साहसी पर्यटन ठिकाणे

संकेत जगताप
सोमवार, 24 जून 2019

डेस्टिनेशन्स
 

साहसी पर्यटन क्षेत्र सध्या चांगलेच नावारूपाला आले आहे. पर्यटकांचा साहसी पर्यटनातील उत्साह चांगलाच वाढताना दिसतो आहे. त्यामुळे गिर्यारोहण, रॅप्लिंग, रॉकक्‍लाइंबिंग, व्हॅली क्रॉसिंग, कॅंपिंग, जंगल भ्रमंती, स्किइंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, झिपलाइन, बंजी जंपिंग, पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी अशा साहसी क्रीडा प्रकारांची मागणी वाढली आहे. काही पर्यटनस्थळे केवळ या धाडसी अनुभवासाठीच लोकप्रिय होऊ लागली आहेत. यातून त्या ठिकाणांच्या व्यवसायास बळकटी मिळत असून या साहसी खेळाशी निगडित रोजगार संधीही उपलब्ध होत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विकसित राज्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील साहसी उपक्रम राबवले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र आणि भारतातील अशाच काही साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहसी खेळांचा आणि ठिकाणांचा घेतलेला आढावा...

स्कूबा डायविंग आणि इतर खेळ - रत्नागिरी
 रत्नागिरी जिल्हा हा साहसवेड्या पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. अनेक साहसी क्रीडाप्रकार रत्नागिरीत वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवता येतात. स्कूबा डायविंगसाठी तारकर्लीजवळील मालवण हे ठिकाण आहे. स्कूबा डायविंग करताना पाण्याखालील रंगीबेरंगी समुद्री जीवनाचा विलक्षण अनुभव येतो. रंगीबेरंगी दुनियेची झलक बघण्याची संधी रत्नागिरीच्या मीरा बंदर येथे उपलब्ध आहे. तसेच मालवणला जेट स्की, बनाना राइड आणि पॅरासेलिंगसारखे साहसी आणि मनोरंजनात्मक उपक्रमदेखील राबविले जात आहेत. भाट्ये किनाऱ्यावर चालणारी व्हॅली क्रॉसिंग करताना दोरीला लटकून दुसऱ्या बाजूला जाताना खाली फेसाळलेला समुद्र आणि आजूबाजूला असणारा हिरवागार निसर्ग आत्मभान हरवून जायला लावतो. तारकर्ली, दिवेआगर, नागाव आणि दापोली ही लोकप्रिय जलक्रीडा स्थळे आहेत.

पॅराग्लायडिंग - पाचगणी/कामशेत
  कामशेतमधील इंडस पॅराग्लायडिंग ही संस्था यासाठी प्रसिद्ध आहे. पराग्लायडिंगसाठी कामशेत, पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे आहेत. पॅराग्लायडिंग हा एक साहस आणि भीती या दोन्हींचा मेळ घालणारा हवाई खेळ आहे, जो अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय होत आहे. एखाद्या पक्ष्याप्रमाणे तुम्ही उंचच उंच उडण्याचा, डोंगर पर्वतांना गवसणी घालण्याचा आनंद घेऊ शकता. साधारणत: ऑक्‍टोबर ते मे हा पराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम काळ असतो.

वन्यजीव सफारी - ताडोबा 
 महाराष्ट्रात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, जसे की भारतीय विशाल गिलहरी, फॉरेस्ट ओऊलेट आणि भारतीय राखाडी हॉर्नबिल. महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्यांमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे.

व्हाइट वॉटर राफ्टिंग - कुंडलिका
 रिव्हर राफ्टिंग किंवा वॉटर राफ्टिंगचा आनंद समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी अनुभवायला मिळतो. कोलाड येथील कुंडलिका नदीवर व्हाइट वॉटर राफ्टिंगचे उपक्रम घेतले जातात. ही नदी महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटातून वाहते. इथे १३ किलोमीटरपर्यंत राफ्टिंगचा अनुभव घेता येतो. तसेच कायाकिंग, कॅनोइंग आणि बोटिंगसारखे साहसी कीडाप्रकारसुद्धा इथे अनुभवता येतात. जून ते सप्टेंबर दरम्यान व्हाइट वॉटर राफ्टिंगसाठी जास्त गर्दी असते. ज्यांना व्हाइट वॉटर राफ्टिंगची भीती वाटते त्यांच्यासाठी कायाकिंग हा पर्याय उत्तम आहे. तीन-चार बोटी जोडून एक भलीमोठी बोट तयार केली जाते. त्यावर एकावेळी जवळपास ७-८ जण बसतात.

रॅप्लिंग - पश्‍चिम घाट
 रॅप्लिंग एक साहसी खेळ आहे, ज्यामध्ये रस्सीच्या साहाय्याने धबधबा असणाऱ्या खडकावरून खाली उतरतात किंवा चढतात. यालाच वॉटरफॉल रॅपलिंग म्हणतात. यासाठी जबरदस्त ताकद असावी लागते. तसेच तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. पुण्यातील पश्‍चिम घाटात अनेक धबधबे आहेत. त्यामुळे साहसी तरुण मंडळी याठिकाणी खास पावसाळ्यात भेटी देतात. जून ते ऑक्‍टोबर या पावसाळ्याच्या काळात रॅप्लिंग केले जाते.

बंजी जंपिंग - लोणावळा
 जगातल्या सगळ्या साहसी खेळांमध्ये सगळ्यात रोमांचकारी खेळ म्हणून बंजी जंपिंग प्रसिद्ध आहे. खूप उंचावरून इलॅस्टिक रोपच्या साहाय्याने उडी मारली जाते. हा खेळ अत्यंत साहसी असल्याने खूप कमी ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या लोणावळ्यात बंजी जंपिंगचा थरार अनुभवता येईल. लोणावळ्यातील डेल्ला ॲडव्हेंचर क्‍लबमध्ये हा उपक्रम राबवला जातो.

जायंट स्विंग - संधान व्हॅली
 अहमदनगरमधील संधान व्हॅली हे सर्वांत रोमांचकारी ठिकाण आहे. सह्याद्री रेंज, फ्लाइंग फॉक्‍स, रॅप्लिंग आणि बर्मा ब्रिज क्रॉसिंगवर जायंट स्विंगसारख्या क्रीडा स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे.

ट्रेकिंग - सह्याद्री पर्वतरांगा
 सह्याद्री पर्वतरांगांमध्ये केलेली ट्रेकिंग साहसी पर्यटनाचाच एक भाग म्हणावी लागेल. कारण डोंगर, कड्या कपाऱ्या, सुळके, कातळकडे चढण्यासाठी साहसच लागते. गड-किल्ले, आसपासचे निसर्गसौंदर्य ट्रेकरला मंत्रमुग्ध करून टाकतात. सर्व ट्रेकिंग ट्रेल्ससह अनेक कॅस्केडिंग क्रीक, गशिंग झरणे, विदेशी वनस्पती-प्राणी, बोल्डर्स स्केल करणे, पूलमध्ये छप्पर घालणे असे अनुभव घेता येतात. महाराष्ट्रात ट्रेकिंग मोहिमांतील साहसी क्रीडाप्रकारांची सूची मोठी आहे. काही ठिकाणी कॅम्पिंग, वन्यजीवन छायाचित्रण, रिव्हर राफ्टिंग आणि इतर पावर-पॅक्‍ड खेळांची सुविधा उपलब्ध आहे. काही ठिकाणी ट्रेकर्ससाठी कॅम्पिंगचीदेखील सुविधा असते. साहसपूर्ण ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे किल्ले म्हणजे तिकोना किल्ला, विसापूर किल्ला, हरिश्‍चंद्रगड किल्ला आणि रायगड असे अनेक किल्ले आहेत.

भारतात साहसी उपक्रम 

हेली स्किइंग किंवा हेलिकॉप्टर स्किइंग
हेली स्किइंग हा एक साहसी रोमांचक हिवाळी खेळ आहे. हा खेळ बर्फाळलेल्या प्रदेशात खेळला जातो. भारतात हिमालयीन प्रदेशात हेली स्किइंगचा उपक्रम राबवला जातो. यात साहसवीर हेलिकॉप्टरमधून बर्फाच्छादित डोंगरावर उडी मारतो. बऱ्याचदा हे जिवावर बेतू शकते. कारण खाली बर्फाचा डोंगर असतो. भारतात हेली स्किइंगसाठी गुलमर्ग (काश्‍मीर), मनाली (हिमाचल प्रदेश) ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

माउंटन बाइकिंग किंवा सायकल ट्रेकिंग 
भारतात माउंटन बाइकिंगसाठी पॅंग टू रुमसे (लडाख), केरळचा पर्वतीय भाग, सिंगलीला रेंज (पश्‍चिम बंगाल), सिक्कीमचे ट्रेल्स ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. माउंटन बाइकिंग हे एकट्याने तसेच ग्रुपमध्येदेखील केले जाते. यातून थ्रिल अनुभवायला मिळतो. त्यामुळे तरुणांमध्ये याची जास्त क्रेझ दिसते.

क्‍लिफ जंपिंग
 क्‍लिफ जंपिंग हा साहसी क्रीडा प्रकार शिवपुरीच्या खडबडीत प्रदेशात लोकप्रिय आहे. हे ठिकाण वर्षभर या खेळासाठी खुले असते.

स्काय डायविंग
स्काय डायविंग एक साहसी क्रीडा प्रकार आहे. यासाठी मध्य प्रदेशातील धन, कर्नाटकातील म्हैसूर, गुजरातमधील देसा आणि महाराष्ट्रातील ॲम्बी व्हॅली ही काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. या साहसी क्रीडाप्रकारातून पक्ष्यांप्रमाणे उडण्याचा अनुभव घेता येतो. हेलिकॉप्टरमधून उडी मारायची आणि पॅराशुटच्या साहाय्याने सुरक्षितपणे जमिनीवर उतरायचे.

ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंग/फ्लाइंग फॉक्‍स/जायंट स्विंग
ऋषिकेशमधील मोहन चट्टी बंजी जंपिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. याची उंची ८३ मीटर आहे. हा खेळ भारतातील सर्वोत्तम साहसी खेळांपैकी एक आहे.

स्नॉर्किंग आणि स्कूबा डायविंग
स्नॉर्किंग हे पाण्याच्या पृष्ठभागावरून केले जाते आणि त्यासाठी खास डायविंग मास्क, श्वासोच्छ्वासाची नळी आणि पंख आवश्‍यक असतात. स्नॉर्किंग आणि स्कूबा डायविंगसाठी प्रशिक्षण आणि कौशल्याची आवश्‍यकता असते. या साहसी क्रीडा प्रकारात जास्त जोखीम असते. पर्यटकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये हा एक अद््‌भुत आणि लोकप्रिय खेळ होऊ लागला आहे. जो समुद्रातील रंगीत जीवन आणि कोरल रीफ्सच्या जादुई दुनियेची अनुभूती देतो. भारतात अनेक बेटे आहेत, जी स्नॉर्किंग तसेच स्कूबा डायविंगचा अनुभव घेण्याची संधी देतात. भारतात स्नॉर्किंग आणि स्कूबा डायविंगसाठी अंदमान बेटे, गोवा, नेत्रणी (कर्नाटक), नेत्रणीची बाराकुडा बेटे, लक्षद्वीप बेटे इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

पॅराग्लायडिंग 
भारतातील पॅराग्लायडिंगसाठी बीर (हिमाचल प्रदेश), स्टोक कांगरी (लडाख),  दार्जिलिंग, सोलंग, गोवा आणि कामशेत/पाचगणी (महाराष्ट्र) ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पॅराग्लायडिंग हा जगभरात अत्यंत लोकप्रिय असणारा एरो-स्पोर्ट आहे. या साहसी वायू खेळामध्ये फ्री-फूट लॉन्च केलेले एक विमान असते, ज्यात पायलट ग्लायडरपासून वेगळ्या केलेल्या दोरीवर बसतो. ग्लायडरमध्ये कोणताही कठीण धातू नसून त्याचा वेग हा हवेच्या दिशेप्रमाणे संतुलित होतो.

संबंधित बातम्या