समुद्राकाठचे देखणे ड्युनेडिन 

उदय ठाकूरदेसाई
बुधवार, 21 मार्च 2018

आडवळणावर

सकाळी सकाळी ताजंतवाने होऊन बसमध्ये बसल्यावर प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली, की काल पूर्ण दिवस ड्युनेडिन फिर फिर फिरलो. इतकं छान ड्युनेडिन पाहिलं. आज आता त्यापेक्षा वेगळं काय पाहणार? इतक्‍यात चक्रधर आणि गाइड अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारा बॉब बस चालवताना माईकवरून म्हणाला, ‘एका मिनिटांत कॅसिनो येईल. जुगार कुणाला खेळायचाय?’ बॉबच्या प्रश्‍नावर सर्व प्रवाशांचा एकमुखी नकार आला. बॉब म्हणाला, ‘ठीक आहे. आपण पेंग्विन प्लेस बघायला जाऊया.’ 

प्रवाशांत चुळबुळ सुरू झाली. काही म्हणाले, ‘पेंग्विन काय बघायचे?’ तर काही म्हणाले, ‘पिवळ्या डोळ्यांचे पेंग्विन आपण कधी बघणार? आलोच आहोत तर जरूर जाऊया..’ हो-ना करता करता आम्ही पेंग्विन प्लेसला जायला तयार झालो. 

थोडं विषयांतर करून सांगायचं तर मलादेखील असं वाटतं की ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं सगळं स्थलदर्शन टिकमार्क केल्यासारखं बघायलाच हवं असं दडपण आपल्यावर नसावं. त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाच्या न वाटणाऱ्या परंतु अति दर्जेदार परंतु वेळखाऊ सफारीदेखील आपण केल्या पाहिजेत. त्या आपल्याला कशा वाटतात तो भाग वेगळा. परंतु आपल्याला अशा ऐकीव बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या सफारीतच कधीकधी अवर्णनीय आनंदाचे क्षण वेचता येऊ शकतात. 

आमच्या बसने ड्युनेडिन पाठी सोडलं. शहराला वळसा मारून ड्युनेडिनच्या दुसऱ्या अंगाने जाता जाता आता वेगळा नजारा दिसायला लागला. ड्युनेडिन स्टेडियम, छोट्या छोट्या टेकड्या यांना वळसे मारत मारत आम्ही नयनरम्य अशा हॅरिंग्टन पॉइंट रस्त्यावर आलो. इथे प्रशांत महासागराचे अप्रतिम दर्शन होऊन सगळे स्तंभित होऊन गेले. हिरव्या-निळ्या पाण्याची काय भूल पडते त्याचे प्रात्यक्षिकच जणू नागमोडी वळणाच्या रस्त्यालगतच्या प्रशांत महासागराच्या पाण्याने दाखवून दिले. आम्ही तंद्रीत असतानाच बसमधून उतरण्याचा इशारा झाला. आम्ही सर्वजण वाहत्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर उतरलो. इथून दोन खासगी टेंपोमधून आम्हाला पेंग्विन प्लेसमध्ये नेणार असे सांगण्यात आले. 

खरे तर इथूनच आमची स्वप्नील सफर सुरू झाली... अतिसुंदर स्वच्छ हवा. दोन्ही बाजूच्या टेकड्यांना घातलेल्या कुंपणाआड मोठ्या आरामात चरणाऱ्या गुबगुबीत मेंढ्या. हिरव्या रंगांच्या ७-८ छटांनी लक्ष वेधून घेणारी दूरवर पसरलेली हिरवळ. झुडुपं. निळ्या आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणारा समोर पसरलेला अथांग प्रशांत महासागराचा तेवढाच गर्द निळा रंग. अहाहा!! गाडीला एसी नसल्यामुळे, खिडक्‍या बंद नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे कच्च्या रस्त्यामुळे समोर दिसणाऱ्या निसर्गचित्राला एक वेगळाच आयाम मिळाला. सर्वच प्रवाशांचे डोळे तृप्त झाले. माझ्यापाठी बसलेले दोघेजण तर एवढे खुश झाले, की या एरियातच दिवसभर फिरवत राहा म्हणाले!! इतका सुंदर प्रवास संपतोच. तसा तो संपला आणि आम्ही पेंग्विन प्लेसच्या उत्कृष्ट प्रवेशद्वारातून आत शिरण्यास तयार झालो. गाइड म्हणाली, ‘पेंग्विन प्लेस हे केंद्र तुमच्यासारखे पर्यटक जे देणगीमूल्य देऊन येतात त्यातून येणाऱ्या पैशाच्या (डॉलर्सच्या) बळावरच चालते. हॉवर्ड मॅकग्रॉदर यांनी १९८५ मध्ये हे केंद्र सुरू केले. इथे पिवळ्या आणि निळ्या डोळ्यांच्या पेंग्विनना जपतात. ते आजारी असले तर त्यांची शुश्रूषा करतात. मुळात पेंग्विन आजारी असले तर त्यांना विसावा मिळेल अशी जागा आम्ही प्रशांत महासागराजवळ घेतली आहे. असा प्रकल्प राबवणारी ही जगातली एकमेव संस्था आहे. त्यामुळे तुम्ही आपसांत मोठ्याने बोलू नका. दोन आजारी पेंग्विन इथे आले आहेत. त्यांची पिसे रोज झडताहेत. मोठ्याने बोलून त्यांना त्रास देऊ नका.’  गाईडपाठोपाठ छोटुकला ट्रेक करत आम्ही निसर्गनवलाई अनुभवत होतो. परंतु आमच्या दुर्दैवाने तिथे आमच्याबरोबर भारतातून आलेला, सतत खाण्यात मग्न असणारा आणि मोठ्यानेच बोलू इच्छिणारा दुसरा एक ग्रुप आलेला होता. तो संपूर्ण ग्रुप गाईडचे बोलणे हसण्यावारी नेऊन टिंगल करण्यापर्यंत धीट झालेला होता. अखेर गाईडने त्यांना झापले आणि आम्हाला मात्र त्या दोन आजारी पेंग्विनना पाहण्यासाठी लपणकेंद्रात चोरपावलाने जायला सांगितले. आम्ही चोरपावलाने लपणकेंद्रात आलो. तिथे कोरून ठेवलेल्या ४ खुल्या चौकटीतून दोन पिवळ्या डोळ्यांच्या पेंग्विनचे यथेच्छ दर्शन घेऊन, पुन्हा छोटा ट्रेक करून मुख्य रस्त्यावर आलो. 

आमच्या बसमध्ये लगेच चर्चा सुरू झाली, की असे आजारी पेंग्विन बघून काय फायदा? सगळा दिवस फुकट गेला. वगैरे वगैरे. बसमधील अस्वस्थता वाढत असतानाच चक्रधर आणि गाइड बॉब म्हणाला, ‘तुमची निराशा घालवायला आपण एक काम करूया. कार्यक्रम पत्रिकेत नसलेल्या परंतु अतिरम्य असलेल्या रॉयल अल्बाट्रॉस सेंटरला भेट देऊया.’ 

या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे ती ही, की अगदी अचानकपणे ठरलेल्या या कार्यक्रमामुळे मला मात्र विलक्षण आनंद झाला. एकतर आजवर अल्बाट्रॉस पक्षी मी प्रत्यक्षात बघितला नव्हता. केवळ चित्रात आणि ‘साजणवेळा’ या कवी ग्रेस यांच्या कवितेवर आधारित असलेल्या सीडीतील निवेदनावरून अल्बाट्रॉस या पक्ष्याच्या लांब पंखांची वगैरे कल्पना मनात होती. त्या पक्ष्याला आयताच बघायला मिळणार यामुळे खूष व्हायला झाले. खुशीचे दुसरे कारण म्हणजे रस्ता. पेंग्विन प्लेस ते अल्बाट्रॉस सेंटर हा केवळ साडेतीन किमीचा रस्ता एरवी पाच मिनिटांतच कापला गेला असता. परंतु हा छोटासा रस्ता इतका सुंदर, इतका विलोभनीय आहे की या रस्त्यावर ना चक्रधराला गाडी जोरात रेटावीशी वाटत, ना प्रवाशांना लवकर पोचण्याची घाई असते! 

दोन्ही बाजूला प्रशांत महासागराची दिसणारी निखळ अद्वितीय रूपे, अंगावर शिरशिरी उठवून बेभान करणारा अवखळ वारा, सेंटरचा जोरदार फडकणारा उंच झेंडा, पूर्ण परिसरात गालिच्यासारखी पसरलेली हिरवळ आणि डोक्‍यावर थोड्याशा उंचीवर फिरणारे अल्बाट्रॉस! अशा बेभान वातावरणात प्रवाशांची पावले अडखळलीच! परंतु त्याचे कुणाला नवल वाटले नाही. 

अति थंड वातावरणामुळे गंमत झाली. प्रवाशांच्या कानटोप्या बाहेर आल्या. हात खिशात गेले. मोकळ्या वातावरणात रमणारे ‘आत सेंटरमध्ये जाऊ’ म्हणाले. सेंटरच्या आत चांगले उबदार वातावरण होते. अल्बाट्रॉस सेंटरमधील कर्मचारीसुद्धा खूपच अदबशीर होते. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांच्याकडे होती. एका कर्मचाऱ्याने आम्हाला विचारले, ‘दोन मिनिटांत शेवटची बॅच अल्बाट्रॉस टूरवर निघतेय. तुम्ही जाणार का?’ आम्ही आणखी दीड तास थांबून ती टूर करून परतण्याएवढा वेळ हाताशी नसल्याने आम्ही जवळचेच अल्बाट्रॉस म्युझियम पाहून माहितीपत्रके घेऊन पाऊणएक तासात बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फेरफटका मारायला आलो. आता गारठा चांगलाच वाढला होता. जवळच्या शक्तिशाली दुर्बिणीतून अल्बाट्रॉसचे मनसोक्त दर्शन घेता आले. समुद्राकाठच्या कुंपणाजवळच्या रपेट मारण्याजोग्या रस्त्याने आम्ही काही जणांनी उत्कृष्ट रपेट मारण्याचा आनंद अनुभवला. थंडी वाढत होती. बोलणाऱ्याचा आवाज बंद करीत होती. किनाऱ्याकाठचे शेवाळे धडकणाऱ्या लाटेसरशी, लाट ओसरताना विविध आकृत्या निर्माण करीत होते. आकाशात उंचीवर उडणाऱ्या अल्बाट्रॉस पक्ष्यांचे बरेच फोटो काढले. पुरेशा प्रकाशाअभावी आणि मोठी झूम नसल्याकारणाने मनाजोगे फोटो घेता आले नाहीत. परंतु १० - १२ फूट पंख असलेले अल्बाट्रॉस दिसतात कसे? हे (दुर्बिणीतून) बघण्यात बराच वेळ गेला. 

उजवीकडे अथांग दिसणाऱ्या प्रशांत महासागराचा अप्रतिम नजारा डोळ्यांनी अक्षरशः पिऊन घेतला. समोरच्या दृश्‍यावरून नजर हटत नव्हती. परंतु डावीकडे मन वळवून पाहिले, तर बसमधील सहप्रवासी हाताने खुणा करून आम्हाला बोलावीत होते. नाइलाजाने निघालो. आणि बसमध्ये येऊन बसलो. 

परदेशातील पर्यटनामध्ये दरवेळी बऱ्याच गोष्टी अर्धवट बघण्यात अर्थ नाही. दोन गोष्टी धड अनुभवल्या तरी केवढेतरी वेगळेपण अनुभवता येते, खूप आनंद गाठीशी बांधता येतो. न्यूझीलंडमधील ड्युनेडिन प्रांतात आणि ड्युनेडिनमधील हॅरिंग्टन रस्त्यावरील भागात सफर केली असता वरील वाक्‍याची प्रचिती येते.

कसे जाल? 

  • ड्युनेडिन - पेंग्विन प्लेस = २८ किमी - पाऊणतास
  • पेंग्विन प्लेस - रॉयल अल्बाट्रॉस सेंटर = ३.५ किमी - १० मिनिटे. 

काय पाहाल? 
    दोन्हीही ठिकाणचा समुद्राकाठचा महाअप्रतिम नजारा. पेंग्विन प्लेस येथे पेंग्विन बघण्यासाठी आणि रॉयल अल्बाट्रॉस सेंटर येथे अल्बाट्रॉस पक्षी बघण्यासाठी खास टूर्स उपलब्ध आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या