संगीतातील स्त्री-पुरुष प्रतिमा 

अंजोर पंचवाडकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

एकदा प्रवासात गाडीतल्या ‘एफएम’वर एक मजेशीर गाणं कानावर पडलं, ‘साडीके फॉलसा कभी मॅच किया रे..’ असे काहीसे शब्द होते त्यात. मला गंमत वाटली, ‘सरकी चुनरिया’, ‘रुखका नकाब’, ‘चेहरेका घूंघट’वरून आता ‘साडीच्या फॉल’पर्यंत नायिकेच्या पोशाखाचं वर्णन पोचलेलं दिसतंय. मग हिंदी चित्रपटगीतातील स्त्रियांच्या रूपाची, तिच्या कपड्यांची वर्णनं असलेली अनेक गाणी मनात रुंजी घालू लागली. ‘अब क्या मिसाल दूं मै तुम्हारे शबाब की’, ‘बदनपे सितारे लपेटे हुए’, ‘रेशमी सलवार कुर्ता जालीका’, ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’, ‘ये चाँदसा रोशन चेहरा’... स्त्रीच्या सौंदर्याचं आणि तिच्या वस्त्रालंकारांचं फार वैविध्यपूर्ण वर्णन हिंदी गाण्यात पाहायला मिळतं. काले/घने/सुनहरे गेसू, उलझलेली लट, कामकमान भवें, जादुभरे नैन किंवा सुरमयी आंखे, गुलाबी होठ, गोरे गाल, गुलाबाच्या डहाळीसारखी झुकलेली मान, कमनीय बांधा, रंगीन आंचल, जाळीदार कुर्ता, रेशमी सलवार, ऊंची सँडल, पायल, चूडिय़ां, झुमके वगैरे. 

पण गाणी आठवताना लक्षात आलं, की एकूणच जुन्या गाण्यांमध्ये नायिकेच्या सौंदर्याची जशी वर्णनं दिसतात तशी पुरुषसौष्ठवाची वर्णनं फारशी दिसत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीनं ‘राजा हरिश्चंद्र’पासून आजतागायत, अनेक विविध विषयांवर चित्रपट दिलेत. मनोरंजनाचा मूळ गाभा न सोडताही अनेक उत्तमोत्तम कलाकृती चंदेरी पडद्यावर सादर झाल्या. तरीही यातला बराचसा भाग हा पुरुषप्रधान नजरेनं व्यापला आहे. आपले बहुतांश चित्रपट Male gaze, पुरुषी नजरेसाठी बनलेले आहेत. पुरुषाला बघायला आवडेल अशी स्त्री (म्हणजे सुंदर, सुस्वभावी वगैरे) आणि स्त्रीला आवडेल असा पुरुष; त्याचे निकषसुद्धा या क्षेत्रातल्या पुरुषांनीच तयार केलेले; म्हणजे ढोबळमानानं जुन्या चित्रपटांमधे नायक गरीब पण हुशार, नीतिवान, हुन्नरी, धाडसी वगैरे. अलीकडं, चांगलं सौष्ठव असलेला, श्रीमंत, परदेशी बिझनेस वगैरे असलेला! नायिका मात्र सुंदरच हवी! (आता याला विद्या बालनच्या कहानी २ सारखे अपवाद आहेतच म्हणा.) 

गाणी ही चित्रपटाच्या कथेला पुढं नेणारी किंवा कथेला अनुरूप असली, तरी एका अर्थी स्वतंत्र असतात. चित्रपटाची कथा, संदर्भ माहीत नसेल तरी गाणं मात्र आवडू शकतं. त्यामुळं चित्रपटातील गाण्यात उतरलेल्या स्त्री-पुरुष प्रतिमा काव्यात्म वस्तू म्हणून पाहता येतात. विविध गीतकारांनी हा विषय कसा हाताळला आहे हे पाहाणं मनोरंजक आहे.

खूप आठवूनसुद्धा पुरुषी सौंदर्याची तारीफ असलेली चित्रपटगीतं फार कमी सापडली. नाही म्हणायला ‘नीली आंखे’, ‘मतवाली आंखे’, ‘चंचल नैनवां’ असे डोळ्यांचे संदर्भ मात्र बरेच आहेत. नायकाच्या कपड्यांचे उल्लेखपण गमतीशीर असतात, ‘तिरछी टोपीवाले’, ‘सरपर टोपी लाल हाथमें रेशमका रुमाल’ असं किंवा ‘पान खाये सैंया हमारो’ या ‘तिसरी क़सम’मधल्या गाण्यात शैलेंद्र लिहितो - 
पान खाये सैंयाँ हमारो 
साँवली सूरतिया होंठ लाल-लाल 
हाय-हाय मलमल का कुरता 
मलमल के कुरते पे छींट लाल-लाल 

‘अलबेला’ चित्रपटातल्या विनोदी ढंगाच्या ‘भोली सुरत दिलके खोटे’ या गाण्यात नायिका पुरुषांना उद्देशून म्हणते, 
रंग-रंगीली इनकी टाई 
घर में लेकिन कड़की छाई 
फॅशन बड़े मोटे मोटे 
नाम बड़े और दर्शन खोटे 

हे गाणं लिहिणाऱ्या राजेंद्र कृष्ण यांनीच ‘मिस मेरी’ चित्रपटात अगदी याच धर्तीचं अजून एक गाणं लिहिलं आहे - ‘होते हैं छोटे दिल के लंबी ज़ुबानवाले.’ (ये मर्द बड़े दिल सर्द बड़े 
बेदर्द न धोखा खाना) 

या गाण्यांवरून एक गोष्ट जाणवली, की त्या काळातली ‘छेड़छाड़’वाली गाणी विनोदी ढंगात पेश केलेली असली तरी स्त्री मोकळेपणी थट्टा करताना दिसते. ‘एक थी लड़की’मधल्या गाजलेल्या ‘लारलप्पा लारलप्पा’ या झिया सरहदीनं लिहिलेल्या गाण्यात, नायिका पुन्हा नायकाची कशी खेचतेय पाहा - 
आजकल के जेंटलमेन 
रहते हैं हरदम बेचैन 
ख़ाली जेब मटकते नैन 
काम करे न काज 
फिर भी अकड़ दिखाए 

नायकाच्या कपड्याचं बाकी वर्णन सोडा, ‘खाली जेब मटकते नैन’ हा टोमणा खासच! 

हिंदी चित्रपटातून दिसणाऱ्या स्त्री आणि पुरुष यांच्या नजरेतला फरक ‘चंदनसा बदन’ या गाण्यात अधोरेखित होतो पाहा (गीतकार इंदिवर). नायकाच्या, म्हणजे मुकेशच्या गाण्यात नायिकेचं वर्णन ‘ये कामकमान भवे तेरी, पलकोंके किनारे कजरा रे’ असं आहे. तर स्त्रीच्या, म्हणजे लताच्या गाण्यात मात्र ‘ये विशाल नयन, जैसे नील गगन, पंछी की तरह खो जाऊ मैं, सरहाना जो हो तेरी बाहों का अंगारों पे सो जाऊ मैं, मेरा बैरागी मन डोल गया, देखी जो अदा तेरी मस्ताना’ असे वैश्विक समर्पण भाव व्यक्त होतात. 

‘सलोना’ नायक आवडत असला तरी त्याच्यावर फिल्मी गाणी फारशी लिहिली गेली नाही. आशाची गैरफिल्मी गजल मात्र आहे, ‘सलोना सा सजन है, और मैं हूँ..’ ‘रागिणी’ (१९५८) चित्रपटात गाणं आहे, ‘छोटासा बालमा, अँखियन नींद चुरा ले गयो..’ मला या ‘छोटासा बालमा’ शब्दाची फार गंमत वाटायची. 

‘फिर वोही दिल लाया हूँ’ चित्रपटातील ‘आंखोसे जो उतरी है दिलमे’ या गाण्यात मात्र मजरूहनं स्त्रीच्या नजरेतून नायकाचं थोडं स्पष्ट शृंगारिक वर्णन केलेलं दिसतं - 
वो उसके लबों पर शोख हँसी 
रँगीन शरारत आँखों में 
साँसों में मोहब्बत की ख़ुशबू 
वो प्यार की धड़कन बातो में 
दुनिया मेरी.. बदल गयी... 
बनके घटा निकल गयी 
तौबा वो नज़र मस्ताने की... 

स्त्री-पुरुष दोघांच्याही गाण्यात काही गोष्टी समान आहेत. उदाहरणार्थ, ‘खुशबू’, ‘चाहुल (आहट)’ किंवा अगदी आपल्या प्रियालाच दुसरा चंद्र मानणं. 

‘रातोंको चोरी चोरी’ (एस. एच. बिहारी) या गाण्यात आशा म्हणते, ‘दो चाँद चमकेंगे मोरी अटरिया, एक तो गगनमें होगा दूजा मोरे अंगना.’ तर मुकेशचं एक गाणं आहे, ‘एक रात में दो दो चाँद खिले एक घूँघटमे एक बदलीमें.’ (राजेंद्र कृष्ण). 

प्रियेच्या चित्राची खऱ्या प्रियेशी तुलना करताना ‘जो बात तुझमे है’ (साहीर लुधियानवी) या गाण्यात रफी म्हणतोय - ‘रंगोमे तेरा अक्स ढला तू ना ढल सकी, सासोंकी आंच जिस्मकी खुशबू न ढल सकी..’ तर ‘अनुपमा’मधल्या ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार’ (कैफ़ी आझमी) मध्ये लता म्हणते - ‘उसके दामन की ख़ुशबू हवाओं में है, उसके कदमों की आहट फ़ज़ाओं में है...’ 

नायिकेच्या शरीरसौष्ठवाचे उल्लेख बटबटीत वाटू शकतात, पण ‘जो बात तुझमे है’ किंवा ‘अब क्या मिसाल दूं’ यासारखी हळुवार गाणी किती मोहक आहेत ना? 

लावणीसारख्या मादक नृत्यप्रकारामुळं असेल कदाचित, या बाबतीत मराठी गाणी हिंदीपेक्षा जास्त धीट आणि थेट वाटतात. १९५९ मध्ये ‘सांगते ऐका’ या चित्रपटातलं गदिमांनी लिहिलेलं, ‘बुगडी माझी सांड़ली गं,’ हेच गाणं बघाना - 
आज अचानक घरी तो आला 
पैरण, फेटा नि पाठीस शेमला 
फार गोड तो मजसी गमला 

किंवा ‘पिंजरा’मधली जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली ही प्रसिद्ध लावणी तर घायाळ करणाऱ्या पुरुषी सौंदर्याचं जबरदस्त उदाहरण आहे - 
गडी अंगानं उभा नि आडवा 
त्याच्या रूपात गावरान गोडवा 
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा 
काळजामंदी ठसला.. 
माझ्या राजाचा न्यारा डौल 
डाव्या डोळ्याचा देतोय कौल 
लहरी पटका, मानेला झटका  
भाला उरी घुसला... 

किती थेट आणि स्पष्ट! 
आता या तोडीचं नाही, तरी थोडंफार याच्या जवळ जाणारं गाणं हिंदीमध्ये गुलजारसाहेबांनी ‘सत्या’साठी लिहिलंय, 
ऊंचा लंबा कद है 
चौड़ा भी तो हद है 
दूरसे दिखता है 
देखने मे तगड़ा है 
जंगल से पकड़ा है 
सिंग दिखता है 

पण नायिकेला असा हा रुबाबदार पुरुष भेटतो तो मात्र स्वप्नात बरं! 
मुंडा मेरा सपनेमे मिलता है! 

स्त्रीच्या नजरेतला आदर्श किंवा तिला हवाहवासा वाटणारा पुरुष कसा असतो? तर जो दिसल्यावर तिचा चेहरा खुशीनं फुलून येतो, डोळ्यात चमक येते. तो दिसायला देखणा, स्वभावानं उमदा, की ज्याच्या येण्यानं मैफिलीत रंग भरला जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, की जेव्हा तो मला आपली म्हणेल तेव्हा मला स्वतःचाच गर्व वाटेल. काय प्रभावीपणं मांडल्यात साहीरनं स्त्रीच्या भावना! ‘वक्त’ चित्रपटात साधना, सुनील दत्तसाठी हे गाणं म्हणतेय. सुनील दत्त देखणा होताच, पण नायिकेनं नायकाला ‘हुस्न की दुनियां’ म्हणणं हे फारच वेगळं आणि खास! 
चेहरे पे ख़ुशी छा जाती है 
आँखों में सुरूर आ जाता है 
जब तुम मुझे अपना कहते हो 
अपने पे ग़ुरूर आ जाता है। 
तुम हुस्न की ख़ुद इक दुनिया हो 
शायद ये तुम्हें मालूम नहीं 
महफ़िल में तुम्हारे आने से 
हर चीज़ पे नूर आ जाता है। 

‘साडीच्या फॉल’मुळं सुरू झालेलं विचारचक्र कुठं कुठं फिरून ‘वक्त’पाशी येऊन पोचलं पाहा. हीच तर खरी संगीताची जादू आणि गाणी आवडण्यातली गंमत आहे.

संबंधित बातम्या