उदास का तू?

डॉ. मृण्मयी भजक
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

अमेरिका ः खट्टी-मीठी
अमेरिकावाला नवरा मिळाला म्हणून सगळ्या नातेवाइकांमध्ये मी बराच भाव खाल्ला होता. मलाही खूप छान वाटत होतं अमेरिकेला यायचं म्हणून; पण इथे येऊन हिरमोडच झाला. अमेरिका जशी स्वप्नात पाहिली होती, तशी वाटलीच नाही. 

अमेरिकेत येऊन जेमतेम दोन आठवडे झाले असतील तेव्हाची गोष्ट. अमेरिकेत पंधरा वर्षांपासून स्थायिक असलेल्या माझ्या मावस बहिणीचा फोन आला. मी आनंदाने हाय, हॅलो केलं. पण तिच्या आवाजामध्ये काळजी वाटत होती. 
‘तू बरी आहेस ना?’ तिने अतिशय गंभीरपणे विचारलं. ‘बरी काय गं अगदी मजेत आहे मी’.
‘काय करतेस दिवसभर?’
‘अगं पहिल्यांदाच एवढा मोकळा वेळ मिळाला आहे, त्यामुळे........’ 
माझं बोलणं मधेच  तोडत ती म्हणाली ‘हो ना, इथे तोच एक मोठा प्रश्न असतो.’
‘प्रश्न कसला, मला तर मज्जा वाटतीये.’
‘सुरवातीला वाटते मजा, इथलं सगळं छान छोकीचं वातावरण असतं ना, त्यामुळे भुरळ पडते आपल्याला, पण थोड्याच दिवसात ते सगळं सरून जातं हे लक्षात ठेव.’ 
‘कशाबद्दल बोलत आहेस तू?’ 
‘काही नाही गं, मी जे भोगलं ते तुला भोगायला लागू नये, म्हणून फक्त सावध करत होते.’ 
‘म्हणजे?’
‘इथे आल्यावर बऱ्याच जणींना खूप उदास एकलकोंडं वाटतं. मला तर फारच डिप्रेस्ड  वाटायचं. श्रीधर दिवसभर ऑफिसला जायचा आणि मी दिवसभर घरी. माझी चांगली नोकरी सोडून मी इथे आले होते. त्यामुळे तर आणखीनच वाईट वाटायचं. आमचा मराठी मंडळाचा ग्रुप होता, तरीही मला एकटच वाटायचं सगळ्यांमध्ये. काय होत होतं कळत नव्हतं, अमेरिकावाला नवरा मिळाला म्हणून सगळ्या नातेवाइकांमध्ये मी बराच भाव खाल्ला होता. मलाही खूप छान वाटत होतं अमेरिकेला यायचं म्हणून. पण इथे येऊन हिरमोडच झाला. अमेरिका जशी स्वप्नात पाहिली होती, तशी वाटलीच नाही अजिबात. मी लहानपणापासून शहरात वाढलेले, इथे अमेरिकेतल्या गावात आले. सार्वजनिक वाहतूक नाही, एकटीने कुठे जाता यायचं नाही. व्हिसामुळे मला नोकरी करायला परवानगी नव्हती.  इथे येऊन फक्त एकटेपणच आलं वाट्याला, मी त्या वेळी हे कुणालाही बोलले नाही, पण तुला जर असं काही वाटत असेल तर तू माझ्यापाशी नक्की बोलू शकतेस.’
दीदींचं लग्न झालं तेव्हा ती मेलवरून फोटो पाठवायची. अमेरिकेचे, इथल्या घराचे, तिथल्या मोठाल्या घरांचे आणि कसले कसले. आमच्या नातलगांमध्ये ती किती नशीबवान आहे असाच बोललं जायचं. आणि त्यावेळी दीदी अशी निराश होती? 
आदल्याच दिवशी माझ्याकडे निधीका येऊन गेली होती. तिच्याही बोलण्याचा सूर काहीसा असाच होता. ती इथे येऊन दोन वर्षे झाली होती. ‘नैराश्‍याची लक्षणं काय असतात गं? तू कधी भेटली आहेस का नैराश्‍यग्रस्त व्यक्तीला? तू डॉक्‍टर आहेस म्हणून सहज विचारते हं.’ असं ती पुनः पुन्हा सांगत होती. नंतर ती म्हणाली. ‘माझ्यामध्ये काही नैराश्‍याची लक्षणं आहेत असं वाटतं का गं तुला? ‘अर्थात हे देखील ती अगदी सहज विचारात होती. इथल्या वास्तव्याबाबत एकूण तिचाही सूर काहीसा नकारात्मक होता. 
शेजारच्या इमारतीमधील नीलकमलदेखील सांगत होती की तिला सारखं वाटत राहतं की जर ती भारतात असती तर आत्तापर्यंत बॅंकेत ब्रॅंच मॅनेजर नक्की झाली असती. हा विचार मनात येतो, तेव्हा तिला खूपच अस्वस्थ वाटतंय, उदास वाटतं, हतबल वाटतं. न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालेली मैत्रीण म्हणाली, ‘तुझे आता मजा करायचे दिवस आहेत, मजा करून घे, नंतर आहेच आपलं रटाळ, उदास आयुष्य. ‘म्हणजे कुणाला सुरवातीला तर कुणाला नंतर उदास वाटतच का?
परदेशी जाणं ही खरंतर आनंदाची बाब आहे. आपण नवीन देश अनुभवत असतो, नवीन माणसं, त्यांचं नवीन जग बघत असतो. पण इथे येऊन एवढं एकटेपण का वाटत असेल अनेक जणींना? आपलं काम, नोकरी हे सोडून यावं लागलं म्हणून? अमेरिकेबद्दल अवास्तव अपेक्षांचा फुगा फुटतो म्हणून? भारतात कोणत्या न कोणत्या कामात आपण सदैव गुंतलेले असतो. ते काम विधायक असो वा  नसो, पण आपलं  मन कशाने तरी व्यापलेले असतं. इथे एक निवांतपणा मिळतो. या मिळालेल्या निवांतपणाचं काय करायचं हे माहित नसल्यामुळे वाटत नसेल न उदास इथे आल्यावर?  स्वतःसाठी बराच वेळ मिळतो, स्वतःची सोबत इतकी भयावह, इतकी उदासीन असू शकते का?  यात दोष कुणाचा? अमेरिकेचा, परिस्थितीचा की स्वतःला हाताळता न आलेल्या स्वतःच्याच मनाचा? 

संबंधित बातम्या