तयारी साहसी सफरीची 

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 24 जून 2019

साहसी पर्यटन :  फिटनेस

आपले नेहमीचे धकाधकीचे पण चाकोरीतले जगणे काही काळ विसरून नव्या ठिकाणी जाणे म्हणजे पर्यटन. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मूलभूत प्रवृत्तीच त्याला पर्यटनासाठी  उद्युक्त करते. पर्यटन करताना मौजमजा करणे हाच बहुतेकांचा उद्देश असतो. मात्र, सारेजण अशा विचारांचे नसतात. त्यांची मौजमजेची व्याख्या थोडी हटके असते.  
 काहीतरी जगावेगळे करावे, ज्यात सर्वसामान्यांना भीती वाटते असे या मोजक्‍या व्यक्तींना वाटत असते. प्रसंगी जीव धोक्‍यात घालून अशा काही देदीप्यमान गोष्टी कराव्यात, ज्या सर्वसामान्य व्यक्ती टाळत असतात. अशी विजिगिषु वृत्ती काही जणांच्या रक्तात सळसळत असते. साहस, साहस म्हणतात ते हेच असते. या साहसी वृत्तीतून विशेष प्रकारच्या स्थळांना भेटी देणे आणि तिथे शरीराला कष्ट देऊन आणखी काही अतिविशेष उपक्रम करणे म्हणजे साहसी पर्यटन. किंबहुना युवकांमधील साहसी वृत्ती अशा पर्यटनातूनच विकसित होऊ शकते. 
 ‘साहसी पर्यटन’ म्हणजे एखाद्या दूरस्थ, अज्ञात आणि अवघड ठिकाणाचा प्रवासी दौरा असतो. त्यात कमालीचे शारीरिक श्रम असतात. या पर्यटनात शरीराच्या तंदुरुस्तीची एक प्रकारची परीक्षाच घेतली जात असते. या पर्यटन प्रकारात गिर्यारोहण, खोल दऱ्यांमध्ये उतरणे, उभ्या कातळांवर प्रस्तरारोहण करणे, ज्यांचा थांगही लागत नाही अशा गुहांमध्ये फिरणे, खूप उंचावरून ‘बंजी जम्पिंग’ करणे, डोंगर-दऱ्यांमध्ये, खडतर प्रदेशात सायकल किंवा वाहन चालवणे, पांढऱ्या शुभ्र पण बर्फासारख्या थंड आणि कमालीचा वेग असलेल्या जलप्रवाहात राफ्टिंग करणे, उंच शिखरांना जोडलेल्या धातूच्या तारांना लटकून पलीकडे दूरवर जाणे (झिप लायनिंग), उंच प्रदेशातून उड्डाण करून मोठ्या कापडी पतंगाद्वारे पॅराग्लायडिंग करणे, समुद्रात खोलवर जाऊन दीर्घ डुबकी मारणे असे अनेकविध प्रकार येतात.  
खूप कमी लोकांना माहिती असलेल्या एखाद्या अनोख्या ठिकाणी प्रवास करून, अशा साहसी खेळांचा मनसोक्त आनंद घेत, शारीरिक कुवतींना आव्हान देणारे हे साहसी पर्यटन झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. मात्र, अशा पर्यटनामध्ये सामील होणाऱ्या उत्सुक पर्यटकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला अनेक धोके संभवतात. त्यामुळे या धोक्‍यांची जाणीव आधीच करून घेतल्यास आणि त्यादृष्टीने उपाय योजना आखल्यास हे पर्यटन सुरक्षित होते आणि तुमच्या सुटीचा आनंद द्विगुणित होतो.

साहसी पर्यटनातील धोके
 दुखापती : साहसी पर्यटनात बहुधा दुर्गम भाग असतात. आपल्या देशात असो किंवा परदेशात असो, अशा ठिकाणी चालताना, चढता-उतरताना, सायकल किंवा वाहन चालवताना पडणे, लागणे, हाड फ्रॅक्‍चर होणे, सांधे निखळणे अशा दुखापती होऊ शकतात. सहलीची ही ठिकाणे शहरी वस्तीपासून आणि वैद्यकीय सोयी-सुविधांपासून अनेकदा इतकी दूर असतात, की या दुखापतींवर त्वरित इलाज होणे दुरापास्त असते. 
 प्रथमोपचार : अशा प्रदेशात जरी उपचार मिळाले, तरी ते खूप प्राथमिक स्वरूपाचे असू शकतात. एखादे महत्त्वाचे औषध मिळणे, गंभीर दुखापतीवर किंवा त्रासावर तातडीक उपचार होणे किंवा शस्त्रक्रियेची सोय असणे शक्‍य होत नाही.
 प्रतिकूल हवामान : या प्रदेशात खूप पाऊस, हिमवर्षाव आणि हवामानातील अतिरेकी बदल घडत असतात. त्यामुळे मदत पथके तिथे पोचणे अनेकदा दुष्प्राप्य असते.
 कीटकदंश, सर्पदंश, वनस्पतींची तीव्र ॲलर्जी येणे, कडक उन्हाने शरीरावर फोड येणे किंवा अतिबर्फाच्छादित प्रदेशात हिमदंश (फ्रॉस्ट बाईट) होणे हे घातक ठरू शकतात.
 शारीरिक कष्ट सहन न झाल्याने दम्याचा त्रास होणे, हृदयविकाराचा झटका येणे, भोवळ येणे, सांधे सुजणे असे त्रासदायक आणि गंभीर आजार होऊ शकतात.
 दुर्गम भागातील अन्न न पचल्यास किंवा दूषित अन्न आणि पाणी घेतले गेल्यास उलट्या, जुलाब, पोट दुखणे, कावीळ, टायफॉईड हे आजार होतात. जर त्या प्रदेशात डास असतील तर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या असे आजार संभवतात.

काय काळजी घ्यावी

वैद्यकीय सल्ला : केवळ एखाद्याची इच्छा आहे म्हणून त्याला अशा पर्यटनात भाग घेता येत नाही. देशा-परदेशातील अनेक साहसी पर्यटनांमध्ये बहुतेकदा शारीरिक फिटनेसची तपासणी केली जाते. काही ठिकाणी तुमच्या फिटनेसबाबत केवळ एक फॉर्म भरून घेतला जातो किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र मागितले जाते. मात्र, या प्रमाणपत्राला फक्त औपचारिकता समजून तो वरवर भरल्यास पर्यटकामधील शारीरिक त्रुटींकडे दुर्लक्ष होऊन प्रवासामध्ये गंभीर प्रसंग उद्भवू शकतात. याकरिता अशा प्रवासाच्या साधारणतः दीड महिना अगोदर डॉक्‍टरांची वेळ घेऊन संपूर्ण वैद्यकीय तपासणी आणि आवश्‍यक त्या चाचण्या करून घ्याव्यात. यामध्ये आपण या पर्यटनासाठी शारीरिकदृष्ट्या फिट किंवा योग्य आहोत का हे समजून घ्यावे. उदाहरणार्थ हृदयविकार असेल, तर फार शारीरिक कष्ट पडतील असे उपक्रम करता येणार नाहीत किंवा फुफ्फुसांची क्षमता जास्त असेल, दमा, सीओपीडी असे विकार असतील, तर अतिउंचावरील व विरळ हवामानाच्या प्रदेशात जाऊ नये.
प्रथमोपचार : अशा सफरीत भाग घेताना प्रथमोपचार येणे आवश्‍यक असते. त्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण घेणे आणि अत्यावश्‍यक औषधे आणि उपकरणे यांचा समावेश असलेले प्रथमोपचाराचे किट प्रवासात नेणे अत्यावश्‍यक असते.

लसीकरण : ज्या भागात जायचे आहे, तेथे प्रचलित असलेल्या आजारांच्या लसी घ्याव्यात. याशिवाय कावीळ, टायफॉईड अशा आवश्‍यक आजारांच्या लसी जरूर घ्याव्यात. 
 विशेष काळजी : आपल्याला असलेल्या त्रासांमधून काही गंभीर आजार होऊ नये म्हणून काय टाळावे आणि काय करावे याबाबतच्या सूचना घ्याव्यात.

प्रवासी आरोग्यविमा : आपल्या साहसी पर्यटनात होणाऱ्या अपघातांसाठी किंवा आजारपणासाठी विशेष प्रकारचा विमा उतरवणे आवश्‍यक असते. त्यामुळे उपचारादरम्यान आर्थिक कुचंबणा होत नाही.

शारीरिक फिटनेससाठी
 साहसी पर्यटन प्रकारामधील सफरी म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीराची सर्वांगीण कसोटी असते. यात - 

  • स्टॅमिना - खूप शारीरिक कष्ट केल्यावरही दम न लागणे,  
  • दीर्घकाळ कार्य करण्याची स्नायूंची शारीरिक कुवत, 
  • सांधे आणि पाठीचा कणा जास्तीत जास्त किती तणाव झेलू शकतो, 
  • प्रतिकूल परिस्थिती, भीती, निराशा, सांघिक ऐक्‍याची भावना या साऱ्याबाबतीत मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती किती ताण सहन करू शकते याची परीक्षा असते. 

या गोष्टी साध्य करायच्या असतील, तर किमान दोन ते अडीच महिने नियोजितपणे शारीरिक तयारी करावी लागते. ही पूर्वतयारी टप्प्याटप्प्याने करावी. साहसी पर्यटन खूप उच्च पातळीचे असेल, तर वर उल्लेखलेल्या सर्व गोष्टी नितांत गरजेच्या असतात. साहजिकच शक्‍य असल्यास अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली किंवा यामध्ये पारंगत असलेल्या प्रशिक्षकांकडून त्यासाठी परिपूर्ण तयारी करून घ्यावी. पण केवळ मौज आणि साहस या दोन्हींचे मिश्रण असलेल्या साहसी सहलीत वैयक्तिक पातळीवरदेखील या गोष्टी काही प्रमाणात आवश्‍यक ठरतात.

चालणे : यात दीर्घकाळ भरभर चालणे आवश्‍यक असते. केवळ सपाटीवर नव्हे, तर उंचसखल रस्ते, टेकड्या, डोंगर, खडकाळ प्रदेश, दगड-धोंड्यांनी, चिखलाने भरलेले माळरान किंवा टेकड्या, समुद्राचा वालुकामय किनारा अशा विविध प्रकारच्या जमिनीवर चालण्याची सवय करणे आवश्‍यक असते. कमी अंतरापासून सुरुवात करून हळूहळू ते अंतर आपल्या प्रवासातील अंतराइतके न दमता कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. पर्यटनाला निघेपर्यंत किमान चार ते सहा तास अखंडितपणे चालता यायला हवे.
चालताना दुर्गम प्रदेशात वापरण्यासाठी काही काठ्या मिळतात, त्यांचा वापर करण्याची सवय करणे योग्य ठरते.
उंचावर चढताना पाठीवर जड वजनाच्या सॅक्‍स बांधून चढणे उपयुक्त ठरते. नेहमीच्या हॅवरसॅकमध्ये दगडी गोटे भरून चालण्याची सवय करणे हा या तयारीचा महत्त्वाचा भाग असतो.

पायांची क्षमता : केवळ चालणेच नव्हे, तर पायांची ताकद आणि क्षमता वाढवणारे इतर व्यायाम करणे योग्य ठरते. यामध्ये वेगाने धावणे, मध्यम गतीने दीर्घकाळ पळणे, ट्रेडमिलवर व्यायाम करणे आवश्‍यक असते. पण त्याबरोबरच बैठका, जिम वर्क-आउट्‌स, वजने उचलून पायांच्या स्नायूंची शक्ती वाढवणे, अधूनमधून फुटबॉल, स्क्वॅश खेळणे. तसेच पोहणे, सायकलिंग करणे, स्पिन सायकलवरील व्यायाम यांचा समावेश करावा. 

श्वसन क्षमता वाढवणे : पळणे, पोहणे, ट्रेडमिल अशा व्यायामाबरोबर प्राणायाम, दीर्घ श्वसन, योगासने, भस्रिका यांच्या साहाय्याने श्वसनसंस्थेची क्षमता वाढते. यामुळे शारीरिक श्रमानंतर दम लागणे कमी होते. तसेच प्रत्येक श्वासाबरोबर जास्त हवा फुफ्फुसात घेतली जाते. या हवेतून प्राणवायू अधिक प्रमाणात मिळतो आणि रक्ताभिसरणात सुधारणा होते.
श्वसनक्षमता वाढवण्याचा एक सोपा व्यायाम म्हणजे नियमितपणे टेकडी चढणे आणि इमारतीचे अधिकाधिक जिने एका दमात चढणे. उंच प्रदेशातील पर्यटनातील सफरीत श्वसनाची क्षमता वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

बदलत्या हवामानातील क्षमता : आपल्या राहत्या प्रदेशापेक्षा वेगळे हवामान असलेल्या प्रदेशातील सफर असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला त्या हवामानाशी जुळवून घ्यावे लागते. साहसी सफरीचे प्रदेश बहुधा अतिथंड, बर्फमय किंवा खूप वेगवान वारे वाहणारे असू शकतात. काही प्रसंगी खूप उष्ण किंवा अतिशय दमट, प्रचंड पर्जन्यवृष्टी, खूप विरळ वातावरण अशा हवामानातही सफर असते. त्या वातावरणाची सवय करून घ्यावी लागते. त्यासाठी त्या सफरी आधी तत्सम हवामान असलेल्या प्रदेशात काही काळ जाऊन, तिथे व्यायाम करणे किंवा ही सफर सुरू होण्यापूर्वी दोन-तीन दिवस तिथे जाऊन राहण्याचा प्रघात असतो. याला ‘ॲक्‍लामायटिझेशन’ म्हणतात. 

मानसिक तयारी : मनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी खंबीरता आणि निर्णयक्षमता असावी लागते. साहसी पर्यटनात विपरीत वातावरण, छोट्या दुखापती, काही विवंचना, अचानक उद्भवणारी भीती किंवा तणाव यामुळे ती सफर अर्धवट सोडण्याचे असंख्य प्रकार घडत असतात. यामध्ये आवश्‍यकता नसताना केवळ चिंता निर्माण झाल्यामुळे अशी सफर सोडू नये. यासाठी थोडी मानसिक सक्षमता लागते. इतरांशी चर्चा, इतरांचे अनुभव शेअर करणे, याबरोबरच मेडिटेशन आणि रीलॅक्‍सेशन पद्धती वापरून मनाची तणाव सहन करण्याची सक्षमता निर्माण करण्याची आवश्‍यक असते.
तणावपूर्ण आणि चिंतेच्या प्रसंगात स्वतःला कसे सावरावे यासाठी काही विशेष सवयी लावून घ्याव्या लागतात. मनोविकार तज्ज्ञ आणि समुपदेशक यांचा सल्ला याबाबत उपयुक्त ठरतो.

आहार : रोजच्या आहारामध्ये बदल करून स्नायूंची क्षमता वाढवायला प्रथिने, हाडांसाठी कॅल्शिअम, उर्जेसाठी पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ यांचा आहारात योग्य वापर करावा लागतो. साहसी पर्यटनात क्षार आणि पाणी यांचे प्रमाण आवश्‍यक तेवढे राखण्यासाठी नियमितपणे तीन लिटर पाणी, फळे, सरबते घेण्याची सवय हवी. पर्यटनात या गोष्टी मिळतीलच याची खात्री नसते. पण त्यासाठी ओआरएस आणि पाणी यांचा वापर करावा लागतो. 

विश्रांती : साहसमय सफरीची तयारी करताना रोज किमान सात तास झोपेची सवय हवी. त्यामुळे शरीराची होणारी झीज भरून निघण्यास वाव मिळतो. अशा सफरींचे दैनंदिन वेळापत्रक ठरलेले असते. त्यावर नजर टाकून जर झोपेची आणि विश्रांतीची वेळ कमी असेल, तर तेवढ्या वेळेच्या विश्रांतीची सवय लावून घ्यावी. कित्येकदा अशा सफरीत अचानक उद्भवणाऱ्या दुर्धर प्रसंगात विश्रांती बिलकूल न मिळण्याची शक्‍यता असते. अशाही प्रसंगांसाठी तयारी हवी.

कौशल्ये : प्रत्येक प्रकारच्या साहसी सफरीत वेगळ्या कौशल्याची गरज असते. उदा. समुद्रात पाण्याखाली डीप सी डायव्हिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नोर्केलिंग यामध्ये वेगळ्या गोष्टी लागतात. गिर्यारोहणात, बंजी जम्पिंग, हाय टेरेन ड्रायव्हिंग, रॉक क्‍लाइंबिंग अशा प्रकारात आणखी वेगळ्या गोष्टी येणे गरजेचे असते. ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी काही विशेष उपक्रम किंवा प्रशिक्षण घ्यावे लागते.  

कपडे आणि इतर : थंड प्रदेशात, बर्फाळ प्रदेशात, पावसाळी किंवा दमट, उष्ण हवामानात ही सफर असेल, तर त्यासाठी योग्य असे कपडे वापरावे लागतात. प्रवासाआधीच त्यांचा वापर करायची पद्धत शिकून त्याची सवय करावी. बर्फाळ प्रदेश, डोंगराळ प्रदेश, खडकाळ किंवा चिखलयुक्त प्रदेश, वाळवंट या प्रकारच्या प्रत्येक प्रदेशात वापरण्यासाठी वेगवेगळी पादत्राणे लागतात. त्यांचाही वापर करण्याची सवय करावी लागते. 
 थोडक्‍यात सांगायचे झाले, तर साहसी पर्यटन तुमच्या शरीराला आणि मनाला वेगळी खुमारी देऊन जाते. या प्रकारच्या सहलीत शरीराची क्षमता पराकोटीने वाढते. मनोमन तुम्ही पाच-सात वर्षांनी नक्कीच तरुण होता. पण त्यासाठी त्या सफरीला आवश्‍यक असलेली शारीरिक मानसिक क्षमता आणि कौशल्ये यांचा विचार करून सजगतेने नियोजन केल्यास या सहली नक्कीच संस्मरणीय होतील. हॅपी ॲडव्हेंचर ट्रॅव्हलिंग.

संबंधित बातम्या