सृष्टिसौंदर्याने नटलेले जव्हार 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आडवळणावर...
 

खरे सांगा, गाव सोडून एखाद्या ठिकाणी, खास पर्यटनासाठी म्हणून तुम्ही किती वेळा गेला आहात? पाच, दहा, पंधरावेळा? मी त्याहून अधिकवेळा जव्हारला गेलो आहे आणि दरवेळी मी जव्हारच्या सृष्टिसौंदर्याने भारावून गेलो आहे. माझ्याइतकीच माझ्याबरोबरची मंडळीदेखील जव्हार बघताना अतिशय आनंदित झालेली मी दरवेळी पाहिली आहेत. माझ्याबरोबर न येणाऱ्या मंडळींचा मात्र वेगळा विचार आहे. ते म्हणतात, ‘तू जव्हारबद्दल लिहिताना थोडे बढा-चढाके लिहितोस. सांगतोस. आम्हीदेखील जव्हारला गेलो खरे; परंतु, आम्हाला तू नक्षत्रांचे देणेबिणे म्हणतोस तसे काही वाटले नाही जव्हार पाहताना!’ मित्रांच्या वरील मतप्रदर्शनाकडे मी चक्क काणाडोळा करतो. माझे साधे म्हणणे असते, नक्षत्रांचे देणे समोर अनुभवूनसुद्धा जर तुम्हाला त्याची अनुभूती येत नसेल तर मग बोलणेच खुंटले! 

यावर्षी जव्हारला जाण्यामागे थोडा गमतीचा भागदेखील होता. ‘आडवळणावर’ सदर वाचणाऱ्या काही वाचकांना माझ्याबरोबर प्रवास करायचा होता. परंतु एका दिवसात लातूर, जळगाव, पुणे इथे परतणे शक्‍य नसल्याने ते वाचक काही माझ्याबरोबर येऊ शकले नाहीत; परंतु माझ्याबरोबर जव्हारच्या वाऱ्या करणारे माझे मित्र मात्र पुन्हा एकवार बरोबर आले आणि यावेळची जव्हारची आणखीन एक वारीदेखील नेत्रसुखद क्षणचित्रांची सुखद सफारी ठरली. 

तुम्ही म्हणाल, इतके काय खास आहे, विशेष आहे जव्हारमध्ये? तुमच्या प्रश्‍नाचे अनेक अंगांनी उत्तर द्यावे लागेल आणि सर्वांत पहिले प्रतिप्रश्‍न करावा लागेल, की जव्हारमधे काय नाही? अलंकारिक भाषेत सांगायचे, तर निसर्गाच्या प्रांगणातले झाकले माणिकच आहे जणू जव्हार! जव्हारला अक्षरशः चोहोबाजूंनी जायला वाटा आहेत आणि प्रत्येक वाट ही सुंदर अशीच आहे. पावसाळ्यात जव्हारचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. विक्रमगड, चारोटी, मनोर, पाली, सेलवास, खानवेल, त्र्यंबक, मोखाडा असे कुठूनही गेले तरी जव्हार गाठेपर्यंत निसर्गाच्या अद्‌भुत आविष्काराने पर्यटक भारावून जातो. 

एका दिवसासाठी जव्हार फिरायला जायचे असेल तर जव्हार बघायची आमची पद्धत ठरून गेलेली आहे. भिवंडी - वाडा मार्गे गेलो किंवा चारोटी नाक्‍यावरून उजव्या हाताच्या वळणावरून कासा गावावरून जव्हार मार्गाला लागलो, तर फोटो काढण्यासाठी आमचे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट थांबे आहेत. त्याशिवाय इतरत्रही थांबणे होतेच. आमचे चक्रधरही शहरापासून थोडे आत वळताच, निसर्गाच्या सान्निध्यात गाडीचा वेग कमी करतात. लावण्या-पेरण्याची दृश्‍ये, ओलेता रस्ता, झिम्माड पाऊस, लालभडक माती बरोबर आणणारे वाहते पाणी, तुम्हाला निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रतिमांची जाणीव करून देतात. 

परंतु जर तुम्ही वाड्यावरून खोडाळ्याला जात असाल, तर घनगर्द जंगलातून, दगडांतून झिरपणारे स्फटिकस्वच्छ पाणी पाहून तुम्ही चकित होता. हिरव्याकंच जंगलात, नीरव शांततेत, पाण्याचा पातळ पडदा पाहून ‘समोर दिसते आहे ते सत्य की स्वप्न?’ असा प्रश्‍न पडेपर्यंत तुमची फसगत होऊ शकते. कधी कधी वाटते, नुसते वरील दृश्‍य निरखायला तरी वाडा - खोडाळा रस्त्यावरून जायला हवे. 

थोडक्‍यात, स्वप्नांच्या वाटेवरील गावात, वास्तवात फिरून झाल्यावर, जव्हार येण्यापूर्वी तुम्ही एक चढ चढून एका पठारावर येता. उजव्या हाताला कोसळणाऱ्या अनेक धबधब्यांच्या दर्शनाने, घाईघाईने गाडी रस्त्याच्या कडेला लावून, रस्त्याच्या पलीकडील वेस ओलांडून, दरीच्या टोकावर येता, तेव्हा समोर झालेल्या निसर्गाच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटणे या शब्दप्रयोगाचा प्रत्यय अनुभवू लागता. झकास पाऊस असला तर पातळ, विरळ ढग माणसांच्या गर्दीतून रस्ता काढून धबधब्याच्या दिशेने पांगताना दिसतात. समोर धबधबे तर कोसळतच असतात! मनात विचार येतो, ‘ट्रेलरच इतका चांगला तर मेन पिक्‍चर काय असेल!’ असे म्हणून तुम्ही पुन्हा गाडीत बसता. तेथून ठरल्याप्रमाणे जणू सारे घडते. म्हणजे, जकात नाक्‍याजवळ गाडी उभी करून राजवाडा बघणे, राजवाड्यातील सेवेकऱ्यांचा मूड चांगला असला तर वाडा आतूनदेखील बघायला मिळणे, वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचे डोळे तृप्त होईपर्यंत दर्शन घेणे, तेथून हॉटेल कुलदीपमध्ये जेवणाचे सांगून पहिले हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, जुना राजवाडा बघून, हॉटेल कुलदीपमध्ये जेवून दाभोसा धबधबा बघायला जाणे आणि मग परतीच्या रस्त्याला लागणे. बहुतेक वेळा याच पद्धतीने वेगवेगळ्या मंडळींबरोबर जव्हार बघणे होते. 

जयविलास पॅलेस ऊर्फ जव्हारचा राजवाडा आतून बघताना, भिंतीवर लटकलेल्या तसबिरीतील तपशील बघताना, जव्हार संस्थानाचा परिचय होतो. सुरतेवर स्वारी करताना महाराजांचा पदस्पर्श जव्हारसंस्थानी झाला होता हा उल्लेख आपल्याला रोमांचित करतो. राजवाड्याकडे जाताना आणि येताना असलेल्या प्रचंड प्रमाणातल्या काजूच्या झाडांमुळे, भोवताली असलेल्या विविध वृक्षांमुळे तुमचे फिरणे आनंददायी वातावरणातून होते. थोडे चालून हनुमान पॉइंटला दरीतून खाली पाहताना, झाप गावाकडे जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता, राजवाड्याचे लांबून होणारे दर्शन, दूरवर दिसणारी हिरवीगार शेती, हे सारे मोहवून टाकणारे चित्र दिसते. सनसेट पॉइंटला जाताच, भणभणता वारा तुमचे स्वागत करतो. टेहेळणी बुरुजावरून दरीत डोकावताना, खालच्या कपारीतून वर झोताने येणारा अवखळ वारा, तुम्हाला क्षणात आपलेसे करून टाकतो. जुन्या राजवाड्यात आज केवळ भग्नावशेष दिसत असले, तरी गतकाळाचे वैभव ते उलगडून सांगतात. त्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या पाचबत्तीकडून डावीकडे सिल्वासा मार्गाला लागलो, की सरळ दाभोसा धबधब्याला जायचा रस्ता लागतो. वाटेत डबकपाडा नावाचे ठिकाण लागते. पावसाळ्यात इथे मोठे तळे होते. ते गोलाकार तळे बघताना, त्यात लहान मुले बागडती पाहत असताना, आपण घरून जेवण आणले असल्यास सुंदर अशा नैसर्गिक पार्श्‍वभूमीवर, सुंदर तळ्याकाठी आपण जेवू शकतो. जेवून आलो असल्यास थोडे थांबू शकतो. तेथून वेगळी हिरवाई बघत, नागमोडी वळणांच्या रस्त्यांच्या साथीने आपण दाभोसा कधी गाठतो ते आपल्याला कळतच नाही. खूप म्हणजे खूपच वर्षांपासून दाभोसा या गावी धबधबा पाहायला जात असल्याने लाल मातीच्या रस्त्यापासून डांबरी रस्त्यापर्यंत झालेली गावाची प्रगती (?) किंवा खाचखळग्याच्या अति उतरणीच्या/चढणीच्या कच्च्या रस्त्यापासून ते सुरेख डांबरी रस्त्यापर्यंत झालेली वाहतूकमार्गाची प्रगती किंवा ‘खाऊ द्या नाही तं पैसं द्या’ म्हणून मागे लागणारी मुले ते खेकडा हातात पकडून, ‘आम्ही हेनला खातो’ म्हणणारी मुले अशा वेगवेगळ्या रूपात, दरवर्षी दाभोशातील तरुणाईचा परिचय होत गेला. 

आता मात्र दाभोसा धबधबा हे मोठे प्रकरण झाले आहे. या वर्षी जुलैला आम्ही दाभोशाला गेलो तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे, ‘भीषण’ गर्दी नव्हती; तरीदेखील धबधबा बघायला ‘झिंगाट’ गर्दी होती. आता धबधब्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केल्या असल्या, तरी मधेच त्या तुटल्या असल्याने, जाण्यायेण्याचा रस्ता ना पायऱ्या चढणाऱ्यांना सोईस्कर ना ट्रेक करणाऱ्यांना सोईस्कर. धबधब्याच्या तळापर्यंत जाणाऱ्यांना त्या रस्त्याचे सोयरसुतक नसल्याने तो रस्ता भरून वाहतो; परंतु आजही आपण एक गोष्ट धडपणे करू शकत नाही हा मुद्दा मनाला पटवून जातो. 

दाभोसा धबधबा बघून परतताना तुमच्यासमोर अनेक पर्याय असतात. ‘दादरकोपरा’ हा तसा फारसा प्रसिद्ध नसलेला, परंतु सुतळीसारखा लांबचलांब धबधबा पाहायचा, मोखाड्यावरून उजवीकडे खोडाळ्याला वळून वाडा-मनोरवरून जायचे की खोडाळा - कसारा करून मुंबईला परतायचे की दाभोशावरून उजवीकडून खानवेल-सिल्वासा करीत हायवेवरून जलद घरी परतायचे.. असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. 

जव्हारबद्दल बोलायचे म्हटले ना, की अशा अनेक आठवणी मनाभोवती फेर धरू लागतात. परंतु लगेचच आपल्या लक्षात येते की अरे, या साऱ्या आठवणी तर केवळ पावसातल्या झाल्या, आपण तर जव्हारला उन्हाळ्यात, थंडीतसुद्धा गेलो आहोत की! आणि मग मन नकळत भूतकाळात जाते. मी खूप लहान असताना जव्हारमध्ये वाढलो. माझे काका डेपो मॅनेजर होते. त्यांच्या बदल्या अर्नाळा, जव्हार, पालघर अशा होत असताना मीदेखील साहजिकच त्यांच्याबरोबर फिरतीवरच राहिलो. आठवते ते माझ्या लहानपणीचे जव्हार खूप वेगळे होते. नीटस होते. एसटी डेपो खुला होता. डेपोतील डेपोमॅनेजरचा बंगला चांगला मोकळाचाकळा होता. आतासारखा बंदिस्त नव्हता. बाजूलाच वकिलांचा वाडा होता. आमच्या बंगल्यापासून गावात जायच्या तेव्हाच्या शॉर्टकटवर स्मशान होते. तेथून जायला भीती वाटायची! परंतु, तरीदेखील शॉर्टकटनेच जाण्याची खुमखुमी असायची! याच कालावधीत जखीण, डाकीण, मानतोड्या या भुतांची ओळख झाली. बालमित्रांच्या गप्पागप्पांतून! एकदा जव्हारच्या राममंदिरात भरपूर बक्षिसे मिळवून रात्री घरी परतताना मानतोड्या मान तोडणार तर नाहीना या भीतीने स्मशानाजवळून चालताना, माझी पाचावर धारण बसली होती. त्यावेळी जव्हारमध्ये इतकी थंडी पडायची की थंडीत आम्हा मुलांचे पाय हमखास फुटायचे. पायातून रक्त वाहून ते सुकायचे. ठणकायचे. मग मावशी कोकमाचे तेल वगैरे लावायची. तेव्हा कुठे पाय मोकळे व्हायचे. तेव्हातर पाऊसदेखील जोरदार असायचा. थंडी सरत येताना होळीची आठवण सांगण्यासारखी आहे. त्यावेळी रात्री आम्ही जेवून झाल्यावर जवळच असलेल्या हनुमान पॉइंटला जायचो. 

जव्हारमध्येच सुलेखनकलेबद्दल ओढ लावणारी घटना घडली. त्यावेळी जव्हार गावात ‘जनता लौंड्री’ ‘शिवाजी उद्यान’ अशा पाट्या रंगवणाऱ्या सुलेखनकाराला मी तासन्‌तास न्याहाळत असे. माझ्या इतिहास, भूगोल या वहीत इतिहास ही अक्षरे अर्धी निळ्या शाईने, आणि उरलेली अर्धी अक्षरे लाल शाईने झरझर काढीत असे. त्यामुळे ‘इतिहास’ अक्षरांमध्ये लाल-निळ्याचा संगम झालेला पाहताना मला फार मजा वाटे. या प्रकारावरून मी घरी सर्वांचा ओरडा खाल्ला होता हे मला आजदेखील चांगले आठवतेय. जव्हार म्हटले, की आदिवासी आठवतात. जव्हारमधला आठवडी बाजार आठवतो. बाजारात, वेदना होत असतानाही अंगावर गोंदवून घेणाऱ्या, वेदनादायी चेहऱ्याच्या बायका आठवतात. त्याचप्रमाणे एक त्रासदायक आठवणही येते. 

या काळात जव्हारला भेट देताना आम्ही जव्हारमधील आश्रमशाळेलाही भेट द्यायचो. आश्रमशाळेतील मुलांना खाऊ वाटप करायचो. आज हे सारे हास्यास्पद वाटते. परंतु त्यावेळी अधिक मोलाचे काय करावे? कसे करावे? ते कळत नव्हते. मधे आईच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ माझ्या भाचेमंडळींना बहिणींबरोबर घेऊन, आश्रमशाळेत खाऊवाटपाचा कार्यक्रम करून, कसारा घाटातून परतताना आमच्या गाडीला अपघात झाला. समोरून येणारी एसटीची आरामगाडी आमच्या गाडीला चाटून गेल्याने, आमच्या गाडीची दोन चाके दरीत आणि दोन चाके रस्त्यावर अशा प्रकारात हमरस्त्यावर उभी राहिली. कुणालाही खरचटले नव्हते. त्यामुळे उगाच आकांडतांडव करण्यापेक्षा, अंमळ जास्तच हास्यविनोद करीत आम्ही मुंबईला परतलो. 

जव्हारला गेलोच मुळी खूपवेळा. त्यामुळे दरवेळच्या आठवणींची भर, अगोदरच्या आठवणींत पडतच राहणार की! अशा एकेक आठवणी! 

जव्हारचा दौरा 

  • जव्हार बघून खानवेल, सेल्वास, सापुतारा, उदवाडा, इगतपुरी, नाशिक येथे कोठेही मुक्काम करता येईल. 
  • वरील सर्व ठिकाणांहून आणखीन दोन पर्यटनस्थळांना भेटी देऊन तुम्हाला परतता येईल. 
  • फोटोग्राफर्सना तर जव्हारच्या दौऱ्यावर जाणे ही आनंदाची पर्वणीच वाटेल असे निसर्गसौंदर्य या परिसरात आहे. 

कसे जाल? 
ठाणे, भिवंडी, वाडा, विक्रमगड करून अथवा चारोटीनाक्‍यावरून उजव्या हाताच्या कासा गावावरून जव्हार गाठता येईल. 

कुठे राहाल? 
प्रकृती ॲग्रो फार्म, दाभोसा वॉटरफॉल रिसॉर्ट, शांती सरोवर रिसॉर्ट, सिंफनी लेक व्ह्यू रिसॉर्ट, हॉटेल साई महल, पुष्पांजली इत्यादी. 

काय पाहाल? 
जयविलास राजवाडा, जयसागर धरण, दाभोसा धबधबा, दादरकोपरा धबधबा, हनुमान पॉइंट, शिर्पा माळ, सनसेट पॉइंट, जुना राजवाडा. 

पर्यटनस्थळांदरम्यानचे अंतर  
 मुंबई-जव्हार : १६६ किलोमीटर. 
 जव्हार-दाभोसे : १८ किलोमीटर. 
 वाडा-जव्हार : ३५ किलोमीटर.

संबंधित बातम्या