरात्रातील कुलाचार म्हणून दररोज नऊ दिवस एक सप्तशतीचा पाठ आणि काहींच्या घरी अष्टमीला होम होतो. आश्‍विन शुद्ध नवमीला खंडे नवमी असे म्हणतात. या दिवशी राजे व सामंत सरदार हे लोक ‘उच्चैःश्रवा’ नामक देवाच्या घोड्यांची पूजा करत त्याला ‘वांजिनीराजन कर्म’ (घोड्यांची पूजा, आरती वगैरे कर्म) म्हणतात. त्याचप्रमाणे आपापली शस्त्रे साफसूफ करुन ती हारीने मांडत व त्यांची पूजा करत. आजही शेतकरी व कारागीर आपापली अवजारे व हत्यारे यांची पूजा करतात. 

कुलधर्म, कुलाचार आणि कुलपरंपरा यानुसार काही घराण्यातले नवरात्र नवमीच्या दिवशी तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते. नवरात्राची पारणा आणि विसर्जन या दोहोबाबत शास्त्रार्थात एकवाक्‍यता नाही. त्यामुळे प्रत्येक घराण्यांची परंपरा, रुढी आणि प्रथा यानुसारच तो प्रश्‍न सोडविला जातो.  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या