लोभस आंबवडे 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आडवळणावर
 

समुद्र आवडणाऱ्या नाशिक, सातारकर, पुणेकर पर्यटकाला, मुंबई-नालासोपाऱ्याजवळचे कळंब जितके आडवळणावर आहे तितकेच, डोंगर आवडणाऱ्या मुंबईकर पर्यटकाला भोरजवळचे आंबवडे हे ठिकाण आडवळणावरचे आहे. माझ्या बाबतीतला आनंदाचा योगायोग असा, की एकदा सहज म्हणून भेट दिल्यावर आंबवड्याच्या मी प्रेमातच पडलो.. आणि त्यानंतर ट्रेकिंगच्या निमित्ताने बऱ्याच फेऱ्या आंबावड्याला मारता आल्या. मजा म्हणजे सर्व फेऱ्या या पावसात मारलेल्याच होत्या. तीन वेळा तर बरोब्बर १५ ऑगस्टचाच मुहूर्त धरून फिरणे झाले. 

खरे तर बरीच वर्षे ट्रेकिंग करूनसुद्धा आंबावड्याविषयी माहिती नव्हती. कारण आंबवड्याला यायचे तर मुंबईहून चांगलीच वाकडी वाट करून यावे लागते. त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षातले कर्जत-लोणावळा-नाशिक परिसरातले किल्ले बघून झाल्यावर मग आंबवड्याचा परिचय झाला. तो किस्सा मात्र वेगळाच आहे... भोर येथे शिकत असणाऱ्या भाचीला भेटण्यासाठी म्हणून आम्ही रेल्वेने पुण्याला आणि तेथून काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीने भोरच्या रस्त्याला लागलो. पुणे-सातारा हायवेवरून भोरला जाण्यासाठी उजव्या हाताच्या फाट्यावर वळलो, की जणू शहराशी संपर्क तुटून वेगळ्या प्रांतात आल्याचे आपल्याला वाटायला लागते. सभोवारच्या हिरवाई पाहून, आपण आनंदून चित्कारताना, टॅक्‍सीचालक, या भोर परिसरात बऱ्याच मराठी-हिंदी चित्रपटांची चित्रीकरणे झाल्याचे सांगतो; तेव्हा फार आश्‍चर्य वाटत नाही. कारण आपण आपल्या मनाशीच म्हणतो, अशा निसर्गरम्य वातावरणात कोणाला ‘शूट’ करावेसे वाटणार नाही? भाटघर धरण बघून आनंद नाही झाला तरच नवल! अशी एक-एक आकर्षणे पाहात आम्ही भोर मुक्कामी पोचलो. दुपारी जेवताना, ‘भोरच्या आसपास बघण्यासारखे काय आहे?’ असा प्रश्‍न विचारताच भाचीने ‘आंबवडे’ असे उत्तर दिले होते. तेव्हा मी प्रथम आंबवड्याचे नाव ऐकले. जेवणानंतर आंबवड्याला भेट द्यायचा कार्यक्रम तत्काळ ठरला.. आणि आम्ही भोरवरून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेल्या आंबवड्याला जाऊन पोचलो. 

दीड हजार लोकवस्तीच्या आंबवडे गावातून तेथील प्रसिद्ध नागेश्‍वर मंदिरात जाण्यासाठी एक झुलता पूल आहे. त्यावरून भोवतालचा परिसर न्याहाळत जाताना जी गंमत येते तिथपासून आपली आंबवडे सफारीची सुरुवात होते. झुलत्या पुलावरून रमत-गमत, झुलत-झुलत, शेवाळे धरलेल्या निसरड्या रस्त्यावरून भोर संस्थानाचे संस्थापक शंकरजी नारायण सचिव यांची समाधी बघून पायऱ्या उतरत पांडवकालीन नागेश्‍वर मंदिर बघायला गेलो. मंदिरात काळाकुट्ट अंधार होता. फक्त महादेवाच्या मूर्तीजवळ समई तेवत होती. ही अडचण वाटण्याऐवजी आमच्या आनंदात उलट भरच पडली. नीरव शांतता अनुभवता आली. बाहेर आल्यावर पुजाऱ्यांकडून कळले, की हे पांडवकालीन मंदिर पश्‍चिमाभिमुख आहे! मंदिराजवळच्या पंचगंगा कुंडातले पाच नद्यांचे पाणी विहिरीत जाते आणि तेथून जवळच्या गावांना पाणी मिळते, असे बरेच काही ऐकले. मंदिराजवळच्या ओढ्याने नदीचे रूप धारण केले होते आणि ती ओढारूपी नदी पावसात दुथडी भरून वाहताना, काठावर बसलेल्या पर्यटकांना, गावकऱ्यांना खुश करीत होती. आम्ही भोरच्या जवळपास काय आहे म्हणून गेलो होतो; परंतु आंबवड्याने पहिल्याच भेटीत आम्हाला वेड लावले ते असे! 

त्यानंतर पावसात मित्रमंडळींबरोबर पुन्हा एकदा सहज म्हणून भोर-आंबवडे-बनेश्‍वर ही रम्य सफर झाली. पुण्यातल्या मैत्रिणीकडे आम्हा मित्र-मैत्रिणींचे जमणे ठरले, की त्यात रात्री गप्पा मारून दुसऱ्या दिवशी भोर-आंबवडे-बनेश्‍वर या कार्यक्रमाचा हटकून अंतर्भाव असायचा! 

वरील घटनांनंतर केवळ योगायोगाने तुषार मोडक या ट्रेकर मित्राने आपण १५ - १६ ऑगस्टला आंबवडे जवळच्या नाझरे गावातून वेगळ्या वाटेने रोहिडा ट्रेक करूया, असे सांगताच, बॅंकेतल्या मित्रांसह स्वाती आणि मी पुन्हा एकदा आंबवड्याला जायला तयार झालो. 
मुंबईतून दोन गाड्यांतून रात्रीचे निघून भल्या पहाटे आंबवड्याला पोचलो. उत्कृष्ट मिसळपावाचा जोरदार नाश्‍ता करून, अगदी लागूनच असलेल्या नाझरे गावात आलो. तिथे शाळेच्या पटांगणात १५ ऑगस्टचे ध्वजवंदन सुरू होते. त्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन,चिमुरड्यांना टाटा केला आणि नाझरे गावातून डोंगर चढायला सुरुवात केली. थोडेसे चढून बाजूला पाहिल्यावर आंबवड्याचा परिसर पाहून अक्षरशः वेडे व्हायला झाले. आंबवडे परिसरालगतचे दोन हिरवेगार डोंगर पाहून खूप आनंद झाला. रस्त्यावरून गाडीतून जाताना बाजूला असे डोंगर आहेत हे नीटसे कळत नाही. ते अद्‌भुत सौंदर्य बघून सगळ्यांची बोलतीच बंद झाली. हिरवाई, हिरवा शालू, काय वाट्टेल ते बोलले तरी समोर जे दिसतेय त्याचे वर्णन करता येईना. सगळ्या उपमा, सगळे भाषिक अलंकार थिटे पडू लागले डोंगर चढताना! 

डोंगरावर डुलणारी गवताची पाती आमच्याशी जणू हितगूज करू पाहत होती. भेटायला आलात म्हणून स्वागतच करीत होती जणू! 
कचऱ्याचा लवलेशही नसलेला तो पूर्ण प्रांत हल्लीच्या बोलीभाषेत ‘फॉरिनमध्ये असल्याचा आभास निर्माण करणारा होता.’ 

पावसांत ट्रेकिंग करणाऱ्या ट्रेकर्सना या हिरवाईचेच अप्रूप असते. सर्वत्र हिरवेगार पाहिल्यावर वयस्क, तरुण झाले. तरुण, बालयुवा झाले.  आम्ही १५ जण इतके हरखून गेलो, की साहित्यात वर्णिलेल्या हिरव्या रंगांच्या ३९ छटा वगैरे सांगितले, वाचले ते खरे असेल नाही? याची चर्चा करण्यापर्यंत उत्साही ट्रेकर्सची मजल गेली. डोंगरावरच्या त्या हिरवाईवर आमच्यातला एक जण ‘रेडकू’ काढते तो आवाज इतका अप्रतिम काढायचा, की त्याने काढलेल्या आवाजानंतर डोंगरावरचे रेडकूही कान टवकारून प्रतिसाद द्यायला लागले. रोहिड्यावरून परतताना पाऊस सुरू झाला. धुक्‍यांचे ढग येऊ लागले. आम्ही स्वप्नात आणि वास्तवात न्हाऊन निघालो.. आणि नाझरे गाव यायच्या आत पाऊस अचानक गायब झाला. उन्हाचा खेळ सुरू झाला. मित्राच्या भाषेत ‘उनपाऊस’ चित्रपटाचे शूटिंग संपवून आम्ही पुन्हा आंबवडे गाठले आणि तेथून मग पुढे कोरले गावी गेलो. 

वरील ट्रेकनंतर काही वर्षांनी भोर-आंबवडे-बनेश्‍वर-रायरेश्‍वर असा दौरा करताना युवा फोटोग्राफरबरोबर खास फोटोग्राफीसाठी दौरा करायचे ठरले. साहजिकच, रायरेश्‍वरचा छोटासा चढ सोडला तर सगळा ‘फोकस’ हा फोटो काढण्यावरच केंद्रित होता. त्यामुळे साहजिकच निसर्गदृश्‍यांजवळ, विशेष लक्षणीय गोष्टींजवळ गाडी थांबू लागली. त्यावेळी नागेश्‍वर मंदिर परिसरात पाण्यातल्या सापाचा फोटो मिळाला. त्याचप्रमाणे आंबवडे यायच्या अगोदर आणि आंबवड्याच्या थोडेसेच पुढे, दिसणारी निसर्गचित्रे पाहून खूप आनंद झाला. सहल म्हणून गेलो, ट्रेकसाठी गेलो आणि केवळ फोटोशूटसाठी गेलो... अशा बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींसाठी आंबवड्यात फिरताना खूप मजा आली हे खरे. 

पावसात घराबाहेर पडणे हीच खरी धमाल असते. त्यात तुमचे पाय एकदा का आंबवड्याला लागले, तर परत कधी ना कधी तरी तुमचे पाय आंबवड्याच्या दिशेने वळतील हे मात्र नक्की!

कसे जाल? 
बस, एसटी, खासगी वाहन, टॅक्‍सी आणि भोरवरून जायचे असल्यास रिक्षा अशा अनेक मार्गांनी तुम्ही आंबवड्याला भेट देऊ शकता. 

अंतर 
पुणे-भोर ५६ किमी - दीड तास. 
मुंबई-भोर २०० किमी - ४ तास. 
भोर-आंबवडे १० किमी - वीस मिनिटे. 

काय पाहाल? 

  • आंबवडे परिसरात बरीच मंदिरे आहेत. त्यात नागेश्‍वर मंदिराचा प्रमुख उल्लेख करावा लागेल. आंबवडे गावातून मंदिराकडे जाण्यासाठी 
  • वापरात असलेला झुलता पूल हे गावाचे प्रमुख आकर्षण आहे. नागेश्‍वर मंदिराजवळून वाहणारा ओढा पावसात नदीचे रूप धारण करतो. 
  • आंबवड्याहून जवळच्याच नाझरे गावातून रोहिड्याला जाता येते. आंबवड्याहून पुढे कोर्ले गावात जाऊन केंजळ आणि रायरेश्‍वरलादेखील जाता येते. 
  • घुमक्कडांसाठी आंबवडे हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. 

    
याशिवाय जवळच्या भोर गावातला राजवाडा, भाटकर धरण, काळूबाई मंदिर, पुणे-सातारा हायवेवरच्या नसरापूर फाट्यावरचे बनेश्‍वर अशी अनेक रम्य ठिकाणे भेट देण्याजोगी आहेत. 
कधी जाल? 
पावसाच्या दिवसात आंबवड्याचे सौंदर्य दृष्ट लागण्याइतके सुंदर असते. श्रावणात ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर आंबवड्याला जाण्याचा सर्वोत्कृष्ट काळ म्हणता येईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या