धास्तावलेला उन्माद
वृत्तांत
‘आमच्यासाठी जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. नरसेवा हीच नारायण सेवा आहे...’ ‘एका तरी योजनेच्या मागे नरेंद्र मोदी हे नाव लागले आहे का ते दाखवा’... ही वचने कोण्या साधुपरूषाची नसून एकशेतीस कोटींच्या भारताचे पंतप्रधान व साक्षात विष्णूचाच अवतार असे वर्णन होणारे नरेंद्र मोदी यांची आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांच्या भाषणात त्यांना याचा उल्लेख केला.
मात्र २०१९ च्या लढाईला सज्ज होण्यासाठी दिल्ली सोडताना या कार्यकर्त्यांच्या मनात पुढील गोष्टी जास्त ठळक ठसल्या असणार, त्या अशा - १. जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आपल्या नेत्याला (अतिदुष्ट) काँग्रेस सरकारने, त्यांच्या यंत्रणांनी व दाक्षिणात्य विद्वान मंत्र्यांनी १२-१२ वर्षे किती म्हणून छळले, २. अयोध्येत राममंदिर भाजपच बांधणार; पण त्याच्या न्यायालयीन सुनावणीतही काँग्रेसच पाहा किती अडथळे आणत आहे व ३. जगन्मान्य व सर्वांत कणखर नेतृत्व आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार तर फक्त भाजपकडे आहे; विरोधकांकडे या गोष्टी आहेतच कोठे? ते आले तर पुन्हा देश भ्रष्ट अंधारयुगात लोटला जाणार हे देशाच्या जनतेने (नीट) लक्षात घ्यावे. म्हणजे मोदी सरकारच्या देदीप्यमान विकासकामांची जंत्री प्रसंगी बाजूला ठेवून प्रामुख्याने वरील तीनच मुद्यांवर भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक फिरविण्याचे ठरविले असण्याची शंका अधिवेशनातील वातावरण पाहून निश्चितपणे आली.
परतफेड झाली ना?
दुसरा मुद्दा, दिल्लीने १२ वर्षे गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा छळ केला असेलही; पण मग भारताच्या जनतेने २०१४ मध्ये काँग्रेसला शिक्षा करून त्याची सव्याज परतफेड केलेली नाही का? दुसरे म्हणजे २००४ ते २०१४ या काळात देशाचे काही चांगले झालेच नाही व जे काही झाले ते २०१४ नंतरच; हे देशाचा मतदार एकमुखाने कसे स्वीकारणार? नॅशनल हेराल्ड, सीबीआय, जेएनयू, अखिलेश यादव यांच्याविरुद्धची खाण कारवाई आदी प्रकरणांत यंत्रणांनी टायमिंग साधून केलेल्या कारवाईचीही जी जाहिरात नेतृत्वाकडून केली जाते त्यामागे ‘विखार’ यापेक्षा कोणती वेगळी भावना दिसते? एकाही योजनेला स्वतःचे नाव नसणे व प्रत्येक वक्त्याच्या भाषणातही स्वतःच्या नावाचा उल्लेख दंडक घातल्याप्रमाणे ठळकपणे करणे, प्रत्येक जाहिरातीत स्वतःचे छायाचित्र येईल असे पाहणे, सरकारी प्रसारमाध्यमांतील नव्वद टक्के हेडलाईन्स आपल्याभोवतीच फिरत राहतील याची ‘दक्ष’ता घेणे यात गुणात्मक फरक काय हेही या सर्वेसर्वा नेतृत्वाने सांगावे.
गेली साडेचार वर्षे सत्तासुखात बुडालेल्या व त्याच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या भाजपने आपल्या हजारो प्रतिनिधींना दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र करून आपल्या संघटनात्मक शक्तीचे दर्शन पुन्हा एकदा घडविले. भाजपइतके लाखो कार्यकर्त्यांचे जाळे देशात सध्या एकाही पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा, की या जाळ्याचा अनुभव व लाभ सामान्य पक्षकार्यकर्त्याला निवडणुकीच्या हंगामानंतर मिळतोय की नाही! सत्ता येण्यासाठी प्रत्येक बूथवर रक्ताचे पाणी करून झटणारे कार्यकर्ते हाच पंचपरमेश्वर; नंतर योजनांचे लाभ मंत्री-नेत्यांच्या जवळच्या बाबूंसह काल-परवा पक्षात येऊन डोक्यावर बसलेल्या आयाराम गयारामांना मिळणार... परत याबद्दल बोलण्याचीही सोय नाही! अशा अस्वस्थतेत गेली साडेचार वर्षे काढणाऱ्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणांतून ‘आता तसे होणार नाही,’ असा अपेक्षित दिलासा कितपत मिळाला? मोदींसारखा ‘अवतारी’ नेता विरोधकांकडे नसेलच तर हातातील तीन हिंदीभाषिक राज्ये भाजपने कशी गमावली याचेही उत्तर भाजप नेतृत्वाला लोकसभा प्रचारात द्यावे लागणार. भाजपचे हे अधिवेशन संपताच धडाधड रुग्णालयांत भरती होणाऱ्या वा त्यासाठी न्यूयॉर्क गाठावे लागणाऱ्या वरच्या फळीतील पक्षनेत्यांना असे अचानक काय झाले, या प्रश्नाइतकेच तेदेखील जटिल असेल. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा प्रचार करतानाच मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही, हे तुम्ही देशभरात जाऊन सांगा, हे मोदींना इतका जोर देऊन ठसवावे लागले हेही ध्यानात घ्यावे लागेल. राफेलप्रकरणी स्पष्ट बोलण्यास मोदी-शहा का कचरतात? सारे काही शुद्ध असेल तर राफेलची संसदीय चौकशी का लावली जात नाही? हे भाजप प्रतिनिधींच्याच मनातील प्रश्न होते.
उन्मत्तपणाचा अतिरेक
सत्ताप्राप्तीचा आनंद होणे वेगळे आणि त्याचा उन्माद चढणे वेगळे. भाजपचे अनेक मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांचे, विशेषतः त्यांचे सहाय्यक व विशेष अधिकारी म्हणविणाऱ्यांच्या वर्तनात गेली साडेचार वर्षे विलक्षण उन्मत्तपणा झळकत असल्याचा सामान्य कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. खुद्द दिल्लीत नितीन गडकरींसारखे अपवाद सोडले, तर भाजपच्या खासदारांनाही केंद्रातील मंत्र्यांपर्यंत सहजासहजी पोचता येत नाही व मंत्री भेटले तरी न केलेल्या कामाबद्दल ते सरळ ‘पीएमओ’च्या दिशेने बोट दाखवून सुटका करवून घेतात, हाही वारंवार अनुभव मांडला जातो. सत्ता मिळाली, की याप्रकारची लागण होतेच, असे मानले तरी भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री व नेत्यांच्या सहाय्यकांच्या बाबतीत या प्रकारच्या उन्मत्ततेचा वेग अक्षरशः विक्रमी असल्याचा या पक्षातल्यांचाच अनुभव आहे, हे वास्तव पक्षनेतृत्व कसे नाकारणार?
चांगल्या गोष्टी
या अधिवेशनातील काही चांगल्या गोष्टीही नोंदवाव्याच लागतील. व्यक्तिस्तोम शक्यतो टाळून दोन्ही दिवस ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’ हीच घोषणा कटाक्षाने देण्यावर भर दिसला. यानिमित्ताने आर्थिक (सुषमा स्वराज), राजकीय (नितीन गडकरी) व कृषी (राजनाथसिंह) असे तीन ठराव मांडण्यात आले. कृषीसाठी वेगळा ठराव मांडून मोदींनी, २०१९ मध्ये सत्ताप्राप्ती झाल्यास केंद्रात स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करण्याचीही चाचपणी केल्याचे दिसते. या तिन्ही ठरावांच्या भाषणांत सरकारच्या कामांचा वैचारिकतेशी असलेला संबंध दिसला, पण फक्त मुख्य वक्त्यांच्याच भाषणात! ‘धोका स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या नेतृत्वाच्या मागे नियतीही उभी राहते,’ असा सुविचार यानिमित्ताने ऐकण्यात आला. सुषमा स्वराज यांना दरिद्री-नारायणाचा आशीर्वाद आठवला. मात्र मोदींआधी केवळ अपघाताने बोलण्याची संधी मिळालेले अरुण जेटली यांचे भाषण व त्यांनी केलेली चतुःसूत्रीची मांडणी ही इतर २०-२२ भाषणांपेक्षा ठोस होती. अर्थात जेटली बोलण्यास उठले तेव्हा ‘मोदी-मोदी’चा जयघोष सुरू असल्याने त्यांचे भाषण कितीजणांना कळले हे समजण्यास वाव नाही.
जेटलींची चतुःसूत्री अशी - १. निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा आम्हीच निर्धारित करावा, २. मोदी सरकारने असे एकही काम केले नाही की ज्यामुळे देशाची मान खाली जाईल, ३. सारेच इच्छुक पंतप्रधान अशा स्थितीतील विरोधकांकडे भाजप नेतृत्वाच्या उंचीचा एकही नेता नाही, ४. तलाक व राममंदिरासारख्या मुद्यांबरोबरच सरकारच्या पाच वर्षांतील लोककल्याणकारी कामकाजाची व वेगवान अर्थव्यवस्थेची माहिती लोकांना बारकाईने द्यावी, असे ठोस मुद्दे जेटली यांनी मांडले. जेटलींना बोलण्यास सांगितले ती खरे तर ‘स्टॉप गॅप’ व्यवस्थाच होती. कारण मोदींच्या भाषणाची व लखनौत अखिलेश-मायावतींच्या पत्रकार परिषदेची वेळ क्लॅश झाल्याने मोदींचे भाषण लांबत गेले. इतक्या देदीप्यमान भाजप नेतृत्वाला खरे तर एखाद्या राज्यातील विरोधकांची एवढी धास्ती वाटायलाच नको...
उक्ती व कृतीत बदल
सोळा राज्ये, शेकडो पंचायती, हजारो ग्रामपंचायती, १४०० च्या वर आमदार, १२ हजारांहून जास्त सरपंच इतकी मोठी सत्ता-शक्ती हाती असलेल्या भाजपच्या वरच्या फळीमध्ये तीन राज्यांच्या निवडणुकीनंतर घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसते. त्याचे निराकरण करून ‘बूथ आपला तर विजय आपलाच’ या संदेशाची नांगरणी करण्यासाठी ही परिषद होती की मोदींनंतर कोणत्या भाजपनेत्याला पक्षाचे केडर सर्वाधिक डोक्यावर घेते याची संघाच्या मनात असलेली ‘चाचपणी’ करण्यासाठी ती उपयुक्त ठरली, याचे उत्तर काळच देईल. पण मोदी-शहा यांच्या वक्तव्यांतून समोर दिसणारे वास्तव हे, की २०१९ मधील विजयाबाबतच्या धाकधुकीने भाजप नेतृत्वाची उक्ती व कृती यांची दिशा तात्कालिक का होईना जरूर बदलल्याचे दिसून आले. तीन राज्यांच्या निवडणुकीनंतर घेतलेला शहामृगी पवित्रा सोडताना शहा यांनी, ‘तेथे विरोधक जिंकले असले तरी आपला पराभव झालेला नाही,’ असे सांगितले. हा शब्दांचा खेळ झाला व तो संघाच्या बौद्धिकांमध्येच शोभून दिसतो. भाजपच्या कोअर मतपेढीसाठी एकीकडे भावनेला साद घालणारे मंदिरासारखे मुद्दे छेडायचे व दुसरीकडे हाती असलेली सारी साधने, यंत्रणा व शक्तीचा वापर करून विरोधकांशी मुकाबला करायचा या दोन पातळ्यांवर भाजपची निवडणूक प्रचार गाडी धावण्याची चिन्हे आहे.
गांधी-आंबेडकरांच्या या देशात ‘काँग्रेसमुक्त भारत’सारखी भाषा तसेच ‘भाजप एके भाजप’ हा विचार चालूच शकत नाही हे वास्तव आहे. तीन राज्यांतील निकालांनी ते अधोरेखित केले. संघनेतृत्वाने विज्ञान भवनात कितीही ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’चा राग आळविला तरी ७० वर्षांनीही शाखेवर भारताचा तिरंगादेखील न स्वीकारणाऱ्या या संघटनेचा ‘मूळ विचार’ तर देशातील बहुजनांना कदापि मान्य होण्यासारखाच नाही. संघाने आता राममंदिर उभारणी पूर्ण होण्यास २०२५ चा उच्चार करून डेडलाईनवर हळूच कोलांटउडी मारली आहेच आणि शंभरीच्या उंबरठ्यावरील संघासाठी २०२५ इतका महत्त्वाचा मुहूर्त कोणता असणार?
दुसरीकडे विद्यमान नेतृत्वाची जादू ओसरते आहे हे लक्षात आल्यावर नवे नवे पत्ते बाहेर काढण्याचा सपाटा सुरू झाला आहे. रामदास आठवले म्हणाले होते तसे जन धन खात्यांमध्ये हळूहळू पैसे येण्यास सुरुवात झाल्याचेही वृत्त आहे. मोदींचे व्यक्तिमत्त्व हे आघाडी सरकार चालविण्याइतके लवचिक व पूरक नाही हे उघड सत्य आहे. साहजिकच स्पष्ट बहुमताची शक्यता धूसर होण्याची पुसट चिन्हे दिसताच आलेल्या धास्तावलेपणातून भात्यातील एकेक बाण निघायला सुरुवात झाल्याचे दिसते. ‘लक्षात घ्या, तुम्ही मायलेक व तुमचा जावई हे सारे जामिनावर बाहेर आहात,’ हा गांधी घराण्याला वारंवार मिळणारा इशारा, गुजरातमध्ये असताना दिल्लीने केलेला आपला छळ, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले यूपीए सरकार, बैठकीचे सूप वाजताच जेएनयू प्रकरणी आरोपपत्र भरण्याबाबत दिल्ली पोलिसांना अचानक आलेली जाग, अखिलेश यांच्याविरुद्धची चौकशी ही सारी विजयाबद्दल आश्वस्त असणाऱ्या नेतृत्वाची लक्षणे नाहीत... ‘अजेय’ भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मिळालेला हाही ठळक सांगावा होय.