रांजणखळग्यांचे गाव 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

आडवळणावर...
 

‘कवी कहीं भी कविता पढ सकता है, खतरा हमेशा सामनेवालेकोही रेहेता है।’ हिंदीतील प्रसिद्ध हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांच्या या ओळी प्रवासासंदर्भात वापरल्या, तर आमच्या पुऱ्या घुमक्कड कंपूला चपखल लागू पडणाऱ्या होत्या. ऐन गद्धेपंचविशीच्या काळात ‘चल म्हटले, की निघालो’ हे आमचे ब्रीदवाक्य असल्याने आम्हाला बोलवायचा धोका हा सतत समोरच्याला असायचा! कुणीही कधीही ‘चल’ म्हटले की ‘नाही’ असे शब्द कधी ओठावर आलेच नाहीत. 

एकदा संध्याकाळचे खेळत असताना मित्र हिरेशचा फोन आला, ‘गावी जातोय, येतोस का?’ म्हटले, ‘हो.’ म्हणाला, ‘ट्रकने जातोय, चालेल ना?’ मी ‘हो’ म्हटले आणि जेवून हिरेशच्या तावरीपाडा येथील घराऐवजी त्याच्या मामाच्या घोडपदेव येथील घराजवळून ट्रकने निघोजला जायला तयार झालो. (आम्ही कसे आणि कशा परिस्थितीत गेलो हा वेगळ्या स्वतंत्र विनोदी लेखाचा विषय व्हावा इतका तपशिलात जाऊन सांगण्यासारखा आहे.) त्याकाळी मी जवळजवळ हिरेशच्या घरातील सदस्यच असल्यासारखा असल्याने ट्रकच्या पाठी बसून साऱ्यांशी गप्पा मारण्यात रात्र कशी सरली ते कळलेच नाही. 

निघोजला हिरेशच्या गावी पोचल्यावर कळले, की त्याच्या घराची घरभरणी असल्याने आम्ही सारे निघोजला पोचलो होतो. साहजिकच हिरेशच्या घरात बरीच लगबग सुरू होती. प्रचंड मोठ्या कढईतला प्रचंड प्रमाणातील शिरा ढवळण्यात येऊ लागला. आम्ही घराबाहेर येतो, तोच धप्पकन काहीतरी विहिरीत पडल्याचा आवाज झाला. काय? म्हणून विचारले असता, ‘घरातल्या लोकांना गार पाणी प्यायचे असल्याने पाण्यात बर्फ टाकण्याऐवजी बर्फाच्या लाद्याच घरमालकांनी विहिरीत लोटून दिल्या’ या उत्तराने मी चकित झालो असतानाच, निघोज गावाची ओळख पटू लागली. महागड्या दूरचित्रवाणी संचावर टाकलेले बारदान (गोणपाट) किंवा बारदानावर सुकत ठेवलेले कांदे असे वेगवेगळ्या तपशिलातले चित्र डोळ्यासमोर पुढील तीन दिवस सतत दिसू लागले. एका वर्षात ३-४ पिके घेणारे शेतकरी आणि राजकारणात, बोलण्यात पारंगत असलेली तेथील मंडळी पाहून, निघोजचे पाणी काही वेगळेच आहे ही गोष्ट पहिल्याच दिवशी मनावर ठसली. दुपारी साऱ्यांसमवेत जेवताना एक फेटेधारी वरिष्ठ व्यक्ती आमच्या पंक्तीतून फिरू लागली तेव्हा, ‘वदनी कवळ घेता’ म्हणा असे ती म्हणतेय की काय असे वाटत असतानाच, त्या व्यक्तीने, ‘धुवा पोराओ... हाना गचागच...’ असे शब्द उच्चारल्यावर जेवणाऱ्या सगळ्यांची हाता-तोंडाची लढाई सुरू झाली. त्यावेळी एकूण तीन दिवसांच्या मुक्कामात रांजणकुंडं, बारव, हेमाडपंथी बारवमधील कलाकुसर, गावातील अनेक दंतकथा हे सारे ऐकण्यात दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही. त्या काळात मीदेखील लेंगा, सदरा आणि डोक्यावर आडवी टोपी अशा गावरान वेशात मुद्दाम असल्यामुळे आणि गावरान बोली बोलत असल्यामुळे गावातील बऱ्याच जणांनी मित्राला विचारले, ‘पैलवान कंच्या गावचं म्हनायचं?’ परंतु मुंबईला परतल्यावर हा सर्व बाज क्षणात नष्ट झाला. नव्हे आठवणीच विसरलो. त्यानंतर अनेक वर्षांनी पावसाचे खास फिरण्यासाठी म्हणून निघोजला फिरणे झाले. 

दुसऱ्यांदा निघोजला गेलो तेव्हा वातानुकूलित गाडीतून, द्रुतगती मार्गावरून, चाकण, मोराची चिंचोली अशा मार्गाने जाणे झाले. मोराची चिंचोली गावाजवळ खरोखरच चिंचेची खूप झाडे पाहिली. बरेच मोरही पाहिले. परतताना या गावात थांबून निघायचे ठरवले होते; परंतु परतताना उलट घाई झाली. 

निघोजमध्ये पाऊल ठेवल्याठेवल्या गावाने कात टाकल्याचे स्वच्छ जाणवले. मित्रमंडळींच्या आणि परिचितांच्या बंगल्यांवरून, घरांवरून सुबत्तेची कल्पना येत होती. नाश्ता करून आम्ही हेमाडपंथी बारव बघायला गेलो. पायऱ्या उतरून बारव बघताना अनेक कथा, दंतकथा कानावर पडत होत्या. पाण्यावर तरंगणाऱ्या घागरीच्या चमत्कार, चमत्काराचा पर्दाफाश, तरीदेखील लोकानुनयामुळे चालू राहिलेला उत्सव, या सर्वांचे तपशीलवार, रसभरीत वर्णन ऐकायला मिळाले. गावात त्यादिवशी नेमका आठवडी बाजार भरला असल्याने पाय मोकळे करून फिरता फिरता, मला जरा दोन वेगळे फोटोदेखील घेता आले. त्यानंतर आम्ही वडगाव बुद्रुक येथील दर्याबाई पाडळी या मंदिराला भेट द्यायला गेलो. 

दर्याबाई पाडळी मंदिर बघायला जातानाच्या वाटेवरचा निसर्ग फारच मोहवून टाकणारा आहे. निर्जन, वळणदार रस्त्यावरून, मित्रमैत्रिणींशी गप्पा करीत, शेती निरखीत प्रवास करण्यातला आनंद काही वेगळाच आहे. देऊळ जवळ यायला लागले तसे वेगवेगळे वृक्षदेखील आपली वेगळी ओळख सळसळताना दाखवू लागले. माकडांची संख्या वाढू लागली आणि गाडीतून उतरल्यावर एक क्षण, माकडे हल्ला तर करणार नाहीत ना? असे वाटण्याचा धाक निर्माण होण्यापर्यंत मजल गेली. उतरल्या जागेपासून खूप खोलवर पायऱ्या उतरायच्या होत्या. पूर्ण पायऱ्या उतरल्यावर थंडगार, शांत वातावरणात देऊळ परिसर निरखयाला फार मजा आली. देवळाचे पुजारी सांगत होते, ‘दर्याबाई देवी हे वणी येथील सप्तशृंगीचे अर्धपीठ मानले जाते.’ ते आणखीनही खूप काही सांगत होते. परंतु आम्ही लवणस्तंभातील मूर्ती बघायला देवळात प्रवेश करते झालो. भुयारी गुहा, लवणस्तंभ, ठिबकणारे पाणी, दुष्काळातदेखील न आटणारे पाणी अशा अनेक गोष्टी ऐकता ऐकता, चैत्रपौर्णिमेची यात्रा, नवरात्रातील उत्सव, मंगळागौरीतील पालखी असे सारे तपशील ऐकत मंदिर पाहिले. त्यानंतर जवळचे निळोबाराय मंदिर पाहिले. टाकळी-ढोकेश्वर येथील गुहा पाहिल्या. जवळच्या राळेगणसिद्धी गावलादेखील भेट दिली. तेथील देवळातील अण्णांचे वास्तव्य, तसेच नापासांची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली शाळादेखील पाहिली. लोकसहभागातून पाणी अडवा -पाणी जिरवा कार्यक्रमाद्वारे हिवरेबाजार या दुष्काळी गावाचे खऱ्याखुऱ्या हिरवाईत रूपांतर करणाऱ्या पोपटराव पवारांचे कौतुक गावकऱ्यांकडून ऐकले. मित्राला म्हटले, तपशील तर आपल्याला माहिती असतात. बरीचशी नावेदेखील माहिती असतात. परंतु प्रत्यक्षात प्रवास करताना सगळ्या खाणाखुणा तपशिलांसह आपल्यासमोर उभ्या राहतात. 

निघोजला परतताना पुन्हा एकदा हिरवागार निसर्ग वाटेवर पाहायला मिळाला. नंतर आम्ही सारेजण रांजणखळगे बघायला निघालो. 

खरे तर त्यावेळेची परिस्थिती मोठी विचित्र होती. पावसाळा असून पाऊस नव्हता. सर्वत्र हिरवाई असून वातावरणात थंडावा नव्हता. कुकडी नदीला पाणीही नव्हते. फोटो काढायला गेलो तेव्हा दगडांवर प्रेमीयुगुलांनी आपली नावे लिहिलेली पाहायला मिळाली. कितीही नाही म्हटले तरी रांजणखळगे बघणे हा आमच्या कार्यक्रमाचा चरमबिंदू होता. रांजणखळगे बघून झाल्यावर तडक मुंबईला परतायचे होते. त्यामुळे खूपशा ओढीनेच आम्ही रांजणखळगे बघायला निघालो. आम्ही रांजणखळगे वगैरे म्हणत असलो, तरी गावचे लोक ‘कुंडावर चालला का?’ असे विचारीत. कुंडं तर फार प्राचीन काळापासून आहेत, परंतु अवघ्या ३० वर्षांपूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या ठिकाणाला जागतिक दर्जा देऊन त्यावर मानाची मोहोर उमटवली, तेव्हापासून रांजणकुंडं आणि कुंडातून वाहणारी घोडनदीची उपनदी असलेल्या कुकडी नदीला निरखीत, कुंडाच्या काठावर गप्पा मारता मारता उन्हे सरायची वाट बघत राहिलो. परंतु परिसर पायी फिरता फिरता कॅमेऱ्यावरचे बोट तसेच राहून मन कुंडांच्या कलाकुसरीत अडकू लागले. कुंडांमध्ये अमूर्त आकृत्या दिसू लागल्या. फोटो घेता घेता वेळ कसा गेला कळलेच नाही. माझ्याप्रमाणेच इतरांनादेखील कुंडातील अमूर्त आकाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. ‘नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर आलेल्या दगड-गोट्यांनी, लाव्हारस शांत होऊन बनलेल्या बेसॉल्ट खडकावर आपटून ही रांजणाच्या आकाराची कुंडं तयार झाली’ असे कानी आले. 

अखेर फोटो काढून, संध्याकाळचा वारा सुटल्यावर, सर्वांची मने कुंडाच्या दर्शनाने तृप्त झाल्यावर निघालो आणि मुंबईला परतलो. 

निघोजवरचा हा लेख लिहीत असताना, मजेचा, योगायोगाचा तपशील असा, की जगप्रसिद्ध रांजणखळगे खळखळू लागल्याच्या वार्ता कानी येऊ लागल्या.

रांजणखळगे 
ज्यांना दगडातील अमूर्त सौंदर्य पाहायला आवडते, आडवळणावरचे खूप वेगळे ठिकाण पाहायला आवडते, त्यांनी रांजणखळगे हे जाणकारांच्या मते आशियात सर्वोत्तम असलेले अप्रतिम ठिकाण पाहायची संधी सोडू नये. सध्याच्या पावसात कुकडी नदी भरून वाहत असताना कुंडांची शोभा पाहणे हे विशेषच महत्त्वाचे म्हटले पाहिजे. निघोज गावाजवळ कुकडी नदीचे पाणी अक्षरशः शेकडो वर्षे काळ्याभोर खडकात जोमदाररीत्या खळाळून जात असता, पाण्याबरोबर वाहणाऱ्या दगडगोट्यांमुळे बेसॉल्ट खडकात खळगे तयार करते. दगडांत विलोभनीय, अमूर्त आकृत्या पाहताना पर्यटकांचे भान हरपून जाते. कुकडी नदी निघोजमधून वाहताना पलीकडे पुणे जिल्हा तर अलीकडे नगर जिल्हा असे विभाजन करून वाहते. दोन्हीही तीरांवर देवी मळगंगेची देवळे आहेत. फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण नंदनवन म्हटले पाहिजे. खरे तर डिसेंबर ते मे महिन्यादरम्यान कुकडीनदीला पाणी कमी असताना या कुंडाचे विशेष दर्शन घेता येते. कुंडात उतरले असता ‘चकवा’ अनुभवण्याचा प्रत्यय घेता येतो. 

निघोजविषयी... 
पारनेर तालुका दुष्काळी असला तरी पाटबंधारे प्रकल्पामुळे निघोजमध्ये बऱ्यापैकी पाणीनियोजन आहे. निघोजमध्ये बिसलेरी प्लॅंटदेखील आहे. छोट्या गावाकडून झपाट्याने शहर बनत चाललेल्या निघोजमध्ये, युवापिढीमध्ये डोक्यावर फेटे बांधणे कमी होते आहे; परंतु मोठ्या हुद्द्यावरच्या व्यक्तीने मानाने मोठ्या व्यक्तीच्या पाया पडण्याचा प्रघात आजही कायम आहे. एकेकाळी ‘ईर्जिक’ म्हणजे सामूहिक शेती करणाऱ्या निघोज गावाने आता शहरीकरणाचा वसा घेतला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत निघोज गावाच्या कुंडांमध्ये चैत्रअष्टमीला पाण्याने भरलेली घागर वर येते तो चमत्कार बघायला अलोट गर्दी जमत असे. बारवेतून घागर वर येणे हा चमत्कार नाही, हे सिद्ध झाले तरीदेखील आजही अनेक दंतकथा या परिसरात ऐकायला मिळू शकतात. 

पर्यटन स्थळादरम्यानचे अंतर  
 पुणे-निघोज = ९० किलोमीटर. 
 मुंबई-निघोज = २४० किलोमीटर. 
 पुणे-मोराची चिंचोली = ५६ किलोमीटर. 
 शिरूर-निघोज = २४ किलोमीटर. 
 निघोज-दर्याबाई पाडळी = १८ किलोमीटर. 
 पुणे-शिरूर = ५८ किलोमीटर. 
 शिरूर-निघोज = २६ किलोमीटर. 
 निघोज-राळेगणसिद्धी = २२ किलोमीटर. 
 निघोज-पारनेर = २२ किलोमीटर.

संबंधित बातम्या