गर्रम-गर्रम...

डॉ. मृण्मयी भजक
शुक्रवार, 9 मार्च 2018

अमेरिका ः खट्टी-मीठी
जगात कुठेही गेलो आणि थंडी असली की आपल्याला तर लागतं गरम खाणं आणि लागतो आपला चहा गर्रम गर्रम..

भारतातून अमेरिकेत, सेंट जोसेफ इथं  पोहोचलो, तेव्हा संध्याकाळची वेळ होती. हॉटेलवर उतरून थोड्या वेळाने रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो. आम्ही राहत असलेल्या हॉटेलजवळ एक रेस्टॉरंट होतं, ’क्रॅकर बॅरल’ नावाचे. अमेरिकेतल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. खरंतर खूप काही भूकही  नव्हती. मग मला ओळखीचा दिसलेला पदार्थ मी मागवला. दूध आणि कॉर्न फ्लेक्‍स. नाश्‍त्याला खाण्याचा पदार्थ मी रात्रीच्या जेवणासाठी मागवत होते, याचं आश्‍चर्य त्या वेटर बाईला वाटलंच. पण तरीही मला तेच हवंय असं मी तिला सांगितलं. कडाक्‍याची थंडी नसली तरी आपल्या मानाने तिथे खूपच गारवा होता  त्यामुळे मला काहीतरी गरम गरम पण हलकं खावंसं वाटत होतं. आता बाऊलमध्ये गरम दूध आणि दुसऱ्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लेक्‍स येतील , याची मी वाट बघत होते. मुलासाठी उकडलेले अंड मागवले होतं आणि नवऱ्याने काहीतरी अमेरिकन पदार्थ मागवला. थोड्याच वेळात आमचे सगळे पदार्थ घेऊन वेटर बाई आली. नवऱ्याने मागवलेला पदार्थ त्याच्या पुढ्यात गेला. मुलांसमोर दोन थंड उकडलेली अंडी ठेवली गेली आणि माझ्यासमोर एक रिकामा बाऊल आणि दोन सीलबंद छोटी खोकी ठेवली गेली. एकात कॉर्नफ्लेक्‍स होतं आणि  एकात थंड दूध !

वेटर बाई निघून गेली आणि आम्ही एकमेकांकडे बघत बसलो. असं कसं थंड खाणं देतात हे लोक ? दूध आणि अंडी आम्ही त्यांच्याकडून नंतर गरम करून घेतली. पण नंतर अमेरिकेत अनेकदा 

असा अनुभव आला की हे लोक थंड 

जेवण बऱ्याचदा खातात. शाळेत किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये दुपारच्या सुट्टीत मिळणाऱ्या जेवणाला ते ‘हॉट लंच’ म्हणतात आणि घरून डबा घेऊन गेलं तर ते ’कोल्ड लंच’ म्हणे. ‘हॉट लंच’ म्हणजे गरमागरम वाफाळणारी थाळी असं अजिबात नाही तर काहीतरी बर्गर किंवा तत्सम पदार्थच ! पण जरा गरम. मुलांना दूध देताना पण ते लोक न तापवलेलंच दूध देतात. तीन-साडेतीन लिटरचा कॅन त्यांच्या अगडबंब फ्रीजमध्ये कायम असतो आणि त्यातलं दूध काढून ते तसंच प्यायची त्यांना सवय असते. तिथे बऱ्याच वर्षांपासून राहणाऱ्या भारतीय लोकांनादेखील असं थंड दूध आणि गारढोण जेवण खायची सवय लागली होती . एवढ्या कडाक्‍याच्या थंडीत यांना थंड खाणं कसं खावत असेल हे मात्र मला कळायचं नाही . अमेरिकन लोक शीतपेयातदेखील भरपूर बर्फ 

टाकूनच घेतात. काही वेळा तर ते लोक ग्लासात अर्ध्याहून जास्त बर्फच टाकतात. पाणी पितानाही भरपूर बर्फ त्यात घातला जायचा. खेळांच्या स्पर्धा असल्या की अतिशय आवश्‍यक बाब म्हणजे कुलर ! ज्यात पाणी , शीतपेये अगदी थंड राहतील. तिथल्या दुकानात आईस्क्रीमची तर अक्षरशः बादलीच मिळायची. आइस्क्रीम आणि शीतपेये या गोष्टी तर तिथल्या घरांमध्ये नेहमी असणाऱ्या गोष्टींपैकी होत्या. सॅंडविच, चीज ब्रेड असे पदार्थ ते लोक फ्रिजमधले थंडच खातात. कधी कधी तर फ्रीजमध्ये ठेवून गार करून 

खातात. स्ट्रॉबेरी, चेरी,कन्टालूप अशी 

फळं, सलाडसाठीच्या भाज्या अशा 

गोष्टीही थंड करून खाणे त्यांना जास्त आवडते. 

थंडीची लाट सुरू झालेली असताना एकदा आम्ही शिकागोला गेलो होतो. तिथे भारतीय पदार्थांची काही दुकानं होती. एका दुकानातून मी ओली भेळ मागवली. त्यात घातलेल्या सगळ्या चटण्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या आणि अतिशय थंडगार भेळ माझ्या हाती आली. पहिल्यांदाच अशी थंडगार भेळ मला मिळाली होती, ती ही कडाक्‍याच्या थंडीत. मग भेळीला मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करण्याचा अभिनव प्रयोगही मी तिथे केला.  

गरमागरम वाफाळलेलं म्हणण्यासारखं तिथे मिळणारे एकमेव पेय म्हणजे कॉफी. पण ती त्यांच्या पद्धतीची, काळीकुट्ट. आपण त्यात दूध घालून घेतो, त्यांच्यासारखे आपल्याला काही एक पाकीट (एक चमचा)दूध चालत नाही मग आपल्या पद्धतीची कॉफी बनवण्यासाठी त्यात किमान चार पाच पाकिटं दूध तरी घालावे लागतं. ते घातल्यावर आपल्याला पाहिजे तशी चव तर तयार होते, पण कॉफी थंड झालेली असते. कारण दुधाची पाकिटं ही फ्रिज मध्ये ठेवलेली असल्याने थंड असतात.

एवढ्या कडाक्‍याच्या थंडीतही त्यांचं थंड खाण्यापिण्याचं प्रेम कसं काय टिकून राहायचं कुणास ठाऊक. आपल्याकडे तर त्यांच्याएवढी थंडी कधीच नसते, पण तरीही थोडासा पाऊस पडला की गरमागरम भजी आणि चहा लागतो. थोडीशी थंडी पडली की गरम कपड्यांबरोबर गरमच जेवण लागतं. आणि ऐन थंडीत  कधी थंड दूध पितात का? एवढंही या लोकांना कसं कळत नाही असंही वाटायचं. जगात कुठेही गेलो आणि थंडी असली की आपल्याला तर लागतं गरम खाणं आणि लागतो आपला चहा गर्रम गर्रम..

फोटो फीचर

संबंधित बातम्या