बगिचाची तयारी

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 17 जानेवारी 2019

होम गार्डन
 

शहरामध्ये आक्रसत जाणाऱ्या राहण्याच्या जागांचा विचार करताना स्वतंत्र घरे किंवा डुप्लेक्‍सच्या (जोडघरे) पुढचा व मागचा भाग, गच्चीवरील जागा, फ्लॅटमधील गॅलरी किंवा खिडक्‍यांचे कट्टे या जागा विचारात घ्याव्या लागतात. घरात ठेवण्याची झाडे (Indoor plants) कोणती, कुठे व कशी लावावीत, त्यांची काळजी कशी घ्यावी, हे पाहूया

जमिनीवरील बागेची आखणी
शहरी भागामध्ये घराभोवतीच्या बागेसाठी जागेच्या निवडीला फारच कमी वाव असतो. उपलब्ध जागेवरच बागेची सुयोग्य आखणी करावी लागते. नवीन बांधकाम झालेल्या घरांबाबत बांधकामातील सिमेंट, राडारोडा यांचे मिश्रण मातीत मिसळले असेल, तर अशी माती काढून टाकावी लागते. साधारण एक ते दीड फूट खोलीचा भाग रिकामा करून, त्यामध्ये नवीन माती भरून घ्यावी लागते. कित्येकदा जुन्या बागांमध्ये झाडांची वाढ नीट होत नाही. याचे कारण बांधकाम पूर्ण झाल्यावर खाली उरलेला राडारोडा तसाच ठेवून त्यावर मातीचा भर घातलेला असतो. जुन्या बागांचे पुनर्निर्माण करताना जमिनीखाली राडारोडा असेल किंवा वाळवी असेल तर त्यासाठी अगोदरच योग्य औषधे टाकून मग नवीन माती टाकावी लागेल. जमिनीवरील खाचखळगे भरून ती सपाट करून घ्यावी. जमीन चढउताराची असेल, काही भागांमध्ये नैसर्गिक खडक असेल तर तो तसाच ठेवून आखणी करता येते. पावसाळ्यात पाणी साठण्याच्या जागा कोणत्या? पाण्याचा निचरा कसा करता येईल? यावर विचार करावा. मूळ माती मुरूम प्रकारची असेल तर पूर्णपणे काढून टाकावी किंवा त्यात पोयटा किंवा लाल माती मिसळावी. मूळ जागेमध्ये शेतातील चिकट माती  असेल तर काही प्रमाणात वाळू मिक्‍स करून वापर करता येईल. नवीन घराच्या नियोजनात बागेची आखणी करताना, ओल्या कचऱ्याचे कम्पोस्टिंग अथवा बायोगॅस, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासाठीची जागा ठरवावी. कम्पोस्टिंगची जागा घराच्या मागच्या भागामध्ये सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी तसेच इतरांना त्रास होणार नाही याचा विचार करून ठरवावी. ओल्या कचऱ्यावरील बायोगॅससाठी गच्चीवरील काही भाग राखून ठेवता येईल.

छतावरील बागेची आखणी
शहरी गृहरचनांचा विचार केल्यास स्वतंत्र बंगल्यांच्या सोसायट्या किंवा ड्युप्लेक्‍स/ रो हाऊसेस एकमेकांना लागूनच असतात. दोन घरांमध्ये जेमतेम पाच ते दहा फूट मोकळी जागा मिळते. शेजारच्या किंवा मागच्या इमारतीची सावली पडत असल्याने, घराभोवतीच्या जागेत प्रत्यक्ष सूर्यप्रकाश फार वेळ पडत नाही. त्यामुळे अशा जागेमध्ये फुलझाडे व फळझाडे, विशेषतः फळभाज्यांना फळधारणा होऊ शकत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे घराच्या, सोसायटीच्या गच्चीवर बाग तयार करावी. घराच्या अथवा रहिवासी इमारतीच्या छताचा बागेसाठी उपयोग करावयाचा झाल्यास दोन बाबींचे नियोजन अतिशय महत्त्वाचे! एक म्हणजे बागेच्या अतिरिक्त भार पेलण्यासाठीची छताची क्षमता व दुसरे म्हणजे छताचे वॉटरप्रूफिंग केले आहे का?

कोणत्याही इमारतीच्या बांधकामाचे स्ट्रक्‍चरल डिझाइन तयार केले जाते. ठराविक रचनेला विशिष्ट भार पेलेल, की नाही याचे गणित स्ट्रक्‍चरल इंजिनिअर ठरवितात. छोट्या गच्चीतील, बाल्कनीतील बाग करताना स्ट्रक्‍चरल इंजिनिअरच्या सल्ल्याची गरज नसते. फक्त वॉटरप्रूफिंग केले आहे किंवा नाही हे माहीत असणे महत्त्वाचे. मात्र नवीन इमारतीमधील मोठ्या बागांसाठी विशिष्ट स्ट्रक्‍चरल डिझाईनची गरज असते. यामुळे बागेसाठी येणाऱ्या अतिरिक्त भाराची काळजी घेतली जाते. त्याबरोबरच छतावर पडणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी ठराविक ठिकाणी उतार दिला आहे का हेही पाहिले जाते. जुन्या इमारतींच्या छतावर अशा बागा विकसित करताना छताची सध्याची स्थिती व इमारतीचे वय यांचे निरीक्षण करून भार पेलण्याच्या क्षमतेचा अंदाज केला जातो. छतावरील बागेमुळे पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी माती विरहित शेती, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व योग्य झाडांची निवड या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

छतावरील बागेचे नियोजन करताना छताचे जलरोधन केले आहे का हे तपासणे अतिशय महत्त्वाचे. वॉटरप्रूफिंग न करता छतावर बाग विकसित करू नयेच. नाहीतर बागेचा खर्च व मनस्ताप यापलीकडे काही हाती लागणार नाही. छताचे वॉटरप्रूफिंग करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. नियोजनामध्ये छतावर बाग करण्याचे अगोदरच  ठरले असेल तर सध्याचे तंत्रज्ञान म्हणजे ब्रीक बॅट वॉटरप्रूफिंग सर्वात उपयुक्‍त आहे. विटांचे तुकडे सिमेंटच्या लगद्यामध्ये बसवून त्याचे लेव्हलिंग करून एक थर देणे म्हणजे ब्रीक बॅट वॉटरप्रूफिंग होय. अशाच प्रकारे पूर्वी कवडी वॉटरप्रूफिंग करत असत. यामध्ये मोझॅक टाइलचे तुकडे सिमेंटच्या थरात बसवतात.
 
जुन्या इमारतीच्या छतावर बाग विकसीत करताना छताचे निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे. तळाचा भाग तसेच पॅरापिट वॉल, गच्चीचा कठडा यांना किती प्रमाणात चिरा गेल्या आहेत; प्लास्टरला फुगवटा आला आहे का? प्लास्टरवर पोकळ भाग आहे का? हे तपासून पहावे. जास्त प्रमाणात चिरा असतील तर संपूर्ण छतावर पुन्हा एकदा ब्रीक बॅट वॉटरप्रूफिंग करून घ्यावे. चिरा दिसत नसल्या तरीही एक काळजी म्हणून बिटूमिन शीट किंवा डॉ. फिस्कीटचे मिश्रण यांचा एक थर देणे केव्हाही फायद्याचे ठरेल. अर्थात हे सर्व आपल्या माहितीसाठी विस्तृतपणे लिहिले आहे. प्रत्यक्षात वॉटर प्रूफिंग करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच केले जाते. विशेषतः छत आणि पॅरापीटमधील जोड व कठड्याचा पृष्ठभाग येथे या तंत्राचा वापर आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या