बगीच्याचे नियोजन

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 10 जानेवारी 2019

होम गार्डन
घराभोवती बाग करायची म्हटल्यावर कोणती झाडे लावायची? रचना कशी करायची? माती, सूर्यप्रकाश, पाणी यांची उपलब्धता, पाणी देण्याची व्यवस्था कशी करायची? असे प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरे...

घराभोवतीची बाग घराच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे, पण त्याबाबत योग्य आखणी किंवा नियोजन नसल्यास त्यातून मोठी डोकेदुखीपण निर्माण होऊ शकते. उदा. दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाच्या जागेत, घराभोवती मोठ्या वृक्षांचे नियोजन केल्यास काही वर्षांनी संपूर्ण घरावरती या वृक्षांची सावली येते, झाडांच्या फांद्या धोकादायक ठरतात. तसेच या मोठ्या झालेल्या वृक्षांच्या सावलीमुळे त्या खाली इतर झाडांची वाढ होऊ शकत नाही. शिवाय मोठे झालेले वृक्ष तोडण्यास किंवा त्यांच्या फांद्या तोडण्यास सहजासहजी परवानगी मिळू शकत नाही.

बागेच्या नियोजनामध्ये उपलब्ध सूर्यप्रकाशाचा योग्य वापर, पाण्याचा निचरा, आपण राहातो त्या शहरी किंवा ग्रामीण भागातील हवामान आणि सर्वात शेवटी खर्चाचा मेळ. अर्थात बाग तयार करण्यासाठीचे आपले बजेट या सर्वांचा सखोल विचार हवा. आपल्या बागेत ठराविक झाडांसाठी निवडलेल्या जागा, झाडांची निवड उदा. फक्त फुलझाडे किंवा भाजीपाला, फळझाडे किंवा मिश्र निवड असावी यावरही विचार व्हावा. यासाठी गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. घरामधील फर्निचर, टीव्ही, इ. ची निवड करताना सर्वांची मते घेतली जातात, तेव्हढेच महत्त्व बागेला देण्यात यावे. अनेक ठिकाणी बाग तयार करताना सुरुवातीला मोठ्या आवडीने सर्व गोष्टी केल्या जातात, मोठा खर्चही केला जातो परंतु नंतरच्या देखभालीचे काय? यावर पुरेसा विचार करावा. घरातील सर्वच सदस्यांना बागकामाची आवड व वेळ असेलच असे नाही. मग ही जबाबदारी कोणा एकावर येऊन पडते. माझ्या ओळखीच्या एका बाईंनी असेच चुकीचे निर्णय घेतले. ही बाग आम्ही बघायला गेल्यावर तिथे दीड फूट उंच व सव्वा फूट रुंद अशा दीडशे ते दोनशे मातीच्या कुंड्या एकमेकांस चिकटून ठेवलेल्या आढळल्या या कुंड्यांवर आजूबाजूच्या वृक्षांची पडलेली सावली. कुंड्या तिथून हलवणे किंवा पुनर्भरण (Revamping) करण्यासाठी माणसे मिळेनात. त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागला. 

आज-काल बागकाम माहिती आहे म्हणून ते करणाऱ्यांपेक्षा पैसा मिळवण्याचे साधन म्हणून माळीकाम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ही मंडळी गार्डन डेकॉरमधून काही खतं व कीटकनाशकं आणतात व आपल्या बागेमध्ये फुलझाडांवर यांचा अमर्याद मारा करतात. कित्येकदा माळ्याने आणलेले औषध रासायनिक आहे, हेच आपल्याला माहीत नसते. बाग तयार करताना आपण त्यामध्ये रासायनिक खतं वापरणार, की सेंद्रिय खतं वापरणार हे आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला हवे. ही खतं व कीटकनाशक कोणती त्यांची नावे कोणती व ती कशी वापरावीत याची सखोल माहिती आपण घेणे गरजेचे आहे. माळीकाम करण्यासाठी येणाऱ्या माणसांकडून काय काम करून घ्यावे त्यांचा सल्ला कुठपर्यंत मानावा यासाठी बागकामाची थोडीफार माहिती आपण करून घेणे आवश्‍यक आहे. सर्वसाधारणपणे माळीकामासाठी येणारा माणूस झाडांवर फवारणी करणे, थोडीफार सफाई करणे, पाणी देणे, एवढ्याच गोष्टी करतो. काही जण रोजच माळ्याला बोलावतात व त्याच्याकडूनच सर्व कामे करून घेतात. असा बागकामातून आपल्याला काय आनंद मिळणार? याऐवजी घराभोवतीच्या बागेसाठी आठवड्यातून एकदाच माळी बोलावणे, बागेतील शारीरिक कष्टाची कामे त्याच्याकडून करून घेणे, फवारणी, फांद्या कापणे, झाडांच्या मुळाशी खुरपून माती लावणे त्याच्याकडून स्वतः करून घ्यावीत. असा कामासाठी आठवड्यातील तीन ते चार तास राखून ठेवावेत. या लेखमालेच्या शेवटी माळ्याच्या सल्ल्याने तुमची बाग फुलवण्यापेक्षा तुमच्या सल्ल्याने त्याने माळीकाम करणे. इतका आत्मविश्‍वास तुम्हाला जरूर येईल!

शहरी भागामध्ये पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपल्या घराच्या आवारातील मोठे वृक्ष तोडणे किंवा त्यांच्या फांद्या तोडणे यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता वृक्षांच्या फांद्या तोडणे हा गुन्हा समजला जातो व त्याला मोठा दंड आकारला जातो. नवीन घर बांधतानासुद्धा प्लॉटवरील आधीचे वृक्ष तोड्याची परवानगी घ्यावी लागते. तसेच क्‍लिअरन्स सर्टिफिकेटमध्ये कम्पोस्टिंगची सोय व चार देशी वृक्षांची लागवड आपल्या प्लॉटवर घराच्या आजूबाजूस करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींची नियमावली, तसेच वृक्षांची यादी महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागामध्ये उपलब्ध आहे. पुण्यामध्ये 
संभाजी उद्यानात हे कार्यालय आहे. येथील अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या प्लॉटवरील धोकादायक झाडे किंवा फांद्या तोडणे यासाठीची परवानगी मिळते, पण त्यासाठी बराच वेळ लागतो व पाठपुरावा करावा लागतो. या सर्वांमुळे आपल्याला बागेतील मोठ्या वृक्षांचे नियोजन विचारपूर्वक करावे.

आतापर्यंत आपण नवीन बाग निर्माण करण्यासाठीच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. पुरेसा सूर्यप्रकाश, चांगल्या दर्जाची माती, खतं, पुरेसे पाणी या गोष्टींच्या उपलब्धेबरोबरच आपण झाडांना केलेला प्रेमाचा स्पर्श व स्वतः केलेली देखभाल आपली बाग सुंदर होण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल!   
 

संबंधित बातम्या