आडवळणावरील आवडनिवड 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आडवळणावर...
देश-परदेशातील अनेक ठिकाणांना आत्तापर्यंत भेटी दिल्या आहेत. या प्रवासात अनेक अनुभव आले आहेत. खूप प्रदेश बघून झाला आहे. सगळेच प्रवास आवडीचे, पण त्यातही काही ‘अधिक’ आवडीचे ठरले.. अशाच काही आवडीनिवडींचा हा लेखाजोखा.

 • भारतातील आवडते ठिकाण : लेह-लडाख, गढवाल (देवभूमी). 
 • परदेशातील आवडते ठिकाण : फियोर्डस (नॉर्वे), अलास्का (अमेरिका). 
 • भारतातील आवडता समुद्रकिनारा : गोपाळपूर (ओरिसा). 
 • परदेशातील आवडता समुद्रकिनारा : अल्बाट्रॉस सेंटरच्या बाजूला असलेला प्रशांत महासागराचा किनारा, ड्युनेडिन (न्यूझीलंड). 
 • देशातील आवडता प्रवास : १. औली ते उखीमठ, २. कारगिल ते गारकोन, ३. चिला ते भारमोर आणि ४. सांक्री ते चकराता. 
 • परदेशातील आवडता प्रवास : १. बर्गेन ते ओस्लो, २. बांफ ते जास्पर, ३. बुडापेस्ट ते सेंतेंद्रे. 
 • उत्तम वातावरणातील देशांतील निवास : स्वप्नगंधा रिसॉर्ट - चोर्ला घाट - गोवा. 
 • उत्तम वातावरणातील परदेशातील निवास : रासा सेंटोसा - सेंटोसा - सिंगापूर. 
 • आडवळणावर खाल्लेला उत्कृष्ट पदार्थ : 
  देशात : भरमोरच्या वाटेवरील ढाब्यात - मद्रा (राजम्याची दह्यातली उसळ), आलूपराठा आणि पहाडी मिरची. 
  परदेशात : द्रुब्बा (जर्मनी) इथे अक्षरशः चापलेले मेक्सिकन जेवण. 
 • साधी गोष्ट कशी कळली नाही, असे वाटायला लावणारा क्षण : परदेशात महामार्गावर बस थांबत नाही हे समजले तो क्षण. 
 • प्रवासाची चटक : 
  - कळसूबाई ते शिवनेरी असा १९८४ मध्ये (ट्रेक) प्रवास केल्यापासून सतत दऱ्याखोऱ्यांत भटकायची चटक लागली. 
  - मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन फिरता फिरता रांगडा सह्याद्री आणि लेह लडाख ते अरुणाचल प्रदेश असा ११०० किलोमीटरचा हिमालय परिसर भटकणे झाले. पुढे परदेशभ्रमण झाले. 
 • प्रवासासंबंधी घडलेली अकल्पित गोष्ट : खूप पूर्वी आमच्या शेजारी देवस्थळी कुटुंब राहत असे. त्यांच्याकडे एक ज्योतिषी येत. एकदा त्या ज्योतिषानी मला आपणहून बोलावले आणि माझा हात पाहून देवस्थळी यांना सांगितले, की हा मुलगा (म्हणजे मी) खूप फिरेल. त्यावेळी हास्यास्पद आणि अशक्यकोटीतली वाटणारी ही गोष्ट पुढे खरी ठरली. 
 • प्रवासासंबंधी आश्चर्यचकित करून सोडणारी गोष्ट : रुईया कॉलेजात असताना लेखन करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला १९७९ च्या काळात मी मॉस्को, कोपनहेगन, हेलसिंकी, व्हिएन्ना, डुसेलडॉर्फ, स्टुटगार्ट, गोथेनबर्ग, अलास्का, इन्सब्रुक अशा कितीतरी ठिकाणांहून काल्पनिक पत्रे लिहीत असे. त्यावेळच्या साहित्यविषयक घडामोडींविषयी टीकात्मक - विनोदी पत्रे लिहीत असे. पुढे भविष्यात मैत्रीण प्रसिद्ध लेखिका झाली आणि मी खरेच पत्रात उल्लेखलेल्या सर्व ठिकाणांना भेट देऊन आलो. १९७९ मध्ये जगातील वरील ठिकाणांचा आमच्या आयुष्याशी सुतरामदेखील संबंध नव्हता. हा अद्‍भुत योगायोग आश्चर्यचकित करणारा ठरला. 
 • आजवरच्या प्रवासात खुणावणाऱ्या आठवणी : १. गोपाळपूरच्या (ओरिसा) खवळलेल्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या हॉटेलमध्ये रात्रभर ऐकलेला तडाखेबाज लाटांचा कडकडाट, २. दोनवेळा मरता मरता वाचलेल्या दुर्घटनेनंतरही ‘अंगावर ओरखडा नाही ना? मग दुर्मुखलेले का राहायचे?’ हे वाटून दुसऱ्या क्षणी हास्यविनोदात बुडून गेलेले आप्तस्वकीय. 
 • प्रवासातला टर्निंग पॉइंट : गुंतवणुकीत पैसे मिळाल्याने परदेशवारी झाली. पहिल्याच परदेशवारीत साहससफारी करता आल्याने परदेशी जाण्याचा ओढा वाढला. 
 • आजवरच्या आवडलेल्या साहसी मोहिमा : 
  १. क्विन्सटाऊन (न्यूझीलंड) येथील ९ हजार फुटांवरील स्कायडाइव्ह, २. हुना (अलास्का, अमेरिका) येथे केलेली जगातील लांब झिपराइड, ३. जुनौ (अलास्का, अमेरिका) येथे मेंडेनहॉल ग्लेशियरवर १४ हजार फुटांवर केलेली डॉगस्लेड (कुत्र्यांच्या गाडीतून केलेली सफर), ४. भाजगाव (कामशेत) येथे केलेले पॅराग्लायडिंग. या साहसी मोहिमा केल्या नसत्या, तर ट्रेकिंग एके ट्रेकिंगच करीत बसलो असतो असे आज वाटते. 
 • परदेशात फिरताना सतत जाणवणारी गोष्ट : वेळ पाळणे आणि स्वच्छता राखणे या दोन गुणांच्या जोरावर परदेशातील लोकांनी खूप प्रगती केली आहे, हे म्हणतात ते खरे आहे. बाकी अनुभवास येणाऱ्या अनेक गोष्टी आहेतच. 
 • भारतात फिरताना सतत जाणवणारी गोष्ट : आपल्याकडील वारशाची आपल्यालाच किंमत नाही. कितीतरी महान वास्तू भणंग, विराण अवस्थेत पडलेल्या आहेत. या वास्तूंना परदेशात डोक्यावर ठेवले असते. भारताकडे पर्यटनक्षेत्रातील अनेक गोष्टी असल्या तरी वाहतूक, दळणवळण, स्वच्छता, समजूतदारपणा अशा गुणांचा अभाव असल्याने भारतातील पर्यटन क्षेत्राचा विकास अत्यंत धीम्या गतीने होतो आहे. लोकसंख्या हा घटक भविष्यात अतिमहत्त्वाचा ठरणार आहे. 
 • अलीकडच्या काळात परदेशप्रवासात जाणवलेली गोष्ट : सार्वजनिक स्वच्छतागृहात नॉर्वेमधील ‘वॉस’ या आडगावी होणारा फक्त आणि फक्त क्रेडिटकार्डाचा वापर. तसेच ओस्लो (नॉर्वे) मधील हॉटेलात विशिष्ट क्रमांकानेच उघडणारे स्वच्छतागृहाचे दरवाजे. 
 • क्रुझ पर्यटन : जमिनीवर असताना क्रुझमध्ये बसायचे पैसे मोजायचे, क्रुझमध्ये असताना जमिनीवर उतरण्यासाठी पैसे मोजायचे. आठ दिवसांच्या काळात रोज आश्चर्यचकित होण्याइतपत नित्यनेमाची आकर्षणे क्रुझवर उपलब्ध असतात. आयुष्यातील सर्वांत जास्त साहसी पर्यटन क्रुझवरील आठ दिवसांच्या काळात झाले. 
 • हेलिकॉप्टरमधील फेऱ्या : बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा हेलिकॉप्टरमधून फिरणे झाले; परंतु नायगारा धबधब्यावरून केलेली हेलिकॉप्टरची फेरी किंवा छोटुकल्या हेलिकॉप्टरमधून १४ हजार फुटांवरील मेंडेनहॉल ग्लेशियरवरून केलेली हेलिकॉप्टरची फेरी दीर्घकाळ स्मरणात राहील. 
 • साहससफारींमधील ऐन मोक्याच्या क्षणी : १. स्वाती आणि मी, आम्ही दोघे स्कायडाइव्हसाठी गेलो. विमान ९ हजार फुटांवर गेले आणि ‘उडी मार’ असे म्हटल्यावर त्वरित स्वतःला निरभ्र आकाशात झोकून देणे... हा निर्णायक क्षण होता, २. जुनौमध्ये (अलास्का) १४ हजार फुटांवर कुत्र्यांची गाडी आपल्याला दूरवर घेऊन गेल्यावर दीड-दोन किलोमीटरवरील अतिबर्फाळ प्रदेशात आपण जेव्हा निर्मनुष्य प्रदेशात थांबतो, तो वेड लागणारा क्षण असतो. 
 • घुमक्कडांचे अनुभव : प्रवासात घुमक्कडांचे थरारक अनुभव ऐकायला मिळतात. कधी कधी वाटते लोकविलक्षण असे घुमक्कडांचे अनुभव ऐकण्यासाठी तरी आयुष्यभर खूप खूप फिरायला हवे. 
 • प्रवासासाठी आवश्यक : तुम्ही ‘लोनली प्लॅनेट’ हे मासिक वाचता का? ‘आऊटलुक ट्रॅव्हलर’ मासिक वाचता का? तुम्ही नकाशे पाहता का? तुमच्या घरात किमान एक खण (ड्रॉवर) पर्यटनविषयक साहित्यासाठी राखीव ठेवला आहे का? तुम्ही नोंदी ठेवता का? एखाद्या ठिकाणी जायचे अनेक रस्ते असले आणि आडवळणावरचा रंजक रस्ता लांबवरचा असला, तर तुम्ही लांबचा पर्याय स्वीकारता का? रेल्वे वेळापत्रकाची दरवर्षीची नवी प्रत घेता का? तारांकित सोयी तर साऱ्यांनाच आवडतील; परंतु गैरसोय झाली किंवा विपरीत घडले तर तुम्ही सामान्य ठिकाणी राहू शकता का? या व अशा अनेक गोष्टी (बऱ्याच वेळा वायफळ म्हणाव्या अशा गोष्टी) तुम्हाला प्रवासयोग्य बनवतात. 
 • आजवरच्या आयुष्यात सर्वांत आवडलेला प्रवास : २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात (दरवर्षीचा नियम असल्याप्रमाणे) केलेल्या अनेक वर्षांच्या सह्यभ्रमण मोहिमा या जिवाच्या लगत आहेत. 
 • महाराष्ट्रातील घुमक्कडांसाठी : सह्याद्रीच्या अनेक वाऱ्या करणाऱ्या ट्रेकर्सना पुऱ्या जगात संचार करणे विलक्षण सोयीचे, सहज असे आहे असे मला वाटते. एकदा १५०/२०० फेऱ्या गडावर मारून झाल्या, की जगभरातील साहससफारींकडे घुमक्कडांनी वळायला हवे. आनंदाची कितीतरी व्यवधाने जगात सापडतात. 
 • अखेरचा शब्द : एक डायलॉग म्हणून नव्हे; परंतु खरोखरच बोलायचे तर, गेल्या ३५ वर्षांत आपण काहीच फिरलो नाही, फिरण्यासारखे केवढेतरी अजून बाकी आहे... हे आणि असेच सतत जाणवत, वाटत राहते. 

संबंधित बातम्या