छोटी आँखे... बडे सपने!

हर्षदा कोतवाल
सोमवार, 24 जून 2019

हिमालयीन वाटा
 

आमचं तर त्या दिवशी फक्त सहाच किलोमीटर ट्रेक करायचं ठरलं होतं. पण आम्ही तब्बल १० किलोमीटर चाललो होतो आणि अजूनही समिट बरंच लांब होतं. प्रचंड आवाज करत आणि मलाच काय तर अनेकांना जागेवरून पुढं ढकलणारा सोसाट्याचा वारा झेलत आम्ही जड होत चाललेलं एक एक पाऊल पुढं टाकत होतो. समोर अंगावर येणारी चढाई होती आणि ताकद संपत चालली होती. सतत होणाऱ्या अतिप्रचंड थंड वाऱ्यामुळं नाक सुन्न झालं होतं. त्यातही कडक सूर्यप्रकाशामुळं उषाच्या डोळ्यावर अंधारी येत होती. आयुष्यातला पहिला हिमालयीन ट्रेक इतका थ्रिलिंग असेल याचा मी कधी विचारही केली नव्हता. 

बाबानं सांगून पाठवलं होतं, ‘समिटवर पोचलीस की डोळे मीट आणि स्वत:चीच पाठ थोपटून घे.’ कारण त्याला एकट्यालाच माहीत होतं, की हा ट्रेक माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही समिटवर पोचलो. आम्ही मोजून सात जण आणि सारा आसमंत फक्त आमचा होता. समोर अली बुगियाल, बेदनी बुगियाल, माउंट त्रिशुल, नंदी घुंटी अशी शिखरं उभी होती. त्यावेळी मनात एक भीती होती, की या शिखरांची प्रचंडता अगदी सहजपणे मला त्यांच्यात सामावून घेऊ शकेल. पण मग विचार आला, की नाही यांच्याजवळ आल्याशिवाय आपण आपल्याला उलगडूच शकत नाही. 

थोडंफार जगणं कळायला लागल्यापासून आयुष्यात आगाऊपणानं मी बरेच निर्णय घेतले. ब्रह्मताल ट्रेकला जाण्याचा निर्णय हा त्यातला सर्वांत ताजा. मला ट्रेकिंगची कितीही आवड असली, तरी याला मी आगाऊ निर्णय यासाठी म्हणते कारण हिमालयातला हा माझा पहिलाच ट्रेक. समजा, आपण हिमालयात पहिल्यांदा ट्रेक करतोय म्हटल्यावर मार्च ते जूनच्या अल्हाददायी आणि कमी आव्हानात्मक वातावरणात ट्रेक करणं अपेक्षित असतं. पण नाही, आम्हाला आगाऊपणा करायचाच होता आणि म्हणूनच आम्ही भर थंडीत म्हणजेच जानेवारी महिन्यात हा ट्रेक करायचं ठरवलं. 

उषा सांगायला आणि मी ऐकायला! तब्बल दोन महिने असंच तर चाललं होतं सारं. अखेर आम्ही १६ जानेवारी ही तारीख ठरवली. 

हिमालयातला पहिलाच ट्रेक आणि तोही एवढ्या थंडीत म्हटल्यावर तयारीही मोठी आली. ही तयारी करण्यात दोन महिने कधी निघून गेले कळलंच नाही. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते काठगोडाम आणि काठगोडाम ते लोहजंग असा बराच मोठा प्रवास करत आम्ही बेस कॅंपला पोचलो. गेल्या वर्षी याच काळात दिल्लीला असताना थंडीचं प्रमाण कमी होतं, याहीवेळी तीच परिस्थिती असेल, असं वाटलं होतं. मात्र, झालं उलटंच. यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका जास्त आहे हे दिल्लीत पाऊल ठेवताच जाणवलं.

 लोहजंग हा आमच्या ट्रेकचा बेस कॅंप. काठगोडामपासून तब्बल १० पेक्षा जास्त तास गाडीनं प्रवास केल्यावर आपण लोहजंगला पोचतो. चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर आणि बरोबर त्याच्या कुशीत वसलेलं हे गाव. पर्यटन हाच सर्वाधिक गावकऱ्यांचा पैसे कमावण्याचा मार्ग. आम्ही तब्बल १२ तासांचा प्रवास करून लोहंजगला पोचलो, तर मावळतीकडं सूर्य अस्ताला चालला होता. त्या जांभळ्या क्षितिजावर चढलेला भरजरी सोन्याचा शालू पाहून एक इशारा नक्कीच मिळाला होता. पुढचे पाच दिवस डोळ्याचं पारणं फेडणारे नयनरम्य सोहळे पावलागणिक पाहायला मिळणार आहेत. 

 सूर्य अस्ताला गेला आणि आम्ही आमच्या ट्रेक लिडरशी बोलू लागलो. आम्ही सर्वांनी आपापली ओळख करून दिली आणि थोड्याफार महत्त्वाच्या सूचनांबद्दल चर्चा केली. गच्चीत उभं असताना गच्चीतल्या एकाही वस्तूला हात लावायची हिम्मत झाली नाही. याला दोन कारणं होती. एक तर खिशात घालून गरम केलेले हात बाहेर काढायला मन मानत नव्हतं, तर दुसरं म्हणजे बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला हात लावला, तरी हात सुन्न करणारी थंडी पडली होती. आम्ही सगळेजण ट्रेक कसा असेल यांची दोन अंशात उभं राहून चर्चा करत होतो. पहिल्या रात्रीच कळलं होत, आपला आगाऊपणा चांगलाच भोवणार आहे आणि पुढचे पाच दिवस खूप आव्हानात्मक असणार आहेत. जेवायला गेलो तेव्हा नुकताच एक ग्रुप ट्रेक संपवून बेस कॅंपला आला होता. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, की वरती -१० अंशापर्यंत तापमान जात आहे. ते ऐकूनच मनात धडकी भरली. माझ्यासाठी ट्रेकमध्ये किती चालायला लागणार, तो किती मोठा असणार, पाठीवर किती ओझं असणार हे सारे प्रश्न दुय्यम होते. मूळ प्रश्न होता एवढी थंडी मी सहन कशी करणार?      

 पुण्यातल्या थंडीतही एकावर एक दोन स्वेटर घालणारी मुलगी मी, तिकडं एवढ्या थंडीत निभाव लागणार तरी कसा माझा? हा विचार करता करताच झोप कधी लागली कळलंही नाही. 

 सकाळी सहा वाजता उठून बाहेर गेले. रात्री काळोखात हरवलेलं ते सौंदर्य सूर्य जसा वर येत होता, तसं आणखी खुलत होतं. आम्ही आवराआवर करायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या ट्रेक लिडरनं आम्हाला थर्मल वेअर आणि स्वेटर घालण्यास मनाई केली. ‘वेडा झालायं का हा? थंडीनं गोठून जाईन मी’ अगदी हेच शब्द मी उषा आणि गणेशला म्हणाले होते. आम्ही सर्वांनी नाश्‍ता करून ट्रेकला सुरुवात केली आणि पुढच्या १५ मिनिटांतच मला तो वेडा नाही हे कळून चुकलं. बाहेरच्या वातावरणात कितीही गारवा असला, तरी केवळ १५ मिनिटं चालल्यावर सगळ्या अंगात उष्णता निर्माण झाली होती. 

 आतापर्यंत सलग चार तास लाल मातीतून चालल्यावर अचानक थंडी वाजू लागली. बराचवेळ अत्यंत कमी प्रमाणात दिसणारा बर्फ आता सर्वांनाच दिसू लागला. हवेतला गारवा प्रचंड वाढला. सर्वांनीच जॅकेट आणि हॅण्डग्लोव्हज घातले. 

 लाल माती आता संपली होती. इतकावेळ आजूबाजूला असलेला बर्फ आता आमच्या पायाखाली होता. नुकतीच बर्फवृष्टी झालेली असल्यानं बर्फ भुसभुशीत होता आणि त्यामुळंच चालण्याची गती आता कमी झाली. बराच काळ बर्फातून चालल्यावर आम्ही आमची पहिली कॅंप साइट बेकलतलला पोचलो. 

 आमच्यासोबत एक चाळिशी पार केलेलं जोडपं होतं. आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून ते दोघंही ट्रेकसाठी आले होते. हे कळल्यावर मला खरंच खूप आनंद झाला. ऑफिसमुळं जमत नाही, मुलांच्या शाळा असतात, त्यांच्याकडं लक्ष कोण देणार?, घरच्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार? अशी कोणतीही कारणं न देता ते दोघंही ट्रेकिंगसाठी असलेली आवड जोपासत आहेत हे पाहिल्यावर मन शांत नसतं झालं तर नवलच. 

कॅंप साइटवर साडेसात वाजता जेवण आणि साडेआठ वाजता गुपचूप टेंटमध्ये जाऊन झोपायचं. नवीन नियम अंगवळणी पडायला थोडा वेळ जाणार होता आणि म्हणूनच आम्ही सगळेजण एकाच टेंटमध्ये गप्पा मारत बसलो. छोट्याशा टॉर्च लाईटमध्ये चाललेल्या गप्पा आणि बाहेर होणारा स्नो फॉल, सारंच अगदी स्वप्नवत होतं. मात्र, उणे अंशात गेलेलं तापमान आम्हाला काही सहन होईना. शरीर गरम ठेवायचं म्हटलं, तर हालचाल हवी. म्हणूनच आम्ही टेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समोरच असलेल्या बर्फाच्या छोट्या टेकडीवर जाऊन आम्ही डान्स केला. तब्बल अर्धातास झालेल्या हालचालीनंतर आम्ही तडक टेंट गाठलं आणि स्लिपिंग बॅगमध्ये जाऊन झोपलो. 

 दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सात तासांचा ट्रेक करायचा आणि ब्रह्मतालच्या कॅंप साइटवर राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी समिट करायचं आणि परतीच्या प्रवासाला लागायचं असा आमचा प्लॅन होता. त्यानुसार आम्ही सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. आता आम्ही तब्बल दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर होतो. आता चारही बाजूंना नजर टाकली, तर फक्त पांढरा शुभ्र बर्फ दिसत होता. जोरात वाहणारा वारा आणि प्रचंड थंडीमुळं आता श्वास घ्यायला किंचित त्रास व्हायला लागला होता. अशा परिस्थितीचा सामना करत आम्ही मजल दरमजल करत पावलं टाकत होतो.

 हिमालयातले सारे ट्रेक्‍स हे तिथल्या वातावरणावर अवलंबून असतात. त्यामुळंच प्लॅनमध्ये कधीही बदल होऊ शकतात. आमचंही तेच झालं. खराब हवामानाचा अंदाज व्यक्त केला गेल्यानं आम्ही त्याच दिवशी समिट करण्याचं ठरवलं. त्यामुळं आम्ही ब्रह्मतालच्या तलावाला वेढा घालून वरच्या बाजूनं सिमटच्या दिशेनं चालू लागलो. अशातच माशी शिंकली आणि दिशाला हाय अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास व्हायला सुरुवात झाली.

 हाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे अतिउंचीवर गेल्यावर होणारा त्रास. दिशाला आता श्वास घेताना त्रास व्हायला लागला, तिच्या छातीत दुखू लागलं. तिला आता पुढं ट्रेक करणं शक्‍य होणार नव्हतं. त्यामुळं तिनं दिनू भय्यांसह पुन्हा कॅंपची वाट धरली, तर आम्ही समिटच्या दिशेनं निघालो. सर्व अवघड परिस्थितीवर मात करत आम्ही अखेर समिटवर पोचलो. त्या एका क्षणात मनाला जेवढी शांतता लाभली आहे, ती गेली २२ वर्षं मिळाली नव्हती. समोर उभी असलेली चारही शिखरं मला साद घालत होती आणि मीसुद्धा त्यांना परतण्याचं वचन देऊनच मागं फिरले. 

 समिटवर चढताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आता उतरताना होणार होता. कारण, भुसभुशीत बर्फावरून चालणं सोपं होतं. मात्र, गोठलेल्या बर्फावरुन सतत पाय घसरत होता. खाली पाहण्याची तर मी हिंमतच केली नाही. सकाळी साडेआठपासून आम्ही चालायला सुरुवात केली होती. आता अंगातली ताकद पूर्णपणे संपली होती. सात किलोमीटर चालण्याच्या केलेल्या मनाच्या तयारीत आम्ही तब्बल १६ किलोमीटर चालून १२,२५० फूट उंची गाठून उतरत होतो. अखेर जवळपास सहा वाजता आम्ही ब्रह्मताल तलावापाशी पोचलो. आता आमचा ट्रेक संपत आला होता. दुसऱ्या दिवसापासून आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार होतो. त्यारात्री मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं आमचा टेंट मध्यरात्री तुटला. उरलेली सगळी रात्र आम्ही तो उडणारा टेंट सावरतच झोप काढली. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. त्यादिवशी आम्ही जंगलात आमची कॅंप साइट लावली आणि चौथ्या दिवशी आम्ही अखेर नो नेटवर्क झोनमधून बाहेर पडत दुपारी एकच्या सुमारास लोहजंगला पोचलो आणि आमचा ट्रेक संपला.  

 या ट्रेकनं मला माझं पॅशन आणि माझा पेशन्स यांची नव्यानं ओळख करून दिली. आमच्या सहा जणांच्या ग्रुपमध्ये मी फक्त उषा आणि गणेशला ओळखत होते, असं जर मी आता कोणाला सांगितलं, तर कदाचित त्यांना हे पटणारही नाही. या ट्रेकनं मी पूर्णपणे कणखर झालेय. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींविरुद्ध फक्त लढत राहण्याची शिकवण मला या ट्रेकनं दिली आहे.

संबंधित बातम्या