कोयना आणि सातारा परिसरातील सौंदर्यलेणी!

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

आडवळणावर
 

एके दिवशी सकाळी कोयना धरण भरल्याची बातमी वाचून, ‘कोयना धरण बघायला जाऊया का?’ असं स्वातीला नुसतं विचारायची खोटी, आम्ही लगेच साताऱ्याला जायच्याच तयारीला लागलो. आमच्या या अशा मनात आल्यावर चटकन निघण्याला चक्रधर ज्योतिबा ग्राम्य भाषेत ‘झटका टूर’ म्हणतो. मी आणि स्वातीनं अशा बऱ्याच ‘झटका टूर्स’ केल्या आहेत. तर, निघायचं म्हटल्यावर असं ठरलं की, कोयना धरण बघून साताऱ्यात थांबू. दुसऱ्या दिवशी साताऱ्यातली स्थळं बघून परतू, असा साधा बेत होता. मजा म्हणजे प्रथमच साताऱ्याला जात असल्यानं केवळ एक नकाशा तेवढा हाताशी होता आणि नाही म्हणायला सज्जनगड आणि ठोसेघर ही दोन महत्त्वाची पर्यटनस्थळं माहिती होती. शक्‍य झालं तर गोवा-कर्नाटक ट्रेकमध्ये दोस्त झालेल्या रमेश भिडे या सातारकर मित्राला भेटून पुढचं पुढं ठरवू, असं म्हणून मुंबईहून स्वाती, मी आणि ज्योतिबा निघालो. ऐनवेळी वाटेत उंब्रजजवळच्या चाफळमधील श्रीराम मंदिर बघून मग कोयना धरणावर जाऊ असं ठरलं. सकाळी सात वाजता मुंबईहून निघून सव्वा अकरा वाजता सातारा आणि १ वाजता उंब्रजमार्गे चाफळला जाऊन पोचलो. उंब्रज फाट्यावरून उजवीकडच्या वळणावरून छोट्या रस्त्यानं चाफळ गाठताना प्रवासाची गती चांगलीच धीमी झाली. आम्ही मंदिरात पोचेपर्यंत शांत परिसरानं आम्हाला आपलंसं करून टाकलं. 

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चाफळ मंदिराबाजूनं उत्तरमांड नदी वाहते. हळुवार थंड हवेचा प्रसाद देणाऱ्या ताज्या हवेनं आम्हाला मंदिराच्या कठड्याजवळ अलगद आणून बसवलं जणू! वेगळ्याच उत्साही मनानं आम्ही मंदिर परिसराबाहेर न्याहाळू लागलो. एक शेतकरी आपल्या बैलजोडीला प्रेमानं अंघोळ घालून त्यानंतर घंटांच्या किणकिणाटात त्या बैलजोडीला घेऊन चालला होता. दुसरा एक शेतकरी लाकडाचा ओंडका ढोपरभर पाण्यातून पैलतीरी नेण्यात व्यग्र होता. मंदिराच्या बाहेरील परिसरात ही निसर्गचित्रं बघताना गुंगून जायला झालं. मग दर्शन घेताना गुरुजींकडून चाफळ परिसराबाबत अनायासे कळलं, की समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुती मंदिरांपैकी ४ मारुती मंदिरे चाफळ परिसरात आहेत. चाफळमधील मंदिर परिसर बघून आम्ही गाडीत बसलो आणि पावसाला सुरुवात झाली. सुंदर अशा हलक्‍या पाऊसधारांत शेतकरी पेरणीची कामं करीत होते. चारा आणि पाणी भरपूर असल्यानं गाई-म्हशी निवांत चरत-फिरत होत्या. आम्हीदेखील डोळे भरून ते दृश्‍य पाहात असल्यानं कोयना धरणापर्यंत कधी जाऊन पोचलो ते कळलंच नाही. ज्यांना पावसाळ्यात निसर्ग बघायला आवडतो त्यांनी जरूर पाटण-कोयना परिसरात फेरफटका करायला हवा. 

आता मजा पाहा. चिपळूणवरून कोयना ४३ किमी. म्हणजे मुंबई - कोयना ३१३ किमी. त्याऐवजी एक्‍सप्रेसवेनं तुम्ही सातारा २६३ किमी, पुढं उंब्रज ३५ किमी, मग पाटण १६ किमी, पुढं कोयना २२ किमी असं ३३६ किमीचं अंतर फार जलद पोचता. कोयना धरणाजवळ छानसं नेहरू उद्यान आहे. तिथं ‘कोयना धरणाचा फोटो काढू नका’ असं म्हटल्यामुळं कोयना धरणाचा फोटो काढता आला नाही. मग आता काय करायचं, असा प्रश्‍न पडल्यावर समोर चहाची टपरी दिसली तिथं गेलो. टपरीचे मालक देसाई यांना ‘जवळ बघण्यासारखं काय आहे?’ असं विचारल्यावर त्यांनी ‘नवजा’ धबधबा बघायला सांगितला. त्यामुळं चहा पिऊन झाल्यावर आम्ही नवजा धबधबा बघायला गेलो. कोयनापासून ५ किमी अंतरावर ‘औषधी वनस्पती संवर्धन केंद्र, नवजा, ता. पाटण, कोयना अभयारण्य’ असा मोठा फलक असलेल्या नवजाच्या कमानीखालून धबधब्याचं छायाचित्र घेऊन आम्ही धबधबा पाहायला निघालो. दुरून धबधबा दिसतो तो अर्धा आहे. खाली कोसळणारा अर्धा दुसरा धबधबा आणखीन वेगळाच आहे. पुऱ्या ताकदीनिशी कोसळत असल्यामुळं जरा जवळ जाताच आपल्या तुषारांनी तो तुम्हाला पुरता भिजवून टाकतो. जंगल खात्याच्या अखत्यारीतल्या या धबधब्याच्या दर्शनासाठी छानशी पायपीट करावी लागते. साडी नेसलेल्या बायका किंवा पायात स्लिपर घालून चालणारे पुरुष कदाचित धबधब्याजवळ पोचेपर्यंत कंटाळतील. कारण जळवा, निसरडा रस्ता आणि मोठमोठाले खडक धबधब्याच्या मुख्य दर्शनाच्या आड ठाम उभे असतात. तो अडसर पार करून जवळ गेलात, की मग मात्र तुम्ही खूप आनंदित होऊन जाता आणि हा सुंदर धबधबा पाहायला लावलेल्या प्रवेश फीमुळं काही क्षण वाटलेलं आश्‍चर्यही विसरून जाता. निसर्ग तुम्हाला भरभरून आनंद देतो हेच खरं! 

धबधब्याजवळच्या झाकोळलेल्या परिसरातून मुख्यद्वारापाशी आल्यावर संध्याकाळची भेट आवरती घेऊन सातारा गाठायला हवं असं ठरल्यानं साताऱ्याला जायला निघालो. साताऱ्यात पोचल्यावर हॉटेलात सामान टाकून रमेश भिडे या मित्राला भेटायला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी भिडे कुटुंबीयांसोबत सातारदर्शन करायचं नक्की झालं. 

सकाळी ८ च्या सुमारास आम्ही दोघं आणि भिडे कुटुंबीय असे ५ जण सातारादर्शनाला निघालो. भिड्यांना भेटल्यावर मागील ट्रेकच्या आठवणी निघणारच होत्या. परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अप्रतिम हिरवाईनं आम्हाला बोलण्यातून बाहेर काढून बाहेर बघायला भाग पाडलं असंच म्हटलं पाहिजे. साताऱ्याहून सज्जनगडला जायचा रस्ता एखादी चतुर ‘हरणटोळ’ डोळ्यासमोरून लखलखत जावी तसा हिरवाईतून लखलखत गेलेला दिसला. आम्ही अवाक होऊन ते समोरचं दृश्‍य पाहतच राहिलो. मनात विचार यायच्या आत चक्रधर ज्योतिबानं फोटोसाठी गाडी थांबवलीच. गाडीतून खाली उतरून गार वारा पिऊन सभोवारचा परिसर न्याहाळून (असं परदेशात करता येत नाही बरं का! तिथं गाडी एकदा सुरू झाली की रस्त्यात मधे थांबत नाही.) मग आम्ही सज्जनगडाच्या वाटेला लागलो. 

सातारा-सज्जनगड हा अवघा १७ किमीचा रस्ता आहे. परंतु अतिशय देखणा आहे. आठशे पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावर आल्यावर राममंदिर आणि अशोकवनातील समर्थांचा मठ अशा दोन जागांना भेट दिल्यावर तेथील निसर्गसंपन्न वातावरणामुळं अतीव शांततेचा अनुभव घेता येतो. गडावरून उमरोडी धरणाचं दर्शन घेऊन, पुन्हा आठशे पायऱ्या उतरून आम्ही ठोसेघरला जायला निघालो. 

ठोसेघरला जायचा रस्ता पुन्हा नागमोडी वळणांचाच आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असल्यानं ठोसेघरचं हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. या ठोसेघरमधला धबधबा खूपच लोकप्रिय आहे. मित्र रमेश भिडे यांनी नारळी नदीवर बांधलेला ठोसेघर तलाव दाखवला. मुख्य धबधबा २-३ ठिकाणांवरून, वेगवेगळ्या वाटांनी नेऊन दाखवलाच, शिवाय जवळून कोसळणारा हा धबधबा, पलीकडील तीरावरून, चाळकेवाडीतून किती छान दिसतो हे दाखवण्यासाठी आमच्याकडून मुद्दाम छानशी पायपीट करवून घेतली. मंडळी, मला वाटतं, तुम्हीदेखील यापुढं ठोसेघर धबधबा बघायला जाल तेव्हा धबधब्याचा मुख्य स्रोत, धबधबा कोसळतो ती जागा आणि पलीकडच्या (समोरच्या) चाळकेवाडीतून असा तिन्ही बाजूंनी बघूनच परत या. 

चाळकेवाडीतून ठोसेघर धबधबा मोठ्या रूपात, पूर्ण ताकदीनिशी दरीत कोसळताना दिसतो. दरीत कोसळणारा धबधबा, बाजूच्या कडेकपारीतून आनंदानं चित्कारणारे आणि धबधब्याच्या तुषारात न्हाऊन निघणारे पक्षी, हे दृश्‍य गर्दी नसलेल्या चाळकेवाडीतून बघणं हा अतिशय आनंदाचा भाग आहे. धबधब्याभोवती गोलाकार फिरण्याची आवर्तनं करणारे पक्षी, वाऱ्यानं उडणाऱ्या धबधब्यांच्या तुषारांत जेव्हा वारंवार भिजून एकच कल्ला करतात तो आपल्या आनंदाचा ठेवा होऊन जातो. याउपर प्रवासातल्या सुखाचा सर्वोत्तम क्षण तो कोणता? 

बरं ही आनंदयात्रा एवढ्यावर संपत नाही. चाळकेवाडीपाठी पवनचक्‍क्‍यांचा प्रदेश लागतो. त्या प्रदेशातून चालताना आपण आणखी आनंदित होतो. पवनचक्‍क्‍या लांबून लहान दिसत असल्या तरी अतिशयोक्त भाषेत त्याची मोटार जीपच्या आकाराची तर पातं ट्रकमधे टाकून नेण्याइतकं लांब! गावरान भाषेत सांगायचं तर पाती वारा कसा कापीत होती तर सान, सान असा आवाज काढून! वाटेत धुकं लागलं. सुरुवातीला मजेचं वाटणारं धुकं दाट होऊन गडद झालं. एकदम पुढं जाऊन कोयना बॅकवॉटरचं दर्शन घेऊन परतल्यावर समोरचं माणूस न दिसण्याइतपत धुकं गडद झालं. वातावरण भयाण होत चाललं तसं आम्ही आवरतं घेतलं. कारण कास तलाव बघून परतीचा प्रवास करायचा होता. त्यामुळं मग आम्ही कास तलाव बघायला निघालो. 

कास तलाव हे ठिकाणसुद्धा आवर्जून बघण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असं नामाभिधान कास पठाराला मिळाल्यामुळं पर्यटक कास तलावालादेखील भेट देत असले तरी मित्र रमेश भिड्यांनी वेगळ्या वाटेनं नेऊन अगदी धरणाच्या बंधाऱ्यावर चढून, मधोमध उभं राहून असा तो आम्ही विस्तीर्ण असा कास तलावाचा परिसर पाहिला. मग कास तलावाला सातारकर ‘साताऱ्याचं नैनिताल’ का म्हणतात किंवा कास तलावाला ‘मिनी महाबळेश्‍वर’ का म्हणतात, याचा उलगडा झाला. अर्थात तलावाजवळ भरपूर ‘काचा’ दिसल्यानं सातारकर विनोदानं या तलावाला ‘काच तलाव’ म्हणतात हेदेखील कानावर आलं. कास तलाव बघितल्यावर भिडे कुटुंबीयांना साताऱ्याला सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

विशेष 
घुमक्कडांसाठी कोयना-सातारा परिसर फिरण्यासाठी आदर्श ठरावा. साताऱ्यातील अजिंक्‍यतारा, काशी-विश्‍वेश्‍वर मंदिर परिसर, राजवाडा, खिंडीतील गणेश, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेली केदारेश्‍वर आणि विरुपाक्ष ही प्राचीन मंदिरे, सज्जनगडापासून २५ किमीवरील जरंडेश्‍वर मारुती, उमरोडी धारण, ठोसेघर अगोदर लागलेल्या ‘मालदेव’ गावातून मारलेला फेरफटका इत्यादी ठिकाणांना भेट दिल्यास लक्षात राहण्याजोगी तुमची सहल होऊन जाईल.

कसे जाल? 
मुंबई-बंगलोर महामार्गावरून उंब्रजवरून उजव्या हाताच्या फाट्यावर चाफळ, मग पाटण आणि कोयना परिसर बघून साताऱ्यात मुक्काम करावा. दुसऱ्या दिवशी साताऱ्यातील स्थलदर्शन करून परतीचा प्रवास सुरू करावा. हे सारे आडवळणावर असल्यानं खासगी वाहनानं प्रवास करणंच इष्ट ठरेल. 

  •  मुंबई - सातारा : २६३ किमी. 
  •  पुणे - सातारा : ११० किमी. 
  •  सातारा - सज्जनगड : १७ किमी. 
  •  सातारा - कास : ३० किमी. 
  •  सातारा - ठोसेघर : २४ किमी. 
  •  मुंबई - उंब्रज : २९० किमी. 
  •  उंब्रज - चाफळ : ८ किमी. 

काय पाहाल? 

  • चाफळ येथील राममंदिर, पाटणच्या वाटेवरील निसर्ग, कोयना धरण परिसर, नवजा धबधबा, ठोसेघर धबधबा, सज्जनगड, कास तलाव. 
  • सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध कास पठारावरील फुलं पाहायला पर्यटकांची खूप गर्दी होते. 

कुठे राहाल? 

सातारा शहरात तुमच्या बजेटप्रमाणं राहण्याची उत्तम सोय आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या