नयनरम्य प्रदेशातील फेरफटका 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 22 जुलै 2019

आडवळणावर...
 

गुवाहाटी विमानतळावर उतरण्याआधी, विमानाच्या खिडकीतून खाली डोकावून पाहिले असता हिरव्यागार शेतीच्या केवळ दर्शनानेच आमचा जीव शांत झाला होता ही गोष्ट आजही लख्ख आठवते. त्याबरोबरच आठवतायत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील अप्रतिम अरण्य लॉज, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील निसर्गचित्रे, पूर्वेकडील (खरे तर ईशान्येकडील) स्कॉटलंड म्हणून प्रसिद्ध असलेले शिलाँग, विक्रमी पावसामुळे जगप्रसिद्ध असलेले चेरापुंजी, शिलाँगमधील असंख्य धबधबे, तवांग-तेजपूर-दिरांग परिसरातील मोहक फुले, सेला पासजवळील तळे, तवांगच्या वाटेवरील लष्करी स्मारक, माधुरी लेक म्हणून प्रसिद्ध झालेला संगेस्तर तलाव... एक ना दोन किती आठवणी सांगायच्या! 

याचा अर्थ या ईशान्येकडील परिसरात सारे काही आलबेल आहे असे अजिबात नाही. येथील प्रवासात नकळत वाट्याला येणारे शहाणपण आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपल्या गाडीचा चक्रधर चक्क बांगलादेशी असणे, त्याने ते नागरिकत्व मानाने मिरवणे, वर तवांगला जायला तसेच गुवाहाटीला खाली उतरायला एकच मार्ग असल्याने आसाम - अरुणाचल प्रदेशातील लोकांनी एकमेकांना जपून (जोखून) असणे.. अशा खऱ्यातर कितीतरी गोष्टी सांगता येतील. परंतु, या साऱ्या जाणीवांतून एका वेगळ्याच दुनियेत मुशाफिरी केल्याचा अनुभव हा दौरा देतो. म्हणूनच हा दौरा खास होऊन कायमचा आठवणींत जाऊन बसतो. 

आम्ही युथ होस्टेलतर्फे अरुणाचल, आसाम, मेघालय असा दौरा करण्यासाठी गुवाहाटीला जायचे ठरवले तेव्हा सहा महिने अगोदर विमानाची तिकिटे अत्यल्प दरात आरक्षित केली. मुंबईत असह्य उकाडा सुरू होण्याअगोदर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गुवाहाटीला जाण्यासाठी निघालो. गुवाहाटीचे स्थलदर्शन करण्यासाठी म्हणून आम्ही एक दिवस अगोदरच गुवाहाटीत जाऊन थडकलो. साहजिकच आम्ही खासगी हॉटेलमध्ये एका दिवसापुरते राहिलो. हॉटेलमध्ये पाय टाकताच काल बॉम्बस्फोट कसा झाला, त्याचे तपशीलवार वर्णन ऐकायला मिळाले. आश्‍चर्य म्हणजे, शहरात प्रचंड तणाव वगैरे दिसला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. आम्ही हॉटेलरुमवर सामान टाकून गुवाहाटीच्या प्रसिद्ध कामाख्या मंदिर बघून आणि एकुणातच गुवाहाटीत फेरफटका मारून हॉटेलरुमवर परतलो. आम्ही राहात असलेल्या हॉटेल परिसरात, ‘इथल्या लोकांना कोण कुठल्या हॉटेलमध्ये उतरलाय, कोण काय करतोय? ते सारे माहीत असते..’ इथपासून ‘बांगलादेशी लोकांनी इथल्या समाजजीवनाची वाट लावलीय..’ इथपर्यंत सारे काही ऐकायला मिळाले. गुवाहाटीला उतरल्यापासून सतत अनिश्‍चिततेच्या वातावरणात असलेले आम्ही त्या रात्री अस्वस्थतेतच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी युथ होस्टेलच्या बेसकॅंपवर पोचलो. 

बेसकॅंपला करंडे दांपत्याची ओळख झाली. रेल्वेच्या प्रदीर्घ प्रवासाने ते बरेच शिणलेले दिसत होते. बोलण्याच्या ओघात, त्यांच्या मुलाने आमच्याबरोबर गोवा-कर्नाटकचा ट्रेक केल्याची माहिती मिळाली. इथून-तिथून भटके हे एकाच जातकुळीचे असतात या उक्तीचा सुखद प्रत्यय आला. आम्ही पाच मित्रमंडळी आणि नवीन मैत्र जुळलेले करंडे दांपत्य असे सात जण त्या दौऱ्यादरम्यान सुमो गाडीत सोबत होतो. 

काझीरंगा अभयारण्यातील ‘अरण्य लॉज’ हे उत्कृष्ट निवासस्थान आहे. देखभाल आणि सेवा उत्कृष्ट झाली तर... हा तर... आपल्याला सगळीकडे पाठी ठेवत असतो. आम्ही जीप सफारीने जंगलाकडे कूच करीत असता गाईडने ‘अरे गप्प राहा..’ असे दबक्‍या आवाजात सांगितले. तेवढ्यात कुठून तरी एक एकशिंगी गेंडा धावत आला आणि जीपसमोरून रस्त्याच्या कडेला झेपावून गवतात दिसेनासा झाला. गाइड म्हणाला, ‘गेंडा जीप सहज उलथवू शकतो. नशीब पटकन बाजूने गेला.’ आम्ही गेंड्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने खुश झालो असलो, तरी गाइडने गेंड्यांच्या शिकारीविषयी अनेक कथा सांगितल्याने शेवटी दुःखी झालो. गेंडे एकाच ठिकाणी नैसर्गिक विधी करतात. या त्यांच्या सवयीमुळे गेंड्यांची शिकार करणे शिकाऱ्यांना सोपे जाते असे सांगून गाइडने अतिशय दुखऱ्या, मनाला घायाळ करणाऱ्या गेंड्यांच्या कत्तलींच्या कहाण्या सांगितल्या. त्या ऐकून अपार दुःखी मनानेच आम्ही पुढे जंगलात गेलो. जंगलातील मचाणावरून प्राणी बघणे, हत्तीवरून जंगलाच्या मध्यवर्ती भागात फेरफटका मारणे, वाटेत गेंडा, सांबर, गेंड्याचे पिल्लू, हरिण असे बरेच प्राणीदेखील पाहिले. वाटेत माहुताने काझीरंगा अभयारण्य ४३० चौरसकिलोमीटर इतके प्रचंड असल्याचे सांगून आमची समज वाढवली. वाटेतील उत्कृष्ट निसर्गचित्रे कॅमेऱ्याने टिपून आम्ही ‘अरण्य लॉज’वर परतलो. दुसऱ्या दिवशी भालुकपाँगला जायचे होते. 

गुवाहाटीवरून भालुकपाँगला जाताना वाटेत तेजपूर लागते. तेथे परतताना मुक्काम करायचा होता. म्हणून आम्ही सरळ भालुकपाँगला गेलो. तेथील आमची राहण्याची व्यवस्था बघून तर आम्ही एकदम खुशच झालो. आमच्या राहत्या जागेच्या पाठीच केमेंग नदी वाहत होती. दिवसभराच्या प्रवासानंतर उत्कृष्ट वातावरणात, नदीच्या पाण्यात पाय सोडून बसताना आम्हा सर्वांच्या गप्पांना रंग ना चढता तरच नवल! 

भालुकपाँग येथील उत्कृष्ट निवासामध्येदेखील देखभाल आणि सेवा या गोष्टींचा अभाव दिसला. देखभाल, स्वच्छता, उत्कृष्ट खाणे असे जर का अरण्य लॉज - काझीरंगा आणि भालुकपाँग येथील निवासस्थानी करता आले, तर दोन्हीही निवास चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे होऊ शकतात. परंतु वास्तव त्यापासून खूप दूर आहे. 

भालुकपाँगनंतर आम्ही दिरांगच्या वाटेला लागलो. त्यानंतर बोमदिला खिंडीतून झालेला प्रवास थरारक होता. अफाट बर्फवृष्टी आणि देखणी निसर्गचित्रे यांनी या प्रवासात जान आणली. मात्र दिरांग येथे आमचा निवास खिडकीसुद्धा नसलेल्या मा लक्ष्मी लॉजवर झाला होता हे आजदेखील विसरता येणे कठीण आहे. त्या ठिकाणी रात्र कशी काढायची? हा प्रश्‍न पडण्याजोगी ती जागा चिंचोळी, अस्वस्थ करून टाकणारी होती. 

दिरांगवरून तवांगला जाताना वाटेत सेला लेक लागते. स्फटिकस्वच्छ सेला खिंडीतून प्रवास करताना पुन्हा एकदा अफाट बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. त्यावेळची स्थिती थोडी वेगळी होती. सगळ्यांना बर्फवृष्टी तर अनुभवायची होती; परंतु गाडीबाहेर पडल्यावर बाहेरची थंडी काही स्वस्थ उभे राहू देत नव्हती. तशाच वातावरणात आम्ही सेलापाससंबंधीची कथा ऐकली. सेला आणि नोरा या म्हणे दोन बहिणी होत्या. चिनी आक्रमण प्राणपणाने थोपवणाऱ्या बहाद्दर जसवंतसिंगची सेला ही मैत्रीण होती. चिनी आक्रमणात सेला, जसवंतसिंगला अन्नपाणी देऊन मदत करायची. अखेर जसवंतसिंगला चिनी सैनिकांनी छळून, ठार मारल्याचे समजल्यावर जवळच्याच उंच शिखरावरून उडी मारून सेलाने आत्महत्या केली - तोच हा सेला पास. बर्फवृष्टीत भारलेल्या वातावरणात ही कथा ऐकताना, आम्ही स्तंभित होऊन गहिवरून गेलो. ७२ तास एकट्याने लढणाऱ्या जसवंतसिंगांच्या धाडसी पराक्रमाने आम्ही सारेच नतमस्तक होऊन गेलो. पुढे युद्धस्मारकात जसवंतसिंगांचा पुतळा बघताना आणखीनही बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. तिथून आम्ही तवांगला रवाना झालो. 

इथल्या रस्त्यांची गंमत अशी, की तुम्ही एकच डोंगर दीर्घकाळ चढत, उतरत असता. खालून वर आणि वरून खाली म्हणजे तवांग -तेजपूरला जायला यायला एकच रस्ता असल्याने दोन्हीकडचे लोक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे इथे दहशतवादी नाहीत म्हणे! त्यामुळे इथे दादागिरी नाही, अशी वेगळीच गोष्ट त्यानिमित्ताने आम्हाला समजली. तवांगला प्रवासी लॉजवर आमची सोय करण्यात आली होती. तवांग निवासी धमाल अशी होती, की शाहरुख खान उतरला होता, त्या हॉटेलमध्ये आमची सोय करण्यात आली होती, असे आजूबाजूचे लोक म्हणत होते. परंतु त्या हॉटेलमध्ये पाणीच नव्हते. पाण्याशिवाय दिवस कसा काढायचा? या विवंचनेत रात्र गेली. सकाळी उठून आम्ही माधुरी लेक बघायला निघालो. 

मजा म्हणजे तवांगपासून १७ किलोमीटरवर ‘पिटूसी लेक’ आहे. त्याचे खरे नाव ‘पेंग टॅंग सो लेक’ असे आहे. पण साऱ्यांनी सोयीचा उच्चार वापरायचे ठरवल्याने बऱ्याच तळ्यांची नावे बदलली. पण त्यामुळे चुकीचेच नाव लोकांच्या तोंडी बसेल काय, अशी भीती वाटण्यासारखी अवस्था झाली आहे. ‘माधुरी लेक’ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वास्तविक ‘संगेस्तर त्सो’ असे नाव असलेल्या तळ्याची ‘संगेत सर’, ‘संखेसर’, ‘संखेश्‍वर’ आणि ‘माधुरी लेक’ अशी चित्रविचित्र नावे बदललेली आहेत. चिंचोळ्या, खडबडीत या रस्त्यावरून जाताना वेळ मात्र चांगला गेला. तळ्याजवळ पोचताच संगेस्तर तळे पाहून, नुसते तळे पाहून नव्हे तर ते पूर्ण वातावरण अनुभवून, एका वेगळ्याच विश्‍वात जायला झाले. तळ्याच्या पलीकडे चिनी सीमारेषा असल्याने वातावरणात तणावदेखील होता; हर्षोल्हासदेखील होता आणि नेमक्‍या याच प्रदेशावर चीन वारंवार आपला हक्क दाखवतो याचा रागही येत होता. 

अनेक गोष्टींचे अनेक घटनांचे गाठोडे मनात अलगद सोडवीत असताना कुणीतरी मोठ्याने म्हणाले, ‘कोयला’मध्ये माधुरीने काय नृत्य केले आहे ना?’ यावर दोनाला तीन, तीनाला पाच प्रतिक्रिया मिळून साऱ्यांचा आवाज चढताच राहिला. मी नकळत फोटो काढण्यासाठी म्हणून साऱ्या कोलाहलापासून लांब जाऊन शांत निश्‍चल तळ्याचे, त्यावर फेर धरणाऱ्या धुक्‍याचे, प्रकाशाच्या लपंडावाचे, हिरव्यागार वनश्रीचे, चित्रात असल्याप्रमाणे भासणाऱ्या दूरवरच्या देखाव्याचे फोटो घेत राहिलो. तवांग सोडताना वाटले आपण सर्वोत्तम पाहिले. परंतु, प्रथम तेजपूर आणि नंतर शिलाँगला परतून, निसर्गाच्या बाबतीत डावे-उजवे करण्याचा आपल्याला हक्क नाही याची जाणीव झाली आणि कमालीचे अचंबित व्हायला झाले. 

शिलाँगला ईशान्येकडील स्कॉटलंड का म्हणतात ते येथील अप्रतिम वातावरणात फिरताना कळले. येथील हत्ती धबधबा प्रसिद्ध आहेच; परंतु, जवळच्या चेरापुंजीला नोकालीकाई धबधबादेखील बघण्यासारखा आहे. एकदा तर धुक्‍याच्या लपेट्यात चुकलो असे समजून धबधब्याजवळ जाऊन परतलो. धुके सरल्यावर समोरचा नजारा महाअप्रतिम दिसत होता. निसर्गाचे अनेक विभ्रम तुम्हाला अनेकदा या परिसरात बघता येतात. बडा पानी परिसरात फिरताना, जलक्रीडा करावी? विविध साहसी खेळ खेळावेत? की नुसते फोटो काढत राहावेत ते न समजण्याइतक्‍या संधी इथे उपलब्ध आहेत. 

अखेर, मेघालय, शिलाँग करून गुवाहाटीत पुन्हा एकदा साऱ्यांबरोबर फेरफटका मारून ईशान्येकडील आमचा दौरा संपला खरा; परंतु ईशान्येकडील मातृसत्ताक पद्धती, नदीऐवजी नद म्हणून प्रसिद्ध असलेली ब्रह्मपुत्रा, बांगलादेशी लोकांची घुसखोरी, स्थानिकांवरचे हल्ले, संपूर्ण ईशान्येकडील महाअप्रतिम निसर्ग, गेंड्यांची क्रूर शिकार अशा अनेक गोष्टी डोक्‍यात फेर धरून नाचू लागल्या. म्हटले तर तेच दौऱ्याचे फलित होय! 

नक्षत्रांच्या गावात 
कसे जाल? 
 पुण्या-मुंबईवरून कोलकता. 
 कोलकत्याहून सकाळी पावणेदहाच्या सराईघाट एक्‍स्प्रेसने गुवाहाटी. रेल्वेच्या दीर्घ प्रवासापेक्षा गुवाहाटीला विमानाने जाणे केव्हाही सोईस्कर. खूप अगोदर आरक्षण केल्यास विमानप्रवास स्वस्तात करता येईल. 
दिवस १ - गुवाहाटी. 
दिवस २ - काझीरंगा अभयारण्य. 
दिवस ३ - काझीरंगा-तेजपूर-भालुकपाँग. 
दिवस ४ - भालुकपाँग - दिरांग. 
दिवस ५ - दिरांग - तवांग. 
दिवस ६ - तवांगदर्शन. 
दिवस ७ - तवांगदर्शन. 
दिवस ८ - तवांग - दिरांग. 
दिवस ९ - दिरांग - तेजपूर. 
दिवस १० - तेजपूर - शिलाँग. 
दिवस ११ - चेरापुंजी स्थलदर्शन - शिलाँग. 
दिवस १२ - शिलाँग - गुवाहाटी स्थलदर्शन - गुवाहाटी. 

कुठे राहाल? 
 अरण्य लॉज - काझीरंगा, काझीरंगा अभयारण्य, जि. - गोलाघाट, आसाम - ७८५१०९. 
 भालुकपाँग प्रवासी लॉज, जि. सोनितपूर, आसाम - ७९०११४. 
 माँ लक्ष्मी लॉज, लेकी कॉम्प्लेक्‍स, एसबीआय बिल्डिंग, दिरांग, पश्‍चिम कामेंग, अरुणाचल प्रदेश - ७९०१०१. 
 तवांग प्रवासी लॉज, तवांग, अरुणाचल प्रदेश - ७९०१०४. 
 प्रसंती प्रवासी लॉज, जि. सोनितपूर, तेजपूर - ७८४००१. 
 केजेपी असेंब्ली गेस्ट हाऊस, मुख्य ग्रंथालयासमोर, शिलाँग - ७९३००१. 

काय पाहाल? 
 चेरापुंजी-मसामाई, केरम धबधबे, गरम पाण्याची कुंडे. 
 शिलाँग-गोल्फ कोर्स, म्युझियम, हत्ती धबधबा, बडा पानी. 
 तेजपूर-बाग. 
 तवांग-मठ, स्तूप, तळी. 
 गुवाहाटी - वसिष्ठाश्रम, कामाख्या मंदिर, उमानंदा बेटे. 

अंतर किलोमीटरमध्ये - 
 गुवाहाटी-भालुकपाँग - २३५. 
 भालुकपाँग - दिरांग - १४१. 
 बोमदिला - सेला - १०८. 
 दिरांग - तवांग - १३०. 
 भालुकपाँग - बोमदिला - १०५. 
 भालुकपाँग - तेजपूर - ५५. 
 दिरांग - तवांग - १४०. 
 दिरांग - तेजपूर - २००. 
 दिरांग - भालुकपाँग - १४५.

संबंधित बातम्या