पळशी आंतरराष्ट्रीय नकाशावर

पांडुरंग तावरे 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

भारत देश तसा कृषी प्रधान देश आहे. कृषी संस्कृतीवर आधारित इथले सगळे सण आहेत. पूर्वी एक म्हण होती - उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. शेतीमध्ये राबणारा शेतकरी राजा म्हणून ओळखला जायचा, तेव्हा राजाला चांगले दिवस होते. स्वतः पुरते शेतीमधून उगवले की त्याचे मन समाधानी असायचे. कुठे जाऊन विक्री करावी लागत नसे. कारण गावामध्ये सगळे उपलब्ध असायचे. केस कापणाऱ्यापासून ते शेतातील धन्य साठवण्यासाठी लागणाऱ्या कणगीपर्यंत धन्य देऊन त्या बदल्यात सगळे मिळायचे. जास्तीचा व्यवहारीपणा नसायचा. जसजसे दिवस गेले, लोकसंख्या वाढली. खाणारी तोंडे वाढली. शेतामध्ये वाटण्या झाल्या. ती करण्यास परवडत नाही म्हणून तीसुद्धा पडीक राहिली. शेती, गाव, आपली माणसे सोडून अनेकजण शहराकडे वळले आणि नोकरी धरली. आता तीनचार पिढ्या शहरातच स्थायिक झाल्या. गावाकडे कधीकधी जत्रा, उरूस असेल, तर देव दर्शन करून परत निघायचे. एवढ्या पुरताच गावाचा काय तो संबंध राहिला आहे. 

कृषी पर्यटन संस्थेने २००३ मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये ४३ टक्के शहरातील लोकांना, गावाकडे एकही नातेवाईक उरला नाही, असे आढळून आले आहे. आता जर त्यांना शेती, शेतकरी, गाव, कृषी संस्कृती जवळून अनुभवायची असेल, दोन दिवस जाऊन शेतामध्ये राहायचे असेल, तर जाणार कोणाकडे? जेवणार कुठे? काय पहणार? काहीही करता येत नाही. परंतु शेती, शेतीची नाळ काही सुटत नाही. आपण जगलेल्या व अनुभवलेल्या सर्व गोष्टी, आपल्या नातवंड, मुलांना अनुभवण्यास मिळत नाहीत याची तळमळ व खंत अनेक जणांच्या मनात आहे. हे ओळखून कृषी पर्यटन विकास संस्थेने 'कृषी पर्यटन' ही कृषीला पूरक पर्यटनाची नवीन संकल्पना मांडली. 

कृषी पर्यटन : कृषी व पर्यटन या दोन अति महत्त्वाच्या विभागांचा समन्वय आहे. शहरातील पर्यटक गावातील शेतीला भेट देतील, शेतीच्या विविध पैलूंचे जवळून दर्शन व अनुभव घेतील. ताजा कृषिमाल, भाजीपाला, फळेफुले, अतिशय रास्त दरात खरेदी करू शकतील, अस्सल गावरान भोजनाचा आस्वाद घेऊ शकतील.

बारामती तालुक्यात पश्चिम पट्यातील पळशी गाव. वाटेत जाताना चहालासुद्धा थांबावेसे न वाटणारे, पिढ्यानपिढ्या पाण्याचे दुर्भिक्ष, पर्जन्यछायेमुळे नेहमीच दुष्काळ ग्रस्त, फक्त पावसावर अवलंबून, त्यामुळे एक किंवा दोन पारंपरिक पिके घेणारे गाव. चहू बाजूला माळरान, दगड धोंडे, १०० टक्के मेंढपाळ समाज, उदरनिर्वाहाचे साधन मेंढीपालन. सहा महिने घाटाच्या खाली आणि सहा महिने घाटावर. कुठलाही पर्यटन व्यावसायिक, पर्यटन केंद्र सुरू करायचे म्हणजे त्याठिकाणी ऐतिहासिक वारसा आहे का, भौगोलिक वारसा आहे का?, डोंगर, दऱ्या, संस्कृती आहे का? पर्यटक येतात का? अशा बऱ्याच गोष्टी पडताळून पाहत, खात्री करून घेतो व नंतरच पर्यटन प्रकल्प उभा करतो. 

यातच खरी कसोटी आहे समजून मी या ठिकाणी कृषी पर्यटन सुरू करण्याचे ठरवले. ते वर्ष होते २००९. सर्व प्रथम पाण्याची सोय करणे गरजेचे होते. ५५ बाय ५५ बाय १० मीटरचे शेततळे करून शेतामध्ये पडणारा पाऊस अडवला. पहिली दोन वर्षे बरा पाऊस झाला. नंतर झाडे लावण्यास सुरुवात केली. भारतीय वंशाची सर्व झाडे लावली. त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, आंबा, कवठ, चिंच अशी विविध प्रकारची झाडे आहेत. नंतर पारंपरिक शेती करीत ज्वारी, बाजरी, हरभरा घेत राहिलो. 

पर्यटन केंद्राचे भूमिपूजन २०१० मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक जिजाबाई शिंदे यांच्या हस्ते केले. पुढे याच पर्यटन केंद्राची सगळी जबाबदारी घेत सर्व कामे करीत आहेत. या पर्यटन केंद्राचे वैशिष्ट्ये म्हणजे हे पर्यटन केंद्र गावातील कारागिरांनी बांधले आहे. गवंडी, सुतार, कामगार सर्वजण पंचक्रोशीतले. पर्यटन केंद्र उभारायला जेवढा खर्च आला तो सर्व पैसा गावातील लोकांना मिळाला. तुम्ही कधी शाश्वत पर्यटन केंद्र होऊ शकता, यासाठी जागतिक पर्यटन संस्थचे (यूएनडब्ल्यूटीओ) शाश्वत पर्यटन विकास करीत असतानाचे काही मापदंड आहेत. उदा. तुम्ही पर्यटनाला बऱ्यापैकी लागणाऱ्या गोष्टी १०० किमीच्या परिसरात खरेदी करणे आवश्यक आहे. पळशीत आपण १५ किमीच्या आतच बऱ्याच गोष्टीचे सोर्सिंग केले आहे. फक्त सिमेंट आणि पत्रा बाहेरून आणला आहे. 

सर्व पर्यटक निवास व्यवस्था पर्यावरणपूरक आहे. उदा. टॉयलेट, बाथरूम रूमला अॅटॅच आहे. परंतु, वर आकाशाकडे खुले असून त्यामुळे दिवसा लाइट, पंखा लागत नाही. रुमध्ये साधी मांडणी आहे. टी.व्ही. नाही, एसी नाही, काही रूम्स शेणाने सारवलेल्या आहेत, लाइटची बटणे पूर्वीच्या काळी असायची तशी गोल आहेत. डोअर बेलच्या जागी बैलांचे घुंगरू लटकवले आहेत. अशा सर्व गोष्टी स्थानिक कारागिरांकडून करून घेतल्या आहेत, त्यामुळे हे पर्यटन केंद्र स्थानिक संस्कृती जपत, पर्यावरणपूरक बांधले आहे. 

महाराष्ट्रात नागपंचमीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. परंतु, हल्ली ही परंपरा लोप पावत चालली आहे. म्हणूच ऑगस्ट २०११ ला नागपंचमीला पंतग जत्रा घेऊन पर्यटन केंद्राचे उदघाटन केले. पर्यटकांची दिनचर्या सकाळी चहा घेऊन सहा वाजता सुरू होते. पक्षी निरीक्षण करत माळरानावर फेरफटका होतो, हेतुपरस्पर लावलेली स्थानिक झाडे, राखून ठेवलेले ग्रास लँड यामुळे पळशी गावात कधीही न दिसणारे पक्षी पर्यटकांना पाहायला मिळतात. नेहमीच ६० पेक्षा जास्त वेगवेगळे पक्षी असतात. नंतर बंबावर तापवलेल्या गरम पाण्याने अंघोळ करून रुचकर नाश्ता करून शिवार फेरी केली जाते. त्यामध्ये ॲग्रो क्लायमेटिक कंडिशन्स, सॉईल टाइप, क्रॉप पॅटर्न, पाणी व्यवस्थापन, असलेल्या पिकांविषयी माहिती पर्यटकांना दिली जाते. तसेच शेतात राखून ठेवलेली स्थानिक झाडे उदा बाभळी, लिंबाची, गावरान बोरीची झाडे, कावळीच्या फोकाची वेलझाडे याबद्दलची सामाजिक व पर्यावरणपूरक कशी आहेत याची माहिती दिली जाते. उदा. कावळीचा फोक - पूर्वीच्या काळी शेती माल पॅकिंग व साठवणुकीसाठी याच फोकापासून बुरूड नावाचा समाज साहित्य तयार करीत असे. त्यामुळे हा समाज गावातील शेतकरी बांधव यांच्याशी आपुलकीचे नाते जपत असे. असे प्रत्येक समाजाचे शेतीपूरक काम असल्याचे सांगितल्यावर गावामध्ये एकोपा असायचा, तसेच आनंदी समाज असायचा. अशा बऱ्याच गोष्टी पर्यटकांना माहीत नसतात. बाभळीच्या झाडाचे महत्त्व, लिंबाच्या झाडाचे महत्त्व, कृषी पर्यटन फेरीत पर्यटक बऱ्याच नवीन गोष्टी शिकतो व त्यातून त्याला बराच आनंद मिळतो. ग्रामीण महिलांकडूनच दुपारच्यावेळी ग्रामीण आस्वादाचे जेवण करून घेतले जाते. कुठलाही मसाला जास्त न वापरता शेतातीलच भाज्या वापरल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना जेवण खूपच आवडते. दुपारच्या विश्रांतीनंतर ग्रामीण खेळ शिकवले जातात. उदा. विट्टीदांडू, गोट्या, भोवरा, सूरपारंब्या, लंगडी, आंधळी कोशिंबीर, सागर गोटे. यातून मुलांना आणि पालकांनाही खूप धमाल येते. पतंग करणे, वावडी तयार करणे, मातीचे बैल तयार करणे असे बरेच खेळ आहेत. संध्याकाळी दिवेलागणीला एकतारी धनगरी भजन, धनगरी गजी नृत्य, जात्यावरची गाणी म्हटली जातात. हे गावातील महिलाच सादर करतात. 

रात्रीचे जेवण झाल्यावर ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहून पर्यटक खूप खूश होतात. या गावात चहालाही न थांबणारे लोकच काय, तर मागील ९ वर्षांत २० देशांतून अनेक पर्यटक इथे कृषी पर्यटनासाठी आले आहेत!

पर्यटक निवास, पर्यटक भोजन व्यवस्था, शिवार फेरी, ग्राम फेरी, शेतीपूरक व्यवसाय भेटी ही सर्व कामे गावातील युवक, महिला करीत आहेत. बऱ्याच पर्यटन स्थळी आपण पाहतो की स्थानिक लोकांचा पर्यटनातला सहभाग फक्त संध्याकाळी नाचगाणी म्हणणे या पुरताच मर्यादित असतो. परंतु, याठिकाणी सगळ्या गोष्टीत स्थानिक लोकांचा सहभाग हेच खूप श्रेष्ठ आहे. जुन्या चिंध्यांपासून गोधड्या करून गावातील महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळाला आहे. 

हे सर्व मापदंड पळशीच्या कृषी पर्यटन केंद्राने पळाले आहेत. म्हणूनच या केंद्राला दोन राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले आहेत. तसेच १० आंतरराष्ट्रीय पर्यटन पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. त्यामध्ये मेक्सिको, जपान, सिंगापूर, अमेरिका, लंडन, फिलिपिन्स इत्यादी देशाचे पर्यटन पुरस्कार मिळाले आहेत. 

शेतकरी बंधूंना एकच सांगायचे आहे, 'कृषी पर्यटन म्हणजे गावाचा संपूर्ण विकास!'

सरकारने आता कृषी पर्यटनाचे महत्त्व ओळखून बरेच निर्णय घेतले आहेत. आजमितीस राज्यात ५२८ कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत असून २०१८-१९ मध्ये पाच हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे, तसेच ७ लाख पर्यटकांनी या सर्व पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या आहेत.

कृषी पर्यटनातून खालीलगोष्टी अपेक्षित आहेत 

  • कृषी मालाची थेट पर्यटकांना विक्री करणे. 
  • स्थानिक कारागीर, महिला बचत गट यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करणे. 
  • स्थानिक महिला, युवक यांना गावातच रोजगार उपलब्ध करणे. 
  • स्थानिक पर्यावरण, स्थानिक संस्कृती, स्थानिक इतिहास, भूगोल या सर्वांचे जतन व संवर्धन करणे.

संबंधित बातम्या