नव्या भारताचे नवे अंगण

अनुराधा भडसावळे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

पर्यटनासाठी आज नवनव्या वाटा चोखंदळल्या जात आहेत. जंगल भ्रमण, पक्षी निरीक्षण, जलक्रीडा, अभयारण्य, साहसी पर्यटन, आरोग्य पर्यटन, आंबा महोत्सव, हुरडा पार्टी, शॉपिंग फेस्टिव्हल, लोककला महोत्सव इ. प्रकारच्या अनेकविध गोष्टींचा अनुभव पर्यटक घेऊ इच्छित आहे. त्यांपैकी भारत देशाला ‘फाईव्ह स्टार’ दर्जा देऊ शकण्याची क्षमता आहे ती कृषी पर्यटनातच.

कृषी पर्यटनात पर्यटकाला शेती व अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेची अनुभूती घ्यायची असते. हा अनुभव आपल्याच शेतावर शेतकरी सहजपणे देऊ शकतो. त्यासाठी गरज असते ती पिकांच्या हिरवाईने नटलेली, सुबक-सुंदर दिसणारी, फुलाफळांनी बहरलेल्या शेतीची. सुरुवातीला तरी कृषकाला त्यासाठी काही वेगळा खर्च करावा लागत नाही. 

 पर्यटक आपल्या खर्चाने शेतापर्यंत येतात. आनंदी होतात व शेतकऱ्याला प्रतिष्ठा व आर्थिक मोबदला देऊन शेतीचा पाया मजबूत करतात. एवढेच नाही तर केंद्र पसंत पडले, तर त्याचा बोलबालाही करतात.  

असे असले तरीही, आजमितीला शेतीमध्ये काम करण्यासाठी सक्षम तरुणांनी येण्याची सुतराम शक्यता नाही. स्वेच्छेने तरुण वर्ग शेती करत नाही किंवा करू इच्छित नाही. शेतीची नावड ही समस्या सबसिडी, यांत्रिकीकरण, बँक लोन अशा आर्थिक मार्गाने किंवा कृषिमित्र, कृषिभूषण यांसारखे सन्मान देऊनसुद्धा सुटण्यासारखी नाही. वरील उपाय म्हणजे 'मानेला गळू आणि पायाला जळू' या म्हणीप्रमाणे आहेत. शेतकऱ्याला समाजात प्रतिष्ठा नाही. हा खरा रोग आहे.

अन्नदाता शेतकऱ्याने उन्हातान्हात राबल्यामुळे आपली भूक भागली जाते. याविषयी कृतज्ञता तर सोडाच पण साधी जाणीवही समाजातील कुणाला नसते. कृषिवलांना अविरत कष्टाच्या, निसर्गाच्या लहरींवर अवलंबून असणाऱ्या बेभरवशाच्या शेतीच्या कामासाठी प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे हे निश्चित.  

शहरवासीय बांधवांनी, ज्यांच्याकडे शिक्षण, नोकऱ्या, पैसा, सत्ता, बुद्धी, वाहने इत्यादी प्रकारची शक्ती आहे, त्यांनी अन्ननिर्मितीचे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगणात जाऊन त्याला प्रतिष्ठा व आपला आर्थिक सहभाग जाणीवपूर्वक दिला पाहिजे.

सक्षम शहरवासीय खेड्यातील ज्या हिरव्या शेतावर जाऊन शेतकऱ्याला भेटतील त्या अंगणाचे नाव ‘कृषी पर्यटन’ होय.

सगुणा बाग हे प्रथम कृषी प्रकल्प व नंतर पर्यटन केंद्र आहे. पारंपरिक भात पिकाबरोबरच; भाजीपाला, भुईमूग, ऊस, मका, पालेभाज्या, आंबा, नारळ, चिकू, फणस, जांब, पेरू इत्यादी फळबागा, मासे उत्पादनासाठी तलाव, वनशेतीतील बांबू  इत्यादी अनेक कृषी प्रकल्प सगुणा बागेत अविरत सुरू आहेत. १९७६ पासून सगुणा बागेत हिरवाईसाठी घाम गाळणे सुरू झाले. 

कृषी पर्यटनास सुरुवात १९८५ पासून झाली. त्या काळात आमच्याकडे पर्यटकांसाठी एकसारखी भांडी नव्हती किंवा फार मोठी झालेली झाडेही नव्हती. मग असे काय होते की, ज्यामुळे पर्यटक खूश झाले? अनोळखी पाहुण्यांची सेवा करण्याची इच्छा होती. फळती-फुलती शेती होती. सन्मानयुक्त मार्गाने मित्र मिळवण्याची ऊर्मी होती.

कृषी पर्यटनाची व्याख्या
''स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ असलेला उपक्रम म्हणजे कृषी पर्यटन.'' या प्रकल्पाची क्षमता प्रचंड आहे याची जाणीव असल्यामुळेच आमची तिन्ही मुले स्वित्झलँड, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका या देशांत शिकून नोकरी करत असतानाही तेथील मोहमयी दुनियेला रामराम ठोकून ग्रामीण भारतात काम करण्यासाठी परत आली. म्हणून आम्ही ठामपणे सांगू इच्छितो, की कृषी आधारित पर्यटन केल्यास आपली शिकली सवरलेली शहरात गेलेली मुले ग्रामीण भागात परतून येऊ शकतात व तेथेच चांगली जीवनपद्धती उभी करू शकतात.

कृषी पर्यटनाचे फायदे
चांगले मित्र जोडणे जमते : कृषी पर्यटन प्रकल्पामुळे नानाविध शासकीय अधिकाऱ्यांशी गाठीभेटी होतात. अनेक प्रकारचे व्यावसायिक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, विविध ठिकाणच्या लोकांशी संबंध येतात. त्यातून खूप चांगले मित्र मिळू शकतात. हे मित्र आपल्याला अडीअडचणीला फार मदत करतात हा आमचा अनुभव आहे.
शेतमालाची योग्य भावात विक्री : आज सगुणा बागेत १० ते १५ हजार किलो तांदूळ; ३० ते ५० हजार आंबे; सहा ते सात हजार किलो मासे; पाच हजार किलो कडधान्य वर्षाकाठी तयार होते. रोजचे ५० लीटर दूध, भाजीपाला, इत्यादी वस्तूंचे उत्पादन होत असले, तरी त्यातील एकही वस्तू आम्हाला आमच्या गेटच्या बाहेर जाऊन विकावी लागत नाही. शिवाय किंमतही आम्हाला हवी ती मिळते.
रोजगार निर्मिती : कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपल्या गावातील अगदी कमकुवतपासून अत्यंत चाणाक्ष अशा प्रत्येक स्थानिक गरजवंताला आत्मसन्मानाने रोजगार मिळू शकतो. या केंद्रात सुमारे १२५ जणांना त्यांच्या उपयुक्ततेनुसार काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
लोक परंपरांचे जतन : आपली स्थानिक संस्कृती सोडून कुठल्याही वेगळ्या संस्कृतीचे लांगूलचालन करण्याची गरज भासत नाही. आपली भाषा, आपले खाद्य पदार्थ, आपल्या चालीरीतींचे पालन करूनही पर्यटकांची वाहवा मिळवता येते.
स्वच्छ भारत अभियानाशी जोडणी : कृषी पर्यटन केंद्रात आजूबाजूच्या गावातील मुले मदतीसाठी येत असतात. त्यांना वेळोवेळी दिलेल्या शिक्षणानुसार त्यांच्यामध्ये पर्यटन संस्कृती रुजते. पर्यावरण जपले जाते. पर्यटकांच्या येण्याशी रोजी रोटीचा संबंध असल्याने प्रदूषणमुक्त स्वच्छ परिसर ठेवण्याचे सार्वत्रिक प्रयत्न केले जातात. परिसर स्वच्छतेची हमी आपोआप घेतली जाते.
राष्ट्रीय एकात्मता साधणे : शेतकऱ्यांकडे निरीक्षण व अनुभवामुळे निसर्गातल्या, सजीवसृष्टीतील गमतीजमतींचा खजिना असतो. आवाजावरून पक्षी ओळखणे त्याला जमते. वारा वाहण्याच्या दिशेवरून हवामानाचा आडाखा बांधण्याचे कसब त्याच्या ठायी असू शकते.
 या स्वानुभवांच्या अनुषंगाने पाहुण्यांशी संवाद साधताना त्यांचे आनंददायी शिक्षण होते व शेतकरी 'प्रतिष्ठेच्या दुनियेत' आत्मविश्वासाने प्रवेश करतो. गाव व शहर यातील दरी कमी होते. राष्ट्रीय एकात्मता साधली जाते.
अधिक अन्नधान्य उत्पादन : कृषी पर्यटनात पाहुणे शेतावर मजेखातर आलेले असतात. शिवार फेरी हा त्यांच्यासाठी अविभाज्य घटक असतो. त्यामुळे शेतकरी सतत आपली शेती अधिक उत्पादन देणारी फळतीफुलती असेल याकडे कटाक्षाने लक्ष ठेवून असतो.

कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याबाबत
 कृषी पर्यटन केंद्र आपल्या शेतावर सुरू करायचे असेल, तर त्यासाठी लक्षावधी रुपयांचे 'प्रोजेक्ट' करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकऱ्याने एक बेताचे कॉटेज बांधायला पाहिजे. जेथे टॉयलेट मोठे व स्वच्छ असावे. 

आपल्या ठिकाणचे वैशिष्ट्यपूर्ण, रुचकर अन्नपदार्थ आग्रहाने वाढले जावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण केली जावी.

आपले केंद्र चकचकीत - झगझगीत असण्याची, तेथे स्विमिंग पूल, रेन डान्स, डिजे वगैरे असण्याची काहीही गरज नाही. परंतु, केंद्र चालकाकडे खालील गुण जरूर असावेत.
१. अनोळखी पाहुण्यांची सेवा करण्याची वृत्ती.
२. सौंदर्य दृष्टी 
३. आपल्या टीमकडून नियोजनबद्ध काम करून घेण्याचे कसब. 
४. पाहुण्यांच्या दिवसाचे योग्य नियोजन. 
चौतीस वर्षांपूर्वी लहान स्वरूपात सुरुवात झालेली सगुणा बाग 'अतिथी देवो भव' व आपल्या केंद्रावर 'दारूला मज्जाव' या दोन तत्त्वांचा अतिशय सच्चेपणाने अंगीकार करून आज एक नावाजलेले कृषी पर्यटन केंद्र म्हणून लौकिक मिळवून आहे. आमच्या मते या देशातील प्रत्येक शेतकरी, असेल त्या आर्थिक परिस्थितीत सौंदर्य, स्वच्छता, सेवावृत्ती, प्रेमभाव व सांघिक कामाच्या बळावर चांगले पर्यटन केंद्र उभे करू शकतो. कृषी पर्यटनामुळे  जगाच्या पुढील दोन फार मोठ्या समस्यांचे निराकरण होणे शक्य आहे.

१. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाचा तुटवडा : सक्षम तरुण शेती कसण्यासाठी पुढे आल्यास अन्नाचा तुटवडा पडणार नाही.

२. जागतिक तापमान वाढ : 'एसाआरटी'सारख्या शून्य मशागत शेती तंत्राचा अवलंब केल्यास कर्बाचे स्थिरीकरण होऊन तापमानवाढीची तीव्रता कमी होईल. 

'परिवर्तनाशी प्रगती निगडित असते' हा मंत्र ध्यानात ठेवून स्वतःमध्ये व परिसरात योग्य बदल घडवून शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपली प्रगती साधून आत्मसन्मान युक्त उत्तम जीवन जगण्यासाठी पुढे यावे. 
 महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघ (मार्ट) या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने कृषी पर्यटनाचे जनक कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचा 'फादर ऑफ ऍग्रो टुरिझम' या पुरस्काराने दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सगुणा बाग, नेरळ, रायगड येथे सन्मान झाला. 

सगुणा बागेतील पर्यटनाचा बाज पाहिल्यावर, रामकृष्ण मिशनचे स्वामी सुप्रदिप्तानंद उद्‌्‌गारले, 'आख्खा देश जर फाईव्ह स्टार करायचा असेल, तर कृषी पर्यटन हाच त्यासाठी सर्वसमावेशक मार्ग आहे.' यातच कृषी आधारित पर्यटनाचे यश सामावलेले आहे.

संबंधित बातम्या