सिंहगड ते रायगड सह्यभ्रमण 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 24 जून 2019

पदभ्रमण
 

काय मजा पाहा! क्विन्सटाऊनला (न्यूझीलंड) स्कायडाईव्हचा थरार अनुभवला. भाजगावला (कामशेत) पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवला. अलास्कातील हुना (अमेरिका) येथे जगातील सर्वांत मोठी झिपराईड अनुभवली. जुनौ (अलास्का-अमेरिका) येथे स्वप्नवत डॉगस्लेड केली. केटचिकन (अलास्का-अमेरिका) येथे हायकिंग एक्‍सपिडिशन केली; तरीही आपल्या महाराष्ट्रात केलेली ‘सिंहगड ते रायगड’ ही साहसी पर्यटनवारीच चांगली लक्षात राहिली. हो.. वारीच म्हणायची! कारण सिंहगड, रायगड, राजगड, तोरणा हे किल्ले अनेकवेळा फिरून झालेले होते; परंतु सारे किल्ले सलगरीत्या एकाचवेळी तेही वेगळ्या मार्गाने असे केलेले नव्हते. पुण्यातून चालायला सुरुवात करून कोकणात महाडला उतरायचे हे प्रकरण काही वेगळेच वाटत होते! 

दरवर्षी नाताळ ते नववर्षादरम्यान आजही वाय. झेड. (यंग झिंगारो ट्रेकर्स) आणि हिमसह्याद्री ट्रेकर्स यांचे आवर्जून ट्रेक्‍स निघतात. वरील दोन संस्थांबरोबर मी देशात, साताऱ्याला (वासोटा) सुरुवात करून कोकणात खेडजवळ (अवचितगड) उतरलो आहे. कोल्हापूरच्या टापूतले पारगड करीत कुडाळला रांगणा उतरलो आहे. नाशिकच्या बागलाण-सेलबारी-डोलबारी रांगेतले किल्ले सलग फिरलो आहे. तसेच नाशिकमधील वणीजवळ (रवळ्या-जवळ्या) सुरुवात करून पार मनमाड (चांदवड) पर्यंतदेखील गेलेलो आहे. त्यामुळे सिंहगड ते रायगड या सह्यमोहिमेवर निघताना फार काही वेगळे वाटण्याचा प्रश्‍न नव्हता; परंतु मोहिमेअगोदरच्या स्नेहसंमेलनात प्रख्यात इतिहाससंशोधक अप्पा परब आम्हाला मार्गदर्शन करणार होते आणि स्नेहसंमेलनातील अप्पांचे बोलणे ऐकून असे वाटले, की (हे सह्यमोहीम) प्रकरण दिसते तितके साधे नाही! शिवाय या वाटेवरचा प्रवासदेखील चांगला डोळे उघडे ठेवूनच करावा लागणार आहे. स्नेहसंमेलनात अप्पांनी सांगितले, ‘या प्रदेशात तुम्हाला राम, कृष्ण, गणपती यांची देवळे लागणार नाहीत; ब्रह्मदेवाचे देऊळ लागेल! हा महादेवकोळ्यांचा प्रदेश आहे. कौंडिण्य ऋषींचा कोंढाणा-सिंहगड, ब्रह्मर्षींचा-मुरुमदेवाचा-बरमदेवाचा राजगड अशा इतिहासाला साक्षी ठेवून तुम्हाला वाटचाल करावी लागेल.’ माझ्यासाठी हे खाद्य पुरेसे होते; परंतु पुढे काय वाढून ठेवले आहे ते माहिती नव्हते. आमच्या सह्यभ्रमणाची कार्यक्रमपत्रिका तशी सोपी साधी दिसत होती. कागदावर! मुंबई ते सिंहगड. सिंहगड ते दादेवाडी. दादेवाडी ते मेटपिलावरे. मेटपिलावरे ते गिळगाणे. गिळगाणे ते पाणे. पाणे ते रायगड. रायगड ते मुंबई... परंतु कार्यक्रमपत्रिकेतली मेटपिलावरे-भट्टी-गिळगाणे या गावांची नावे आमची गाळण उडवून द्यायच्या बेतात होती. तरीदेखील साहससफारीसाठी आम्ही अगदी उत्सुक होतो. अखेर प्रवासाचा दिवस उजाडला आणि आम्ही रात्रीचे मुंबईहून निघून पहाटे पुण्याला पोचलो. पहाटेच सिंहगड चढून, सिंहगड फिरून, शिल्पा परबने सांगितलेला मराठ्यांचा पराक्रमी इतिहास ऐकून विंझरमार्गे दादेवाडीला जायला सज्ज झालो. 

सिंहगड तर आम्ही जणू वॉर्म अप केल्यासारखा चढलो होतो. सिंहगड दरवाजातून दिसणाऱ्या रम्य डोंगरधारेचे दर्शन डोळ्यांना सुखावत होते. परंतु, त्याच धारेवरून पुढे जायचे हे माहिती नव्हते. पुढील पाच दिवसांत किती डोंगरधारांवरून चाललो किती अनवट वाटा पायाखाली घातल्या, किती घसरगुंड्या पार केल्या, कितीएक स्क्री वरून घरंगळत गेलो ते आमचे आम्हालाच माहीत! दादेवाडीला पोचायला रात्र झाली. आमच्यातील बऱ्याच जणा-जणींना पहिलाच दिवस चांगलाच भारी पडला होता. पायाला चालून-चालून फोड (ब्लिस्टर्स) आले होते. रात्री सहज म्हणून बोलायला आम्ही बसलो, ते काही ट्रेकर्सनी घरी परतायची इच्छा प्रकट केली. आमचा लीडर विठ्ठल म्हणाला, ‘उद्या एका दिवसापुरता सॅकशिवाय प्रवास आहे. आपल्या सगळ्यांच्या सॅक गाडीने पुढील मुक्कामी ठेवल्या जातील. त्यामुळे तुम्हाला चालणे अगदी सोपे होईल.’ या मोठ्या निर्णयामुळे सारेजण दमल्याचे विसरून दुसऱ्या दिवशी मार्गस्थ व्हायला तयार झाले. परंतु, दम असा लगेच जातो का? दादेवाडीहून राजगड चढताना शेवटच्या चढावावर फोटोसाठीसुद्धा कुणी आजूबाजूला किंवा वर बघत नव्हते. राजगडावर निवांत गड फिरायचा होता. पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बालेकिल्ला सुवेळा माचीसमोरच्या धमधम्यावरून तोफेचा गोळा स्वतःच्या छाताडावर घेऊन माची शाबूत ठेवणारा नरवीर... या आणि इतर अनेक कहाण्या ऐकत, संध्याकाळच्यावेळी मेटपिलावरे गावात पोचलो. तोरणा किल्ल्याच्या बरोब्बर खाली - पायथ्याशी असलेल्या मेटपिलावरे गावातील शाळेत ‘दर्शनाचा धाक’ वाटत तोरणा पाहात, गावात फिरून, पाय मोकळे करून आलो. गावकऱ्यांनी प्रेमाने आमच्यासाठी स्वयंपाक केला होता. दुसऱ्या दिवशीचा कॅम्पफायर जोरदार झाला. सगळ्यांचे पाय ‘बोलू’ लागले असल्याने मांडी घालून बसणे सर्वांनाच आवडून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याउठल्याच, तोंड धुता धुता तोरणाचे दर्शन झाले. तोपर्यंत तोरणाचे होणारे नित्यदर्शन आता काहींना भयप्रद वाटू लागले होते! थोडे चालल्यावर सुरू होणारा खडा चढ पार शेवटापर्यंत असल्याने वाटेत विश्रांतीचे काही खरे दिसत नव्हते. सकाळी चहा-नाश्‍ता आटोपल्यावर चढ चढायला सुरुवात करून तोरणाच्या माथ्यावरून खाली बघताना, काय आणि कसे छान वर आलो असे वगैरे बोलणे व्हायला लागले. मंडळी खडतर प्रवासाला सरावल्याचेच ते लक्षण होते; परंतु खडतर प्रवासातला तो एक केवळ ‘टप्पा’ होता, हे नंतर समजले. आम्ही तोरणा गडावरील बुधला माचीवरून खाली उतरू लागलो. दोन-चार रॉकी पॅच, घसरगुंडी, गुढग्यांचा कस पाहणाऱ्या (स्क्रीमुळे) निसरड्या अरुंद वाटा, पुरेपूर अनुभवत भट्टी गावाजवळची खिंड लागली. कधी न ऐकलेली गावे, अर्थातच न पाहिलेले चेहरे, कुठून कुठे आलो? कुठून कुठे चाललो? हे सांगूनसुद्धा न समजणारा भौगोलिक तपशील, कानावर येणारी ऐतिहासिक माहिती, यामुळे पूर्णपणे बावचळून जायला झाले. अगदी खरे सांगायचे, तर संध्याकाळचे साडेपाच झाले म्हणजे गाव जवळच आले की! अशी स्वतःच स्वतःची समजूत घालून चालत राहिलो. परंतु, लवकरच खिंडीतून आम्ही जंगलात गेलो. जंगलात काहीजणांच्या बॅटऱ्या ऐनवेळी चालेनाशा-पेटेनाशा झाल्या. साहजिकच राग आणि हास्य यांचे विचित्र मिश्रण होऊन, ठेचकाळत ठेचकाळत प्रदीर्घ काळाने गिळगाणे नावाच्या गावात येऊन पोचलो. रात्रीचे ८ वाजले होते. चांदणे फुल्ल पडलेले होते. पौर्णिमेला दिसतो त्यासारखा वाटोळा चंद्र शीतल प्रकाश देत ट्रेकर्सचे मन शांत करत होता. बूट काढताना बहुतेक सगळेजण म्हणाले, ‘पाय तुटेपर्यंत चालणे म्हणजे काय ते अनुभवले बुवा!’ त्यादिवशी सगळे लगेच गुडूप झाले, हे काही वेगळे सांगायला नको! 

दिवस उजाडताच चहा-नाश्‍ता झाल्यावर सरळ चाल असल्याने, त्यात मोहोरीच्या पथावरून जायचे असल्याने सगळे खुशीत होते. पण काही काळच! कारण लगेच आम्ही लिंगाणा दिसतो म्हणून त्याचे फोटो काढेपर्यंत बोराट्याच्या नाळेत उतरलो. आमच्या बरोबरचे पुढे निघून गेले होते. आम्ही फोटो काढीत मागे राहिलो होतो. आम्हा कुणाकडेही जेवण नव्हते. आमच्याजवळचे पाणीदेखील संपत आले होते. रॉकी पॅच वाढत चालले होते. वर आकाशात कुणा गिर्यारोहण संस्थेचे व्हॅली क्रॉसिंग चालले होते. खडक तापलेले होते. संपूर्ण बोराट्याची नाळच मुळी मोठमोठाल्या दगडांची असल्याने त्या नाळेतूनच आम्हाला रास्ता काढीत जायचे होते. अखेर आमचे सहकारी दिसले. तेव्हा कुठे थोडे पाणी प्यायला मिळाले. लिंगण्याजवळच्या पाणे या गावात आमचा मुक्काम होता. पौर्णिमेचा चंद्र आणि थम्स अप दिसणारा लिंगाणा कॅमेऱ्यात घेण्यासाठी छायाचित्रकारांची चुळबुळ सुरू झाली. 

अखेरच्या दिवशी पाणे गावातून निघून रायगड दिसायची खोटी; सगळ्यांमध्ये ट्रेक संपल्याचीच भावना जागृत झाली. अखेरच्या टप्य्यात रायगडाच्या पायऱ्या चढताना, सरावलेल्या पायांनादेखील कंटाळा आला. ‘चाल चालेल पण पायऱ्या नकोत’ अशी अवस्था झाली सगळ्यांची! त्यानंतर रायगडावर मिलिंद पराडकर यांच्याकडून गडाची विशेष अशी माहिती ऐकून आणि त्यानंतर रायगडावरील महाराष्ट्र पर्यटन निवासामध्ये २ दिवस वास्तव्य करून, चमचमीत मेजवानीवर आडवा हात मारून अखेर आपापल्या घरी परतलो. इतिहासात डोकावायला लावणारे, अनवट वाटांसह गडकोट फिरण्यातले साहस अगदी आपल्या रक्तात भिनवणारे हे साहसी पर्यटन प्रत्येक घुमक्कडाने, आयुष्यात एकदा तरी आवर्जून करण्याजोगे आहे.

कसे जाल? 
 पुणे/मुंबई - सिंहगड - विंझर - दादेवाडी. 
 दादेवाडी - राजगड - मेटपिलावरे. 
 मेटपिलावरे - तोरणा - भट्टी - गिळगाणे. 
 गिळगाणे - मोहोरीपठार - बोराट्याची नाळ - लिंगाणमाची - पाणे. 
 पाणे - वाघेरी - रायगडवाडी - रायगड. 
 रायगड - पुणे/मुंबई.  

विशेष महत्त्वाचे 
ही साहससफर केवळ तज्ज्ञ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखालीच करण्याजोगी आहे. या साहससफारीबरोबर इतिहासाचे जाणकार सोबत असल्यास तुमचा प्रवास अधिक रोचक होईल. ‘सिंहगड ते रायगड’ असे हे साहसी पर्यटन घडवणाऱ्या आणि या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या विठ्ठल आवारीला विचारले, ‘या ट्रेकची तयारी कशी केली?’ विठ्ठल म्हणाला, ‘महाराजांच्या कारकिर्दीतले खूप गाजलेले गड बऱ्याच ट्रेकर्सनी अनेकवेळा केलेले असतात. त्या त्या गडाचा इतिहासही बऱ्याच ट्रेकर्सना थोडाफार माहीत असतो. आपल्या ट्रेकमध्ये शिल्पा परब आणि मिलिंद पराडकर या तज्ज्ञ इतिहासकारांनी मोहिमेदरम्यान ऐतिहासिक माहिती सर्व ट्रेकर्समंडळींना सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे या साहसी मोहिमेचा पायलट ट्रेक दोन वेळा केला असल्याने ट्रेकर्सना सोयीसुविधा पुरवता येणे शक्‍य झाले. त्यामुळेच सिंहगडावरून थेट राजगड न करता राजगडाच्या पायथ्याशी दादेवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. एकेकाळचे राजगडावरचे पहारेदार हणुमती भिकुले हे या गावात राहतात. त्यांच्याच घरी मुक्काम करायचा असे ठरवले. त्याचप्रमाणे राजगडावरून तोरण्याला मुक्काम न करता मेटपिलावरे या दुसऱ्या एका छोट्या गावातल्या शाळेत उतरलो. तेथून भट्टी गाव आणि गिळगाणे गावाजवळच्या जंगलपट्ट्यात खूप पक्षी दिसत असल्याने भट्टीजवळच्या खिंडीतून गिळगाणे गावात थांबलो.’ 

‘या मोहिमेतील सर्वोच्च टप्पा कोणता?’ विठ्ठल म्हणाला, ‘मोहोरीच्या पठारावरून खाली बोराट्याची नाळ - ट्रेकर्सनी सुखरूप पार केली हा सर्वांच्या दृष्टीने रोचक अनुभव होता.’ ‘या मोहिमेत निर्वाणीचा क्षण तुमच्या (आयोजकांच्या) दृष्टीने आला होता का?’ विठ्ठल म्हणाला, ‘पहिले सिंहगड आणि त्यानंतर लगेचच विंझरमार्गे दादेवाडी हे पहिल्या दिवशीचे अंतर पार केल्यावर अनेक जणांनी घरी परतायची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मार्ग म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या सॅक्‍स गाडीने मेटपिलावरे गावापर्यंत पाठवल्या. या छोट्याशा कृतीमुळे सरावलेले ट्रेकर्स पुढचा अवघड टप्पा सहज पूर्ण करू शकले.’ शेवटचा प्रश्‍न विठ्ठलला विचारला, ‘साहसी पर्यटनात अव्वल नंबर पटकावणारा ट्रेक कोणता?’ विठ्ठल म्हणाला, ‘सिंहगड ते रायगड हाच ट्रेक इतर सर्व ट्रेक्‍सपासून वेगळा काढावा असा आहे. या ट्रेकच्या आयोजनामुळे अपार आत्मविश्‍वास मिळाला. त्या बळावरच ‘हिमसह्याद्री’ ही संस्था उभी करू शकलो. त्या संस्थेतर्फे १५ हजार फुटांवरील २५ हून अधिक ट्रेक्‍स मी यशस्वी आयोजित करू शकलो. ही धडाडी आणि जोश मला ‘सिंहगड ते रायगड’ या साहसी मोहिमेनेच दिला.’

संबंधित बातम्या