आगळे सिमला, कुलू, मनाली 

उदय ठाकूरदेसाई
मंगळवार, 11 जून 2019

आडवळणावर...
 

तुम्हाला सिमला-कुलू-मनालीतील निसर्गसौंदर्य पाहायचे असेल, तर वरील तीन शहरे सोडून त्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशात फिरावे लागेल. पर्यटक विमानाने तडक चंडीगड किंवा भूंतर गाठून, सिमला-कुलू-मनाली या शहरांत फिरतात. फार फार तर चैल-कुफ्री-मशोबरा-रोहतांगपास अशी नेहमीची ठिकाणे फिरतात आणि बर्फवृष्टीचा अनुभव गाठीशी असल्यास फार यशस्वी दौरा झाल्याचे समाधान मानतात आणि परततात. परंतु खरी मजा, खरी गंमत, त्यापलीकडे जाण्यात आहे. कशी ते सांगतो... 

तुम्हाला शहरापासून लांब जायचे असेल, शरीराचा आणि मनाचा ‘ताल’ धीमा करायचा असेल आणि खरोखरीचा उत्कट आणि उत्कृष्ट निसर्ग पाहायचा असेल, तर तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात वेगळेपण असायला हवे. युवापिढीच्या भाषेत असे खास ‘अनवायंडिंग’ होण्यासाठी म्हणून तुम्ही हिमाचलमध्ये गेलात, की फक्त एकदाच त्या प्रदेशात पाय ठेवायचा अवकाश, तुम्ही तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडताच. हिमालय तुम्हाला वारंवार साद घालतोच आणि तुमच्या हिमालयातल्या फेऱ्या वाढतच जातात. आम्हीदेखील या प्रदेशात अनेक फेऱ्या मारल्या. प्रत्येक फेरीतल्या अनुभवांवर लिहायचे म्हटले, तरी अनेक लेख होतील. परंतु आपण एकाच लेखात सिमला-कुलू-मनालीतील आडवळणांचा यथामती विचार करू. 

स्वाती आणि मी प्रथम हिमाचलमध्ये गेलो, तेव्हा शिवालिक डीलक्‍स एक्‍स्प्रेस या छोट्याशा गाडीने हळुवार प्रवास करीत जायचे होते आणि ती गाडी काल्काहून पकडण्यासाठी हावडा काल्का मेल दिल्लीला पकडायची होती. दिल्लीला तर सकाळीच राजधानीने पोचलो होतो. परंतु रात्रीची हावडा काल्का मेल जुन्या दिल्ली स्थानकातून पकडण्यासाठी जवळपास उभा दिवस, अस्वस्थ वाटणाऱ्या दिल्लीत काढावयाचा होता. तो अतिकंटाळवाणा वेळ काढून, जुन्या दिल्लीत हावडा काल्का मेलमध्ये बसून दुसऱ्या दिवशी सकाळी काल्का रेल्वेस्थानकात उतरून शिवालिक डीलक्‍स एक्‍सप्रेसमध्ये बसलो; तेव्हा कुठे प्रथमच शहर सोडल्याचा मोकळेपणा अनुभवता आला. काल्काच्या वातावरणातला थोडासा थंडपणा मन शीतल करून गेला. गाडी सुरू झाल्यावर सूचिपर्णी वृक्ष खुणावू लागले. बरोग स्थानकात पहिल्या मजल्यावर जाऊन कटलेट-चहा असा रेल्वेतर्फे मिळणारा नाश्‍ता झाल्यावर १०३ बोगद्यांमधून लयदार वळणे घेत थंड होत जाणाऱ्या वातावरणातून सिमला येथे पोचलो आणि स्वातीच्या ऑफिसतर्फे बुक केलेल्या आरामशीर हॉलिडे होममध्ये गेलो. खरेच सांगतो, काल्का - सिमला या प्रवासातच पुरते आनंदून गेलो. 

पहिल्या दिवशी चैल, कुफ्री पाहून झाल्यावर, चिखल तुडवीत, घोड्यावर बसून फागू येथे जाऊन आलो. स्वच्छ वातावरणामुळे फागू येथे प्रथमच हिमशिखरांचे दर्शन घडले. नंतर मशोबरा आणि नालदेरा बघून आल्यावर हॉलिडे होममधील केअरटेकरने ‘मॉल रोड फिरलात का?’ असा प्रश्‍न विचारला. आम्ही नाही म्हटले. तो चूप बसला. दुसऱ्या दिवशी सिमला, जाकू हिल्स, तातापानी (तप्तपाणी), क्रेगनॅनो फिरून, दमून भागून ६ अंश सें.ग्रे.मध्ये बोचरी थंडी लागत असल्यामुळे हॉलिडे होममध्ये टेकणार, एवढ्यात हॉलिडे होममधील केअरटेकरने ‘मॉल रोड फिरलात का?’ असा प्रश्‍न पुन्हा विचारला. आमचे पुन्हा ‘नाही’ हे उत्तर ऐकल्यावर, महाअप्रतिम चीजपराठा आणि चहा देऊन तो केअरटेकर आमच्या पाठीच लागला. ‘पहिले आधी मॉल रोड’ फिरून या म्हणाला. आम्ही अत्यंत कंटाळत पुन्हा अंगावर कपडे चढवले. पायात बूट घातले आणि जवळच्या ‘मॉल रोड’वर फिरायला गेलो. संध्याकाळनंतरची वर्दळ बघून हरखून गेलो. समोरचे उत्फुल्ल वातावरण बघून कंटाळा निघून गेला. आळस क्षणात पळाला. मनात म्हटले, आलो नसतो तर फार आनंदाच्या क्षणांना मुकलो असतो. प्रदीर्घ फिरत, गेईटी थिएटर, महापालिकेची इमारत, लांबून दिसणारे काली मंदिर हे सारे पाहण्यापेक्षासुद्धा अगदी हलके हलके बर्फ पडत होते, त्याचा आनंद घेत होतो. हातात हात घालून चालणाऱ्या युवा जोडप्यांचा चिवचिवाट, लहान मुलांचा हास्यकल्लोळ, कठड्यावर पाय दुमडून बसलेला बेरका गावकरी, दिवसातली शेवटची विक्री वाढवण्याचा खटाटोप करणारे दुकानविक्रेते, थंडीत बहारदार आइस्क्रीम्स देणारी आइस्क्रीम पार्लर्स आणि त्यांच्या समोरूनच, पाठीवरच्या डब्यातल्या कुल्फ्या विकणारे अनेक कुल्फी विक्रेते. संध्याकाळ झाल्यानंतर रात्र व्हायच्या आत, अशा अनेक गोष्टींनी सजलेला-रंगलेला ‘मॉल रोड’ बघून, पुरते दमून परतल्यावर, केअरटेकरने प्रेमाने केलेल्या जेवणाचा स्वाद फारच वाढला. केअरटेकरला म्हटले, ‘आम्ही यापुढे कुठल्याही ठिकाणच्या ‘मॉल रोड’वरून फेरफटका मारायला कधीच विसरणार नाही.’ सिमल्यानंतर वाटेतली बरीच गोवे बघून, नेहमीची रोहतांगपास आणि माणिकरण बघून झाल्यावर मनाली वास्तव्यातल्या अखेरच्या दिवशी ‘शिरड’ येथे कसे गेलो? हा एक किस्साच आहे. 

पॅराग्लायडिंग करणाऱ्या संजय या मित्राने जीवन या मित्राची ओळख करून दिली. जीवन हा ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग करीत असे. जीवन शिरड येथे राहणारा होता. बोलण्याच्या ओघात जीवनने शिरडला यायचे आमंत्रण दिले आणि सहसा पटकन कुणाच्या घरी न जाणारा मी, जेव्हा मनालीला जायची वेळ आली तेव्हा आडवळणावरच्या शिरड येथे जायला चांगलाच उत्सुक होतो. मनाली आणि कुलूच्या बरोबर मधोमध असणाऱ्या शिरडमध्ये जीवनचे नाव उच्चारताच साऱ्यांनी जीवनचे घर दाखवले. सुदैवाने जीवन घरीच होता. जीवनशी गळाभेट झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांशी गप्पा झाल्या. आम्ही थंडीने कुडकुडतोय हे पाहिल्यावर जीवनच्या आईने आम्हाला घरात बोलावून ‘बुखारी’जवळ बसायला सांगितले. थोडक्‍यात सांगायचे, तर घरातल्या शेकोटीला बुखारी म्हटले तरी चालेल. चहाची किटली बुखारीवर ठेवली की चहा गरम राहतो. आपण चांगले लांब बसलो तरी चांगली ऊब मिळते. असा महिमा घरातल्या बुखारीचा असतो. जीवनच्या आईने बळेबळे खायला लावून, चहा देऊन, स्वतः विणलेले पायमोजे स्वातीला दिले. निसर्गसंपन्न वातावरणात आपल्या स्निग्ध बोलण्याने आम्हाला निरपेक्ष प्रेमात चिंब भिजवून टाकले. अशा निरपेक्ष प्रेमाची आठवण आजही यावी हीच हिमाचलची देन आहे, असे म्हटले पाहिजे. 

हिमाचलमध्ये त्यानंतर खूपवेळा फिरणे झाले. एकदा बर्फ पडतोय म्हटल्यावर, एकदा मार्च महिन्याच्या सुरुवातीला, तर नंतर ट्रेक्‍सच्या निमित्ताने बऱ्याच वेळा या परिसरात फिरणे झाले. एकदा सारपास ट्रेकला जाण्याच्या निमित्ताने आम्ही सहा मित्र-मैत्रिणी मुंबईहून राजधानीने दिल्ली आणि लगेच गारेगार गाडीत बसून तडक हिमाचलमधील मंडी असा कार्यक्रम ठरवला. मंडीतील हॉटेल मंजुल येथे थांबलो. रात्री जेवणे झाल्यावर, हॉटेलमालकाबरोबर निवांत गप्पा मारीत राहिलो. दुसऱ्या दिवशी कुलूजवळच्या कसोल येथील बेसकॅंपमध्ये जाऊन पोचलो. अतिउत्कृष्ट बेसकॅंप, बाजूने वाहणारी पार्वती नदी, कानावर आलेली कसोलमधील अफू-गांज्याची शेती, त्यामुळे मालामाल झालेले गावकरी, परदेशी पर्यटकांच्या डॉलर्समुळे गावकऱ्यांच्या दारात आलेल्या रॉयल एन्फिल्डस... वगैरे वगैरे.. साऱ्या दंतकथा - सत्यकथा कसोल बेसकॅंपला ऐकून आम्ही ग्राहण गावी गेलो. तेथील निसर्ग तर दृष्ट लावणारा होता. हिमनगात तोटी टोचून २४ तास पाण्याची सोय करून ठेवलेली पाहिली तेव्हा फारच गंमत वाटली. पुढील वर्षी कळले, की ग्राहण गावातून हिमनग पाठी पाठी सरकत चालले आहेत. त्यानंतर कळले हिमनग चक्क गायब झालेत... आणि आता तर तेथे वेगळीच परिस्थिती असल्याचे कळते. 

ग्राहण ते बडा थाचच्या वाटेवर बरेच धबधबे लागले. रोज उठायचे, खायचे आणि मार्गाला लागायचे या नित्यक्रमात धबधबे अडथळा आणायचे. नीट आणि परतपरत स्वतःकडे पाहायला लावायचे. नाही नाही म्हणता म्हणता मनात घर करून राहायचे. ग्लेशियरमधून धबधब्यांत जाणारे पाणी, मातीमिश्रित गढूळ असे आणि तेच पाणी सकाळी स्फटिकस्वच्छ असे. निसर्गाचे असे खेळ बघत जायला फारच मजा येत असे. 

बडाथाचहून मिंथाचला जाताना बर्फिल्या पहाडावरून धुके आस्ते आस्ते खाली उतरू लागले आणि दमलेली ट्रेकर्समंडळी धुक्‍याच्या विळख्यात झोपून गेली ही आठवणही मनाच्या कुपीत साठवून ठेवलेली आहे ती काही उगाच नाही! निसर्गाच्या लीला किती सांगायच्या? बिसकेरी आणि भांडक थाच येथील हिरवळ, तेथील कॅंप हे ट्रेकर्सना स्वप्ननगरीत असल्याचा आनंद देत होते. 

आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी जे कोणी वयाच्या पन्नाशीपर्यंत पोचले आहेत, जे शरीर आणि मनाने तंदुरुस्त आहेत त्यांनी युथ हॉस्टेल दरवर्षी आयोजित करीत असलेला ‘सारकुंडी पास’ हा ट्रेक जरूर करावा. पहिला कॅंप सेगली ला पोचतानाच इतकी हिरवाई दिसते, की आमच्या ट्रेकच्या आठवणींच्या भाषेत सांगायचे, तर ‘वनवास हा सुखाचा’ हे शब्द वारंवार म्हणावेसे वाटतात. न्यालन गाव गाठेपर्यंत ताक, फळांचे रस, ऑम्लेट, चेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी खाऊन तुम्ही बोलता बोलता पुढच्या कॅंपवर जाता. याच ट्रेकमध्ये तुम्ही १३ हजार फुटांवरून ठिपक्‍याएवढे वाटणारे मनाली शहर बघू शकता. या साऱ्या विभागातील मखमली हिरवळ, वाटेतील फुलांचा दरवळ, लेखनी कॅंपजवळचा पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट, तन-मन उत्तेजित करणारी ताजी हवा, विश्रांतीच्या थांब्याजवळ वाट पाहणारे तुमचे स्नेही! सारे काही कल्पनेपलीकडील वाटावे असे आहे. मला तर उघडउघड वाटते, की वर उल्लेखलेल्या साऱ्या गोष्टींसाठीच ट्रेकर्समंडळी किंवा घुमक्कडमंडळी १५-२० दिवसांचा वनवास अत्यानंदाने स्वीकारीत असावीत. 

अखेर एक बहुमोल गोष्ट सांगावीशी वाटते. याच सारकुंडी पास ट्रेकमध्ये एक सोनेरी केसांची राजकन्या आणि तिचे सात मित्र असे आठहीजण सारे मूकबधिर होते; ते आमच्याबरोबर ट्रेकला होते. सतत खुणेने बोलून आपसांत मस्करी करून, आमचीदेखील छान फिरकी घेत होते. ते सारे मस्ती करायचे आणि आम्ही मुकेपणाने ते सारे पाहायचो, असे मजेदार दृश्‍य सतत पाहायला मिळायचे. संपूर्ण ट्रेकभर त्यांनी हैदोस घातला. खूप छान मंडळी होती. आम्ही बेसकॅंपला परतल्यावर त्या साऱ्यांनी मला ‘फोनवरून आमच्या घरच्यांना आमची खुशाली सांग’ असे सांगितले आणि मी फोन करून त्यांच्या घरच्यांना सांगत असता मी फोनवर काय बोलतोय ते पाहणारे त्यांचे डोळे आणि पलीकडे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याविषयीची कळकळीने केलेली चौकशी यात मला त्यांचे घरच्यांशी असलेले प्रेमळ भावबंध कळले. 

ज्याप्रमाणे बिसकेरी ते भांडकथाच हा सारपास ट्रेकमधील हिरवळीचा सुखद प्रदेश होता; त्याचप्रमाणे सारकुंडी पास ट्रेकमध्ये होराथाच ते मायली या टापूत विलक्षण सौंदर्य दिसले. मला तर असे वाटते की निसर्ग आवडणाऱ्या, शहरापासून लांब जाऊ इच्छिणाऱ्यांनी हिमाचलमधील ग्राहण, बिसकेरी, सगळी, न्यालन, मलाना आणि गवताळ कुरणांची बडाथाच, मिंथाच, होराथाच अशी कितीतरी गावे बघायला हवीत. एकदा त्या दिशेने पाऊल टाकलेत, की नंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचा हिमालय सतत साद घालीत राहील!

कसे जाल? 
     पुणे/मुंबई - अंबाला - चंडीगड - सिमला. 
     पुणे/मुंबई - दिल्ली - चंडीगड - सिमला. 
     पुणे/मुंबई - दिल्ली - काल्का - सिमला. 
     पुणे/मुंबई - दिल्ली - मंडी - सिमला/मनाली. 
     विमानाने - पुणे/मुंबई - भुंतर/चंडीगड - सिमला/मनाली. 

कधी जाल? 
     बारा महिन्यांत कधीही जावे हे खरे उत्तर. 
     थंडीत गेल्यास बर्फ मिळेल. पण फिरणे मनाजोगते होईल असे नाही. 
     मार्चमध्ये गेलात तर बर्फवृष्टी अनुभवता येईल. ‘ऑफसीझन’चे दर पदरात पडून घेता येतील. 
     सप्टेंबरमध्ये सफरचंदाच्या बाग बघता येतील. 

साहसी खेळांसाठी... 
या विभागात अक्षरशः असंख्य ठिकाणी ट्रेकिंगसाठी संधी असल्यामुळे अनेक संस्थांकडून तुम्ही ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, झिपराईड या साहसी खेळांचा आनंद लुटू शकता. 

कुठे राहाल? काय खाल? 

  • सिमला-कुलू-मनालीत बजेटनुसार राहण्याची सोय आहे. 
  • त्याचप्रमाणे चवीप्रमाणे खाण्याचीसुद्धा पुरी सोय आहे. 

प्रवास किलोमीटरमध्ये  
दिल्ली - सिमला - ३४५. 
दिल्ली - मंडी - ४३५. 
कुलू - कसोल - ३९. 
कुलू - बबली - ८. 
कुलू - मनाली - ४०. 
सिमला - मनाली - २५२. 
सिमला - क्रेगनॅनो - १७. 
सिमला - मशोबरा - १३. 
भुंतर - माणिकरण - ३८. 
सिमला - तातापाणी - ५५. 
सिमला - कुफ्री - १६. 
मनाली - माणिकरण - ८२. 
मनाली - रोहतांगपास - ५२.

संबंधित बातम्या