...आणि अमेरिका मोठ्ठीही!

 मृण्मयी भजक 
गुरुवार, 22 मार्च 2018


अमेरिका खट्टी मीठी      

आम्ही भारतात परत जाणार होतो, त्यावेळी तिथल्या अमेरिकन मैत्रिणींना भेट म्हणून एखादी भारतीय वस्तू देता आली तर किती छान होईल असं मला राहून राहून वाटत होतं. काय करावं या विचारात असतानाच मला निधीचा मेसेज आला, मी पुढच्या आठवड्यात भारतातून परत येत आहे, तुझ्यासाठी काही आणायचं आहे का?

मी तिला माझ्या अमेरिकन मैत्रिणीसाठी कुर्ता आणायला सांगितला. उपलब्ध असलेल्या सगळ्यात मोठ्या साईझचा. तिनेही लीनला डोळ्यासमोर ठेवून ट्रिपल एक्‍सेल साइझचा ड्रेस आणला. मी लीनसाठी भारतीय कुर्ता मागवू शकले याचा मला फार आनंद झाला. लीन म्हणजे फक्त नावानेच लीन. तिला भारतीय कपड्यांबद्दल फार आकर्षण होतं. तिला कुणीतरी एक पंजाबी ड्रेस दिला होता, त्याचं वर्णन करताना ती मला नेहमी सांगे, ‘मला तो ड्रेस घातल्यावर राजकुमारीसारखं वाटायचं’. तो ड्रेस आता नाही, याचंही तिला फार वाईट वाटे. सुंदर रंगसंगती आणि नाजूक नक्षीकाम असलेल्या कुर्त्याचे फोटो निधीने मला मेल केले. तो कुर्ता आता मी लीनला देऊ शकणार याचा मला आनंद झाला. लीन घरी आली आणि मी तिला ‘सरप्राऽऽईज’...... असं छान ओरडून तिच्या हातात तो कुर्ता दिला. तिने तो उघडून पाहिला, ‘हा माझ्यासाठी?’, ‘हो ... तुझ्याचसाठी’  पण एका मिनिटाच्या आत तिनेच मला सरप्राईज दिलं, ‘हा छोटा होईल मला’ लीनचा अंदाज बरोबर निघाला. आम्ही दोघीही हिरमुसलो. ‘मोठ्या साईझचा का नाही घेतलास ड्रेस?’ ती रडवेली होत म्हणाली. ‘हा सगळ्यात मोठाच साईझ आहे’ मी म्हणाले. ‘काय ? सगळ्यात मोठा साईझ? अरे देवा, म्हणजे तुमच्या देशात माझ्याएवढं जाड कोणीच नाही?’ ती आश्‍चर्याने म्हणाली आणि हसू लागली. 

मी मनात म्हटलं खरंच मी विचार नव्हता केला पण आमच्या देशात तुझ्याहून लठ्ठ बायका फारच कमी असतील. पण अमेरिकन लोकांमध्ये मात्र लीन एवढी किंवा तिच्याहून अधिक जाड मंडळी बरीच होती. तेव्हा मला त्यांचं जाड असणं आणि आपलं जाड असणं यातला फरक समजला.  

आम्ही पहिल्यांदा अमेरिकेतील दुकानात भाजी आणायला गेलो होतो. छान रचून ठेवलेल्या भाज्यांमध्ये मी बटाटे शोधत होते. ते मला कुठेच दिसेनात. तिथे एक वेगळं रॅक होतं. तिथे पाहिलं तर मोठाले बटाटे मोठमोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक होते. ते बटाटे इतके मोठे की भाजी करायला एका वेळी एकच बटाटा पुरला असता.  बटाट्यांच्या आकाराकडे आश्‍चर्याने बघत असतानाच, मुलगा एक भल्या मोठ्या आकाराची ढोबळी मिरची घेऊन आला. ‘आई हे बघ, किती मोठं आहे’ मग कांदा, लसूण, फ्लॉवर, कोबी, फळं हे सगळेच मोठमोठे बघून कपाळाला हातच लावला होता. मोठा आकार, पण एवढा मोठा? इथे ’कोवळा’ हा शब्दच लागू होत नव्हता. मग इतरही वस्तू सगळ्या मोठ्या आकाराच्या डब्यांमध्येच. दुधाचाही कॅन साडेतीन चार लिटरचा. साधं डिटर्जंट घ्यायचं तरी ते ही मोठा पॅक मधलंच घ्यावं लागे. चॉकलेट, आइस्क्रीम मोठं मोठं. त्यापेक्षाही पुढे म्हणजे तिथे काही होलसेलची दुकानं होती. त्या दुकानांमध्ये या सगळ्या आधीच मोठ्या असलेल्या वस्तू आणखी मोठ्या आकारात मिळत असत. जागेची कमी नसल्याने तिथे घरंही मोठी, ऐसपैस. मागे पुढे अंगण, हिरवळ मोठी. मग लक्षात आलं, घरासमोर लेक तर समुद्रासारखा मोठा होता . त्याच्या आकाराबद्दल काय बोलायचं? तिथल्या बागाही लांबच लांब  इथल्या लोकांना थोडं थोडं छोटं छोटं असं काही आवडतंच नसेल का? कोणतीही नवीन गोष्ट आधी थोडी घेऊन बघावी मग मोठ्या प्रमाणात घ्यावी असं ही वाटत नसेल का? कोणत्याही गोष्टींचे मोठाले आकार पाहता, त्यांच्यामध्ये काही नजाकत, नाजूकपणाच नाही असं ही वाटलं. त्यांना कागदावर लिहायला सांगितलं तरी, कसं बटबटीत अक्षर काढतात ते. आपल्यासारखं एका ओळीत व्यवस्थित बसणारं अक्षर तिथं पाहणंच विरळ.  

म्हणजे एकुणातच अमेरिका मोठी, 
तिचं क्षेत्रफळ मोठं, वस्तूंचे आकार मोठे, गाड्या मोठ्या, घरं मोठी ,माणसं मोठी, सगळंच मोठं...अगडबंब... आणि मला निघताना वाटलं अमेरिका खट्टी, मिठी आणि मोठ्ठीही...

संबंधित बातम्या